2

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 85 30 52 85 50 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

Tuesday 30 April 2019

कच्चा इतिहास लिहिणाऱ्यांची पक्की गोष्ट


जगभरामध्ये लोकशाही राज्यव्यवस्था स्वीकारली जाऊ लागली तसा राजसत्तेचा खेळ बदलला. राजाची गरज संपली आणि जनता दर काही वर्षांनी देशाचे राज्यकर्ते निवडू - बदलू लागली. आज लोकशाहीत लोक राज्यकर्ते निवडून देतात का राज्यकर्ते लोकांकडून स्वतःला निवडून घेतात, असा संभ्रम तयार झालाय. राजसत्तेतून लोकशाहीत रूपांतरण होताना राजकीय व्यवस्था खरेच बदलली का बदलाचा आभास तयार केला अशी आजची परिस्थिती. बदलाच्या सुरुवातीपासूनच ही अशीच संभ्रमित होती. पहिल्या - दुसर्या महायुद्धाने या अस्थिरतेची चुणूक दाखवलेलीच आहे. राज सत्तेतले व्यापार, युद्ध, निरंकुश सत्तेची लालसा असे अनेक गुण लोकशाहीत जसेच्या तसे झिरपले. आजही जगातील संरक्षण अस्थिरता, दहशतवाद आणि हुकूमशाही प्रवृत्तीची भांडवली लोकशाही व्यवस्था हा संभ्रम अधिक बळकट करतात. हा भ्रमाचा भोपळा फुटू देण्यासाठी वापरले जाणारे महत्त्वाचे प्रचारतंत्र म्हणजे प्रोपगंडा. प्रोपगंडा अमलात आणण्यासाठी माध्यमाचा सर्वात जास्त वापर केला जातो. आज आपण माध्यमाच्या सर्वात विकसित आणि गतिमान टप्प्यावर आहोत. ही प्रोपगंडा आणि पर्यायाने सत्ताकारणांसाठी जमेची बाजू. प्रोपगंडा राबवणारीही माध्यमच आणि उघड करणारीही माध्यमच. सद्दाम हुसेन यांच्याकडे अतिसंहारक जैविक अस्त्र आहेत हे आपल्याला माध्यमच सांगतात आणि त्या चक्रम सद्दामला ठार मारण्याचा विडा अमेरिकेने उचलला आहे, आता जगाला चिंता करायची गरज नाही हेही सांगतात. अमेरिकेने सद्दामला मारून झाल्यावर तिथे झुरळ मारू शकेल एवढ्या शक्तीचेही अस्त्र सापडले नाही हेही आपल्याला माध्यमच सांगतात. मग अमेरिका आपल्याला सांगते की तिथे लोकशाही मूल्यांची पुनर्स्थापना करण्यासाठी आम्हाला सद्दामला मारणे गरजेचे होते. मग आपल्यालाही हे वाटतं की एखाद्या देशात लोकशाही मूल्यांची स्थापना करण्यासाठी ठोकशाहीची गरज असते. हा सर्व प्रोपगंडा. हा उपद्व्याप अमेरिका आपल्या देशातही करते. असाच एक प्रोपगंडा अमेरिकेने त्यांच्या देशात व्हिएतनाम युद्धाबद्दल सत्तरच्या दशकात केला. तिथल्या वर्तमान पत्रातील काही लोकशाही मूल्यांची चाड असलेल्या पत्रकार आणि संपादकांनी तो उघड केला. त्याची प्रखरता एवढी की अमेरिकेच्या सर्वशक्तिमान राष्ट्राध्यक्षावर महाभियोग चालवण्याची वेळ आली. मात्र त्या आधीच त्यांनी राजीनामा दिला. लोकांच्या हातातून गेलेल्या लोकशाहीला माध्यमांनी बळ दिलं. ती तगून राहिली, पुन्हा उभी राहिली. सद्दामची जागा ओसामाने घेतली आणि हे चक्र अव्याहतपणे सुरू आहे. हे सहज उघड करू शकेल अशा ताकदीची माध्यमं आज नाहीत ही आजच्या लोकशाहीची शोकांतिका. ही गरज अधिकच तीव्र असल्याची जाणीव करून देणारा एक चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झाला, त्याचे नाव पोस्ट’. स्टीवन स्पीलबर्ग हे या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक.

