2

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 85 30 52 85 50 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

Tuesday 17 December 2019

शौकत कैफी आझमी आनंदोत्सव


अनेक संस्कृतीत जन्माप्रमाणे मृत्यूचाही उत्सव केला जातो. मरण हे मानवी वास्तव जीवनाचा भागच आहे. परंतु मृत माणसांच्या आठवणी त्याच्या चांगल्या स्मृती व कार्य यांची आठवण म्हणजे सेलेब्रेशन होय!

26 नोव्हेंबर, 2019 रोजी मुंबईत जलाराम सभागृह, विलेपार्ले येथे शौकत कैफी आझम यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. या श्रद्धांजली सभेला आझमी कुटुंबीयांच्या कल्पक आयोजनामुळे आनंदोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते. शबाना आझमी, बाबा आझमी या शौकतच्या मुलांनी आणि कुटुंबीयांनी अभिनव पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित करून सर्वांना मोहित केले.
सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल, राकेश रोशन, अभिनेत्री काजोल व तब्बूसह अनेक सहकलाकारांनी शौकतजींना आदरांजली वाहिली.

शौकत आझमी यांचे व्यक्तिमत्त्व भारदस्त होते. त्या स्वत: कलावंत होत्या व त्यांना अभिनय संगीत, कविता यांची चांगली जाण होती व चांगले जीवन जगण्याची कलाही त्यांना अवगत होती. हैद्राबाद संस्थानाच्या मोठ्या अधिकार्‍याची मुलगी लखनऊच्या जमीनदार घराण्याचे बंडखोर शायर असलेल्या कैफी आझमी यांच्या प्रेमात पडली. खरं पाहता आधी त्यांच्या शायरीच्या व नंतर शायरच्या प्रेमात पडली असे म्हणणे जास्त योग्य होईल. स्वभावच बंडखोर असलेल्या शौकतजींनी घरातला विरोध मोडून काढला व आपल्या वडिलांना मुंबईत येऊन 40रु. महिना घेऊन खोलीत कम्युनमध्ये राहणार्‍या कैफी आझमीशी लग्न करून देण्यास भाग पाडले! हे तत्कालीन समाज स्थितीत मोठे क्रांतिकारीच होते! अत्यंत सुस्थितीत राहणारी ही मुलगी मुंबईत एका खोलीत कम्युनमध्ये राहण्यास आली! लखनऊ व हैद्राबाद या दोन शहरांना तत्कालीन काळात गंगा-जमुना तहजीब म्हणत असत, म्हणजे, ती हिंदू-मुस्लीम एकत्र राहण्याची शहरे होती व त्याचा प्रभाव आयुष्यभर त्यांच्यावर होता. कम्युनिस्ट नसलेली ही महिला आपल्या प्रेमासाठी कम्युनिस्ट झाली व अंतापर्यंत चांगली कम्युनिस्ट म्हणून जगली तिची जीवनमूल्ये इतरांना प्रेरणादायी ठरली.

कार्यक्रमाची सुरुवात सतारवादनांनी व नंतर आझमी कुटुंबीयांचाच घनिष्ठ स्नेह असलेल्या सिंग या प्रतिभावान गायकाच्या गाण्याने झाली, कैफी आझमीची एक लम्हा, ही गझल व नंतर मिर्झा गालिब, शौकत आझमी यांची आवडती गझल गाऊन या गायकाने रंगत आणली व मैफल जमवली. शबाना आझमीने आपल्या निवेदनात आपल्या आईवडिलांच्या अनेक आठवणी जागवल्या.

शौकत आझमी दररोज सकाळी तब्येतीत चहा घेत असत! त्यावरून कैफीनी ‘तुम कुछ ना कहो, मैं कुछ ना कहुँ’, ही गझल लिहिली होती. शबाना यांनी आपल्या वडिलांची व शौकतजींना गप्प करण्याची इच्छाच या निमित्ताने व्यक्त केली असे सांगितले.

शौकत आझमी यांनी ‘‘कैफी आणि मी’’ हे पुस्तक लिहिले. ते इंग्रजीत आले. तेव्हा नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांनी त्या बद्दल फारच चांगले लिहिले. ते आपल्या आईला वाचून दाखवल्यावर त्यांनी हे अमर्त्य सेन कोण? असे विचारले शबानाने ते मोठे अर्थतज्ज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते आहेत, हे सांगितल्यावर सायंकाळी शौकत जी 16 साड्या विकत घेऊन आल्या! शबानाने हे काय? मी पण एवढ्या साड्या एकदम आणल्या नाहीत हे सांगितले! त्यावर तुझी स्तुती अमर्त्य सेन यांनी केली का? असा प्रश्‍न विचारून आपला आनंद शौकतजींनी व्यक्त केल्याची आठवणही शबानाने सांगितली.

