2

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 85 30 52 85 50 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

Tuesday 13 August 2019

स्वातंत्र्याची ओढ

साहित्य आणि कलाकृतीतून स्वातंत्र्याबद्दल वेगवेगळे मत वा विचारप्रवाह व्यक्त होत राहिले. काहींनी याबद्दल गंभीर प्रश्न उभे केले. आजतागायत जगात सर्वत्रच याबाबतचे चर्चा-चर्वण चालूच आहे. असो. स्वातंत्र्य मिळालेल्या देशात या स्वातंत्र्याचे गोडवे गाणारे अनेक चित्रपट तयार झाले. तिथली लोकशाही स्थिरावल्यावर व्यक्तिस्वातंत्र्य, माध्यमस्वातंत्र्य, अभिव्यक्तिस्वातंत्र्य अशा अनेक विषयाबद्दल कलाकृती तिथे तयार होत राहिल्या. यातील अनेक कलाकृती मूळ साहित्य स्वरूपात आणि नंतर त्या साहित्यावर निर्माण झालेले चित्रपट, चित्र शिल्प, नाट्य कलाकृती असे स्वरूप आहे. स्वातंत्र्योत्तर पिढीने आपला मोर्चा स्वातंत्र्याची चिकित्सा करण्यासोबतच जगण्याच्या इतर संघर्षाकडे वळवला. यातूनच तिथली लोकशाही अधिक प्रगल्भ होत राहिली.

अमेरिकेमध्ये इतर कुठल्याही देशापेक्षा अधिक प्रमाणात उपरोक्त विषयाबद्दलच्या कलाकृती निर्माण झालेल्या आहेत. ज्या लोकशाही आणि स्वातंत्र्याच्या मूल्यांसाठी अमेरिका ओळखली जायची त्यापेक्षाग्रेटअमेरिका बनवण्याची स्वप्नं दाखवणारे अध्यक्ष निवडून आले मात्र या मूल्यांनाच नख लावलं. त्याचा विरोध तेथील कलाकारांनी त्यांच्या कलाकृतीतून केला. हाच जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशामधील आणि एका प्रगल्भ लोकशाहीमधील फरक आहे. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सत्ताधीशांनी लोकशाही मूल्यांची कितीही गळचेपी केली तरी कुणी काहीच करत नाहीत. काही अपवाद वगळता सर्व कलाकृती त्या सत्ताधीशांचे गुणगान गाण्यातच धन्यता मानतात. हे नक्कीच एका प्रगल्भ लोकशाहीचे लक्षण नाही. अमेरिकेमध्ये हे होऊ शकतं कारण तिथे वेगवेगळ्या विचारप्रवाहांची चाड राखणार्यांची मोठी परंपरा आहे. म्हणून आजही तिथे राष्ट्रप्रमुखांच्या निर्णयावर टीका केली म्हणून देशद्रोहाच्या गुन्ह्यामध्ये अटक केली जात नाही. आणि राष्ट्रप्रमुखांवर स्तुतिसुमने उधळली म्हणजे राष्ट्रभक्ती समजली जात नाही. असो.

स्टीफन किंग हे अमेरिकेतील मोठे लेखक. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची संख्या आणि त्यांच्या विकल्या गेलेल्या प्रती या आणि त्यातील साहित्यमूल्य या अर्थाने. स्टीफन किंग यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या साहित्यावर खूप मोठ्या प्रमाणात चित्रपट निर्मिती केली गेली आहे. तब्बल 277 चित्रपट, टीव्ही सीरियल व इतर दृक्श्राव्य माध्यमासाठीचा मूळ कलाकृतीचा लेखक म्हणून स्टीफन किंग यांची नोंद आहे. स्टीफन किंग यांचीकॅरीही पहिली कादंबरी 1974 मध्ये प्रकाशित झाली. त्यानंतर दोनच वर्षांत म्हणजे 1976 मध्येकॅरीहा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रचंड प्रसिद्धी मिळवली आणि स्टीफन किंग हे नाव घराघरात पोहोचले. पुढे त्यांचा आलेख कायम चढताच राहिला. एकाच दिग्दर्शकाने स्टीफन किंग यांच्या कथेवर आधारित अनेक चित्रपट बनवले आणि अनेक दिग्दर्शकांनी त्यांच्या एकाच कथेवर अनेक चित्रपट बनवले अशीही अनेक उदाहरणे आहेत. फ्रँक डाराबॉन्ट हे त्यापैकीच एक. त्यांनी दिग्दर्शित केलेलाशॉशांक रिडीम्पशनहा याचे सर्वोत्तम उदाहरण. स्टीफन किंग हे फार चतुरस्र लेखक. भय, थरार, गूढ, विज्ञान अशा अनेक विषयांच्या कथा त्यांनी लिहिलेल्या. त्यासाठीच ते जास्त प्रसिद्ध आहेत. मात्र फ्रँक डाराबॉन्ट यांना स्टीफन किंग यांच्या आड वळणाच्या कथा अधिक भावतात. त्यांचेच त्यांनी चित्रपटात रूपांतर केलेले आहे.

