2

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 85 30 52 85 50 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

Friday 16 August 2019

‘त्रिज्या’ : मूल्यनिष्ठा आणि प्रेरणांचा शोध


त्रिज्याया अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या लेखसंग्रहात डॉ. गणेश देवी आजवरच्या स्वत:च्याच कार्याचा शोध घेताना दिसतात. त्यामुळे या पुस्तकातून त्यांच्या साहित्य-भाषाविषयक समीक्षा आणि संशोधनाचा अधिक सखोल परिचय वाचकांना होतो. ‘त्रिज्यामधील त्यांचे हे सिंहावलोकन निव्वळ बौद्धिक नाही; तर ते भावना, संवेदना आणि अंत:प्रेरणांच्या स्वरूपातील तो आत्मशोध आहे. या शोधाचा पटही विशाल आहे. पण संस्कृती, साहित्य, भाषा व आदिवासी-भटक्या जमातीच्या मूलभूत प्रश्नांच्या संदर्भात ते इतिहासाचा धांडोळा घेत समकालाच्या परिप्रेक्ष्यात आपले चिंतन मांडतात. एकूणच त्यांच्या संशोधनाचा व्यास एका भाषेचा किंवा संस्कृतीचा नसून तो वैश्विक कसा आहे याचा प्रत्ययत्रिज्याया पुस्तकातून येतो. 

त्रिज्याया लेखसंग्रहातील लेखांचे स्वरूप मनोगत, चिंतन, नोंदी आणि वृत्तांत अशा स्वरूपाचे संमिश्र आहे. काही ठिकाणी डॉ. देवी पद्याचाही वापर करतात. पुस्तकाच्या प्रारंभीच ते लिहितात,

जो गोष्ट सांगतो तो त्या गोष्टी असत नाही.
जे गोष्टीत असतात ते ती गोष्ट सांगत नाहीत.
जो गोष्ट सांगतो तो ती गोष्ट असत नाही.
तो ती गोष्ट नसतो तर ती गोष्टही नसते.
आणि तो गोष्टीत नसतो म्हणजे तो नसतो.
या सार्या नसणार्यांनी सांगितलेल्या, नसलेल्या गोष्टी.
पण सांगणे असतेच.
ते असते म्हणजे एखादा सांगणारा असलाच पाहिजे.
आणि सांगणे असले म्हणजे ते सांगितले जात आहे
ते कुठेतरी, काहीतरी असले पाहिजे.
हे असे, असणे आणि त्याच वेळी नसणे.
असण्याचा केंद्रबिंदू आणि नसण्याचा परीघ जोडणारी त्रिज्या.’ 

डॉ. देवीत्रिज्याया पहिल्याच लेखात त्यांच्यावर तरुणपणी झालेले संस्कार सांगतात. गौतमाचे समाधीवस्थेतून परत फिरणे, जैन तत्त्वज्ञानातील काळ-अणूची संकल्पना आणि युक्लिडच्या भूमितीतील त्रिज्येविषयीच्या त्यांच्या धारणा आणि पुढे डार्विन व मार्क्स यांच्या विचारांच्या संदर्भात सत्तेचेकेंद्रआणिपरिघाविषयी चिंतन ते मांडतात. त्यांच्या आगळ्यावेगळ्या शैलीमुळे वाचकांना एकाच वेळी त्यांच्या लेखनातील बौद्धिक परिमाण आणि भाषिक लालित्याचा अनुभव येतो.  

त्रिज्यामध्ये आठ लेख आहेत. ‘स्व-त्वया लेखात महात्मा गांधी, श्री अरविंद, डॉ. आंबेडकर आणि महाश्वेतादेवी यांच्या वैचारिक संस्कारातून आपले विचारविश्व कसे घडत गेले ते डॉ. देवी सांगतात. त्याच प्रभावातून ते विद्यापीठातील प्राध्यापकीचा त्याग करून भटक्या आदिवासींच्या प्रश्नांवर काम करू लागतात. प्रारंभ करतात. जीवनमूल्यांसाठी स्व-त्वाची अशी परखड परीक्षा स्वत:च घेणारे डॉ. देवी जीवनमूल्यांच्या आग्रहासाठी प्राण पणाला लावणार्या महात्म्यांच्या बलिदानाचे कटू सत्य पुढील शब्दात मांडतात :       

स्त्री-त्वहा या संग्रहातील एक महत्त्वाचा लेख. या लेखात त्यांनी प्रेम, सत्य व सौंदर्य या संकल्पनांचा मागोवा घेतला आहे. बुद्ध, येशू, मीरा आणि गांधी यांनी प्रेमाचे तत्त्वज्ञान मांडले. उच्च दर्जाच्या प्रेमाला बुद्ध करुणा आणि गांधी अहिंसा म्हणतात. त्यांची अहिंसेची अभिव्यक्ती स्त्रीत्वावर आधारित असल्याचे सांगून डॉ. देवीस्त्रीत्वया संकल्पनेला गांधींच्या राजकारणाच्या संदर्भात मूल्याचा दर्जा देतात. महात्मा गांधींच्या राजकीय आंदोलनातीलमौन’, ‘असहकारमिठाचा सत्याग्रहया अहिंसक कृतींचा समावेश कसा होतो आणि लढण्याचे हे मार्गस्त्री’-त्वाचे विशेष कसे आहेत, ते डॉ. देवी यांनी वेधक शब्दात सांगितले आहे. 

