2

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 85 30 52 85 50 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

Tuesday, 16 June 2020

कुणी घेऊ शकतंय, श्वास?

कुठल्या शब्दांत, निरर्थक शब्द वगळून, मी भारतीय म्हणून माझ्या बंधुभगिनींशी एकजूट व्यक्त करू? मिनिआपोलिस मधील तरूण आणि स्वातंत्र्यप्रिय लोक मला नाही का विचारणार की रोहित वेमुलाला आत्महत्या करावी लागली, तेव्हा सर्व भारतीय विद्यापीठांमधील विद्यार्थी व शिक्षकांनी  निषेध व्यक्त केला का? नियमित दिसणाऱ्या झुंडबळींच्या दृश्यांनी भारतभरच्या लोकांच्या काळजाचा ठाव घेतला का? दलित मुली आणि मुलांवरील झालेले बलात्कार आणि खून यामुळे सर्व भारतीय संतप्त झाले का? कोणत्या शब्दांत मी त्यांना समजावू शकेन की लाखो आदिवासींना सर्व प्रकारच्या असमानतेचा सामना करावा लागत आहे आणि तरीही भारत सहजगत्या त्याकडे कानाडोळा करतो आहे.

१५७ वर्षांपूर्वी गेटीसबर्ग येथे झालेल्या छोट्या भाषणामुळे एक युद्धग्रस्त देश पुन्हा जागृत झाला. १७ महिन्यानंतर ज्यांची हत्या झाली ते अब्राहम लिंकन केवळ ३ मिनीटे; २७८ शब्द बोलले, ज्याने अमेरिकेचा आत्मा ढवळून निघाला. समानता अबाधित राखण्यासाठी ज्या अमेरिकन लोकांनी आपले प्राण दिले त्यांच्याबद्दल ते बोलत होते.

‘‘आठ दशके आणि सात वर्षांपूर्वी या खंडामध्ये आपल्या पूर्वजांनी स्वातंत्र्याची संकल्पना मनात योजून आणि जन्मलेले सर्व लोक समान आहेत या वचनाला समर्पित असे नवे राष्ट्र निर्माण केले. सध्या आम्ही एक मोठ्या नागरी युद्धामध्ये व्यग्र आहोत, हे पाहण्यासाठी की हे राष्ट्र किंवा कोणतेही राष्ट्र अशा संकल्पनेतून जन्मलेले आणि असे समर्पित, किती काळ टिकू शकेल? आम्ही त्या युद्धाच्या महान रणांगणावर एकत्र जमलो आहोत. ज्या लोकांनी हे  राष्ट्र जिवंत राहण्यासाठी इथे आपले प्राण दिले, त्यांचे अंतिम विश्रांती स्थळ म्हणून या भूमीचा काही भाग त्यांना समर्पित करण्यासाठी आम्ही आलो आहोत. असे आम्ही करणे पूर्णतः संयुक्तिक आणि योग्य आहे. परंतु व्यापक अर्थाने ही भूमी आम्ही समर्पित करु शकत नाही - आम्ही शुद्ध करू शकत नाही, आम्ही पवित्र करू शकत नाही. ज्या जिवीत आणि वीरगती प्राप्त बहादूरांनी इथे संघर्ष केला, त्यांनी या भूमीला इतके पवित्र केले आहे की आमची दूर्बल क्षमता त्यामध्ये काहीही जमा किंवा वजा करू शकत नाही. आम्ही इथे काय बोललो याची दखल हे जग क्वचितच घेईल, ना फार काळ स्मरणात ठेवेल. परंतु त्यांनी इथे केलेले कार्य ते कधीही विसरू शकत नाहीत. या शहीदांनी ज्यासाठी आपले जीवन अर्पण केले त्यांचे अधुरे महान कार्य पूर्ण करण्यासाठी खरे म्हणजे आम्ही जिवंत असणाऱ्यांनी स्वतःला वाहून घ्यायला हवे. या आदरणीय शहीदांकडून समर्पणाची शिकवण घ्यायला हवी, ज्यासाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केले. त्यांचे बलिदान व्यर्थ न जावो यासाठी आपण आता संकल्प करायला हवा, की ईश्वराच्या आशीर्वादाने या राष्ट्रामध्ये स्वातंत्र्याचा नवा उदय होईल आणि लोकांचे, लोकांकडून, लोकांसाठी चालवलेले राज्य पृथ्वीवरून नष्ट होणार नाही.” (१९ नोव्हेंबर १८६३)