‘Different Seasons’ ही स्टीफन किंग यांची साहित्यकृती ऑगस्ट 1982 मध्ये प्रकाशित झाली होती. साडेपाचशे पानाच्या या पुस्तकात चार लघु-कादंबर्या होत्या. त्यातील एक होतीरीटा हेवर्थ आणि शॉशांक रिडीम्पशन’. या लघुकादंबरीवर फ्रँक डाराबॉन्ट यांनीशॉशांक रिडीम्पशनहा चित्रपट 1994 मध्ये बनवला. विसाव्या शतकातील  सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या कोणत्याही यादीमध्ये हा पहिल्या पाच मधेच आहे. मानवी भावना आणि लोकशाहीतील संस्थांचा सहसंबंध उलगडणारी ही कथा. कथेच्या मानाने चित्रपटाची लांबी खूप आहे.

शॉशांक या काल्पनिक कारागृहामध्ये ही कथा घडते. अँडी डुफ्रेन या तिशीतील उंचपुर्या, सुंदर दिसणार्या गोर्या गुबगुबीत श्रीमंत तरुणाला त्याच्या पत्नीच्या न केलेल्या खुनाबद्दल जन्मठेपेची शिक्षा होते. त्याची रवानगी इतर अजून काही कैद्यासोबत शॉशांक या कारागृहामध्ये होते. हे कारागृहातील अँडीच्या मुक्त, आलिशान जगापेक्षा फार वेगळं आहे. या जगण्याची त्याने कधी कल्पनाही केली नसेल. सुरुवातीचे काही वर्ष त्याला तिथे स्थिर व्हायला खूप अवघड होतं. तिथे तो हळूहळू काही मित्र तयार करतो. रेड हा त्याचा पहिला मित्र. तो आपल्या पत्नीसह शेजार्याचा खून करून कित्येक वर्ष झालीत इथे पडून आहे. रेड हाच या कथेचा निवेदक आहे. त्याच्या निवेदनानेच कथा सुरू होते आणि संपते. मूळ पुस्तक आणि चित्रपटातील ही रचना सारखीच. रेड हा त्या कारागृहातीलसुपारमार्केटआहे.

सिगरेटपासून तर इतर कोणतीही जीवनावश्यक वस्तू तो कारागृहामध्ये कैद्यांना हवी तेव्हा मिळून देतो. अँडी हा रेड कडून दगडाचे छोटे शिल्प बनवण्याची छोटी हातोडी आणि रीटा हेवर्थ या मादक अभिनेत्रीचे पोस्टर घेतो. रेडने या कारागृहातून बाहेर पडण्याची अपेक्षा सोडून दिली आहे. तर अँडी खुनी, बलात्कारी कैद्यांमध्ये राहून आपला निरागसपणा जपत कारागृहातून पळून जाण्याचे मनसुबे आखत असतो. अँडी कारागृहाच्या छताला रंग देण्याचे काम सुरू असताना पहार्यावरील सैन्याच्या प्रमुखाला प्राप्तीकर भरण्याच्या अडचणीबद्दल चर्चा करताना ऐकतो व त्याला करसल्ला देऊन त्याचे प्राप्तीकर विवरणपत्र मोफत भरून देतो असे सांगतो. हाही प्रसंग अगदी संवादासहित पुस्तकात जसा आहे तसा चित्रपटात आहे.

