2

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 85 30 52 85 50 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

Thursday 7 November 2019

93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आश्वासक निवड


ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची उस्मानाबाद येथे होणार्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ही बातमी कळताच वसईकरांमध्ये आणि मराठी सारस्वतात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. निवड समितीच्या या निर्णयाचे महाराष्ट्रात सर्व स्तरांवरून स्वागत झाले. मराठी साहित्यातील ते एक वाचकप्रिय लेखक, संत साहित्याचे अभ्यासक, क्रियाशील संपादक, पर्यावरणाच्या रक्षणासाठी झटणारा भूमाफियाविरुद्ध आवाज उठवणारा सजग कार्यकर्ता म्हणून ओळखले जातात. आजच्या उन्मादी काळात संत साहित्याशी नाते असणार्या साहित्यिकाची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणं खूपच दिलासादायक आश्वासक आहे अशा सकारात्मक प्रतिक्रिया अनेकांनी नोंदवल्या. फादर यांच्या निवडीचं असं दमदार स्वागत होण्याला फादर यांचं साहित्यविचार आणि त्या विचाराला असलेली कृतिशीलतेची जोड कारणीभूत आहे. ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊलेम्हणूनच फादर यांच्याकडे रसिक वाचकांचा आणि सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा इतका ओढा आहे.

1972 साली कॅथलिक पंथीय ख्रिस्ती धर्मगुरुपदाची दीक्षा घेतल्यानंतर केवळ देवळातला पुजारी होता प्रार्थनेला  कृतीची जोड देत त्यांनी ईश्वरसेवेतून जनसेवेचा मार्ग स्वीकारला.

जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले
तो ची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा

या संत तुकारामांच्या वचनानुसार माणसाच्या व्यथा वेदनांना  त्यांनी आपल्या लेखनात आणले. ‘दु:खिताचे तिमिर जावोया प्रेरणेने त्यांनी आपले लेखन केले. फादर यांच्या लेखनविचार आणि कृतीत संत साहित्यातील माधुर्य विचार आणि येशूख्रिस्ताची करुणा याचा अपूर्व मिलाप पाहायला मिळतो. याच्या संंयोगातून, त्यांंच्या लेखनातून आलेलं माधुर्य आणि लेखनातून व्यक्त झालेली करुणा म्हणजे मराठी सारस्वताला मिळालेली अनमोल अशी देणगी आहे.

निसर्गसंपन्न वसईतील नंदाखाल येथे जन्म झालेल्या फादर यांनी निसर्गाकडून काय घेतले असेल तर ते म्हणजे निसर्गाची प्रसन्नता. ही प्रसन्नता त्यांच्या लेखनात उतरली. भारतीय संत साहित्याचा अभ्यास आणि ख्रिस्ती धर्माचे तत्त्वज्ञान यातून मिळालेल्या मानवी दु:खाचा कळवळा, विचारांची चौफेर बैठक आणि स्पष्टता आणि शब्दावरची अपार श्रद्धा, निसर्गाकडे पाहण्याचा मानवतावादी दृष्टिकोन अशा संस्कारांंनी त्यांना लिहिते केले. जैसी पुष्पांमाजी पुष्प मोगरी परिमळांमाजी कस्तुरी तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी अशा शब्दात मराठी भाषेचा गौरव करणार्या फा. स्टिफन यांचा वारसा फादर यांनी समर्थपणे पेलला.

वसईतल्या निसर्गाची प्रसन्नता आणि इथल्या झाडा फुलांचा सुवास त्यांनी आपल्या लेखनातून जगभर पसरविला. ‘तेजाची पाऊले’, ‘सृजनाचा मोहोरया संग्रहातील  प्रासादिक शैलीतील ललितलेख वाचून पु. . देशपांडे यांनी, ‘या लेखांना वसईच्या मळ्यांचा’, ‘जीवनाचा गंध येत आहे.’ असे गौरवोद्गार काढले होते.