मे २०२० च्या शेवटच्या आठवड्यामध्ये एका अमेरिकन माणसाने जगण्यासाठी आठ मिनीटे संघर्ष करताना श्वास घेण्यासाठी तडफडत, शेवटच्या १२७ शब्दांत जे अब्राहम लिंकन यांनी सांगितले तेच सांगितले. किंवा जो बिदेन यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘गुलामगिरीचे मूळ पाप आपल्या देशाला कलंकीत करत आहे.’ जॉर्ज फ्लायडचे शब्द सन्मान आणि समानतेच्या अधिकारासाठीची अमर आरोळी म्हणून इतिहासामध्ये घोषित होतील.

हा माझा चेहरा आहे, माणसा
मी गंभीर काही केलेले नाही, माणसा
कृपया
कृपया
कृपया मी श्वास घेऊ शकत नाही
कृपया माणसा
कृपया कुणालातरी
कृपया माणसा
मी श्वास घेऊ शकत नाही
मी श्वास घेऊ शकत नाही
कृपया
(अश्राव्य)
माणसा, श्वास घेता येत नाही, माझा चेहरा
ऊठ जरा
मी श्वास घेऊ शकत नाही
कृपया, माझ्या मानेवर गुडघा
मी श्वास घेऊ शकत नाही
शीट
मी करीन
मी हलू शकत नाही
आई
आई
मी करू शकत नाही
माझा गुडघा
माझी मान
मी मेलो
मी मेलो
भय वाटतंय
माझ्या पोटाला इजा
माझी मान दुखतेय
सर्वांग ठणकतंय
थोडेसे पाणी किंवा काहीतरी
कृपया
कृपया
साहेब, मी श्वास घेऊ शकत नाही
मला मारू नका
माणसा, ते मला मारून टाकतील
चल उठ माणसा,
मी श्वास घेऊ शकत नाही
मी श्वास घेऊ शकत नाही
ते मला मारून टाकतील
ते मला मारून टाकतील
मी नाही घेऊ शकत श्वास
मी नाही घेऊ शकत श्वास
कृपया सर
कृपया
कृपया
कृपया मी नाही घेऊ शकत श्वास..’

त्याच्या शरीरातून शेवटचा श्वास निघून गेला तेव्हा मिनीयापोलिस मधून मिसिसिपी वाहत राहिली, परंतु एका आठवड्यातच अमेरिकेच्या सत्तरहून अधिक शहरामध्ये संतापाचा उद्रेक तीव्र होऊन निषेध नोंदवला गेला. निदर्शकांनी व्हाईट हाऊसच्या बाहेर गर्दी केली तेव्हा त्यांच्या संतापाची तीव्रता इतकी होती, की अमेरिकेन राष्ट्राध्यक्षांची तळघरामध्ये आसरा घेण्यासाठी धावपळ उडाली. निषेध केवळ अमेरिकेपुरतेच मर्यादीत राहिला नाही. लंडनमधील ट्रॅफलगर चौकामध्ये त्याचा प्रतिध्वनी उमटला. जर्मनी, इराण, कॅनडा आणि न्यूझीलंड आणि बऱ्याच आफ्रिकन आणि आशियाई देशांमध्ये निदर्शने झाली. शहराचा परिसर सुशोभित करणाऱ्या महान नद्या आणि तलाव यांचा विचार करून चार्लस् होग या फारशा सुप्रसिद्ध नसलेल्या शिक्षकाने 'पाणी'ला मिनी या मूळ अमेरिकेन शब्दासह 'नवीन' नीया आणि शहर 'पोलिस' या ग्रीक शब्दांना एकत्र करून मिनीयापोलिस या शब्दाची निर्मिती केली. तिरस्कार, अवमान, राज्यकर्त्यांची मग्रुरी आणि असमानतेच्या उघडउघड समर्थनाने गुदमरून अचानक जगामध्ये उघड बंड उसळत असताना, आज जॉर्ज फ्लॉयडच्या निर्दयी हत्येने त्या नावाचा अर्थ पुन्हा एकदा जिवंत केला आहे.

