2

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 85 30 52 85 50 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

Tuesday 30 July 2019

शाहिरी सरताज हरपला!


शाहीर अण्णा भाऊ साठे गेले. प्रथम विश्वासच बसला नाही. पण शेवटी सत्य ठरले ते. अण्णा भाऊ गेले. महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेला ललामभूत करून गेले. त्यांनी मराठी लोककलेचा मंच विश्वासानं गाजवून त्याला आज लौकिकाला चढविला. पोवाडा, लावणी, लोकनाट्य (वग) याच नव्हे तर लघुकथा 6 कादंबर्‍यातही त्यांनी दिग्विजय गाजविला.
तसे शाहीर का कमी प्रसविले मराठी माऊलीने? अण्णा भाऊंचे वैशिष्ट्य काय हे अजून बुद्धिजीवी वर्गापर्यंत पोचले नसले तरी अवघ्या महाराष्ट्रातील सामान्यांचा समाज अण्णा भाऊंचे पोवाडे, लावण्या नि वग यांनी प्रथम प्रभावित झाला. मी प्रथम त्यांना ओळखले पोवाडेकार शाहीर म्हणून. तसे पाहता आद्य शाहीर अगीनदास-तुळसीदासापासून, सगनभाऊ तो तहत आजच्या अनेक शाहिरांपर्यंत पोवाडेकार झाले. मग अण्णा भाऊंनी यात वेगळेपण ते काय दाखवलं? मला या थोड्या लेखात ते मांडता येणार नाही, पण शाहिरी जीवन हा महाराष्ट्रानं दिलेला अमोल नजराणा, अण्णा भाऊंनी सार्थकी लावला.
पोवाड्यातून नुसती वर्णनं करून वाडवडिलानी केलेल्या कहाण्या पद्यरूप ऐकवणे हे शाहिराचे काम नाही तर -

’’शाहिरानं जनमन:सागरात सर्वभर संचारून नव्हे तर त्याच्या तळाचा ठाव घेऊन, त्यात चाललेल्या भावनोद्रेकांचा आविष्कार आपल्या लेखणीच्या लालित्यपूर्ण ढंगाने व्यक्त करून, अथवा जनमानस हेलावूनच नव्हे तर त्या सागराच्या कणाकणाला ऊब देऊन, त्याच्या लाटावर पण आरूढ होऊन गगनालाही गवसणी घालावी. तोच मराठी शाहीर.’’

ही उक्ती सार्थ करणारे अण्णा भाऊ हे एकमेव शाहीर होते. पोवाडाहे नवकाव्य नाही. या नवकाव्याचा तर आमच्याकडे खेड्यात थोडीशी किल्लीदेताच कुठंही प्रसव होतो. हे आमच्यातल्या भल्याभल्यांना ठाऊक नाही. त्यामुळे आज नवकाव्य म्हणून काही प्रसवल गेलं की, आमच्यातल्या काही बुद्रुकांना त्याचा वेगळाच साक्षात्कार होतो. त्यांच्या दृष्टीने पोवाडाम्हणजे काहीच नाही, पण पोवाडाहे काव्य सहजसाध्य नाही. त्यातही कमीअधिक असतं. खरा पोवाडातसा बैठकीशिवाय, अभ्यासाशिवाय, चिंतनाशिवाय जमत नाही. त्याचीही एक लय आहे. तंद्री आहे. पण तेवढंच नाही तर त्या शाहिराची प्रतिभा व त्याचा मर्दानीपणाही पण त्यात आहे. बाणा पण आहे.

अण्णा भाऊंजवळ हे सर्व तर होतंच पण अन्यायाची चीडही होती. गुलामगिरीविरुद्ध लढण्याची खुमखुमी होती. दु:ख-दैन्य, दारिद्य्र यांचा नाश करू इच्छिणार्‍या शुद्धरूप गोळ्यांचं कोठारच्या कोठार होतं आणि त्यांच्या मानवतावादाच्या तलवारीला समाजवादाची शास्त्रीय पद्धतीनं चढवलेली धार होती. म्हणून त्यांचा पोवाडाजनमानसात नुसता रवंथकरण्यासाठी जात नसे तर ठिणग्या-ठिणग्यांनी रान उठवीत असे.

त्यांच्या मानवतावादाला समाजवादाची शास्त्रशुद्ध धार होती, म्हणूनच जन्माला येताच, डोळे किलकिले करून जगाकडे बघताच, स्पेनमधील फ्रँकोच्या फॅसिझमविरोधी स्पॅनिश जनतेचा लढा, हा मानवी न्याय्य हक्कासाठी सनातन गुलामगिरीच्या विरुद्ध चाललेला लढा, असा त्या काळच्या नवतरुण अण्णा भाऊ नामे कामगाराला वाटला व त्याने स्पेनच्या स्वातंत्र्यलढ्याचा पोवाडालिहिला. अण्णा भाऊ हे हाडाचे कम्युनिस्ट. अन् कम्युनिस्ट कवी म्हटला की, त्याची कला सर्वथैव प्रचारकी, त्यात खरे काव्य नसलेलीअसा शिक्का त्या काव्याचं वाचन, परिशीलन न करताही दिला जातो. पण उत्तम कला प्रचारकी असतेच नि उत्तम प्रचार हा कलात्मकच असतो, हे सत्य आहे.

त्या दृष्टीने पूर्वीच्या शाहिरांचे पोवाडे व शाहीर अण्णा भाऊंचे पोवाडे अभ्यासणे योग्य होईल. पण त्यामुळे आपली मते चुकीची होती असा शिक्का मिळेल म्हणून काही शहाणे विद्वान विचार करणार नाहीत. पण हा तोकडेपणा आता महाराष्ट्रात बराच कमी झाला आहे. म्हणूनच एके काळचा अवमानित, उपेक्षित कलावंत आज शाहीर अण्णा भाऊ साठेहे नाव घेऊन उच्चभ्रू समाजापुढे मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठामार्फत जाऊन कित्येकदा पोहोचला तर कित्येकदा, त्यानं आपल्या दलित समाजाच्या कर्मकहाण्या सांगून, त्यांच्याकडून मानाचे पानही मिळविले. पण त्यांच्या शाहिरी प्रतिभेची अजूनपर्यंत कधीच पावती त्यांना मिळाली नव्हती, हे खरे.

