2

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 85 30 52 85 50 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

Thursday 7 November 2019

मूकनायकाची प्रेरणा


लोकवाङ्मय गृह प्रकाशित उत्तम कांबळे यांच्या  ‘आज-कालचे प्रश्आगामी या पुस्तकातील प्रस्तावनेचा संक्षिप्त भाग

काय करू आता धरूनिया भीड, नि:शंक हे तोंड वाजविलेअसं सूत्र घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 31 जानेवारी 1920 लामूकनायकया निमित्ताने भारतीय पत्रकारितेत विद्रोही, बंडखोरी भूमिका घेऊन प्रवेश केला. त्याला आता 2020 मध्ये शंभर वर्षे पूर्णही होतील. ‘मूकनायकपाक्षिक अल्पकाळ टिकले हे खरं आहे; पण त्यानिमित्तानं येथील व्यवस्थेनं मुका, बहिरा, गुलाम, अस्पृश्य, सर्वहारा बनवलेल्यांसाठीची बंडखोर पत्रकारिता सुरू झाली. तत्पूर्वी सोमवंशीय मित्र, हिंदू नागरिक, विटाळ विध्वंसक अशी काही अनियतकालिकं सुरू झाली; पण लोकांमधील निरक्षरता, निधीचा अभाव यामुळे ती फार काळ तग धरू शकली नाहीत. दीनमित्र, जागरूक, डेक्कन रयत, विजयी मराठा, ज्ञानप्रकाश, इंदुप्रकाश, सुबोधपत्रिका आदी काही वृत्तपत्रे व्यवस्थेविरुद्ध लिहीत होती. ब्राह्मणेतरांसाठी लिहीत होती; पण मुक्या, बहिष्कृत आणि अस्पृश्य ठरवल्या गेलेल्यांसाठी त्यात खूप कमी जागा मिळत होती. एका नाजूक, विलक्षण आणि सामाजिक लढ्यासाठी बिगूल वाजवण्याच्या पार्श्वभूमीवर मूकनायकाचा जन्म झाला आहे. कोणत्याही गोष्टीचं महत्त्व समजून घेण्यासाठी ती कोणत्या परिस्थितीत, कोणत्या पार्श्वभूमीवर जन्माला आली हे समजून घेणं अधिक महत्त्वाचं असतं. ‘मूकनायकाला राजर्षी शाहू महाराजांनी मदत केली. मोठ्या दिमाखात हे पत्र सुरू झालं. पण लगेचच बाबासाहेबांना उर्वरित अभ्यासासाठी परदेशात जावं लागलं. त्यांच्या अनुपस्थितीतमूकनायकफार काळ चालला नाही. परदेशातून निघण्यापूर्वीच तो बंद पडला होता. अर्थातच बाबासाहेबांना याचं खूप दु: झालं. त्यांनी ते तसं नमूदही केलंय. पण नंतर खचून जाता त्यांनी 1 एप्रिल 1928 लाबहिष्कृत भारतसुरू केलं. एकीकडे महाडच्या तळ्यावर संघर्ष आणि दुसरीकडे त्याचा आवाज बनलेलाबहिष्कृत भारतअसं एक युद्धचित्र निर्माण झालं. 6 डिसेंबर 1956 ला बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झालं आणि आंबेडकरी पत्रकारितेचाही शेवट झाला. तशी पत्रकारिता आपल्याला पुढं कधी पाहायला मिळाली नाही.

वेगवेगळ्या गटांत विभागल्या गेलेल्यांनीही काही साप्ताहिकं आणि पाक्षिकं सुरू केली नाहीत असं नाही; पण त्यात सामाजिक, राजकीय पत्रकारिता कमी आणि राजकीय हेवेदावे अधिक होते. ‘बहिष्कृत भारतचे अतिशय महत्त्वाचे ठरलेले 46 अंक, ‘समताचे 19 अंक आणि मूकनायकाचे 13 आदी अंकांनाही बाबासाहेबांच्या पत्रकारितेत महत्त्वाचं स्थान आहे.