पॉल क्रुगमन यांनी न्यूयॉर्क टाईम्समध्ये लिहिले, "प्रत्येक दिवस जणू काही आमच्या पतनाचा संकेत आणत आहे : समर्थ राष्ट्र महामारीचा सामना करू न शकणारा असा प्रदेश बनले आहे, मुक्त जगाचा नेता आंतरराष्ट्रीय संस्थांचा विध्वंसक बनला आहे, आधुनिक लोकशाहीच्या जन्मस्थानी हुकूमशाहीकडे झुकणारे सरकार राज्य करत आहे. सर्व काही इतके अयोग्य, इतके जलद कसे होऊ शकते?" हा प्रश्न केवळ अमेरिकेपुरताच नाहीये. रशिया, चीन, भारत, नायजेरिया, स्पेन, इटली, तुर्की, इजिप्त आणि बऱ्याच इतर देशांमधील कोट्यवधी लोक हाच प्रश्न विचारत आहेत. २०१४ मध्ये एरिक गार्नर या निःशस्त्र कृष्णवर्णीय व्यक्तीची गळा दाबून हत्या झाली आणि श्वास घेण्यासाठी धडपडताना तो ओरडत राहिला, "मी श्वास घेऊ शकत नाही" अकरा वेळा त्याने हे म्हटले. बाराव्या वेळेस म्हणायला तो जिवंत राहिला नाही. गार्नरला जिथे मारण्यात आले ते न्यूयॉर्कमधील स्टेटन आयलँड हे ठिकाण, जगप्रसिद्ध स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्यापासून १७ मैलावर, गाडीने अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे.

फ्लॉयडच्या हत्येनंतर नोंदवले गेलेले निषेध केवळ गुन्हेगारी कायद्यातील त्रुटी किंवा पोलिस नियमावलीतील अपूर्णतेबद्दल नाहीत. ते स्वातंत्र्य, समानता आणि बंधुतेच्या प्रश्नांबद्दल आहेत. संपूर्ण जगभर पसरलेला नैतिक संताप या प्रश्नाने क्षुब्ध आहे. "आपण सर्व माणसे नाहीत का आणि म्हणून समान रितीने समान?" ७ जून १८९३ रोजी गोऱ्या पोलिसाने प्रथम श्रेणी डब्या बाहेर काढल्यानंतर बॅरिस्टर मोहनदास गांधी यांनी पिट्सबर्ग येथील छोट्या रेल्वे स्थानकामध्ये काढलेल्या काळोख्या रात्रीला याच प्रश्नाने उजळून टाकले.

नेल्सन मंडेलांच्या मनातही हेच होते, जेव्हा आफ्रिकन काँग्रेसमध्ये दाखल झाल्यावर त्यांनी आपली प्रस्तावित ANC परिषद देशद्रोह नाही, असे सांगूनही  न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांना देशद्रोहीम्हणून दोषी ठरवले; तेव्हा २० एप्रिल १९६४ रोजी त्यांनी सांगितले, "आम्हाला ठाऊक आहे की तुमचे शासन पुन्हा एकदा अनिर्बंध क्रौर्य आणि त्वेषाने आफ्रिकन लोकांचा छळ करेल. परंतु शेवटच्या संपाच्या परिणामाने हे स्पष्ट केले आहे की पृथ्वीवरील कोणतीही शक्ती वंचित लोकांना स्वातंत्र्य मिळविण्याच्या त्यांच्या निश्चयापासून रोखू शकत नाही. देशातील बहुसंख्य नागरिकांचे हक्क आणि सनदशीर आकांक्षा दडपण्यासाठी जुलूम आणि फसवणुकीचा अवलंब करणाऱ्यांना इतिहास शिक्षा करतो."

काही क्षण तरी त्याच्या डोळ्यांमध्ये पश्चातापाचा अल्पांश उमटला आहे का हे पाहण्यासाठी फ्लॉयडच्या मानेवर गुडघा रोवून असलेल्या पोलिस अधिकाऱ्या छायाचित्र मी पुन्हा पुन्हा तपासले आहे. तो वर्णद्वेषी असूनही त्याच्या या कृत्याला केवळ त्यालाच जबाबदार धरून चालणार नाही. लोकांना एकमेकांच्या विरोधात उभे ठाकण्यासाठी वाटेल त्या थराला जाणारी, त्यांना विभाजित करणारी, विद्वेषाचे विष त्यांच्या मनात भरवणारी आणि राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयातील ट्विट्सना पाठिंबा देणारी सध्याची राजवट त्याला अधिक जबाबदार आहे. तसेच या वृत्तीला खतपाणी घालणाऱ्या अमेरिकेन समाजातील सर्व घटकांचा तो संघटित दोष आहे.