खरं म्हणजे अलीकडं मनाच्या चोचलेपुरवणीला थोड्या विशिष्ट अशा समाज विभागात भाव आला असला तरी पोवाडा ही कलासुद्धा मराठी साहित्याला भूषवणारी एक कला मराठी साहित्याचाच एक विभाग आहे, ही जाणीव अजून मराठी साहित्यात काडीमात्रही रुजली गेली नाही. इतकेच नव्हे तर तिच्याविषयी साधी दखलही मराठी साहित्यात घेतली जात नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

तसे पाहता, पोवाड्याच्या कलेला वरपर्यंत पोचवणारी मंडळी काही कमी समर्थ नव्हती. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा बाजी प्रभूचा पोवाडा सिंहगडचा पोवाडा या पोवाड्यातील काही ओळी - प्रेमे आणी सिंहगडाचा पोवाडा गाजीअजूनही तळपणार्‍या महाराष्ट्राच्या कंठात झळाळत आहेत, पण सावरकरांच्या पोवाड्याकडं कुणी साहित्य म्हणून पाहिलंय का? त्यानंतर आलेले कवी गोविंद, स्वातंत्र्यशाहीर मुचाटे कधी मराठी साहित्याने त्यांची दखल घेतलीच नाही, तर शाहीर अण्णा भाऊंच्या पोवाड्याची दखल कोण घेणार? हेच मराठी शाहिरीचे दु:ख अण्णा भाऊ गेले पण मला हे कटुसत्य प्रकर्षाने जाणवले.

बापसे बेटा सवाईअसे अण्णा भाऊंनी या क्षेत्रात आपले कर्तृत्व दाखवून आपली स्वत:ची अशी मराठी पोवाड्यात त्यांनी भर घातली. वेगळेपणा दाखवला. पूर्वीच्या शाहिराच्या चालीत तोच तोपणा असायचा. त्यामुळे रसपरिपोष होत नसे. अण्णा भाऊंनी हा दोष आपल्या पोवाड्यातून साफ काढून टाकला.

पोवाडा हा सर्वांगाने विचारपूर्वक पण कलात्मकतेने रचावा लागतो. त्यात पावलोपावली सौंदर्यहानीचे धोके असतात, हे अण्णा भाऊ पूर्ण समजून होते. म्हणून त्यांच्या पोवाड्यात सौंदर्याचे ताजमहाल पदोपदी ऐकणाराला दिसून येतात. आता हेच पाहा ना! महाराष्ट्राचे वर्णन का मराठीत थोड्याथोडक्या कवीनी केले आहे? समर्थ रामदास, टेकाडे, गडकरी, माधव ज्युलियन, आदी सर्वांनी, अन् अलीकडे महाराष्ट्र देश रंगवायला प्रयत्न अनेकांनी केला. पण अण्णा भाऊंचा महाराष्ट्र पाहायचा तर त्यांचा हा पोवाडा रसिकांनी मुद्दाम डोळ्याखालून घालावा. अण्णा भाऊ सह्यगिरीवर उभारून प्रथमच पाय रोवून गर्जतात. ते म्हणतात -

मराठी मायभू आमुची । मराठी भाषिकांची । संत महंताची । ज्ञानवंतांना जन्म देणार । नव रत्नांचे दिव्य भांडार । समर धीर घेति जिथे अवतार । जी जी जी.
शौर्याची अजरामर महति । आजही नांदती । सह्य चलावरति । मावळा दख्खनचा राहणार । स्वाभिमानार्थ जिणे जगणार । मराठा मानी आणि दिलदार । जी जी जी.

अन् आता पहा -

सह्याद्रि पसरला जिथे शेषसमगिरी जी
दौलत घेउनी सत्तावीस गड शिरी जी
भेसूर कड्यावर बुरुज पहारेकरी जी
ताड माड सागाची झाडं त्याच्या शेजारी जी
कळकीचे बेट आकाशास झुकांड्या मारी जी
करवंदि बाभळ आणि बोरी
चिल्लार, कठीण काटेरी
खाली सुपीक शेती जमीन काजळा परी जी
महाराष्ट्राची शेतसरी
सुवर्ण आणि भुईवरी
कापूस, ऊस, गूळ, भेंडी, तूर, तीळ, हवरी
कारळा फुले गोजिरी उधळून महाराष्ट्रावरी
राळ्याचे लोंब पुढे लवून मुजरा करी जी ।

हे नि यापुढचे वर्णन मराठी काव्यमंदिराला अवकळा आणील काय? पुढे अण्णा भाऊ उठून इतिहासात जातात व म्हणतात -

घनघोर महाराष्ट्राची । ज्ञानेश्वरांची ।
गर्जना झाली ॥ संस्कृत भाषेची भिंत ।
करुनि आघात । त्यांनी फोडिली ॥
ती काय मराठी बोली । बाहेर काढिली ।
स्वैर षोडिली ॥ अज्ञाना, दील-दलिता ।
भगवद्गीता । त्यांनी वदविली ॥
दांभिकांशी अति दुर्दमनीय लढा त्यांनी दिधला ॥
महाराष्ट्राची परंपरा ती पुढती नेण्याला ॥
अन्यायावरी मात करोनी त्यांनी त्या समया ॥
अमुची मराठी आम्हा शिकविली परतुन बोलाया ॥
तो संत राणा हो श्रेष्ठ ।
साहुनि कष्ट दंडण्या दुष्ट या अवनीवर अवतरला ।
भूषवून महाराष्ट्राला तो वंद्य झाला जगताला ।
दिले उघडूनि ज्ञानाचे कोठारची आम्हाला ।
महाराष्ट्राची परंपरा ती पुढती नेण्याला ॥

संत ज्ञानेश्वरांचं जीवनकार्य इतक्या सोप्या भाषेत सांगून, त्यांतील सौंदर्यस्थळांचा विकास साधीत साधीत, ज्ञानेश्वरांच्या कार्याची महती गाऊन, तिला महाराष्ट्राच्या परंपरेला जुंपून, आपल्या वाढत्या सामाजिक जाणिवांबरोबर महाराष्ट्रप्रेमाचा डंका ते वाजवतात. अण्णा भाऊ निघतात पुढे. श्री शिवरायांचे दर्शन घडवतात अन् त्यांनी घडविलेला इतिहास किती चित्रमय पद्धतीने, नवकाव्यात्मक धुंदीने रंगवतात तेही पाहण्यासारखे आहे. ते म्हणतात (चित्राबरोबर धावणारी चालही अति मनोवेधक आहे)

मेघापरि हाक देते झाले शिवाजी ।
मग उठे तानाजी । बहिर्जी नि येसाजी ।
हंबीरराव आणि बाजी । मालुसरे आले
सूर्याजी हो मावळे मर्द रणगाजी जी जी जी
पुढं काय होतं? (गुलामगिरीविषयी जाण येताच)
करवंदी पार झिंगलेली ।
ऐकून हाक हर्षली ॥
दरडीने जांभई दिली ।
कळकीने मान डुलविली ॥
किल्ल्याने धाप टाकिली ।
बुरुजाने बाहू उभविली ॥
त्या भयाण जाळीखाली ।
तलवार चमकू लागली ॥
(चाल बदल) राखाया महाराष्ट्रा ।