हळूहळू पुढील काही वर्षांत कारागृहातील सर्व कर्मचार्यांचे विवरणपत्र भरून देण्याचे काम अँडीकडे येतं. यामध्ये जेलरची विवरणपत्र भरताना जेलरच्या भ्रष्ट कमाईतून आलेला पैसा अँडी एका खोट्या नावाने खाते उघडून त्यात वळते करतो. वर्षानुवर्ष हे चालत रहातं. या कामातून अँडीची कारागृहात पत वाढते. त्याला इतर कामातून सूट मिळून ग्रंथालयात काम करण्याची सुविधा मिळते. एक खूप म्हातारा कमरेत वाकलेला कैदी इथे हे काम करत असतो.

त्याला मदतनीस म्हणून अँडी काम करू लागतो. या ब्रूक्स नावाच्या म्हातार्याशी आधीही अँडीचा खूपदा संबंध आलेला असतो. जेवताना अँडीच्या ताटातील भातात निघणार्या आल्या ब्रूक्स लहान पक्ष्यांना भरवत असतो. असा पक्षी आपल्या स्वेटरच्या खिशामध्ये ब्रूक्सने पाळलेला असतो. तो ब्रूक्स सोबतच मोठा होतो. त्यासोबतच त्याच्या खोलीत आणि ग्रंथालयात लपून राहतो. पक्षी हे मुक्त स्वातंत्र्याचे प्रतीक. मात्र इथले पक्षी ते विसरून गेलेत. ही प्रतीकात्मक रचना कारागृहातील कैद्यांसाठी वापरलेली आहे. इथले कैदी या वातावरणाला सरावलेत. इथून बाहेर पडण्याचा ते विचारही करू शकत नाहीत. कोणत्याही संस्थात्मक रचना माणसाला असं स्थिर करून टाकतात. हे अभिव्यक्ती आणि व्यक्तिस्वातंत्र्याला किती मारक आहे असे चित्रण केलेलं आहे. या ब्रूक्स म्हातार्याची चांगल्या आचरणामुळे शिक्षेपेक्षा लवकर सुटका होते तर तो सहकारी कैद्याचा खून करून पुन्हा कारागृहामध्येच राहण्यासाठी प्रयत्न करतो. अँडी त्याला असे करण्यापासून वाचवतो. ब्रूक्स बाहेर पडून एका सुपरमार्केटमध्ये नोकरी करतो. मात्र कारागृहाबाहेरच्या मुक्त जगण्याशी तो एकरूप होऊ शकत नाही म्हणून आत्महत्या करतो. त्याचीही अवस्था त्याने पाळलेल्या पक्ष्यासारखीच आहे. पक्षी असूनही तो उडत नाही. अशीच अवस्था रेडचीही आहे. अँडी मात्र या वातावरणात स्वत:चे अस्तित्व टिकून ठेवतो. आपली स्वतंत्र जगण्याची स्वप्न रंगवतो, त्यासाठी नियोजन करतो. आणि आपण योग्य नियोजन केले तर एक दिवस यातून बाहेर पडू हा स्वतःवरील विश्वास ढळू देत नाही.