साहित्य चंद्रावर बसून लिहिले जात नाही. समाजाविषयी आस्था बाळगून समाजातील व्यथा, वेदना, प्रवाह, आंतरप्रवाह यांची नोंद साहित्यात घेतली पाहिजे. माणसाच्या दु:खाला, वेदनामय मौनाला उद्गार देणारं साहित्य निर्माण व्हायला हवे. साहित्याचं कोणतंच टेक्स्टबुक नाही माणूस आणि त्याचं जगणं हेच साहित्याचं टेक्स्ट आहे.’ असे मानणार्या फादर यांनी   माणसाच्या आयुष्याला स्पर्शून आणि निसर्गाचे अनेक विभ्रम अनुभवत केलेल्या चिंतनाचा आविष्कार त्यांच्या साहित्यातून केला. निसर्ग माणसाला खूप काही शिकवितो असे मानून  निसर्गाची भाषा जाणणार्या फादर यांनीवेदनेचे गाणेया साधनासाठी लिहिलेल्या लेखात कोकिळेच्या गुंजनातून मानवी मूल्यांचे होणारे अवमूल्यन रेखाटले आहे. निसर्गावर अपार प्रेम असणार्यालाच निसर्गाची मानवासाठी असलेली कु हू कु हू ऐकता आली.

शब्द बापुडे पोकळ वारानसूनप्रारंभी शब्द होता...’ या बायबल वचनाला अनुसरूनआम्हा घरी शब्दाचीच रत्ने...’ असे अलोट शब्दधनाचे भाग्य लाभलेले फादर गेले अर्ध शतकाहून अधिक काळ शब्दांंची उपासना करीत आहेत. ही उपासना केवळ देवळातल्या उपासनेसारखी नाही. 

नव्वदच्या दशकात भूमाफिया सत्तेचा गैरवापर करून वसईच्या निसर्गसौंदर्याला धक्के देणारे निर्णय घेऊ लागले होते. दहशत पसरवून लोकांच्या जमिनी लुटणे, पाणीउपसा, विकास आराखडा लादून निसर्गाचा गैरफायदा घेण्याचे षङ्यंत्र रचले जात होते, विकासाच्या नावाखाली निसर्गाचा होऊ घातलेला विनाश निसर्ग वाचू-अनुभवू शकणार्या फादर यांनी ओळखला. मी जिथे जातो, तिथे मला निसर्ग खुणावतो असे म्हणणार्या फादर यांना निसर्गाच्या हाका ऐकू येत असाव्यात. त्या त्यांनी ऐकल्या. भूमाफियांच्या संगनमतीने राज्यकर्त्यांनी वसईवर लादलेला विकास आराखडा वसईच्या संस्कृती आणि पर्यावरणावर दूरगामी परिणाम करणारा आहे हे दूरदृष्टी असलेल्या फादर यांनी वेळीच ओळखले. त्या काळात माफियांच्या, गुंडाच्या दहशतीविरोधात ब्र काढण्याची हिंमत नसताना फादर त्याविरोधात खंबीरपणे उभे राहिले. प्रवचन आणि प्रबोधन करून पुरेसे नाही, प्रत्यक्ष कृती केली पाहिजे, भक्तीचे रूपांतर सामाजिक बांधिलकीमध्ये झाले पाहिजे, असा उदात्त विचार करून, सुवार्तेच्या माध्यमातून. ‘नाठाळांच्या माथी हाणावी काठीया उक्तीनुसार निसर्गाची लूट करण्याचा कट रचणार्या आणि जमिनी लाटण्यासाठी दहशत निर्माण करणार्या विरोधात त्यांनी आपली लेखणी सिद्ध केली. हरित वसई संरक्षण समितीच्या माध्यमातून हरित वसईची समृद्धी टिकून राहावी म्हणून समविचारी सहकार्याच्या साहाय्याने लोकलढा उभा केला. यासाठी त्यांना अनेक लोकांचा, महाराष्ट्रातील अनेक साहित्यिकांचा, चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळाला. फादर यांनी लावलेली पर्यावरणविषयक जाणिवांची ही ज्योत आम्हा वसईकरांच्या मनात आजही प्रज्वलित आहे. आजही फादर वसईतल्या पर्यावरण चळवळीचे खंदे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या प्रेरणेने सातत्याने निसर्ग संवर्धनासाठीचा लढा अनेक तरुण सकारात्मक विचाराने लढत आहेत.

