2

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 85 30 52 85 50 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

Tuesday, 30 April 2019

पुस्तकलेखनामागची माझी भूमिका : डॉ. आ. ह. साळुंखे


भारतीय घटना मनुस्मृतीपेक्षा हिणकस?
खरे तर, प्रत्यक्ष पुस्तक वाचल्यावर पुस्तकलेखनामागची माझी ही भूमिका आपोआपच स्पष्ट होईल. पण संपूर्ण पुस्तक वाचेपर्यंत थांबावे लागू नये, म्हणून येथे फक्त काही पुरावे देतो. श्री. कुलकर्णी यांनी 15/5/1992 रोजी मला पत्र लिहिले आहे. तेव्हा माझे हे पुरावेही फार जुने न देता 1992, 1991 आणि 1990 या सालांतील देतो. त्यांचे अधिक विवेचन अर्थातच पुढे योग्य ठिकाणी येईल. कोणी असे म्हणेल, की ही मते अपवादात्मक स्वरूपाची असल्यामुळे त्यांना फारसे महत्त्व देण्याची गरज नाही. प्रत्यक्षात ही मते अपवादात्मक नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत प्रबळ अशा एका गटाची ही प्रातिनिधिक मते आहेत. आणि म्हणूनच त्यांची दखल घेणे भाग आहे.

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी "मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती"वर क्लिक करा.

आजचा सुधारकनावाचे एक मासिक नागपूरहून प्रकाशित होत असते. त्याच्या मे-जून 1992च्या अंकात एक संशोधक श्री. नी. र. वर्‍हाडपांडे यांनी पुढील विधान केले आहे, ‘‘...आजचे आमचे संविधानदेखील समतेचा निकष लावला, तर मनुस्मृतीपेक्षा हिणकस ठरते; कारण, या संविधानात पदोपदी भेदभाव करणारी कलमे आहेत. भारतीय संविधान समतेच्या तत्त्वावर आधारलेले नाही, असे न्यायमूर्ती निगम यांनी नुकतेच सांगितले.’’

पुणे विद्यापीठातर्फे परामर्शया नावाचे एक त्रैमासिक प्रसिद्ध होत असते. या त्रैमासिकाच्या फेब्रुवारी 1991च्या अंकात पुणे विद्यापीठाच्या संस्कृत-प्राकृत विभागाच्या प्रमुख डॉ. सरोजा भाटे यांनी म्हटले आहे, ‘‘घर सोडून मोकाट सुटलेल्या स्त्रीला नाठाळ गुराप्रमाणे वठणीवर आणण्यासाठी दावणीला बांधणारा मनू स्त्रीच्या दृष्टीने क्रूर असेल. परंतु एकंदर समाजाच्या दृष्टीने क्रूर असेल. परंतु एकंदर समाजाच्या दृष्टीने अराजकातून सुराज्य निर्माण करू पाहणारा एक कठोर अनुशासक अशी त्याची भूमिका असली पाहिजे.’’

नागपूर तरुण भारतच्या 15 ऑगस्ट 1990च्या अंकात लिहिताना संस्कृतचे विद्वान डॉ. के. रा. जोशी यांनी लिहिले आहे, ‘‘समाजनिर्मितीच्या क्षेत्रात आजपर्यंत झालेल्या प्रयोगात मनुस्मृतीचा प्रयोग लक्षणीय आहे.’’

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी "मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती"वर क्लिक करा. 

मनुस्मृती कालबाह्य झालेली नाही, हे प्रथमदर्शनी दाखवून देण्यास ही तीन मते पुरेशी आहेत, असे मला वाटते. आता, एका बाजूने मनुस्मृतीच्या संदर्भात अशा प्रकारचे लेखन सातत्याने प्रकाशित होत असताना, त्या लेखनाची चिकित्सा करणे आवश्यक आहे की नाही, याचा निर्णय वाचक सहजपणे घेऊ शकतात.
- डॉ. आ. ह. साळुंखे

No comments:

Post a Comment

माणगाव परिषद : बहिष्कृतांचे रणशिंग - उत्तम कांबळे

'अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद ’ हा उत्तम कांबळे यांचा ग्रंथ ‘ लोकवाङ् ‌ मय गृह ’ तर्फे लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. एका ऐति...