मूकनायकाचा जन्म कसा आणि का झाला, याचं विवेचन बाबासाहेबांनी मूकनायकाच्या आणिबहिष्कृत भारतच्याही पहिल्या अंकात करून ठेवलं आहे. समाजातील जीवघेणी विषमता मांडण्यासाठी, तिच्याविरुद्ध जनमत तयार करण्यासाठी, तिच्याविरुद्ध लढण्यासाठी, तिच्याविरुद्ध काही पर्याय देण्यासाठी, माणूस विचारी बनवण्यासाठी वर्तमानपत्राची आवश्यकता असते हे त्यांना कधीच कळून चुकलं होतं. त्या काळात धर्मप्रसार करणारी व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणारी अनेक नियतकालिकं आणि अनियतकालिकं होती. याशिवाय स्वातंत्र्य, समता, शिक्षण यांचा प्रसार करणारीही काही होती. प्रश् होता तो विषमतेविरुद्ध बंड करणार्या वर्तमानपत्रांचा.
त्यांचा अभाव होता. जी काही वर्तमानपत्रं निघाली ती अल्पजीवी ठरली. जी टिकून होती ती विषमतेविरुद्ध त्यातही सामाजिक विषमतेविरुद्ध काही बोलत नव्हती. त्या काळी अस्तित्वात असणार्या एका बड्या आणि प्रतिष्ठित वर्तमानपत्राने आपल्या अंकातमूकनायकची एक छोटी जाहिरात छापण्यासही नकार दिला होता. एवढंच नव्हे तर महात्मा फुले यांच्या निधनाची बातमीही छापली नव्हती असं सांगितलं जातंय. व्यवस्थेचे समर्थक आणि व्यवस्थेचे लाभार्थी असं त्याचे वर्णन केल्यास अतिशयोक्ती होणार नाही. काही वृत्तपत्रं अस्पृश्य ठरवल्या गेलेल्या या मोठ्या समूहाकडं फक्त करुणेनं बघायची. प्रत्यक्षात व्यवस्था मोडीत काढण्यासाठी, ती समजावून सांगण्यासाठी, ती नेस्तनाबूत करण्यासाठी ठोस प्रयत्न होत नव्हते.

डॉ. बाबासाहेबांनी ते करायचं ठरवलं आणि त्यासाठी मूकनायकाची जुळवाजुळव केली. मूकनायकाला प्रबोधन, शिक्षण, विद्रोह, स्वातंत्र्य, आत्मसन्मान आणि बंडासाठीचं साधन बनवायचं होतं. त्याच्या पानापानावर फक्त युद्ध, प्रबोधन आणि बंड झळकणार होतं. व्यवस्थेची चिरफाड होणार होती. जातिव्यवस्था ही देवानं निर्माण केली. ती समाजाच्या उपयोगाची आहे. वर्णव्यवस्था देवानं केली. कुणाला कोणती जात मिळणार हे त्याच्या पूर्वजन्मावरून ठरते. जात म्हणजे देवानं दिलेली देणगी असं सांगितलं जात होतं. अनेक ग्रंथांच्या माध्यमातून लिहिलं जात होतं. जात कोण तयार करतं, ती कशी तयार करतं, तिचे फायदे-तोटे काय आणि ती कशी संपवायची हे सांगण्यासाठी एक प्रभावी साधन समजून बाबासाहेब आपल्या वर्तमानपत्रांकडे बघत होते. जात कशी असते याचं बाबासाहेबांनी मूकनायकाच्या पहिल्याच अंकात वर्णन केलं आहे. खरं तर ती एक थिअरी मानावी लागेल. अशी थिअरी यापूर्वी कुणीही मांडली नव्हती. बाबासाहेब या थिअरीत म्हणतात, ‘हिंदू समाज एक मनोरा आहे. त्यातील एक एक जात म्हणजे त्याचा एक एक मजला होय.

लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की या मनोर्यास शिडी नाही. एका मजल्यावरून दुसर्या मजल्यावर जाण्यास मार्ग नाही. ज्या मजल्यात ज्यांनी जन्मावे त्याच मजल्यात त्यांनी मरावे. खालच्या मजल्यावरचा इसम मग कितीही लायकीचा असो त्याला वरच्या मजल्यात प्रवेश नाही वरच्या मजल्यातला कितीही नालायक असो त्याला खालच्या मजल्यात लोटून देण्याची कोणाची प्राज्ञा नाही’. जातीरचनेचा हा सिद्धांत मनोर्याचा सिद्धांत म्हणून पुढं आला. सामान्य माणसाला समजेल, त्याला चेतवेल आणि त्याला विचारप्रवृत्त करेल असा हा सिद्धांत मूकनायकाच्या अग्रलेखात अवतरला. हा अग्रलेख म्हणजे व्यवस्था हादरवण्यासाठी फुंकलेली तुतारी होय. एवढ्याचसाठी हे म्हणायचं की, 1920ला बाबासाहेबांच्या वर्तमानपत्रांचा उदय झाला आणि पुढं कमीच कालावधीत व्यवस्थेविरुद्धच्या महाप्रचंड अशा त्यांच्या लढायाही सुरू झाल्या