पथिकाची नामयात्राया अनुवादित पुस्तकांपासून सुरू झालेली त्यांची लेखनयात्राआनंदाचे तरंग’, ‘मदर तेरेसा’, ‘पॉप दुसरे जॉन पॉल’, ‘मुलांचे बायबलअशा धार्मिक पुस्तकांपासून पुढे धर्मधर्मचिकित्सता करणारापरिवर्तनासाठी धर्महा लेखसंग्रह; सूक्ष्म निरीक्षण लालित्यपूर्ण शैलीतीलओअॅसिसच्या शोधात’, ‘संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची ही प्रवासवर्णने; ‘सृजनाचा मळाअशा विविध वाङ्मय प्रकारात स्वत:चा ठसा उमटवत आहे.

त्यांनी   बायबलचा केलेला सुबोध अनुवादावर महाराष्ट्रात सर्वधर्मीय वाचकांची पसंतीची मोहोर उमटली आहे. या कामासाठी त्यांना साहित्य अकादमीने उत्कृष्ट अनुवादाचा पुरस्कार देऊन गौरविले आहे. ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार त्यांना संताच्या भूमीत  आळंदी येथे प्रदान करण्यात आला. तसेच अनेक मानाच्या पुरस्काराने त्यांना आतापर्यंत सन्मानित करण्यात आले आहे. ‘नाही मी एकलाअसे म्हणत फादर यांनी आपल्या  साहित्यिक  प्रवासात  वसईकर जनतेला आपल्यासोबत घेतले. 20  वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांनी सुवार्तेच्या संपादकपदाची धुरा सांभाळली. त्यांच्या या कार्यकीर्दीत त्यांनी वसईतल्या कॅथलिक समाजाचे मुखपत्र असलेले सुवार्ता मासिक  महाराष्ट्रभर पोहोचवले. साहित्यिक प्रबोधनाची जवळपास अडीच दशके यशस्वी धुरा सांभाळत त्यांनी खर्या अर्थाने वसईचे सांस्कृतिक नेतृत्व केले. 

त्यांनी चालविलेल्या चळवळीने वसईचा सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध केला. उपासकालीन व्याख्यानमाला, सुवार्ता साहित्य मेळावा, वाचक मेळावा यासारखे अनेक उपक्रम त्यांनी राबविले. लोकाभिमुख केले. त्यांना लोकाश्रय मिळाला. त्यांच्या साहित्याने वसईला महाराष्ट्राच्या साहित्यिक, सांस्कृतिक पटलावर आणले. वसईकरांना साहित्याच्या अधिक समीप आणले. अनेकांना साहित्याची आवड निर्माण झाली. अनेक तरुण लिहिते झाले, या विचारांच्या उत्सवातून, देवाणघेवाणीतून वसईतील प्रबोधनाची परंपरा आणि निसर्गविषयक आस्था आताच्या तरुणांपर्यंत झिरपत आली आहे, त्यामुळेच  प्रबोधन उपक्रमाचा वारसा, निसर्ग रक्षणाचा लढा तरुण पुढे नेत आहेत, जपून ठेवत आहेत, त्याचे प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक फादर आहेत.