उठे मरहट्टा । रण करण्याला ॥
भुईकोट किल्ल्याच्या तटा ।
मारुती रट्टा पाडू लागला ॥
पट्टा घेऊन रोखिल्या वाटा ।
वैर्‍याचा पिट्टा । त्याने पाडीला ॥

पुन: पुन: अण्णा भाऊ पालुपद घेतात-परंपरेचं
रणधुमाळीमध्ये हेटकरी रक्ताने न्हालेला ।
महाराष्ट्राची परंपरा ती पुढती नेण्याला ॥
तसेच महाराष्ट्रात इंठाजांचं आगमन बघायचंय? पहा -

एके दिवशी अरबी सागर ।
होऊन स्थिर । होता झोपला ॥
आणि त्याच्या उशाशेजारी ।
मराठा गडकरी । होता बैसला ॥
तोफेस घालुनी गोळा ।        
लावुनी डोळा । पहारा करण्याला ॥ 
त्या शांत मध्यरात्रीला ।
करायला हल्ला इंठाज आला ॥

शेवटी इंठाजांची डर्बी नौका पालथी होते. मग अण्णा भाऊ म्हणतात -

किति मुंडकी तुटली त्यावेळी
पाण्यात प्रेते बुडाली
आणि लाटांवरती टोपडी तरंगु लागली ॥
रक्ताची लाली दर्याला रंगीन आली ॥
पराजया मग पदरी घेऊन क्षणभर दम घ्याया ॥
गोर्‍यानी गाठली मुंबई जखमा बांधाया ॥ जी ॥
आंग्र्‍याच्या आरमारा नदीपती मार्ग देता झाला ।
महाराष्ट्राची परंपरा ती पुढती नेण्याला ॥

तीच परंपरा गात अण्णा भाऊ बेचाळीसच्या सातार्‍यात जातात-

बंदूक ठासून बसे शेतकरी तेली तांबोळी ।
गुलामगिरी होळी पेटवून मग मारी गोळी ॥
नांगर सोडुनी कुळव सोडूनी मोहही सर्वाचा ।
मालक होऊन मिरवू लागला तो महाराष्ट्राचा ॥
(चाल) त्याने ठाामराज्ये स्थापिली ।
नाकी बसविली । सातार्‍यास पहिली ॥
अशक्य आज असलेले । ते शेतकर्‍यांना दिसले ।
त्यांनी शक्य करून दाविले ॥
शेतकर्‍यांचा साहाय्यक वाली सह्याद्री झाला ।
महाराष्ट्राची परंपरा ती पुढती नेण्याला ॥

अण्णा भाऊंवर लिहायचं? काय लिहायचं? ते आले गटारीतून, अक्षरश: अनंत दु:खे भोगून, कोळशाच्या पाट्या वाहून, कुणाची मुलं सांभाळून, कुणाची कुत्री सांभाळून, कधी कसली तर कधी कसली बोझी वाहून, दारिद्य्र, दारिद्य्र असा आवाज सदा घुमवणार्‍या मोरबाग गिरणीच्या डाफर खात्यातून... अनंत दु:खे साहूनही त्यांच्या साहित्यात, काव्यात, व्यक्तीत गुरफटलेले, त्या व्यक्तिमत्त्वाचे स्तोम माजवून चोचले करून घेणारे-आपल्या दु:खाचा बाऊ करून आपल्या नसलेल्या जखमा वेशीवर धूत बसल्याचे ढोंग करणारे अण्णा भाऊ, मला कधीच दिसले नाहीत. अभ्यास अभ्यास ध्यास घेऊन समाजाभिमुख होऊन, सामाजिक जुलूम, अन्याय यांना आपल्या समर्थ अन् मर्द लेखणीने कलापूर्ण झुंज देणारे अण्णा भाऊ मला आयुष्यभर मिळाले. त्यांनी खूप प्रेम दिले. आम्ही दोघेही समकालीन उशाला उसं लावून एका ताटातली अर्धी भाकर खाल्ली. आमच्या उभयतात कधी एखाद्या काळ्या ढगाचा पुंजका येऊन जायचाही. पण गंगायमुनेगत आम्हा दोघांना, अडाणी-अशिक्षितांना-कम्युनिस्ट पार्टीनं घडवलं होतं, माणूस बनवलं होतं. ही कृतज्ञता आमच्यात नसेल तर आम्ही प्रत्यक्ष आईशीही कृतघ्न राहू असे आम्हाला वाटत होतं. आमच्यातल्या साम्राज्यवाद-विरोधाला त्यामुळेच धार आली. वर्गीय जाणीव आली-व्यक्तीचा बडेजाव मेला होता. म्हणूनच अण्णा भाऊ, लेखणीची तोफ करून, दिव्यात तेल नसेल तर सार्वजनिक बत्तीखाली बसून, कलेद्वारे समाजक्रांतीचे पोवाडे लिहीत होते, आपल्या सहकार्‍यांच्या हाती देत होते, देशात, विश्वात होणार्‍या उलथापालथीकडं ड्युटीवरच्या सैनिकाप्रमाणे एकेकाळी डोळ्यात तेल घालून पाहत होते.

त्यांनी लिहिलेला बंगालचा पोवाडा व माझे बंगालवरचे कवन घेऊन बंगाल कलापथकाबरोबर महाराष्ट्रभर हिंडलो. त्यांचा बंगाल दुष्काळाचा पोवाडा इतका गाजला की, श्री. विनय रॉय यांनी मराठी पोवाड्याच्याच चालीवर त्याचे भाषांतर करून कलकत्त्याला रेकॉर्ड केला व त्याच्यावर बंगालच्या उड्या पडत असलेल्या मी पाहिल्या. पंजाब, दिल्ली दंग्याचा पोवाडा व त्यातील सौंदर्यस्थळे व त्यातील हाक आग अन् विशाल मानवतेचे शाहीर अण्णा भाऊ, तो पोवाडा वाचल्याशिवाय कळणार नाहीत. तेवढा वाव आज नाही.

पोवाड्याच्या कलेला वेगळी बैठक देणारे अण्णा भाऊ, पोवाडा सौंदर्यपूर्ण उभा करणारे अण्णा भाऊ, पोवाड्याद्वारे जनजागृती साधून-जनशिक्षण करून जनतेच्या हातून पराक्रम घडवून आणणारे अण्णा भाऊ व्यक्तिजीवनात अतीव दु:खी होते, सर्व सर्व प्रकारे. तरीही त्यांनी आपल्या व्यक्तिगत दु:खाचं स्तोम माजविले नाही. पण त्यांच्या पोवाडा कलेलामहाराष्ट्र शारदेच्या मंदिरात (तिचाच सच्चा पुत्र असून) स्थान नाही. यामुळे ते फार फार होरपळून जात. ही उपेक्षा त्यांना जन्मभर जाणवली. असे म्हणून मला कुणाला दुखवायचे नाही. पण अण्णा भाऊ आता गेले आहेत. आता तरी त्यांच्या होरपळणुकीची दखल घ्यावी, एवढेच.