पोस्ट हा फक्त एक ऐतिहासिक घटनेवरचा चित्रपट नाही. या विषयाचे आणि घटनेबद्दल अनेक चित्रपट निर्माण केले गेले आहेत. स्पीलबर्ग यांना हाच चित्रपट आणि याच काळात का करावासा वाटला हा खरा प्रश्न आहे. आताचा काळ पोस्टट्रुथचा. आताची अमेरिका ट्रम्पची. ट्रम्पचा नारा अमेरिकेला पुन्हा महान बनवण्याचा. ट्रम्प सरकार आणि पोस्टट्रूथची पावलं ओळखून स्पीलबर्ग यांनी चित्रपटनिर्मिती केली हे म्हणण्याला नक्कीच वाव आहे. अशा अनेक कड्या जुळवत नेल्या की उत्तरे मिळतील. त्यासाठी चित्रपटाचे कथानक काय आहे आणि त्याची नेमकी रचना कशी आहे हे लक्षात घ्यावे लागेल.

चित्रपटाची कथा सुरू होते व्हिएतनाममधील एका गुमनाम सैन्यतळावरून. तिथे निस्तेज, निरुत्साही, थकलेले सैनिक युद्धासाठी जाण्याची तयारी करत आहेत. त्यांच्यात एक असैनिक व्यक्तीला बघून सैनिक बोलत आहेत. हा आहे डॅन. सीआयए या गुप्तचर एजन्सीच्या लान्सडेल या अधिकार्यासाठी काम करणारा निरीक्षक. व्हिएतनाम युद्धाची नेमकी काय परिस्थिती आहे याची पाहणी करण्यासाठी तो आलाय. ही तुकडी रात्रीच्या काळोखात धो-धो पावसात युद्धासाठी जंगलात शिरते आणि अचानक झालेल्या हमाल्यात मारली जाते. सैन्यतळावर बसून डॅन या परिस्थितीचा अहवाल टाइप करत आहे. डॅनसमोरील प्रकाशाचा मॅचकट साधत दृश्य विमानाच्या खिडकीच्या प्रकाशात येतात. खिडकीत डॅन कसल्या विचारात तंद्रीत आहे. त्याला कुणीतरी आवाज देऊन डिफेन्स सेक्रेटरीने बोलावलं म्हणून सांगतो. ते डॅनला विचारतात काय परिस्थिती आहे तू प्रत्यक्ष व्हिएतनाममधली. डॅन सांगतो परिस्थिती आहे तशीच आहे. पुढील दृश्यात एअर फोर्सच्या विमानातून उतरताच धावपट्टीवरच काही पत्रकार सेक्रेटरीला गाठतात. दौरा कसा झाला, काय परिस्थिती आहे विचारतात. सेक्रेटरी सांगतात खूप चांगली परिस्थिती आहे. आपले सैनिक खूप चांगली लढाई लढत आहेत. बाजूने जाणारा डॅन हे ऐकून चक्रावतो. सेक्रेटरी खोटे बोलतो आहे हे त्याच्या लक्षात येतं. इथपर्यंत स्पीलबर्ग यांची नेहमीचीच दिग्दर्शकीय रचना दिसते. स्पीलबर्ग दोन परस्पर विरोधी गोष्टींसाठी दोन वेगळे शॉट वापरता एकाच शॉटमध्ये दोन्ही संदर्भांना जोडतात. ही रचना पुढेही चित्रपटात खूप वेळा वापरलेली दिसते. स्पीलबर्ग यांच्या कोणत्याही चित्रपटात अशी रचना असतेच असते. त्यामुळे लांबी वाढते. खूप दीर्घ वेळेचा शॉट आणि यात सतत पॅन होणार्या कॅमेर्याने अनेक संदर्भ एकाच वेळेस आणि एकाच शॉटमध्ये जोडण्याचा परिणाम खूप प्रभाव करून जातो. विमानतळावरून डॅन सरळ कार्यालयात जातो आणि व्हिएतनाम युद्धाबद्दलची गोपनीय कागदपत्र घेऊन बाहेर पडतो.

