2

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 85 30 52 85 50 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

Thursday, 7 November 2019

विज्ञान विषयावरील शास्त्रज्ञांनी लिहिलेली पुस्तके

शास्त्रज्ञांनी लिहिलेली पुस्तके मराठीत कमी आहेत. शास्त्रज्ञाने स्वत: लिहिलेले अनुभव किंवा आत्मचरित्र हे पहिल्या प्रतीचे विज्ञानानुभव म्हणता येतील. त्याने लिहिलेले ललित लेखन विशेषत: विज्ञान काल्पनिका त्याच्या एकूण कल्पनेच्या भरारीचे दालन वाचकाला उघडून देतात. तर शास्त्रज्ञाचे चरित्र जर त्याच्या क्षेत्रातील जाणकाराने लिहिले, तर त्या क्षेत्रातील वेगळी माहिती आपल्याला मिळते किंवा एखाद्या शोधाची गोष्ट लिहिली तर ती ज्ञान कसकसे होत जाते याची चुणूक दाखवते. त्यातल्या त्यात विज्ञानातील माहिती देणारी पुस्तके तो विषय लोकप्रिय करायला मदत करतो. या प्रकारातील पुस्तके मराठीत जरा जास्त आहेत.

शिक्षक, शेतकरी, संशोधक हे केवळ उपजीविकेचे प्रकार नाहीत. ते जीवनदृष्टी असणारे पेशांचे प्रकार आहेत. केवळ पैसे मिळतात त्या पैशावर उपजीविका करता येते म्हणूनही असा पेशा काही जण स्वीकारतही असतील, पण त्या पेशाची जीवनदृष्टी होते, आवड निर्माण होते म्हणून त्यात काम करणार्यांना त्याचा वेगळा आनंद घेता येतो. तो अनेकदा पैशाने कमी किफायतशीर होत असला तरी अनुभवाने समृद्ध करणारा उपक्रम ठरतो. या मंडळींचे अनुभव समाजातील इतरांना समजले, तर समाजालाही या मानसिक, बौद्धिक समृद्धीत सहभागी होता येते.

लिओनार्द व्हिन्चीची टिपणे काहीशी माहिती देतात पण ती खूप गुंतागुंतीची आहेत. मेंडेल या धर्मगुरूने केलेल्या वाटाण्याच्या नोंंदी अनेक वर्षे दुर्लक्षित राहिल्या. जेव्हा त्या लक्षात आल्या, तेव्हा मेंडेलच्या प्रयोगाचे महत्त्व लोकांच्या हळूहळू लक्षात आले. नंतर झालेल्या त्या क्षेत्रातल्या प्रगतीने तो अनुवंशशास्त्राचा जनक ठरला.

हेन्री कॅव्हेंडीशचे संशोधनाच्या नोंदीही अनेक वर्षे धूळ खात पडल्या होत्या. जेम्स मॅक्स्वेल या शास्त्रज्ञाने त्या शोधून बराच काळ घालवून त्यांचे संपादन करून त्या लक्षात आणल्या तेव्हा असे लक्षात आले, की त्याच्या नंतर इतर शास्त्रज्ञांनी केलेले काम किंवा लावलेले शोध कॅव्हेंडीशने काही दशके आधीच लावले होते. शोध नंतर लावणार्यांनी लक्षित केलेल्या शोधांचे श्रेय त्या शास्त्रज्ञांपासून हिरावून घेतले गेले नाही, तरी कॅव्हेंडीशलाही मरणोत्तर का होईना, रास्त श्रेय मिळालेच.