- शाहीर अमर शेख

Thursday 25 July 2019

‘टाहोरा’ : जंगलझाडीतल्या दु:खानुभवांची अस्सल कविता


कमीत कमी भाषिक अवकाशात गुंतागुंतीचा आणि समृद्ध अनुभव व्यक्त करण्याचे माध्यम असलेला कविता हा वाङ्मयप्रकार सर्जनाचे अवघड माध्यम समजला जातो. कमीत कमी भाषिक अवकाशात गुंतागुंतीचा आणि समृद्ध अनुभव व्यक्त करण्याचे माध्यम असलेला कविता हा वाङ्मयप्रकार सर्जनाचे अवघड माध्यम समजला जातो. असे असूनही मराठीत कविता उदंड प्रमाणात लिहिली जाते. परिणामी कवितेच्या रूपबंधाकडे लक्ष न देताही विविध अनुभव आणि आशयसूत्रे कवितेमधून व्यक्त होत आहेत. यात महानगरीय संवेदनशीलतेतून व्यक्त होणारे अनुभव आहेत. महानगरांमधला कल्लोळ, मानवी संघर्ष, तिथले सामाजिक-सांस्कृतिक स्तरांवरचे शोषणाचे, अगतिकतेचे आणि असहायतेचे प्रकार, विशिष्ट वर्गात बोकाळलेली चंगळवादी वृत्ती, जागतिकीकरणाच्या दाबामुळे बदललेली वेगवान जीवनशैली इत्यादी अनुभव महानगरीय संवेदनशीलतेच्या कवितेतून व्यक्त होत आहेत.

ज्यांना ग्रामीण संवेदनशीलतेतून व्यक्त होणारे अनुभव म्हणता येतील असे अनुभवही कवितेत व्यक्त होत आहेत. या अनुभवांची दाहकता आणि सकसता अधिक मूल्ययुक्तही आहे. अशा कवितांची संख्याही वाढते आहे. राजकीय- सामाजिक- सांस्कृतिक स्तरांवर सत्तास्थानी असणारा वर्ग हा कष्ट करणाऱ्या, राबणाऱ्या, मातीशी नाते असलेल्या, सर्वार्थाने तळाच्या वर्गाचे करीत असलेले शोषण, या वर्गाचा अस्तित्वासाठीचा जीवनसंघर्ष, त्याची प्राप्त परिस्थितीतली विकलता, ग्रामीण पातळीवरील सर्वच स्तरांवरचे गुंतागुंतीचे होत चाललेले जीवन, निसर्गनिर्मित आणि मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा होणारा विनाश, जागतिकीकरणाचा रेटा, महानगरीय जीवनशैलीचा ग्रामसंस्कृतीवर वाढलेला प्रभाव व त्यापायी तिथल्या निरागस, सर्वसमावेशी संस्कृतीची होणारी विद्रूप अवस्था, अस्मितांच्या राजकारणामुळे वाढलेल्या जातीय तेढी व पेच इत्यादी आशयसूत्रे ग्रामीण कवितांमधून व्यक्त होत आहेत. याचबरोबरीने गावकुसाबाहेरच्या जिण्याचे, तिथल्या शोषणाचे व भयावह जीवनसंघर्षांचे चित्रणही कवितेत साकारत आहे. महानगरीय संवेदनशीलतेतून व्यक्त होणारे अनुभव वगळता उपरोक्त सर्व जीवनानुभव हे एक प्रकारचे परिघाबाहेरचे जीवनानुभव आहेत.परंतु सर्वसाधारणपणे ज्याला परिघाबाहेरचे जीवन वा अनुभव म्हटले जाते, त्याच्याही पल्याड एक वास्तवअसते आणि ते महानगरातल्या माणसांना पूर्णपणे अपरिचित असते. अशा परिघाबाहेरच्या जीवनानुभवांच्याही पल्याडच्या वास्तवानुभवाचा साक्षात प्रत्यय देणारा आणि कवितेच्या रूपबंधाचेही पुरते भान असलेला कवी अनिल साबळे यांचा टाहोराहा लक्षणीय व वैशिष्टय़पूर्ण कवितासंग्रह लोकवाङ्मय गृहाने प्रसिद्ध केला आहे.



कवी साबळे हे अगदी अलीकडच्या काळातील कवी आहेत. ते दूरस्थ ग्रामीण भागात राहतात. त्यामुळे शहरी कवी संमेलने आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांच्याशी त्यांचा कमीत कमी संबंध येत असावा. त्यांच्या दैनंदिन जीवनसंघर्षांत या घटकांना प्राधान्य वा स्थानही नसावे. त्यांचा हा चरित्रात्मक तपशील सारांशाने देण्याचे कारण असे की, या सर्वच कारणांनी ते मराठीच्या मोठय़ा सांस्कृतिक पर्यावरणाला फारसे परिचित नाहीत. (शिवाय या चरित्रात्मक तपशिलांचा त्यांच्या कवितांमधील भावानुभवांशी जवळचा व दूरचा संबंध आहे, हेही त्यांच्या कवितेला सामोरे जाताना लक्षात घ्यायला हवे.) अलीकडच्या काही वर्षांमध्ये काही वाङ्मयीन नियतकालिकांनी मात्र त्यांच्या कविता आवर्जून प्रसिद्ध केल्या. त्यांना साहित्य अकादमीने प्रवास शिष्यवृत्ती दिल्याचेही ऐकिवात आहे. मराठीच्या वाङ्मयीन पर्यावरणाशी एवढाच काय तो त्यांचा संबंध असावा.

प्रारंभीच परिघाबाहेरच्याही पल्याडचे वास्तव सांगणारा हा कवितासंग्रह आहेअसे म्हणण्याचे कारण असे की, आजवर मराठी कवितेला अपरिचित असणाऱ्या जंगलझाडीतल्या आंतरविश्वाचा वेध घेणारा हा कवितासंग्रह आहे. जंगलझाडीतील माणसे, त्यांचा जीवनसंघर्ष, त्यांचे परस्परांशी असलेले संबंध, त्यांचे सण-उत्सव, त्यांच्या श्रद्धा-अंधश्रद्धा, त्यांची दु:खे, त्यांच्या दैनंदिन जगण्यात उद्भवणारे संघर्षांचे प्रसंग- घटना- घटिते, त्यांचे सभोवतालच्या परिसराशी, तिथल्या स्थित्यंतरांशी, डोंगर-दऱ्या, ओढे-नद्या-नाले, वृक्षवल्ली, पशुपक्षी, जीवजीवाणू यांच्याशी असलेले सौहार्दाचे किंवा संघर्षांचेही नाते, जंगलझाडीतले भक्ष्य आणि भक्षक संबंध, तिथल्या आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांचा जगणे आणि शिक्षणासाठी चाललेला संघर्ष या सगळ्याचे प्रत्ययकारक दर्शन या कवितासंग्रहातून होते. किंबहुना, हे सगळे घटक या संग्रहाच्या केंद्रस्थानी आहेत. या घटकांमधून रान-जंगल संस्कृतीचा अनोखा प्रत्यय या कवितांमधून उत्कटपणे येतो. हे अनुभवविश्व मराठी कवितेला जवळपास अनोळखी असेच आहे. हे या कवितासंग्रहाचे प्रथमदर्शनीच प्रत्ययाला येणारे वैशिष्टय़.