सध्या जगभर आणि देशभर धार्मिक उन्मादी वातावरण निर्माण झाले आहे, या परिस्थितीत फादर यांच्यासारख्या व्यक्तीची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणं दिलासादायक आणि आश्वासक असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. कारण आधुनिक काळात धर्म संघर्षासाठी नसून परिवर्तनासाठी आहे अशी फादर यांची भूमिका आहे. धार्मिक उन्माद हा विशिष्ट लोकांनी आपल्या स्वार्थासाठी कृत्रिमरीत्या निर्माण केलेला आहे. मात्र अनेक धर्म हजारो वर्षे येथे नांदत आहेत, परस्परविरोधी तत्त्वज्ञान, उपासना पद्धती भिन्न असूनही भारताची सहिष्णुता आपण जपली आहे, जोपासली आहे. सहिष्णुता, करुणा, सहभाव, बंधुत्व, क्षमाशीलता आणि मानवता या मूल्यांचा आग्रह धर्माने धरला पाहिजे असे मानून त्यासाठी त्यांनी सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि धार्मिक अशा विविध प्रकारच्या उपक्रमातून स्वत:ला समाजाशी, अन्य धर्मीयांशी जोडून घेतले आहे. धर्मांधतेच्या विषयावर सर्वधर्ममैत्री आणि सर्वधर्मसंवाद हा फादर यांचा कृतिशील विचार आजच्या काळात फार महत्त्वाचा  ठरणार आहे, या संवादासाठी ते आग्रही आणि प्रयत्नशील आहेत.

भारताच्या एकात्मता संवाद आणि मैत्रीच्या आधारावर टिकून राहील असा त्यांना विश्वास आहे त्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमातून संवादासाठी वेगवेगळे प्रयोग ते राबवीत आहेत..

अनेक अन्य धर्मीय व्यक्ती, संस्था, संघटना यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्या संवादी उपक्रमांना त्यांना चांगला प्रतिसादही मिळाला आहे. पुणे येथीलजंगली महाराज मंदिरआणि मुंबई वरळी येथीलहनुमान मंदिरयेथे त्यांनी प्रवचनं दिली आहेत. वसईतील वाघोली येथील एका मंदिरात त्यांनी ज्ञानेश्वर माऊलीने जगाच्या कल्याणासाठी मागितलेल्या पसायदानाचे निरूपण केले, त्याला श्रोत्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता.

अनेक संस्था, व्यक्ती, चळवळीतील कार्यकर्त्यांना फादर नेहमी आपले वाटत आले आहेत. या सर्वांना फादर यांनी नेहमीच आपला कृतिशील पाठिंबा प्रोत्साहन दिले आहे.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडीबाबत फादर यांना विचारले असता फादर यांनी, ‘मला गुरुवर्य असलेल्या  कुसुमाग्रज, पु..देशपांडे यांच्यासह अनेक दिग्गजांनी आतापर्यंत हे पद भूषविले आहे. मला माझ्या मर्यादांची जाणीव आहे म्हणूनच ही निवड माझ्यासाठी अनपेक्षित आहे, तरी या पदाचा बहुमान मिळाला याचा मला आनंद आहे.’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्याबरोबरच संमेलन साधेपणाने व्हावे आणि साहित्य संमेलन केवळ दोन-तीन दिवस चालणारे नसते तर ते अखंड चालूच असते असेही मत नोंदवले आहे.

सुबोध बायबलच्या मनोगतात फादर यांनी स्वत:च्या लेखनकामाविषयी म्हणताना
मी तो हमाल भारवाहीअसे म्हटले आहे. म्हणजेच आपण आपले कर्तृत्व करीत राहावे, आपण आपली भूमिका निष्ठेने पार पाडावी, हीच आपल्या धर्माची शिकवण आहे अशी कर्तृत्वनिष्ठ भूमिका फादर यांनी सातत्याने घेतली आहे आणि त्यामुळेच फादर यांंना अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विराजमान होणं मराठी साहित्य परंपरा अधिक समृद्ध करणारं ठरेल, असा विश्वास अनेकांना वाटत आहे.                   

- फेलिक्स डिसोजा

No comments:

Post a Comment

माणगाव परिषद : बहिष्कृतांचे रणशिंग - उत्तम कांबळे

'अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद ’ हा उत्तम कांबळे यांचा ग्रंथ ‘ लोकवाङ् ‌ मय गृह ’ तर्फे लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. एका ऐति...