जेम्स मॅक्स्वेल स्वत: आघाडीचा शास्त्रज्ञ होता. त्यांनी केलेल्या संशोधनामुळे त्याचे समीकरण आणि त्याने सांगितलेला स्थिरांक यामुळे नंतरच्या काळात पुंज सिद्धांताचा (क्वांटम थिअरीचा) पाया घातला गेला. त्याला काही जणांनी विचारले, स्वत:चे संशोधन करण्यासाठी लागणारा वेळही मर्यादित असताना, आधीच्या पिढीत होऊन गेलेल्या शास्त्रज्ञाचे काम लक्षात आणण्यासाठी एवढा वेळ घालवणे कितपत समर्थनीय होते. त्याने दिलेले उत्तरही आदर्श संशोधकाचा एक पैलू स्पष्ट करते. तो म्हणाला मॅक्स्वेलचे समीकरण शोधणे जितके महत्त्वाचे होते त्याहूनही कॅव्हेंडीशचे संशोधन नव्याने उजेडात आणणे जास्त महत्त्वाचे होते. कारण त्यावेळी पदार्थविज्ञानातील विशेषत: अणुविज्ञानातील गूढ उकलण्याचे जे काम चढाओढीने अनेक जण करीत होते, त्यात कोणाला तरी मॅक्स्वेलच्या समीकरणाचा स्थिरांकाचा शोध स्वतंत्रपणे लागलाच असता. पण कॅव्हेंडीशच्या कागदपत्रांमधून ते संपादन करणे त्याच प्रयोगशाळेत संशोधन करत असल्याने ते त्यालाच शक्य होते. त्यामुळे ते काम त्यानेच करणे क्रमप्राप्त होते.

त्या प्रयोगशाळेला कॅव्हेंडीशचे नाव मिळाले, त्याच प्रयोगशाळेत नंतर अनेक विद्यार्थी संशोधकांनी काम केले. त्यातील अनेकांना नोबेल पुरस्कार मिळाले. अशा प्रकारे दर्जेदार संशोधनाची परंपरा अखंडित चालू राहिली.  आधीच्या पिढीतील संशोधकांचे महत्त्व ओळखणे नंतरच्या पिढीतील संशोधकांना वाव देणे यातूनच ही ज्ञानाची परंपरा अखंड चालू राहते. त्यामुळेच याच कॅव्हेंडीश लॅबमध्ये 1950च्या दशकात आनुवंशिकतेला कारणीभूत असणार्या डीएनएची संरचनाशी असते यावर जेम्स वॅटसनने त्याच्या सहकार्यांनी जे संशोधन केले त्यालापण नोबेल पुरस्कार मिळाला.
त्याबद्दलचे वॅटसनने लिहिलेले पुस्तक डबल हेलिक्स प्रकाशित झाल्यावर चांगलेच चर्चेत आले. नोबेल पुरस्कारात श्रे़य मिळालेल्या स्त्री संशोधकाचे श्रेय पुस्तकातही नाकारले गेले. मग तिचेही चरित्र बाजारात आले. इतर सहसंशोधकांनीही या संशोधनाच्या दिवसांवर आत्मचरित्रपर पुस्तके लिहिली.

न्यूटनने केलेले संशोधन प्रकाशित करायला स्वत: खूप वेळ घेतला. त्याचे सिद्धांत वापरून इतर लोकांनी त्यापुढचे संशोधन करू नये, म्हणून न्यूटन पुढील सिद्धांताचे काम स्वत: करेपर्यंत आधीचे संशोधन प्रकाशात आणत नसे, असे आरोप त्याच्या चरित्राच्या काही अभ्यासकांनी केले. आठ दशकांचे प्रदीर्घ आयुष्य मिळालेल्या न्यूटनला असे संपूर्ण सिद्धांत मांडण्याचे काम करायला आणि ते सिद्धांत हयातीतच प्रक्षित होऊन त्याचे योग्य ते श्रेय मिळालेले बघायला वेळ मिळाला.
फ्रेंच गणिती फर्माच्या अशा गणितविषयक नोंदी प्रकाशात यायला उशीर लागला. त्याच्या वारसांनी जेव्हा ते उजेडात आणले तेव्हा त्याच्या सिद्धांतांच्या नोंदी सापडल्या नाहीत. त्याच्या काही प्रमेयांच्या सिद्धता इतर गणितींनी शोधल्या. मात्र ज्याला फर्माचे अंतिम प्रमेय म्हणतात ते उलगडून दाखवणारी सिद्धता शतकभर संशोधकांना हुलकावणी देत राहिली. फर्माने स्वत: सिद्धता दिली असेल, आणि ती उपलब्ध झाली असती, तर आतापर्यंत पुढचे टप्पे गणितींना गाठता आले असते, असे काही जण म्हणतात, तर त्या सिद्धांताच्या निमित्ताने इतर गणितींना या विषयात काम करण्याचे आव्हान मिळाल्याने प्रगती झाली असे काही जणांचे म्हणणे आहे.

