2

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 85 30 52 85 50 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

Saturday 9 May 2020

दडपशाहीच्या पात्याने चिरलेला क्रांतीस्वर : हेलिन बोलेक



शारीर प्रेमात पडण्याच्या वयात हेलिन डाव्या विचारसरणीच्या प्रेमात पडली. संगीताची नैसर्गिक आवड आणि गाता गळा यामुळे ती योरूमच्या संपर्कात आली. सेल्मा अल्टीन, इनान अल्टीन, इब्राहीम गोस्केक, अली अराकी, बरीस युक्सेल या योरूमच्या मूळ सहकाऱ्यांना नंतर येऊन जुळलेले केमाल साहिर गुरेल, मेलीन कहरामन, हिमी यारायिया, इल्की अकाया, इफ कान सेसेन यांच्यात एक नाव जोडले गेले, ते होते हेलिन बोलेक.
जगातील लोकशाही मूल्यव्यस्थेचे बीजारोपण आणि तिचे बहरणे अनेक लोकांच्या रक्ताच्या सिंचनातूनच उभे ठाकले आहे. हळूहळू ही व्यवस्थाच नैसर्गिक आणि आदर्श असल्याचं जगातल्या बहुतांश राष्ट्रांनी मान्य करून तिचा अंगिकार केला. प्रजासत्ताक व्यवस्था माणसाच्या शांत-संयमित जगण्याचे आणि म्हणूनच त्याच्या प्रगतीचे, अपरिहार्यपणे त्याच्या सुसंस्कृतपणाचे आणि ती नसणे म्हणजे रानटीपणा असं मानण्याइतपत आता साऱ्या जागाची मजल गेली आहे. परंतु माणसांच्या मनातील सर्वसत्तामान होण्याची अभिलाषा मात्र कधीच संपली नाही. यासंदर्भात त्याच्यात असलेली त्याची सरंजामी जनुकं त्याच्या आंतर्मनात धडकी देतच राहिले.


संधीच्या शोधातील हे लोकशाही व्यवस्थेचे शिकारी आता उजव्या विचारांचे म्हणून पुन्हा जगभर धुमाकूळ घालायला लागले आहेत. भारतासहित, अमेरिका, पोलंड, ईस्रायल, इटली, हंगेरी, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जपान आणि मुस्तफा केमाल अतातुर्कने अत्यंत सुनियोजित पद्धतीने लोकशाही मूल्यांची ९० वर्षांपूर्वी बीजारोपण केलेले तुर्कस्थान असे सारेच देश सत्तांधांच्या वावटळीत गटांगळ्या खात, लोकशाही व्यवस्थेची मूळं खिळखिळी करण्याच्या अट्टाहासाने प्रज्वलित झाली आहेत. आत्यांतिक राष्ट्रवादाच्या नावाखाली आपापल्या कालबाह्य  रूढी आणि परंपरांच्या कवट्यांतील मगज कोरत त्याला अग्नी देत, यातील घूम्रवलयाने समाजाला गूंगीत आणण्याचा प्रयत्न जगभरातील हे  उजव्या विचारसरणीचे सत्ताधीश मोठ्या नेटाने करीत आहेत.

तुर्कस्तानचे बारावे राष्ट्राध्यक्ष रेकेप तय्यीब एर्दोगन हे अशा अनेकांपैकी एक. आपल्या देशाला पुन्हा एकदा इस्लामी राष्ट्र करण्याच्या मानसिकतेने झपाटलेल्या एर्दोगनने आपल्या इलेक्शन मोहिमेमध्ये मुस्तफा केमाल अतातुर्कने रूजविलेल्या तुर्कस्तानच्या लोकशाही व्यवस्थेवर उघडउघड टिका करणे सुरू केले होते. त्याचवेळी त्याच्या विरोधकांनी याला तुर्कस्तानचा ऑटोमन एम्पायर व्हायचे आहे’, अशी त्याच्यावर टिकेची झोड उठविली होती. त्याला उत्तर म्हणून  त्याने बेमुर्वतपणे ऑटोमन एम्पायरपेक्षा आपल्याला राणी एलिझाबेथ द्वितीय व्हायला आवडेल’, असे जाहीरपणे उत्तर दिले होते.

