2

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 85 30 52 85 50 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

Thursday 7 November 2019

सातपाटील कुलवृत्तांत - कल्पित आणि वास्तवाचे मिश्रण


सातपाटील कुलवृत्तांत ही कादंबरी सातशे वर्षांच्या इतिहासाला आणि संस्कृतीला कवेत घेते. ज्यात स्त्री-पुरुष संबंधांचा इतिहास, अठरापगड जातींचा इतिहास, अफगाण आणि मराठा संबंधांचा इतिहास या आणि अशा कित्येक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक घटनांचे विवेचन करते. रंगनाथ पठारे या कादंबरीवरती मागच्या तीस वर्षांपासून विचार करत होते. तर प्रत्यक्षात या पुस्तकाची लेखनप्रक्रिया आणि मांडणी मागच्या तीन वर्षांत पूर्ण झाली आहे. या कादंबरीच्या निर्मितीसाठी लागलेल्या कष्टाची मोजणी त्यामागे असलेल्या तीस वर्षांच्या प्रचंड विचारप्रक्रियेवरून करता येईल.

भाषणाच्या शेवटी रंगनाथ पठारे म्हणतात की, कुठल्याही कादंबरीचे मूळ हे वर्तमानातच असतात. तुमच्या वर्तमानातील प्रश्नांचे अर्थ शोधण्यासाठीच तुम्ही तुमच्या भूतकाळात किंवा भविष्यात जाता आणि या झालेल्या प्रवासाचे संचित आपल्या लेखनातून मांडत असता.

सातपाटील कुलवृत्तांत ही रंगनाथ पठारे यांची कादंबरी 21 सप्टेंबर 2019 रोजी पुण्यामध्ये प्रकाशित झाली. हे पुस्तक शब्दालय प्रकाशनने प्रकाशित केले आहे. या कार्यक्रमाला व्यासपीठावर सुमती लांडे, दीपक करंजीकर, राजन गवस, राजन खान, प्रभाकर कोलते आणि स्वत: रंगनाथ पठारे उपस्थित होते.   

कादंबरीबद्दल राजन खान म्हणतात, रंगनाथ पठारे हे सलग वाचलेला मी मराठीमध्ये एकमेव लेखक आहे. त्यांच्या पहिल्या कथेपासून ते सातपाटील कुलवृत्तान्तपर्यंत मी सगळं वाचलं आहे. मराठीमध्ये सलग वाचावा असा लेखक विरळा आहे, पण रंगनाथ पठारे या कसोटीला पुरून उरतात.

राजन गवस यांच्या मते ही कादंबरी एक शोध आहे, शोधाच्या या प्रवासात ती वाचकाला सोबत घेऊन त्याच्या सातशे वर्षांच्या काल पटलावरती सहज फिरवून आणि पुढे राजन गवस यांनी कादंबरीबद्दल काही नोंदी मांडल्या, या कादंबरीचा पट मांडताना पठारेंनी कल्पित आणि वास्तव याची सरमिसळ केली आहे आणि ती करताना या कादंबरीवरची, त्याच्या प्रवाहीपणावरची पकड यत्किंचितही ढिली पडू दिली नाही. या कल्पित आणि वास्तवाच्या मिश्रणातून तयार झालेल्या कादंबरीला एका जातीमध्ये बांधणे तर सोडाच एका साहित्यप्रकारात मांडणे देखील कठीण आहे.
वर्तमान मराठी समीक्षकांच्या भूमिकेवरतीही राजन गवस प्रश्नचिन्ह उभे करताना दिसतात. देशी आणि प्रायोगिक या दोनच पारड्यात प्रत्येक पुस्तक तोलून बघण्याच्या त्यांच्या प्रक्रियेबद्दल त्यांना शंका वाटते.

पुढे भाषणात अरुण कोलटकरांचा संदर्भ देत राजन गवस म्हणतात, कोल्हटकरांच्याजेजुरीपासून सुरू होणार्या कवितेचा प्रवासभिजकी वहीपर्यंत येईस्तोवर किती प्रकारे बदलला. ‘जेजुरीमधली कविताभिजक्या वहीपर्यंत पोहोचता पोहोचता सोपी झाली. याच पद्धतीने पठारे सरांच्याकोंबालगतचा प्रवासपासून सुरू झालेला साहित्यप्रवास वेगवेगळे प्रयोग करत सातपाटील कुलवृत्तांतपर्यंत येऊन पोहोचला आहे. या अगणित प्रयोगातून पठारे सरांचा सोप्याकडे होत गेलेला प्रवास आपल्याला सातपाटीलमध्ये लक्षात येतो. इथे वापरलेलासोपाहा शब्दसहजया अर्थी वापरला जातोय.

चित्रकार प्रभाकर कोलते यांचे चित्र या कादंबरीच्या मुखपृष्ठावर आहे. कादंबरीच्या मुखपृष्ठावरील चित्राच्या प्रक्रियेबद्दल प्रभाकर कोलते म्हणतात, या मुखपृष्ठासाठी मी जवळजवळ दहा चित्र काढली. त्यातल्या कशातही मी समाधानी नव्हतो. तेव्हा या कादंबरीचा परत एकदा विचार करताना मला असे लक्षात आले की ही कादंबरी एका वृक्षासमान आहे आणि तिची मुळं आपल्या संस्कृतीमध्ये खोलवर रुजली आहेत. या संकल्पनेवर आधारित चित्रामध्ये या प्रतीकात्मक मुळांना मी स्थान दिले. झालेल्या चित्रावर नंतर मी एक खादीचा कपडा लावून त्यावर वॉटर कलरचा हात फिरवला. या प्रक्रियेनंतर मला खर्या अर्थी विश्वास वाटला की, या कादंबरीसारखेच असंख्य पदर असणारे रंगनाथ पठारे या चित्रातून मला सापडले.

या संपूर्ण प्रकाशन सोहळ्याला बरीच मान्यवर मंडळी उपस्थित होती. त्यात सध्या साहित्यविश्वात उल्लेखनीय काम करणारे प्रणव सखदेव, स्वप्निल शेळके, कुणाल गायकवाड, महेश लोंढे, प्रतीक पुरी अशी तरुण लेखक, कवी उपस्थित होते.

सरतेशेवटी या पुस्तकाचे एका वाक्यात वर्णन करायचे ठरवल्यास असे म्हणता येईल की, ही कादंबरी इतिहास, संस्कृती, प्रेरणा, स्वभाव, सामाजिक भाषिक कंगोरे आणि अशा अगणित गोष्टींना स्वत:च्या प्रवाहात सामावून घेऊन एक खळाळता जिवंत अनुभव सर्वांपर्यंत पोहोचवते.
चारुदत्त पांडे

No comments:

Post a Comment

माणगाव परिषद : बहिष्कृतांचे रणशिंग - उत्तम कांबळे

'अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद ’ हा उत्तम कांबळे यांचा ग्रंथ ‘ लोकवाङ् ‌ मय गृह ’ तर्फे लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. एका ऐति...