महाडचा संग्राम असेल किंवा नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशासाठीचा सत्याग्रह असेल त्याला चेतवण्यासाठी जे काही प्रयत्न, संकल्प झाले असतील त्यात या वर्तमानपत्रांचीही छोटी-मोठी भूमिका आहेच आहे. बाबासाहेबांनी ब्राह्मण, ब्राह्मणेतर आणि बहिष्कृत किंवा अस्पृश्य असे व्यवस्थेचे तीन तुकडे केले होते. भूदेव मानणारा ब्राह्मण उर्वरित समाजाला पिळून आपला उद्धार करून घेतोय. सर्व प्रकारची सत्ता देवा-धर्माच्या नावानं त्यानं आपल्या मुठीत ठेवली होती. या सनातन व्यवस्थेविरुद्ध लढल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही हे सांगताना बाबासाहेब याच पहिल्या अग्रलेखात पुढं जाऊन म्हणतात, दीर्घकाळ अंगी मुरलेल्या दास्यामुळे उद्भवलेली हीनता त्यांना (अस्पृश्यांना) मागे खेचीत आहे. ती स्थितीच योग्य आहे. त्यापेक्षा वेगळी स्थिती आपल्या नशिबी नाही. आणि या समजुतीतील विघातकपणा या पतितांच्या नजरेत आणण्यासाठी ज्ञानासारखे दुसरे अंजन नाही. पण तेही मिरची-मसाल्यासारखे अजूनही विकतच घ्यावे लागते आणि दारिद्य्रामुळं ते दुर्मीळ झाले आहे. कोठे कोठे विकत घेऊ पाहता ते मिळतही नाही; कारण ज्ञानमंदिरात सर्वच अस्पृश्यांचा प्रवेश होतो असे नाही. याचा अर्थ बाबासाहेब मूकनायकाकडे केवळ टीकाटिप्पणी करण्याचं साधन म्हणून नव्हं, तर ज्ञानाचा आणि प्रबोधनाचाही एक दरवाजा म्हणून बघत होते. हा सारा दरवाजा अस्पृश्यांसाठी, बहिष्कृतांसाठी खुला करायचा होता. जे ज्ञान व्यवस्था आपल्याला देत नाही ते देण्याचं काममूकनायककरणार होता. पण हे घेताना, आत्मसात करताना विचार कसा करायचा हे सांगताना ते म्हणतात. खरं तर प्रबोधन करतात आणि सांगतात, की दारिद्य्राची बोळवण करण्यास कपाळी अस्पृश्यतेचा शिक्का मारला असल्यामुळे पैका मिळवण्यास हवी तेवढी संधी आणि मोकळीक नाही. व्यापार उदीम इत्यादी धंद्यात त्यांचा क्वचितच समावेश होतो. नशीब (आजमावून) पाहण्यास कोठेच जागा नसल्यामुळे त्यांना केवळ भुईचे खडे खात पडावे लागते. अशा या अस्पृश्य नव्हे तर बहिष्कृत लोकांस निश्चितपणे खितपत पडलेले पाहून 33 कोटी देवांस नव्हे ते हिंदूंचे देव निदान अल्लास तरी कीव येत असेल. पण मनुष्यकोटीतील इतर प्राण्यांस त्यांच्याबद्दल धिक्कारच उत्पन्न होईल.

काही वेळेला प्रश् बदलत जातात, उत्तरेही बदलत जातात. काही वेळा प्रश् जुनेच असतात. त्यांची उत्तरं सापडत नाहीत. काही वेळा जुने प्रश् नवे रूप घेऊन उभे ठाकतात. काही वेळा प्रश्नांची चकवा देणारी उत्तरे सापडतात तर काही वेळा ती सापडतच नाहीत. काही असो सामान्य माणसाचं भोवताल हे नेहमी प्रश्नांनी भरून राहात असतं. कुठून आणता उत्तरं असं आव्हान ते देत असतं. तरीही माणूस उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतोच. नव्या सहस्रकातल्या दुसर्या दशकाच्या आसपास गर्दी केलेल्या काही प्रश्नांचा हा उच्चार! तुम्हाला विचार करायला लावतो आणि गाईड वापरता उत्तर शोधा म्हणतो.
उत्तम कांबळे

No comments:

Post a Comment

माणगाव परिषद : बहिष्कृतांचे रणशिंग - उत्तम कांबळे

'अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद ’ हा उत्तम कांबळे यांचा ग्रंथ ‘ लोकवाङ् ‌ मय गृह ’ तर्फे लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. एका ऐति...