अशा या उर्मटपणाविरोधात तुर्कस्तानमध्ये विविध संघटनांच्या माध्यमातून गत काही काळापासून आवाज उठायला लागला  होता. १९८५ मघ्ये स्थापन झालेला योरूमरॉक संगीत बँड हा त्यापैकीच एक.  संपूर्णपणे डाव्या विचारसणीने प्रभावित असलेल्या योरूम रॉक संगीत बँडच्या माध्यमातून, सरकारच्या लोकशाहीविरोधी धोरणांवर टिका करीत सामान्य लोकांच्या शोषणाविरोधातील स्वर आपल्या गाण्यांच्या माध्यमातून मांडणाऱ्या योरूमला तुर्कस्तानमध्ये मोठी लोकप्रियता प्राप्त झाली आहे. केवळ तुर्कस्थानमध्येच नव्हे तर जर्मनी, ऑस्ट्रीया, फ्रान्स, इटली, नेदरलँड, बेल्जियम, डेन्मार्क, ग्रीस, यु.के. या देशांतही योरूमने आपले अनेक शो सादर केले आहेत. या बँडमधील कलावंतांच्या मनातील सामान्य माणसाविषयीचा कळवळा आणि एकूणच शोषण व्यवस्थेविरेधातील स्वर, तुर्कीच नव्हे तर इतर राष्ट्रांतील लोकांना आणि विशेषत: तरूणांना अधिक भावत आहेत.

युरोप आणि आशिया या दोन्ही खंडात येणारे तुर्कस्तानचे वैशिष्ट्यपूर्ण शहर म्हणजे इस्तांबुल’. स्वाभाविकच पाश्चात्य आणि पौर्वात्य संस्कृतीच्या खुणा आपल्या अंगाखांद्यावर खेळवणारं हे शहर. १९९२ मध्ये इथेच हेलिन बोलेकचा जन्म झाला. शारीर प्रेमात पडण्याच्या वयात हेलिन डाव्या विचारसरणीच्या प्रेमात पडली. संगीताची नैसर्गिक आवड आणि गाता गळा यामुळे ती योरूमच्या संपर्कात आली. सेल्मा अल्टीन, इनान अल्टीन, इब्राहीम गोस्केक, अली अराकी, बरीस युक्सेल या योरूमच्या मूळ सहकाऱ्यांना नंतर येऊन जुळलेले केमाल साहिर गुरेल, मेलीन कहरामन, हिमी यारायिया, इल्की अकाया, इफ कान सेसेन यांच्यात एक नाव जोडले गेले, ते होते हेलिन बोलेक. हेलिनचा गळा गाणारा. जणू तिच्या स्वरांतून मनात खोलवर दडलेल्या सामान्यांविषयीच्या वेदना, कारूण्याची लय घेऊन ठिणग्यांचा खेळ मांडायच्या. तिच्या गाण्याला हजारोंची उपस्थिती बेहोश होऊन साथ द्यायची. तिचा आवेगात्मक, आक्रोशणारा स्वर लोकांच्या काळजाला जखम करीत न्यायचा. तिच्या ह्रदयाच्या तळापासून प्रकट होणाऱ्या माणसाविषयीच्या कळवळ्याने ओथंबलेल्या सूरांत लोकं चिंब व्हायचे.

शोषणाविरोधातील उठणारी कोणतीही नजर सत्तांधांना नेहमीच कासावीस करीत असते. कारण ही नजर हळुवारपणे त्यांच्या सत्ताबुरूजाखाली असंतोषाचा दारूगोळा पेरीत असल्याची भित्ती त्यांना बेचैन करीत असते. कुर्दीश प्रश्नावरून एर्दोगन सरकारविरोधात २०१६ मध्ये येथील लष्कराने उठाव केला. तो अपयशी ठरला असला तरी त्यामुळे अधिकच भयकंपित झालेल्या एर्दोगन सरकारने आपल्या दडपशाहीचे पाश सर्वत्र अधिकच मजबुतीने आवळायला सुरूवात केली. भांडवलशाही, निरंकुश एकाधिकारशाही, धर्मांधता व सामान्य कष्टकऱ्यांच्या शोषणाविरोधात आणि अमेरिका धार्जिण्या धोरणांविरोधात आपल्या गाण्यांतून जागृती करणाऱ्या आणि डाव्या विचारसरणीने भारलेल्या योरूमची लोकप्रियता देशात दिवसेंदिवस वाढायला लागली होती. आपल्या गाण्यांच्या प्रस्तुतीकरणासमयी क्रांतीकारकांचे उदात्तीकरण करणारे हे कलावंत तुर्की सरकारच्या नजरेत खुपायला लागलेत. यामुळेच २०१६ मध्ये सरकारने या बँडवर बंदी आणली.

नोव्हेंबर २०१६ मध्ये इस्तांबुलच्या आयडीयल कल्चरल सेंटरवर पोलिसांनी धाड टाकली. योरूमच्या संगीतविषयक गतीविधींचे हे महत्वाचे केंद्र होते. यावेळी हेलिन बोलेक सहित आठ जणांना इथं अटक करण्यात आली. तुर्कस्तानमध्ये बंदी असलेल्या रिव्होल्युशनरी पिपल्स लिबरेशन फ्रंट (DHKP-C) ची ती सदस्य असल्याचा तिच्यावर आरोप ठेवण्यात आला. मार्च २०१७, मे २०१७ अशा आत्तापर्यंत दहावेळा आयडील कल्चरल सेंटरवर धाडी घालण्यात आल्या. अशा विविध धाडी आणि इतर अटक सत्रांत जवळपास योरूमचे चारशेच्यावर सदस्य अटक करून, तेथील दडपशाही विरोधातील गळा आवळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