विज्ञानाच्या अनेक पैलूंवर लिहिणारे विज्ञान काल्पनिका लिहिणारे लेखक आयझॅक आसिमोव्ह यांचे आत्मचरित्र दोन खंडांत आणि सुमारे हजारभर पानांचे असावे. इतर अनेक रंजक माहितीबरोबरच एक गोष्ट लक्षात येते ती अशी, की त्यांनी जवळपास दर महिन्याला एक, या वेगानी थोडीथोडकी नाही तर आठशेहून अधिक पुस्तके लिहिली. म्हणजे लिहिण्याचे कष्ट, वेग आणि सातत्य (आणि अर्थातच या विषयाचे प्रेम) लक्षात येते.

शास्त्रज्ञांनी स्वत: आत्मपर लिहिले नाही तरी इतर निकटवर्तीयांनी किंवा त्यांच्या क्षेत्रातल्या इतरांनी परिश्रमपूर्वक चरित्र लिहिले तरीही वेगळा प्रश् संशोधनावर पडतो. किंवा विनयाने ज्या गोष्टी तो शास्त्रज्ञ स्वत: सांगणार नाही त्या त्याच्या चरित्रकारांना सांगणे साधते उचित ठरते. पिटर मेदावर या नोबेल पुरस्कार मिळालेल्या संशोधकाला उत्तर काळात आरोग्यविषयक समस्येमुळे लिहिण्यावर मर्यादा आल्या तेव्हा त्याच्यावर पत्नीने लिहिलेले पुस्तक याचे चांगले उदाहरण आहे.
आइन्स्टाइनचे चरित्र आणि अणूच्या शोधाची गोष्ट ही दोन पुस्तके अब्राहम पाइस या भौतिकशास्त्रज्ञाने लिहिली आहेत. सटल इज लॉर्ड आणि इनवर्ड बाऊंड ही ती दोन पुस्तके. कदाचित आइन्स्टाइनलाही एवढ्या रसाळपणे लिहिता आली नसती असे काही वाचक संशोधकांनी म्हटले आहे.

कामेश्वर वाली यांनी सुब्रह्मण्यम चंद्रशेखर या नोबेल पुरस्काराने सन्मानित झालेल्या संशोधकाचे चरित्र चंद्रा लिहिले तेही असेच रसाळ आहे. भारतातील जीवशास्त्रज्ञ बलराम साहनी यांचे काका रुचिराम साहनी यांच्या दैनंदिनीच्या नोंदींचे पुस्तक आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील विज्ञान संशोधनावर लक्ष टाकतात. रुचिराम साहनींच्या ऑब्झर्वेटरीतील नोकरीचे अनुभव, त्यांचे विज्ञान लोकप्रिय करण्याचे अनुभव, अंधश्रद्धा निर्मूलनाचे अनुभव, शास्त्रीय उपकरणे बनवण्याचे त्यांचे व्यवसायाचे प्रयत्न, त्याच्या उपकरणाच्या दर्जेदारपणाला पुण्यातील प्रयत्नांना मिळालेली दाद हे सारेच वाचण्यासारखे आहे. विशेष म्हणजे याचे मराठी भाषांतर उपलब्ध होते. आता त्याच्या प्रती शिल्लक नसाव्यात आणि त्याची पुढील आवृत्तीही उपलब्ध नाही.

शास्त्रज्ञांच्या किंवा त्यांच्यावरील पुस्तकाचे वाचन आवर्जून जाणीवपूर्वक केले, तर मराठी वाचकांना संशोधनाच्या अनुभवांचे एक वेगळे दालन तर खुले होईलच, पण कदाचित या संधीचा आनुषंगिक लाभ म्हणून या विषयावर मराठीतही पुस्तके प्रकाशित होतील.
जयंत गाडगीळ

No comments:

Post a Comment

माणगाव परिषद : बहिष्कृतांचे रणशिंग - उत्तम कांबळे

'अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद ’ हा उत्तम कांबळे यांचा ग्रंथ ‘ लोकवाङ् ‌ मय गृह ’ तर्फे लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. एका ऐति...