लोकवाड़्मय गृहाचे "टाहोरा" हे पुस्तक ऑनलाईन खरेदी करण्यासाठी भेट द्या आमच्या वेबसाईटला... (सवलत मूल्य फक्त 117 रु.) http://lokvangmaybooks.com/index.php?route=product/product&product_id=277&search=टाहोरा

समाजवास्तवाचे भान व्यक्त करणारी समाजलक्ष्यी कविता आज मराठीत विपुल लिहिली जाते आहे. त्यादृष्टीने पाहता मराठीतले समाजलक्ष्यी अनुभवांच्या कवितांचे दालन समृद्ध आहे असे म्हणता येईल. टाहोरासंग्रहातील कविताही समाजलक्ष्यी/ समूहलक्ष्यी अनुभवांच्याच कविता आहेत. किंबहुना, ‘टाहोराया शीर्षकाचा अर्थच मुळी ढोल बडवण्याचा लाकडी दांडाहा आहे! कवी आपल्या कवितांतून जंगलझाडीतल्या दु:खांकडे इतर समाजघटकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यासाठी त्याची कविता एक प्रकारे टाहोराबनते आहे. शीर्षकापासूनच या कवितांचे समाजलक्ष्यीत्व/ समूहलक्ष्यीत्व सुरू होते. मात्र, या कवितांमधून सामोरा येणारा समाज हा विशिष्टआहे. तो शहरी वा महानगरातील नाही. तो विशिष्ट परिसरात, जंगलझाडीत, तिथे उपलब्ध असलेल्या नैसर्गिक संसाधनांत अभावग्रस्त अवस्थेत जगणारा आदिवासी समाज आहे. रानसंस्कृती हीच त्याची शाळा आहे. ज्या पशुपक्ष्यांवर त्याची अपार माया आहे, त्यांचीच प्रसंगी शिकार करून तो आपले आणि आपल्या कुटुंबाचे उदरभरण करीत आहे. जीवनदायिनी नद्या-नाले, त्याला आपल्यात सामावून घेत आहेत. तो सुरक्षित आणि स्थिर आयुष्य जगतच नाही. त्याचे वास्तव्याचे ठिकाण ऋ तुचक्रानुसार बदलत राहते. (पावसाळ्यात डोंगराच्या गडदेत/ हिवाळ्यात वीटभट्टीवर/ उन्हाळ्यात रोजगार हमीच्या सडकेवर’) शिक्षणाच्या, आरोग्याच्या, विकासाच्या सोयी-सुविधा त्याच्यापर्यंत यंत्रणा पोहोचू देत नाहीत. किंबहुना, वेठबिगारीचा करार करणाऱ्या, वीटभट्टीची उचल देणाऱ्या, वन खात्याचे पंचनामे करणाऱ्या अशा ग्रामपातळीवर कार्यरत असणाऱ्या भ्रष्ट आणि बेमुर्वतखोर यंत्रणांनी त्याचा जणू अंगठाच कापून घेतला आहे. शोषण करणाऱ्या या व्यवस्थांकडून नागवला जाणारा आदिवासी समाज हा इतर समाजघटकांना एक प्रकारे पारंपरिक एकलव्याच्या मिथकाचीच सतत आठवण करून देतो. त्याला स्वप्नभंगाच्या वास्तवाला सतत सामोरे जावे लागते. विकास, शहरीकरण आणि आधुनिकीकरण यांच्या नावाखाली चाललेला सभोवतालच्या पर्यावरणाचा विध्वंस त्याला असहायपणे पाहावा लागतो. तिथली नैसर्गिक मूल-संस्कृती तिच्यातील सर्व आदिम आणि सुसंस्कृत घटकांसह नष्ट होत आहे. या कवितांमधून प्रकट होणाऱ्या समाजलक्ष्यी/ समूहलक्ष्यी जाणिवेचे स्वरूप हे असे विदारक आणि व्यापक आहे. मराठी कवितेत नव्याने प्रकटणारी ही समाजलक्ष्यी जाणीव वास्तवाचे नवे भान देणारी आहे. म्हणूनच तर ती वैशिष्टय़पूर्ण आहे.


नवे वास्तवभान देणाऱ्या या अनुभवांच्या बरोबरीनेच कवीचे आत्मपर/ आत्मलक्ष्यी स्वरूपाचे अनुभवदेखील या कवितांमधून व्यक्त होतात. आत्मपर/ आत्मलक्ष्यी जाणीव आणि सामाजिक वास्तवानुभव यांची विलक्षण सरमिसळ या कवितासंग्रहात झालेली आहे. हा कवी जेव्हा आत्मपर/ स्वलक्ष्यी अनुभव साकार करीत असतो तेव्हा त्याच्या सभोवतालचे जीवन, त्याला लगडून असलेल्या घटना-घटिते अपरिहार्यपणे कवितेच्या रूपात साकार होत राहतात. उजव्या हाताची बोटे सांभाळण्याच्या भावाच्या सूचनेतून आदिवासी समाजात नुकतीच कुठे शिक्षणाची सुरुवात होते आहे, ही जाणीव होते. तिथेच आपल्या मुलाला बैतवार शिकीवअशी ताकीद देणारी मायमाऊली भेटते. आश्रमशाळेतल्या मुलांच्या वास्तव परिस्थितीने कवीला स्वत:च्या घराची आठवण होते.