याच कागदपत्रांनी चित्रपटाच्या शेवटी डिफेन्स सेक्रेटरीचे आणि पर्यायाने राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचे पितळ उघडे पडते. म्हणून चित्रपटाची सुरुवात व्हिएतनाम युद्ध हा विषय आणि त्यातील दोन टोकाचे हे दोन विचारांचे दोन पात्र अशी सुरुवात केलेली आहे. आता दिग्दर्शक पुढे सविस्तर विषय मांडणीला सुरुवात करतो. डॅनने कार्यालयातून चोरलेल्या व्हिएतनाम युद्धाबद्दलची गोपनीय कागदपत्रांच्या काही मित्रांसमवेत छायाप्रती काढत आहेत. इथे त्या कागदपत्रांच्या सहज वाचता येतील असे क्लोज शॉट आहेत ज्यामधून हा विषय नेमका कधीपासून आहे आणि कोणत्या अध्यक्षांच्या काळात काय परिस्थिती होती हे प्रेक्षकांना वाचायला मिळते. सोबत ट्रुमनपासून केनडीपर्यंत चार अध्यक्षांच्या या विषयाबाबतच्या भाषणाच्या अर्कायव्हाल फुटेजच्या क्लिप दाखवल्या आहेत. या रचनेने या सत्य घटनेवर आधारित कथेची विश्वासार्हता वाढते. या पार्श्वाभूमीनंतर चित्रपटाची कथा 1971 मध्ये वॉशिंग्टन डी. सी. मध्ये येते जी चित्रपटाची मुख्य कथा आहे.

वॉशिंग्टन पोस्ट या वर्तमानपत्राच्या मालकाने नुकतीच आत्महत्या केलेली आहे आणि हे आर्थिक अडचणीत आलेलं वर्तमानपत्र चालवण्याची जबाबदारी त्यांची पत्नी कॅथरीन ग्राहम यांच्यावर येऊन पडली. त्यांच्या सोबतीला आहे संपादक  बेन ब्रॅडली. कॅथरीन म्हणजेकेने तिच्या मालकीचे खूप समभाग शेअर मार्केटमध्ये विकून वर्तमानपत्र सुरू ठेवण्यासाठी पैसा जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ती प्रयत्न करत आहे. के आणि बेन यांच्या पहिल्या भेटीतील गप्पातून आपल्याला पुढे घडणार्या गोष्टींचा अंदाज येतो. ते दोघे त्यांच्या प्रतिस्पर्धी वर्तमानपत्र न्यूयॉर्क टाइम्सच्या पत्रकाराच्या व्हिएतनाम युद्धाबद्दलच्या वर्तन्कानाबद्दल बोलत आहेत. त्याने तीन महिने झाले एकही लिखाण केले नाही. म्हणजे तो कुठल्या तरी मोठ्या बातमीच्या कामात आहे आणि यांच्या वर्तमानपत्राच्या वार्ताहराला अध्यक्षांच्या मुलीच्या लग्नाचे वार्तांकन करण्याची परवानगी मिळाली नाही. तो वार्ताहर बदलण्यासाठी केला व्हाइट हाऊसमधून फोन आला आहे. बेनला हे एकूण आश्चर्य वाटतं. दोन्ही गोष्टी पुढच्या दिवशी येऊन मिळतात. न्यूयॉर्क टाइम्स व्हिएतनाम युद्धाबद्दलची मोठी लेखमाला प्रकाशित करतं आणि वॉशिंग्टन पोस्टच्या पहिल्या पानावर निक्सनच्या म्हणजे अध्यक्षांच्या मुलीच्या लग्नाचा फोटो आणि बातमी प्रकाशित झालेली आहे. इथे एक खूप मजेशीर शॉट आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या कार्यालयातील सर्व न्यूयॉर्क टाइम्समधील ती खळबळजनक बातमी वाचत आहेत. स्पीलबर्ग कायम घटनेभोवतीचा भवताल चित्रात मांडतात. घटना आणि परिणामाचे खूप घनिष्ठ सहसंबंध दाखवणारे वातावरणाचे सखोल चित्रण दाखवतात. अशा दृश्य रचनेचा खूप प्रभाव प्रेक्षकांवर पडतो. आपल्या कार्यालयातील हे वातावरण बघून संपादक खूप अस्वस्थ होतात आणि आपल्या सहकार्यांना संबोधून म्हणतात... कुणी बातमी देऊन थकण्याऐवजी बातमी वाचून थकले असेल तर आपण या विषयावर पुढे काही काम करूया का?  