सुप्रसिद्ध ड्रेस डिझाईनर भावना सोमय्या या शबाना आझमीच्या मैत्रिणी आहेत. तसेच त्या कुटुंबांच्या सदस्यदेखील! त्यांनी शौकतजीच्या साडी प्रेमाबद्दल, मॅचिंगच्या त्यांच्या आग्रहाबद्दल सांगतानाच, मला साडी नेसव, लिपस्टिक पावडर लाव, चादर नीट कर, कारण डॉक्टर येणार आहेत असे सांगणार्‍या एका वेगळ्याच व्यक्तिमत्त्वाची शौकतजीची ओळख करून दिली. इप्टाचे जावेद आनंद यांनी त्यांच्या कलाकार म्हणून असलेल्या कामगिरीची व उच्चदर्जाच्या अभिनयाची माहिती दिली. विशेषत: भूमिकेत समरस होणार्‍या त्यांच्या अभिनयाच्या ताकदीची उदाहरणे त्यांनी उमरावजान व इतर चित्रपटातील अभिनयाची उदाहरणे दिली.

शौकतची सून व त्यांची मुलगी तन्वी आझमी यांनी आपल्या सासूबद्दल अनेक छोट्यामोठ्या घटना सांगून त्यांचे व्यक्तित्व उलगडले. विशेषत: लग्न झाल्यावर कैफीजींनी स्त्री स्वातंत्र्य, सक्षमीकरण, व्यक्तिमत्त्व विकास याबद्दल सतत बोलणार्‍या  सासूपासून सावधान राहण्याचा दिलेला इशारा फारच  महत्त्वाच्या पैलूंची आठवण करून देणारा ठरला.

जावेद अख्तर या त्यांच्या जावयाने फारच चांगल्या व योग्य तर्‍हेने शौकतजीच्या व्यक्तित्वाचा आढावा घेतला. अखंड प्रेमात पडलेली स्त्री, वाहत जाऊन शेवटी दासी वा गुलाम होते. परंतु शौकतजींनी ते होऊ दिले नाही. त्यांनी शैलीवर, त्यांच्या काव्यावर जिवापाड प्रेम केले. 55 वर्षे त्यांना साथ दिली. स्वतंत्र व्यक्तिमत्त्व व ओळख कायम ठेवली. हे त्यांचे जगणे अवघड परंतु तेवढेच महत्त्वाचे होते.

त्यांना खोटे बोलणे जमायचे नाही. त्यामुळे सलीम-जावेद यांचा ‘इमान धरम’ हा चित्रपट चालणार नाही. हे त्यांनी स्पष्टपणे जावेद अख्तर, यांना त्याचा खास शो पाहिल्यावर सांगितले होते. त्यानंतर काही आठवड्यांनी जावेद अख्तर हा प्रसंग विसरले असताना, ‘त्रिशूल’ या चित्रपटाचा शो पाहून त्यांनी जावेद यांना हा चांगला चित्रपट आहे, असे आवर्जून सांगून, जुन्या इमान-धरमच्या वेळी केलेल्या व्यक्तव्याची आठवण करून दिली.

एका जीवनपटात शबाना यांनी नेसलेली साडी व ब्लाऊज यांच्या बद्दल काय बेकार मॅचिंग आहे असे सर्वांसमोर त्यांनी आपले मत मांडण्याचा किस्साही सांगितला. त्या आजारी असताना त्यांच्या नातीने त्यांची केलेली देखभाल ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वासाठी प्रेमाच्या आठवणी ठरल्या. या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

हिंदू-मुस्लीम असा भेद न मानणारे हे कम्युनिस्ट कुटुंब आहे. याची जाणीव जेव्हा शबानाजींना झाली तेव्हा त्यांनी सर्वांना नमस्कार न करता लाल सलाम केला.

या आदरांजली सभेला कॉ. सुरेश धोपेश्वरकर, कॉ. राजन बावडेकर, कॉ. प्रकाश रेड्डी, कॉ. चारुल जोशी व इतर अनेक पक्ष व इप्टा सदस्य उपस्थित होते.

- डॉ. भालचंद्र कानगो

No comments:

Post a Comment

माणगाव परिषद : बहिष्कृतांचे रणशिंग - उत्तम कांबळे

'अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद ’ हा उत्तम कांबळे यांचा ग्रंथ ‘ लोकवाङ् ‌ मय गृह ’ तर्फे लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. एका ऐति...