1998 च्या सुमारास महाश्वेतादेवींच्या प्रेरणेने भटक्या-विमुक्तांच्या मानव अधिकारांच्या हक्कासाठी उभारलेल्या चळवळीबद्दलसत्ताया लेखात सांगताना डॉ. देवीराष्ट्रलोकशाहीया संकल्पनाची चिकित्सा करतात. त्यांच्या मते भटक्या-विमुक्तांचे प्रश्न केवळ दारिद्य्राशी संबंधित नाही. इंग्रजी वसाहतीच्या सत्ताकांक्षेतून भटक्या-विमुक्तांवर गुन्हेगारीचा ठपका बसला होता. त्यातून मुक्तीचा मार्ग दिसत नव्हता. अशा या आंदोलनातून डॉ. देवी धडा घेतात की, परिवर्तनाची लढाई एकेका मुद्द्यावर करून उपयोग नाही. कायदे अस्तित्वात असूनही न्यायासाठी सत्तेशी संघर्ष करावा लागत असेल तर प्रबोधन व संघटन या गोष्टींना पर्याय नाही.

राष्ट्रया लेखात त्यांनी भारतीय लोकशाहीचा ऐतिहासिक मागोवा लेखात घेतला आहे. ‘स्वदेशआणिस्वराज्यया संकल्पना स्पष्ट करून अरविंद घोष, रवींद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधी या भारतातील तीन महान नेत्यांच्याराष्ट्रया शब्दाविषयी कशा सावध भूमिका होत्या, ते घटनाप्रसंगातून पटवून देतात. आपल्या देशातल्या तीन महान विचारवंतांना असे वाटले की, जर्मनी आणि इटलीचा केवळ भौगोलिकतेवर आधारित, आयर्लंडचा केवळ संस्कृतीवर आधारित आणि रशियाचा आर्थिक मुद्द्यावर आधारित राष्ट्रवाद योग्य नाही. भारताकडे सर्व जगाला देण्यासाठी राष्ट्रवादाची एक नवी संकल्पना आहे. ती ‘Democracy by Diversity’, असे डॉ. देवी या संदर्भात पुढे लिहितात.  

भाषाया विषयाला मानवी संस्कृतीत असलेले सांस्कृतिक, जैविक आणि तात्त्विक परिमाण आपल्या संशोधनातून अधोरेखित करणारे डॉ. देवी यांनी गेल्या अडीच दशकात या संदर्भात केलेल्या कामाचा आढावा एका लेखात घेतला आहे. मृत्युपंथाला लागलेल्या जगातील भाषा टिकवणे का महत्त्वाचे आहे आणि ते कसे करता येईल याचा एक कृती आराखडाच डॉ. देवी यांनी मांडून दाखविला आहे. विश्वाच्या उत्पत्तीपासून तर जागतिकीकरणापर्यंतचा भाषेचा प्रवास तात्त्विक अंगाने या लेखात मांडून ध्वनी, नाट्य आणि चित्र संकेत अशा आधुनिक काळातील भाषेबद्दल भाकीत सांगितले आहे. संपूर्ण जगभरात मोजक्याच भाषा अस्तित्वात असाव्या असे काहींना वाटते, पण त्यामुळे जगभरातील मानवसमूहांचा भाषिक वारसा, संस्कृती व बौद्धिक संपदा नष्ट झाले तर काय होईल ते नीट समजावून सांगतात. ज्या भाषेमुळे माणूस इतर प्राण्यांपासून वेगळा ठरला त्या  भाषेची निर्मिती प्रक्रिया गेली पाच लाख वर्षे सातत्याने सुरू होती. आज हे भांडवल गमावण्याच्या टप्प्यावर आपण येऊन पोचलो आहोत. भारतातील मराठी, कन्नड, गुजराती, ओरिया अशा समृद्ध साहित्य परंपरा असलेल्या भाषांमध्येही हा र्हास दिसत आहे, असे निदान ते या लेखात करतात.   

त्रिज्यामधीललोकवर्तमानहे बहु-सांस्कृतिकता आणि मानवी अस्तित्व या विचारांचे महत्त्व सांगणारे हे लेख आहेत. आपल्या दीर्घकालच्या संशोधनातून डॉ. देवी काही प्रमेय या लेखात मांडतात. ‘लोकया लेखात ते म्हणतात की मराठीतीललोकसाहित्यही संज्ञा इंग्रजीतीलफोकलोरया अर्थाने वापरली जाते. पण युरोपमध्येफोकयाचासांस्कृतिकदृष्ट्या बिन-चेहर्याचेसमाजघटक असा अर्थ प्रचलित होता. मौखिक गीतांनालोरअसे म्हणत. 1870 पासून आधुनिकतावाद प्रस्थापित होत असतानाफोकलोरया शब्दाचा अर्थ बदलून तो केवळ मौखिक साहित्य असा संकुचित झाला.  पण भारतीय परंपरेतील साहित्याचा विचार केला तर मौखिक साहित्य हे केवळफोकनव्हते. वैद्यक, गणित, भूगोल, संगीत, कला किंवा  वेद, रामायण-महाभारत हे ग्रंथ मौखिकतेतूनच संक्रमित झाले. वस्तुतः साहित्य ही एकज्ञानशाखाअसते. लिखित ग्रंथ आणि मौखिक तेलोकसाहित्यअसा भेद करता येत नाही.