आपल्या आठही सहकाऱ्यांवरील आरोप चुकीचे असून ते मागे घेऊन त्यांना तुरूंगातून सोडून देण्यात यावं, योरूम वरील बंदी मागे घ्यावी यासाठी इब्राहीम गोस्केक सहित हेलिनने आमरण अन्नत्याग आंदोलन सुरू केले. २४००  पेक्षा अधिक सैनिकी अधिकाऱ्यांना तुरूंगाची हवा दाखविणाऱ्या, २७४५ पेक्षा अधिक न्यायाधीशांना पदुच्युत करून दहशत निर्माण करू इच्छिणाऱ्या एर्दोगन शासनाच्या पुढे झुकायचं नाही, या पक्क्या इराद्याने हे अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन थांबवावं यासाठी जेल प्रशासनाने  प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण त्यांना अपयश आले. तेव्हा नोव्हेंबर २०१९ मध्ये हेलिनला तुरूंगातून सोडून देण्यात आले. तरी गोस्केक आणि हेलिन बोलेकचे अन्नत्याग आंदोलन सुरूच होते. शेवटच्या काळात पोलिसांनी हेलिन आणि गास्केक यांना हॉस्पिटलमध्ये नेऊन जोरजबरदस्तीने त्यांच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती गास्केकचा वकील एझ्गी काकीर यांनी दिली आहे.

शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं हा हेलिनचा निर्धार मात्र पक्का होता. अन्नत्याग आंदोलनाच्या २८८ व्या दिवशी ३ एप्रिल २०२० ला हेलिन बोलेकचा श्वास शेवटी थांबला. या थांबलेल्या श्वासाने मात्र तुर्कस्तानमधील उन्मत्त शासन व्यस्थेविरोधातील लक्षावधी त्वेषमयी फुत्कारांना जन्म दिला. तिच्या अंत्ययात्रेत अनेक क्रांतिकारी, तिचे चाहते  उपस्थित होते. सर्व स्त्रियांनी तिला खांदा दिला. इब्राहीम गोस्केक आपल्या कृश देहानिशी अन्नत्यागाच्या २८९ व्या दिवशी व्हील चेअरवर सामील झाला. हेलिनला श्रद्धांदली वाहताना तो म्हणाला, “अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी अशा कितीही आहुती द्याव्या लागल्या तरी चालेल, शेवटी विजय आपलाच असेल.योरूम बँडमधील एक सभासद सेहेर आपली श्रद्धांजली अर्पण करताना म्हणाला, “आपल्या श्वासाच्या शेवटपर्यंत हेलिनने आपल्यावर प्रेम केले आहे. आपल्या न्याय्य मागण्या आपण त्याच न्याय्य मार्गाने एक दिवस मिळविल्याशिवाय राहणार नाही. आपल्यावरील या विश्वासानेच हेलिनने आपले डोळे मिटले आहेत. एक दिवस आपण हा लढा जिंकल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द तिला देऊया.

सरकारच्या दडपशाहीविरोधात आवाज उठविल्यामुळे तुरूंगात बंदिस्त असलेल्यांच्या मातांसोबत हेलिनची आई आयगुल बिल्गी या अंत्यसंस्काराच्या समयी हजर होती. हेलिन बोलेकच्या स्मृतीप्रित्यर्थ तिच्या बँडच्या सहकाऱ्यांनी नो डेथ फॉर अस्हे गीत गायिले. एर्दोगन शासनाच्या दडपशाही वृत्तीने हेलिन बोलेकचा क्रांतीस्वर थांबविल्या गेल्याचा आभास निर्माण होत असला तरी जगाचा इतिहास सांगतो, की अशा घटनांच्या प्रेरणांतून लक्ष लक्ष क्रांतीस्वर गावगाडे, गल्ली बोळांतून धारदार पात्यांप्रमाणे सरसरून वर येतात. अग्नीलोळ होऊन ते दमनकारी यंत्रणांवर कोसळल्याशिवाय राहात नाही. तुर्कस्तानमध्ये तसं होणारच नाही या भ्रमात राहण्याचं काही कारण नाही. हेलिनच्या आईला आपल्या मुलीने शेवटपर्यंत गात राहावं’, असं वाटत होतं. यापुढे साऱ्या जगातील क्रांतीकारकांचा सूर हेलिनच्या सूरात मिसळलेला असेल आणि हेलिनचं गाणं आभाळभर झालेलं असेल.
- प्रा. प्रसेनजित एस. तेलंग

No comments:

Post a Comment

माणगाव परिषद : बहिष्कृतांचे रणशिंग - उत्तम कांबळे

'अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद ’ हा उत्तम कांबळे यांचा ग्रंथ ‘ लोकवाङ् ‌ मय गृह ’ तर्फे लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. एका ऐति...