मी येतोय तिथून आणि आठवतंय
जन्मलो होतो मी जन्मतो प्रत्येक
जण तसा.
आहे मला आई
आणि एक घर बर्याच विधवांनी
भरलेलं.
आहेत मला भाऊ, मित्र
आणि आहे एक तुरुंग,
आहे माझ्याजवळ एक लाट
खेचून नेलेली समुद्रपक्ष्यांनी.
आहे माझा स्वत:चा दृष्टिकोन
आणि एक जादा पातं गवताचं.
आहे माझा चंद्र
शब्दांच्या शिखरापलीकडे गेलेला.
आहे देवानं पाठवलेलं अन्न
पक्ष्यांसारखं
आणि एक ऑलिव्हचं झाड ज्ञानाच्या
पलीकडचं.
मी तुडवलीय जमीन
तरवारींनी देहांना मेजवानीत
बदलण्यापूर्वी.
मी येतोय तिथून
परत केलंय आकाशाला त्याच्या
आईकडे
जेव्हा त्याची आई करत होती
आक्रोश
आणि ढाळतोय मी अश्रू
परतणार्या ढगानं मला ओळखावं
म्हणून.
रक्तलांछित दरबारातील शिकलोय
शब्द
तोडता यावेत नियम म्हणून
आणि केलेय मोडतोडही सर्व
शब्दांची
एकच शब्द बनवण्यासाठी :
मायभूमी.
- अनुवाद : रमेशचंद्र पाटकर
No comments:
Post a Comment