न्यूयॉर्क टाइम्सने केली तशी पत्रकारिता आपण का करू शकत नाही? आपण यापेक्षा अधिक ताकदीची पत्रकारिता करू या निश्चयाने संपूर्ण वॉशिंग्टन पोस्टचं ऑफिस कामाला लागतं. पुढे परिस्थिती बिघडते. अमेरिकेचे महाधिवक्ता न्यूयॉर्क टाइम्सला व्हिएतनाम युद्धाबद्दलच्या बातमीसाठी कोर्टात खेचतात आणि यापुढे या विषयाचे कोणत्याही प्रकारचे वार्तांकन करण्यावर बंदी आणतात. आता पोस्टची अडचण होते की पुढे काय करायचे. टाइम्सला वार्तांकन करण्याची बंदी असेल तर पोस्ट त्याबद्दलचे वार्तांकन कसे करू शकते. पोस्टचे संपादक मंडळ याचा फार विचार करता आपले काम सुरू ठेवतात. या कामात हळूहळू त्यांना यश येतं, त्यांच्या एका पत्रकाराच्या गळाला लागतो डॅन. डॅनने अजून काही गोपनीय अहवाल बाहेर काढलेले असतात. तो ते सर्व वॉशिंग्टन पोस्टला देतो. या कागदपत्रांचं गांभीर्य लक्षात घेऊन बेन आपल्या घरीच काही सहकार्यांना बोलावून घेत माहितीचे विश्लेषण करतो. आज रात्री हाती आलेल्या कागदपत्रांवरून बातमी तयार करण्यासाठी दुसर्या दिवशी रात्री पर्यंत एकूण दहा तासांचा वेळ आहे. हे दहा तास थांबता काम करून बातमी तयार केली जाते. ती प्रकाशित करायची का नाही याविषयी वकिलांचा सल्ला घेतला जातो. वकील म्हणतात तुम्ही ही बातमी छापली तर खूप अडचणीत याल. तुम्हाला आणि मालकाला अटक होऊ शकते. मालकाला याची कल्पना देण्यासाठी संपादक बेन दुसर्या दिवशी के ला भेटायला तिच्या घरी जातात. तिथे केच्या वाढदिवसाची पार्टी सुरू असते. ज्यांच्या विरोधात बातमी प्रकाशित करायची ते डिफेन्स सेक्रेटरी त्या पार्टीत हजर असतात. बेन मालकिणीला म्हणजे कॅथरीनला स्पष्ट सांगतात की, त्यांनी तुमच्याशी मैत्री यासाठी केली आहे की तुम्ही एक वर्तमानपत्राच्या मालकीण आहात. कॅथरीनही तेवढीच गंभीर प्रतिक्रिया देते की तिचे मित्र आणि वृत्तपत्र या दोन वेगळ्या बाबी आहेत. त्यांचा एकमेकांवर परिणाम होणार नाही. वकील - संपादक मंडळाची कॅथरीनशी घमासान चर्चा झाल्यानंतर के धीराने निर्णय घेते की सत्तेपुढे झुकायचे नाही. लोकांना सत्य कळलेच पाहिजे. त्यासाठी आपल्याला काहीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, परंतु आपण पत्रकारितेच्या व्यवसायाला जागले पाहिजे. बातमी प्रकाशित होते. दुसर्या दिवशी सर्वत्र चर्चा होते. सरकारचे वकील कोर्टात केस दाखल करतात. माध्यम स्वातंत्र्याच्या चर्चेला उधाण येतं. सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. निकालाच्या एक दिवस आधी इतर सर्व पेपर व्हिएतनाम युद्धाबद्दल काहीनाकाही बातमी प्रकाशित करतात. आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेणार. सर्वच्या सर्व वर्तमानपत्रावर बंदीची कारवाई करणे शक्य होणार नाही. आतापर्यंत लपलेला डॅन समोर येऊन दूरचित्रवाणी वाहिन्यांना मुलाखती देऊ लागतो आणि आपण प्रत्यक्षात काय पाहिले हे लोकांना सांगतो. निकालाच्या दिवशी कोर्टाबाहेर फ्री प्रेसचे पोस्टर घेऊन लोक निदर्शने करत आहेत. केसचे कामकाज संपून कोर्टाच्या बाहेर पडणार्या कॅथरीनकडे बघणार्या सामान्य स्त्रियांचा एक अप्रतिम शॉट या ठिकाणी आहे. त्या सामान्य स्त्रियांच्या चेहर्यावरच्या कॅथरीनसाठीच्या भावना बघून या माध्यमाची खरी ताकद कळते. दिग्दर्शक कुठलीही टीका टिप्पणी करता फक्त चित्राच्या माध्यमातून हे दाखवतो. पुढे वेगवेगळ्या शॉटच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाचा निकाल ऐकू येतो. ''The founding fathers gave the free press the protection it must have to fulfill its essential role in our democracy. The press was to serve the governed, not the governors.''