आत्मपर/ आत्मलक्ष्यी अनुभव आणि रानसंस्कृतीमधले शोषणयुक्त वास्तव यांचीही अशीच सरमिसळ होत राहते. घरात पाळलेल्या कोंबडय़ा, शेळ्या, गाईगुरे यांच्याविषयी ओतप्रोत जिव्हाळा असणाऱ्या स्त्रीमधल्या मातृत्वभावाचे दर्शनही या अनुभवांतून होते. खेडय़ांतल्या तरुणांना स्वप्नभंगाचे दु:ख सोसून, परिस्थितीपुढे अगतिकपणे माघार घेऊन उदरनिर्वाहासाठी शहराची धरावी लागणारी वाट अशा आत्मलक्ष्यी अनुभवांतून प्रतीत होत राहते. आश्रमशाळेतल्या मुलांना कवीविषयी असणारा अपार स्नेह आणि त्या दोहोंतला भावबंध अशा अनुभवांतून झिरपत राहतो. ग्रामसंस्कृती आणि नागर संस्कृती यांच्यातले ताण अशा आत्मपर अनुभवांतूनच व्यक्त होत राहतात. कवी स्वानुभव/ आत्मपर अनुभवकथन करत करत स्वातंत्र्योत्तर काळात बोकाळलेली स्वार्थी वृत्ती, शोषण, दारिद्रय़, अभावग्रस्तता, स्त्रियांची फरपट, आसुरी धर्मभावनेमुळे माणसामाणसांमध्ये उभ्या राहिलेल्या जाती- धर्म- पंथाच्या भिंती आणि या साऱ्या घटकांमुळे बदलत गेलेले ऱ्हासमय जीवन यांचे भेदक वास्तव आपल्यासमोर साकार करतो. मराठीतील काही कवी-कवयित्री समाजलक्ष्यी/ वास्तवलक्ष्यी अनुभवांच्या काठावर उभे राहून अशा अनुभवांचे केवळ वर्णनकवितेतून करत राहतात. प्रसंगी त्यांच्या कवितांमध्ये टिपेचास्वर लागतो. मात्र, हा कवी स्वत:च सामाजिक वास्तवानुभवांच्या केंद्रस्थानी उभा राहून सभोवतालच्या जीवनसंघर्षांकडे अतीव मानवी करुणेने पाहत असल्याने आणि हे सगळे अनुभव घटक त्याच्या जगण्याचे आणि काव्यात्म व्यक्तिमत्त्वाचेदेखील अविभाज्य भाग झाल्याने अशा आत्मपर/ आत्मलक्ष्यी अनुभवांमधूनदेखील समाजलक्ष्यी/ वास्तवलक्ष्यी अनुभव साकार होत राहतात. परिणामी, या कवितांना अस्सल काव्यमूल्यही प्राप्त होते. ही प्रक्रिया मराठीत अगदी मोजक्याच कवींच्या कवितांमध्ये घडल्याचे प्रत्ययाला येते.


 या कवितांमधून व्यक्त होणारे अनुभव केवळ वर्णनाच्या पातळीवर राहत नाहीत. कारण ते प्रत्यक्ष माणसांच्या अनुभवांतून, जीवनसंघर्षांतून प्रकट होत राहतात. पुष्कळ माणसे या कवितांमधून वाचकांना भेटतात. रंजिता, मंदा गावडे, नवनाथ माळी, कवीचा मित्र, वडील, आई, बहीण, ठाकर दादा, तानाजी, सुईण, कादीर, सखाराम साबळे, आश्रमशाळेतली निराधार मुले ही सारी या जंगलझाडीतल्या कुटुंबव्यवस्थेतील, जीवनव्यवस्थेतील, गावगाडय़ातील माणसे, मुले आहेत. या प्रत्येकाच्या अनुभवांच्या विदीर्ण करणाऱ्या स्वतंत्र कहाण्या आहेत. जंगलझाडीतील निसर्गनिर्मित संकटे, निरनिराळ्या यंत्रणांनी व व्यवस्थांनी निर्माण केलेल्या संकटांशी आकांत न करता झगडणारी आणि तरीही जीवनसंघर्षांत एकमेकांच्या आणि रानसंस्कृतीच्याही आधाराने टिकून राहणारी ही माणसे आहेत. त्यांच्या जगण्याच्या विजीगिषु वृत्तीचा प्रत्यय या जीवनकहाण्यांमधून येतो आणि महानगरीय वाचकांना तो स्तिमित करतो. नारायण सुर्वे, नामदेव ढसाळांनी स्खलनशील महानगरीय संस्कृतीतील माणसे आणि त्यांच्या जीवनकहाण्या आपल्या कवितांमधून चितारल्या. कवी साबळे त्याहीपलीकडे जातात आणि आजवर दुर्लक्षित राहिलेल्या माणसांच्या अस्पर्शित जीवनकहाण्यांद्वारे मानवी सामर्थ्यांचे दर्शन घडवतात. यातून त्यांची निखळ मानवतावादी जीवनदृष्टी प्रतीत होत राहते. प्रत्यक्ष जंगलझाडीतील माणसांच्या जीवनानुभवांचा गहिरा स्पर्श या कवितांना झाल्यामुळे त्यांना अस्सलत्व प्राप्त झालेले आहे.


सामान्यत: आजची मराठी कविता ही दोन घटकांच्या संयोगातून निर्माण केलेल्या प्रतिमा प्रतीके व रूपके यांच्याद्वारे व्यक्त होते. तिच्यातून शब्दांचा, ओळींचा अतिव्ययदेखील केला जातो. परिणामी अशा कविता क्लिष्ट होतात. त्यांना दुबरेधता प्राप्त होते. कवी साबळे प्रामुख्याने आजच्या मराठी कवितेची ही प्रचलित शैली बाजूला ठेवतात आणि कथाशैली अवलंबून आपला अनुभव थेट सुबोधपणे प्रक्षेपित करतात. त्यामुळे त्यांना अनुभव आणि भावात्मकता यांचे एकात्मीकरणही करता आले आहे. इथल्या प्रतिमा, प्रतीके, रूपके जंगलझाडीतल्या, रानसंस्कृतीतल्या पर्यावरणातील आहेत. ती कवीच्या निकडीच्या भावानुभवाला व्यक्त करण्यासाठी अनिवार्यपणे येतात आणि अपेक्षित भावानुभवाला समृद्ध करतात. त्यास स्पष्ट असे दृश्यात्मक रूप देतात. या कवितांमधून भावानुभव तीव्रपणे साकार होतोच; शिवाय वाचकांना प्रत्यक्ष दृश्यरूपात दिसतोदेखील! अशा रचनात्मक शैलीच्या शक्यता फार मोठय़ा असतात. हा कवी या शैलीमुळे भावी काळात विशाल मानवी जीवनपट, जीवनानुभव साक्षात करू शकतो. याचा प्रत्यय त्याच्या या पहिल्याच कवितासंग्रहामधून येतो. या कविता प्रमाण मराठीत लिहिल्या गेल्या असल्या तरीदेखील कवीने काही वेळा बोलीभाषेचा, त्यामधील उच्चारांचा, त्यातल्या आर्त आवाहनांचा, संबोधनांचा अर्थपूर्णरीत्या वापर केला आहे. तो औचित्यपूर्ण आहे. त्यामुळेही काव्यानुभव भावात्मक होतो. त्यातून उन्नत अशी कातरता झिरपत राहते.