भारतीय लोकसाहित्यहे भाषा, संस्कृती आणि साहित्यमूल्य या संदर्भात डॉ. देवी यांना जसे महत्त्वाचे वाटते तसे ते लोकसाहित्य हे विद्यासंक्रमणाचे सोपे व समाजस्मृतीत रुजलेले ज्ञानमार्ग होते. इंग्रजी शिक्षणाच्या संस्थात्मक चौकटीत यासमाजस्मृतीकशा नाकारल्या गेल्या ते सांगून ते मानवी मेंदूच्या जडणघडणीतील नैसर्गिक उत्क्रांतीचे प्रमेय मांडतात. भविष्यातील मानवी भाषेत शब्द असणार नाहीत. प्रतिमा असतील. मानवी स्मृतीच्या पलीकडे गेलेल्या नव्या संवादसंस्कृतीचा प्रवास मल्टिमीडियाच्या मार्गाने होईल. यात मानवी स्मृतीचा हजारो वर्षांचा संस्कृतीसंचय आपण गमावून बसू असे भाकीत डॉ. देवी करतात. प्रचंड वेगाने कृत्रिम स्मृती मानवी मेंदूवर स्वार होईल. अशा वेळी कोणत्याही भाषेमधील मौखिक स्मृतीच्या शक्यता जपून ठेवणे हाच एक इलाज संभवतो. ज्यांच्या भाषांना लिपीच मिळाली नाही अशा भटके-आदिवासीच्या मौखिक स्मृतीला तिथे स्थान मिळेल. डॉ. देवींच्या मते त्यांच्या मौखिकतेत आजही जिवंत असणारी बहुमाध्यमता कदाचित उद्याच्या भाषांची जननी असू शकेल. एखाद्या शतकानंतर लिखित साहित्य जवळपास इतिहासजमा झाल्यानंतर, मौखिकतेच्या मदतीने मानवाची मानवीयता आपण पुढच्या युगाच्या उंबरठ्यापर्यंत पोचवू शकू, अशी आशाही ते व्यक्त करतात.

सारांश, स्वातंत्र्य, समता व बंधुता या लोकशाही मूल्यांवर अधिष्ठित मानवी सहजीवन हे डॉ. देवी यांच्या एकूणच साहित्याचे आणि सामाजिक कार्याचे केंद्र आहे, ते या पुस्तकावरून लक्षात येते. म्हणूनचन्यायया एकाच तत्त्वाच्या निकषावर ते वसाहतवादी सौंदर्यमूल्यांनी बाधित झालेली साहित्य संस्कृती, भटक्या-विमुक्तांचे सांस्कृतिक अस्तित्व आणि आदिवासींची भाषा यांची सूक्ष्म चिकित्सा ते करतात. 

त्रिज्याया पुस्तकात तत्त्वज्ञान आणि सौंदर्यशास्त्र अशा विभिन्न ज्ञानशाखांचा एक मनोरम वैचारिक संगम झाला आहे, असे वाटते. ‘त्रिज्याया पहिल्या लेखातून लेखकाने संपूर्ण पुस्तकामागील भूमिकाच मांडली आहे. तर अन्य लेखांतून आयुष्यभर जपलेली मूल्ये, थोरांप्रतिच्या निष्ठा, हाती घेतलेली कामे आणि वर्तमानाच्या क्षितिजावर भेडसावणार्या प्रश्नांना भिडताना जे जाणवले ते मनस्वीपणे वाचकांपुढे मांडले आहे. मुळात साहित्य आणि साहित्यशास्त्राची चिकित्सा करताना डॉ. देवी यांना आंतरिक प्रेरणेने भटके-आदिवासींचे प्रश्न, भाषाविषयक संशोधन आणि दक्षिणायनसारखी चळवळ अशी कामे हाती घ्यावी लागली. या वेगवेगळ्या कामांमागे त्यांची मूल्यनिष्ठा कोणती आणि त्यामागील त्यांच्या प्रेरणा कोणत्या या प्रश्नांची  उत्तरे शोधण्याच्या प्रपंचातूनत्रिज्यामधील हे लेखन सिद्ध झाले आहे.
प्रमोद मुनघाटे

No comments:

Post a Comment

माणगाव परिषद : बहिष्कृतांचे रणशिंग - उत्तम कांबळे

'अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद ’ हा उत्तम कांबळे यांचा ग्रंथ ‘ लोकवाङ् ‌ मय गृह ’ तर्फे लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. एका ऐति...