स्पीलबर्ग मुद्रित माध्यमाचा प्रवास विलक्षण वेधक पद्धतीने मांडतात. हा प्रवास आपल्याला समृद्ध करतो, स्फूर्ती देतो. आशेचा दिवा तेवत ठेवतो. हा परिणाम सध्या होतो तो चित्रपटाच्या रचनेमुळे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शक कुठेही चित्रण अवास्तव आणि अतिशयोक्त होऊ देत नाही. संपूर्ण कथानकाची मांडणी खूप संयत पण वेगवान पद्धतीने केलेली आहे. त्यात कुठेही व्यवस्थेविरोधाचा राग आणि आक्रस्ताळेपणा दिसत नाही. आपण काहीतरी भव्यदिव्य करतोय आणि लोकांवर उपकार करतोय असेही दिसत नाही. चित्रपट संपूर्णपणे वास्तवदर्शी वाटतो तो दिग्दर्शकाच्या कौशल्यामुळे. उत्तम कलाकारांची निवड, त्यांचा नेटका अभिनय, सत्तरच्या दशकाच्या काळाची तंतोतंत निर्मिती. फक्त सत्तरच्या दशकाचा फील यावा यासाठी हा चित्रपट 35 एम एम निगेटिव्ह फिल्मवर चित्रित केला गेला. त्या काळातील माध्यमाचा प्रत्यय येण्यासाठी संपूर्ण लेथो प्रिंटिंग प्रेस उभारली गेली. या प्रेसच्या क्लोज शॉटचा अप्रतिम वापर चित्रपटात केला आहे. त्या काळातील माध्यम वातावरण पाहून आपण अचंबित होतो. एवढे की प्रश्न पडतो खरेच तेव्हाची पत्रकारिता एवढी निरागस आणि प्रामाणिक होती. कदाचित आज माध्यमे कधी नव्हे एवढी सरकारच्या वळचणीला जाऊन बसली आहेत म्हणून तसे वाटत असेल. असं वाटत असेल तर दिग्दर्शकाचा आताच्या काळात हा चित्रपट बनवण्याचा उद्देश सफल झाला असं म्हणावं लागेल. याचीच झलक चित्रपटाच्या शेवटी दिसते... केसच्या निकालाच्या दिवशी तो प्रकाशित करताना पहिला पेपर पाहण्यासाठी मालक कॅथरीन आणि संपादक बेन उतावीळ झालेले आहेत. तेव्हा बेन आदराने के कडे बघतो तेव्हा ती एक सिक्रेट सांगते की तिचा नवरा कायम बातमीबद्दल कायम म्हणायचा की... (''News is the first rough draft of history''.)
- संदीप गिऱ्हे

माणगाव परिषद : बहिष्कृतांचे रणशिंग - उत्तम कांबळे

'अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद ’ हा उत्तम कांबळे यांचा ग्रंथ ‘ लोकवाङ् ‌ मय गृह ’ तर्फे लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. एका ऐति...