लोकशाहीचा टेंभा मिरवणाऱ्यांना
भूकबळी कशी दिसत
नाही
आमच्या घरात आम्हीच
लोकशाहीत दंगलीने
पेटलेल्या वणव्यात
माणसे जाती, धर्माच्या
कफनात करकचून बांधलेली,
जातीयतेच्या
पिंजऱ्यात
मोहल्ल्याभर दंगलीत
घुसमटलेली
माणसाला माणसातून
उद्ध्वस्त करणारी
ती ही पेटलेली
भूकच.
खांद्यावर उपेक्षितांचे
जनाजे उचलून
खंगलेल्या वाटेवरुन
चालताना
दमलोय बघून
लोकशाहीत उथळ भूक.
कालची भूक, आजची भूक
नेत्यांची खंडीभर
आश्वासने तुपाशी
सत्तेच्या साठमारीत
जनता बिचारी उपाशी
मायबाप सरकार
ही सुध्दा
खुर्चीचीच भूक..!
गरीबाच्या झोपडीत
मूक वेदनेनं तळमळणारी
लोकशाहीच्या
अस्तित्वाला उभा आडवा छेद देणारी
दारिद्र्याचे लेणे
प्रकाश बनलेली
नागड्या, उघड्या देहावर
उमटलेली
रक्त अश्रू पिऊन
यातनेच्या महानगरात
कच्च्याबच्च्यासाठी
विवस्त्र होत
आयुष्याचा पट
मांडणारी
ही सुध्दा निर्भिड
भूकच.
'मदहोश'
चुलीवर असहाय्यपणे पेटणारी
चांदण्याच्या
उजेडात, बंदिस्त
ओठात तडफडणारी
मनातील वादळ मुठीत
धरत
निरगाठ सोडणारी
झोपडीतून निर्लज्ज
बनून रस्त्यावरती येणारी
मोर्चेकरी बनताना
खदखदत
पार्लमेंटवर धडका
देणारी
ही सुध्दा बेधडक
भूकच.
अशोकचक्राच्या
चक्रव्यूहातही समस्त फसलेली
स्वातंत्यदिनी
तिरंग्यातही तडफडलेली
दुष्काळात पाण्याला
विहिरीच्या तळाशी शोधणारी,
विषाणूच्या
महामारीत
अस्वस्थ भूकेची
कोंडी होताना
सामुहिक
चेहऱ्यावरचे हास्य हरवलेली,
चुल आणि मुलासाठी
करपलेली
मेल्यावर 'जनाजातल्या'
निर्जिव देहाला
मूठभर मातीसाठी
लागली
ती सुध्दा भूकच.
- सफरअली इसफ (छायाचित्राचे कॉपीराईट : विकास खोत)
No comments:
Post a Comment