मी हे लिहिताना माझे मन अमेरिकेतील लोकांना संपूर्ण भारतातून सहानुभूती व्यक्त करू इच्छित आहे. शेक्सपियरच्या  "मॅकबेथ"मध्ये नुकताच राजाची हत्या करून परतलेला मॅकबेथ 'तथास्तू' म्हणायला सांगितल्यावर तो पवित्र शब्द उच्चारू शकत नाही. कुठल्या शब्दांत, निरर्थक शब्द वगळून, मी भारतीय म्हणून माझ्या बंधुभगिनींशी एकजूट व्यक्त करू? मिनिआपोलिस मधील तरूण आणि स्वातंत्र्यप्रिय लोक मला नाही का विचारणार की रोहित वेमुलाला आत्महत्या करावी लागली, तेव्हा सर्व भारतीय विद्यापीठांमधील विद्यार्थी व शिक्षकांनी  निषेध व्यक्त केला का? नियमित दिसणाऱ्या झुंडबळींच्या दृश्यांनी भारतभरच्या लोकांच्या काळजाचा ठाव घेतला का? दलित मुली आणि मुलांवरील झालेले बलात्कार आणि खून यामुळे सर्व भारतीय संतप्त झाले का? कोणत्या शब्दांत मी त्यांना समजावू शकेन की लाखो आदिवासींना सर्व प्रकारच्या असमानतेचा सामना करावा लागत आहे आणि तरीही भारत सहजगत्या त्याकडे कानाडोळा करतो आहे. मी त्यांना कसे सांगू शकेन की ब्रिटिशांनी गुन्हेगार ठरवलेले लाखो संशयित आणि भटके विमुक्त लोक अजूनही कमी-अधिक प्रमाणात आजही त्याच अवस्थेत जगत आहेत आणि असंख्य भारतीयांना याची साधी जाणीवही नाही? ४० अंशापेक्षाही अधिक उन्हाळी झळांमध्ये लाखो स्थलांतरीत कामगार शेकडो किलोमीटर पायी चालत आहेत आणि राज्यकर्ते मात्र हे सत्य नाकारत असताना प्रशासनाला नुसत्या कुरबुरीची पत्रे पाठवण्यापलीकडे न जाणारे लोक पाहण्याची शरम व अपराधीपणाची भावना मी कशी आणि कधीतरी त्यांच्याबरोबर वाटून घेऊ शकेन?

कोरोना विषाणूच्या गडद छायेखाली संपूर्ण जग ठप्प झालेले असताना असमानतेचा कर्करोग जगभरातील समाजात झपाट्याने पसरत आहे. जात, वर्ग, लिंगभेदामध्ये उल्लेखल्या जाणाऱ्या 'सामाजिक अंतर' या सर्वांत शक्तीशाली शस्त्राला अप्रत्यक्षपणे मोठी कायदेशीर मान्यता लाभली आहे. अपरिवर्तनीय मूलभूत हक्क अशी समतेची घोषणा करणाऱ्या विविध देशांच्या संविधानांची खिल्ली उडवली जातेय. जॉर्ज ऑर्वेलच्या नवभाषेने उत्तर-सत्य युगातील राजकीय परिचर्चा झाकोळून टाकली आहे.

म्हणूनच हाच तो क्षण आहे, बॅरिस्टर गांधींचे ७ जून १८९३ चे विचार आठवण्याचा.. तसेच २० एप्रिल १९६४ चे नेल्सन मंडेला यांचे विचार आणि लिंकन यांच्या शब्दात सांगण्याचा, की 'सर्व स्त्री-पुरूषांची निर्मिती समान झाली आहे'. ही वेळ आहे, प्रत्येक क्षणी म्हणण्याची, 'मी श्वास घेऊ शकत नाही'.
- गणेश देवी (अनुवाद : ज्ञानदा आसोलकर)     

1 comment:

  1. मला हे संपादकीय लेख खूप प्रेरणादायी वाटला ..तुमचा अंक नक्की वाचत राहीन .
    प्रा.डॉ .सुभाष वाघमारे
    मराठी विभाग प्रमुख
    पदवी व पदव्युत्तर मराठी विभाग
    छत्रपती शिवाजी कॉलेज ,सातारा ..४१५००१

    ReplyDelete

माणगाव परिषद : बहिष्कृतांचे रणशिंग - उत्तम कांबळे

'अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद ’ हा उत्तम कांबळे यांचा ग्रंथ ‘ लोकवाङ् ‌ मय गृह ’ तर्फे लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. एका ऐति...