वर्षानुवर्ष जेलरच्या भ्रष्ट संपत्तीतून अँडी ठरावीक रक्कम एका गुप्त खात्यावर वळती करत असतो. सोबतच दगडातून शिल्प कोरायच्या हातोडीने आपल्या खोलीतून प्रचंड लांब भुयार खोदतो. करोडोंची रक्कम साठल्यावर एक दिवस त्यातून पळून जातो. सांडपाण्याच्या गटारातून बाहेर पडल्यावर मोकळ्या मैदानात पावसात भिजण्याचा आनंद घेऊन आपल्या स्वातंत्र्याची अनुभूती घेतो. तो पाऊस अँडीचा सर्व भूतकाळ धुऊन काढतो. एक मुक्त भावनेने भरलेला अँडी त्या गुप्त खात्यातील सर्व रक्कम काढून मेक्सिकोच्या समुद्रकिनार्यावरील एका खेड्यात जाऊन राहतो. हे सर्व नियोजन अँडीने कसे केले हे चित्रपटात पाहणे खूप महत्त्वाचे आहे. लघुकादंबरीतील रचनेपेक्षा ही थोडी वेगळी रचना आहे. यामध्ये रेडसुद्धा सहभागी आहे. बोलण्या-बोलण्यातून अँडी रेडला या सर्वांची कल्पना देत असतो. काही काळानंतर रेड पॅरोलवर सुटतो. ब्रूक्सने काम केले तिथेच काम करतो. तो राहिला त्याच खोलीत राहतो. त्या खोलीत अशी अनेकांची नावे लिहिलेली आहेत ज्यांनी ब्रूक्सप्रमाणे आपले स्वतंत्र जीवन संपवले. रेड मात्र अँडीपासून प्रेरणा घेत मुक्त जगण्याची कास धरतो. अँडीने इशारा दिलेले ठिकाण शोधतो आणि त्याच्या पर्यंत मेक्सिकोच्या समुद्रकिनार्याला जाऊन त्याला भेटतो. इथे चित्रपट संपतो. पुस्तकातील कथा मात्र यापेक्षा आधी संपते. रेड अँडीला शोधायला जाण्यासाठी बसमध्ये बसतो इथे लघुकादंबरीतील कथा संपते. लघुकादंबरीत रेड आणि अँडीची भेट होत नाही. चित्रपटात मात्र रेड आणि अँडीची भेट होण्याचा समुद्रकिनार्यावरील सीन खूप महत्त्वाचा आहे. या दोघांची भेट चित्रपटातील कथेला अधिक उंचीवर घेऊन जाते.

मूळ कथा आणि चित्रपटातील कथा यात खूप साधर्म्य आहे. मूळ कथेतील सर्व महत्त्वाच्या घटना आहे त्या संवादासह चित्रपटात चित्रित केलेल्या आहेत. चित्रपटाची कथा मात्र मूळ कथेपेक्षा थोड्या अधिक लांबीची आहे. चित्रपटाच्या रचनेसाठी आणि त्या रचनेचा प्रभाव होण्यासाठी कारागृहामधील घटनांचे विस्तृत चित्रण चित्रपटात केलेले आहे. अँडी, रेड आणि ब्रूक्स ही पात्र आपल्या मनात घर करून बसतात. त्यांची कारागृहातील घुसमट आपण अनुभवतो. ही पात्र प्रभावी होण्यासाठी दिग्दर्शकाने खूप वेळ घेतला आहे. हे पाहताना जाणवतं. मुख्य पात्रांचा अभिनयही कसदार आहे. कथेतील नायक बुटका तर चित्रपटातील अँडी सहा फुटांपेक्षा उंच आहे. मात्र त्याचा सहज निष्पापपणा नजरेत भरतो. रेड मूळ कथेमध्ये आयरिश गोरा धिप्पाड माणूस आहे तर चित्रपटात आयरिश संबंध असलेला काळा माणूस आहे. कलाकाराच्या निवडीसाठी हे स्वातंत्र्य दिग्दर्शकाला घ्यावे लागते. त्यांच्या दिसण्यापेक्षा अभिनयाचा गुण महत्त्वाचा असतो. म्हणून शेवटी अँडीची मुक्तता आपल्याला आनंद देऊन जाते. रेड आणि अँडीच्या भेटीने आपणही समृद्ध होतो. हा प्रवास प्रेक्षक म्हणून आपणही अनुभवतो. यासाठीची जी चित्रपट रचना दिग्दर्शकाने केलेली आहे त्यात तो काही दिग्दर्शकीय स्वतंत्र घेतो. त्याने चित्रपटाची लांबी वाढते मात्र चित्रपट पाहिल्यावर असे कुठेही जाणवत नाही. एक स्वतंत्र श्रेष्ठ कलाकृतीचा अनुभव हा चित्रपट देतो. या अनुभवाचे वर्णन फार कुणी करत बसू नये. हा जगण्याला पुरून उरेल एवढा अनुभव ज्याने-त्याने आपला घ्यावा.
- प्रा. संदीप गिऱ्हे

No comments:

Post a Comment

माणगाव परिषद : बहिष्कृतांचे रणशिंग - उत्तम कांबळे

'अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद ’ हा उत्तम कांबळे यांचा ग्रंथ ‘ लोकवाङ् ‌ मय गृह ’ तर्फे लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. एका ऐति...