आज जीवनाच्या सर्वच क्षेत्रांवर जागतिकीकरणाचा दाब वाढलेला आहे. याला वाङ्मयीन क्षेत्रही अपवाद नाही. अशा परिस्थितीत साबळे यांच्या कवितांमधून मात्र सच्चा देशी अनुभव निखळ स्वरूपात साकार होतो. ही प्रक्रिया भावानुभव आणि त्याचे आविष्करण या दोन्ही पातळ्यांवर घडते. कवी साबळे यांना आपल्या समृद्ध काव्यपरंपरेचे पुरते भान आहे. (कविता- तुम्ही पहाटेच्या अंधारात शब्द गोळा करायला निघून जायचे’) साठोत्तरी काळातही सुर्वे, ढसाळ, नारायण कुळकर्णी-कवठेकर, अनुराधा पाटील आणि अरुण काळे या मानवतावादी कवी-कवयित्रींच्या परंपरेतील ही कविता या काव्यपरंपरेला जीवनानुभव आणि त्यांच्या आविष्करणाचे नवे आयाम प्राप्त करून देते. म्हणूनच वाचकांनी टाहोराकवितासंग्रहातील जंगलझाडीतल्या दु:खानुभवांच्या या अस्सल कवितांचे भरभरून स्वागत करावयास हवे.

- नीलकंठ कदम
(साभार : लोकसत्ता 21 जुलै 2019)

Friday 19 July 2019

जगण्यासाठी लढणार्‍या माणसाची कथा!


अण्णा भाऊ साठ्यांच्या कथांचे एका वाक्यात वर्णन करावयाचे झाल्यास असे सांगता येईल की त्या जगण्यासाठी लढणार्या माणसांच्या कथा आहेत. आपल्या कथांमध्ये निरनिराळी माणसे त्यांनी रंगविली आहेत. पण सर्वांच्या रक्तांतून एकच लढाऊ ईर्षा वाहत आहे. त्या सर्वांना मानाने जगायचे आहे. अंगांत असेल नसेल तेवढे बळ एकवटून त्यांना आक्रमक वृत्तींशी सामना द्यायचा आहे आणि त्यांत त्यांना जिंकायचेही आहे.

हा त्यांचा गुण डोळ्यात प्रथम भरतो. ती कच खाणारी, हार मानणारी माणसे नाहीत. वार झेलायला त्यांची छाती नेहमीच ताठ्याने उभारलेली आहे. धडक द्यायला मस्तक नेहमीच पुढे झुगारलेले आहे. त्यांच्या कथांमध्ये इथून-तिथून एकच झुंजार मराठबाणा आवेशाने स्फुरताना दिसून येतो. अण्णा भाऊंच्या कथेतल्या माणसांचा पिंड हा असा कणखर आणि टणक आहे. जीवनाच्या सामान्य धडपडीतदेखील मराठ्यांचे हे क्षात्रतेज लोपलेले दिसत नाही. त्या पराक्रमी कथा अण्णा भाऊंनी तितक्याच तेजस्वी भाषेत रंगविल्या आहेत.


मराठी साहित्यात ग्रामीण वाङ्मयाचा एक स्वतंत्र वैशिष्ट्यपूर्ण असा वर्ग निर्माण झालेला दिसतो. त्यात कर्हाड-सातार्याकडील जीवनाचे चित्रण विपुल प्रमाणात केलेले आढळते. अण्णा भाऊंची कथाही सातारच्या पंचक्रोशीतच वावरत आहे. वारणेच्या खोर्यातच तिचा श्वासोच्छ्वास चालला आहे. त्यांच्या कथांचा जन्म सह्याद्रीच्या त्या ऐतिहासिक दर्याखोर्यातच झाला आहे. पण मराठीतल्या इतर सातारकरांपेक्षा अण्णा भाऊंची तर्हा वेगळी आहे. छत्रपतींच्या घोड्याची सातारच्या मातीत रुजलेली पाऊलखूण आपल्या छातीवर अभिमानाने मिरवणारे अण्णा भाऊ इतरांपेक्षा निराळ्या तेजाने डोळ्यात भरतात. सातारची माणसे इतरांनी पुष्कळ रंगविली आहेत. शब्दांना नुसता आकार देणे सोपे आहे. त्या आकाराला आत्मा देणे त्याहून अवघड आहे. तेदेखील काही लेखकांना सहज साधून जाते. पण त्या आत्म्यामागची इतिहासपरंपरा शोधणे आणि तिचा अर्थ लावता येणे फार अवघड आहे. ते सहसा साधत नाही. पण ते अण्णा भाऊंना जमले आहे. सहज लिहिता लिहिता जमून गेले आहे.

मराठी माणूस रंगविताना त्यांनी त्याच्या मराठा वृत्तीची आठवण सतत जागी ठेवली आहे आणि तिला आलेला विजेचा फुलोरा त्यांच्या कथांतून जागोजागी तळपताना आढळतो. म्हणून देहात प्राण असेतो झगडणार्या मराठी माणसांचे त्यांच्या कथेतले चित्र अविस्मरणीय ठरते ह्यात शंका नाही. एवढेच नव्हे तर ते मराठी वाचकांचे मराठी मन सुखविणारे ठरले आहे.


खुळंवाडी’, ‘विष्णुपंत कुळकर्णी’, ‘रामोशी’, ‘बंडवालाआणिमेंढाह्या कथांतून लढाऊ मराठी बाण्याचे दर्शन विशेष चमकदारपणे होते. मंजुळेच्या अब्रूला रेसभरही धक्का लागताच खवळून आनंदराव पाटलाचा हात तोडणाराखुळंवाडीतला सखुबा खुळा, ‘कुत्र्यासारखं मरुं नकाअसा दुष्काळांत आदेश देऊन मांगांना पाठीशी घालून त्यांच्या चोरीचे समर्थन करणारा बाणेदारविष्णुपंत कुळकर्णी’, जुलुमाने घेतलेल्या जमिनीसाठी इमानदाराला टक्कर देणाराबंडवालातात्या मांग, डोंगरे-चव्हाणांच्या वैरापायी पोटचा पोर बळी गेल्यामुळे कुर्हाड घेऊन उठलेलायदु रामोशीआणि मेंढ्यांच्या झुंजीतही मानापमानाची लढत देणारामेंढाकथेतला हिंमतबाज लखू माने, ह्या सर्व व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वांतून एकच सूत्र वाहते आहे. ही गुमान बसणारी भ्याड माणसे नाहीत. अपमानाने त्यांचे रक्त उसळून उठते. प्रसंगी त्यांतून सूडही पेट घेतो. पण अन्यायाला, आक्रमणाला ठेचून काढल्याशिवाय ती स्वस्थ बसत नाहीत. अशी ही सारी कडवट आणि तिखट माणसे तलवारीच्या लखलखीत पात्यासारखीं चमकतात, त्यांच्या धारेचे भय आणि कौतुक वाटू लागते.

अण्णा भाऊंच्या कथेत असा हा आवेशाचा पीळ करकचून भरलेला आहे, पण त्यांना विनोदाचे वावडे मात्र मुळीच नाही. किंबहुना लढायचे असेल तेव्हा लढणारी पण एरवी हंसणारी अशी त्यांच्या कथेतली माणसे आहेत. ‘तीन भाकरी’, ‘पिराजीची भानगड’, ‘शिकार’, ‘कोंबडी चोर’, आणिमरीआईचा गाडाह्या त्यांच्या कथांचा आत्मा संपूर्णतया विनोदी आणि खेळकर आहे. पण त्यांच्या विनोदाची जात काही वेगळीच आहे. दैन्य आणि दारिद्य्र ह्यांनी कावलेल्या आणि खंगलेल्या जीवनात जी विसंगती आणि अपूर्णता निर्माण होते, त्यांतच त्यांच्या विनोदाचे बीज रुजले आहे. त्यामुळे वास्तविक ज्या उणिवेचे दु:ख करायचे त्यासाठी कित्येकदा हसायची अथवा ते हसण्यावारी घालवायची पाळी येेते. कारण माणसामध्ये ही जी अपूर्णता अथवा विसंगती निर्माण होते तिला जबाबदार तो नसतो. त्याचे दैन्य वा दारिद्य्र असते. पण त्यातही माणसे जी धडपड चालवितात त्यांतूनच काही विनोद निर्माण होतो. हीदेखील एक प्रकारची जगण्याची ईर्षाच म्हणता येईल.

पिराजीची भानगडकोंबडी चोरह्या दोन कथा ह्या दृष्टीने विनोदाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून नमूद करता येतील. पहिल्या कथेतला पिराजी काय किंवा दुसर्या कथेतला रामू काय, दोघांच्या हातून गुन्हे घडतात ते पोटाची आग शमविण्यासाठीच. इतरांची फजिती उडविता उडविता कधी कधी त्यांचीही फजिती होते. आपण करतो ते चुकते आहे हे त्यांना समजत नाही असे मात्र नव्हे. पश्चात्तापाने पोळलेला पिराजी म्हणतो, ‘‘आता मला ह्यो गाव नगं! ...म्या लई भानगडी केल्या. अब्रू गेली-कळा गेली, पार पार गेली’’ जे जीवन त्यांनी पत्करले आहे त्याला जबाबदार ते नाहीत, हे अण्णा भाऊ वाचकांना इतक्या नकळत पटवून देतात की त्यामुळे ह्या उपद्व्यापी प्राण्यांबद्दल कधी अनुकंपा वाटू लागते हे आपल्यालाही समजत नाही. कारुण्य वा हास्य या दोहोंचा उगम एकाच परिस्थितीतून होतो हे सूत्र अण्णा भाऊंना पुरते समजले आहे.


अण्णा भाऊंच्या कथेचे आणखी एक आकर्षक अंग म्हणजे तिची गहिरी भाषा आणि तिच्यातली चित्तहारी वर्णने. त्यांच्या भाषेत मोकळ्या हवेत पोसल्याने येणारा रसरशीतपणा आणि कसदारपणा आहे. त्यांच्या कथेतल्या व्यक्तींइतकीच ती कणखर आणि तेजदार आहे. भाल्याच्या फेकीप्रमाणे त्यांच्या वाक्याची झेप मर्मभेदी व पल्लेदार आहे. ते अर्थानुकूल शब्द वापरतात ते कसे अगदी कोंदणात मोती बसवल्यासारखे.

दगडाच्या खिळ्यात उगवणारे झाड जसे वाकडे-तिकडे वर यावे, तद्वत पिराजीचे मन अनंत अडचणींच्या दगडातून वाकडेतिकडे होऊन वर आले होते’, ‘कूडसं पडून तोंडओळख मोडली होती’, ‘प्रकाशाची पाचर अंधारात खोल गेली’, ‘बगळा बैलाच्या गोचड्या तोडतो, त्यो काय बैलावर उपकार म्हनं नवं, तर आपलं प्वाट भराया पाई’, ‘तो जीव घोटाळेपर्यन्त बोले म्हणून लोक त्याला बडबड्या केरु म्हणत’, इत्यादी अनेक वाक्ये अशी पटपटा वेंचून त्यांच्या मराठमोळ्या जिवंत भाषेचे नमुने म्हणून दाखल्यास्तव पुढे करता येतील. ते व्यक्तीचे वा प्रसंगाचे वर्णन करतात तेदेखील अशाच प्रभावी शब्दांत. ‘सारे विश्व घेऊन बसलेल्या त्या अंधाराची मूठ आता सैल होत होती. नवे वारे कपारीवरून धावत होते. अठरा भार वनस्पतींचा सुगंध वार्याने पुढे पळत होता. वृक्षराजींच्या मुखावर तजेला आला होता. पूर्वेने लाल प्रकाशाचा मळवट भरला होता. त्यामुळे सर्व जीवजंतू मानवाच्या दृष्टीत एकरूप होत होते. दवबिंदूच्या सिंचनाने न्हाईलेले प्रचंड दगड हत्तीप्रमाणे लोळत असल्याचा भास होत होता आणि दूर सोनेरी पिकांनी नटलेला तळवट धुक्यातून बाहेर निघत होता’. हे सह्याद्रीच्या परिसराचे वर्णन एखाद्या चित्रपटाच्या सुरवातीच्या दृश्यासारखे धावते आणि नयनसुभग वाटते.


अण्णा भाऊंच्या कथांमध्ये नाट्य आहे. जीवनाचे वास्तव नाटक त्यांच्या कथेत अगदी संघर्षाच्या वातावरणात खेळते आहे. त्यांतले संवाद बोलके आणि झणझणीत वाटतात. क्रोध, असूया, सूड, हिंमत इत्यादी प्रखर भावनांचे लखलखते पाणी त्यांच्या संवादांना आगळीच घाट आणते. त्यांच्या कथेतली माणसे ढोंग जाणीत नाहीत. ती आपल्या भावना रोखठोकपणे बोलून दाखवितात. जे कृतीने करायचे आहे त्याचाच उच्चार त्यांच्या बोलण्यातून होत असतो.

माणसाने जगलं पाहिजेअसा संदेश देणारी अण्णा भाऊंची अस्सल मराठी बाण्याची कथा मराठी वाचकांना नुसता आनंदच देऊन थांबणार नाही तर त्यांच्या अंगी लढाऊ जोम निर्माण करील, त्यांच्या रक्ताला बंडाची प्रेरणा देईल ह्यात तिळमात्र शंका वाटत नाही.

- आचार्य अत्रे

माणगाव परिषद : बहिष्कृतांचे रणशिंग - उत्तम कांबळे

'अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद ’ हा उत्तम कांबळे यांचा ग्रंथ ‘ लोकवाङ् ‌ मय गृह ’ तर्फे लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. एका ऐति...