2

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 85 30 52 85 50 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

Thursday 25 July 2019

‘टाहोरा’ : जंगलझाडीतल्या दु:खानुभवांची अस्सल कविता


कमीत कमी भाषिक अवकाशात गुंतागुंतीचा आणि समृद्ध अनुभव व्यक्त करण्याचे माध्यम असलेला कविता हा वाङ्मयप्रकार सर्जनाचे अवघड माध्यम समजला जातो. कमीत कमी भाषिक अवकाशात गुंतागुंतीचा आणि समृद्ध अनुभव व्यक्त करण्याचे माध्यम असलेला कविता हा वाङ्मयप्रकार सर्जनाचे अवघड माध्यम समजला जातो. असे असूनही मराठीत कविता उदंड प्रमाणात लिहिली जाते. परिणामी कवितेच्या रूपबंधाकडे लक्ष न देताही विविध अनुभव आणि आशयसूत्रे कवितेमधून व्यक्त होत आहेत. यात महानगरीय संवेदनशीलतेतून व्यक्त होणारे अनुभव आहेत. महानगरांमधला कल्लोळ, मानवी संघर्ष, तिथले सामाजिक-सांस्कृतिक स्तरांवरचे शोषणाचे, अगतिकतेचे आणि असहायतेचे प्रकार, विशिष्ट वर्गात बोकाळलेली चंगळवादी वृत्ती, जागतिकीकरणाच्या दाबामुळे बदललेली वेगवान जीवनशैली इत्यादी अनुभव महानगरीय संवेदनशीलतेच्या कवितेतून व्यक्त होत आहेत.

ज्यांना ग्रामीण संवेदनशीलतेतून व्यक्त होणारे अनुभव म्हणता येतील असे अनुभवही कवितेत व्यक्त होत आहेत. या अनुभवांची दाहकता आणि सकसता अधिक मूल्ययुक्तही आहे. अशा कवितांची संख्याही वाढते आहे. राजकीय- सामाजिक- सांस्कृतिक स्तरांवर सत्तास्थानी असणारा वर्ग हा कष्ट करणाऱ्या, राबणाऱ्या, मातीशी नाते असलेल्या, सर्वार्थाने तळाच्या वर्गाचे करीत असलेले शोषण, या वर्गाचा अस्तित्वासाठीचा जीवनसंघर्ष, त्याची प्राप्त परिस्थितीतली विकलता, ग्रामीण पातळीवरील सर्वच स्तरांवरचे गुंतागुंतीचे होत चाललेले जीवन, निसर्गनिर्मित आणि मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा होणारा विनाश, जागतिकीकरणाचा रेटा, महानगरीय जीवनशैलीचा ग्रामसंस्कृतीवर वाढलेला प्रभाव व त्यापायी तिथल्या निरागस, सर्वसमावेशी संस्कृतीची होणारी विद्रूप अवस्था, अस्मितांच्या राजकारणामुळे वाढलेल्या जातीय तेढी व पेच इत्यादी आशयसूत्रे ग्रामीण कवितांमधून व्यक्त होत आहेत. याचबरोबरीने गावकुसाबाहेरच्या जिण्याचे, तिथल्या शोषणाचे व भयावह जीवनसंघर्षांचे चित्रणही कवितेत साकारत आहे. महानगरीय संवेदनशीलतेतून व्यक्त होणारे अनुभव वगळता उपरोक्त सर्व जीवनानुभव हे एक प्रकारचे परिघाबाहेरचे जीवनानुभव आहेत.परंतु सर्वसाधारणपणे ज्याला परिघाबाहेरचे जीवन वा अनुभव म्हटले जाते, त्याच्याही पल्याड एक वास्तवअसते आणि ते महानगरातल्या माणसांना पूर्णपणे अपरिचित असते. अशा परिघाबाहेरच्या जीवनानुभवांच्याही पल्याडच्या वास्तवानुभवाचा साक्षात प्रत्यय देणारा आणि कवितेच्या रूपबंधाचेही पुरते भान असलेला कवी अनिल साबळे यांचा टाहोराहा लक्षणीय व वैशिष्टय़पूर्ण कवितासंग्रह लोकवाङ्मय गृहाने प्रसिद्ध केला आहे.



कवी साबळे हे अगदी अलीकडच्या काळातील कवी आहेत. ते दूरस्थ ग्रामीण भागात राहतात. त्यामुळे शहरी कवी संमेलने आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांच्याशी त्यांचा कमीत कमी संबंध येत असावा. त्यांच्या दैनंदिन जीवनसंघर्षांत या घटकांना प्राधान्य वा स्थानही नसावे. त्यांचा हा चरित्रात्मक तपशील सारांशाने देण्याचे कारण असे की, या सर्वच कारणांनी ते मराठीच्या मोठय़ा सांस्कृतिक पर्यावरणाला फारसे परिचित नाहीत. (शिवाय या चरित्रात्मक तपशिलांचा त्यांच्या कवितांमधील भावानुभवांशी जवळचा व दूरचा संबंध आहे, हेही त्यांच्या कवितेला सामोरे जाताना लक्षात घ्यायला हवे.) अलीकडच्या काही वर्षांमध्ये काही वाङ्मयीन नियतकालिकांनी मात्र त्यांच्या कविता आवर्जून प्रसिद्ध केल्या. त्यांना साहित्य अकादमीने प्रवास शिष्यवृत्ती दिल्याचेही ऐकिवात आहे. मराठीच्या वाङ्मयीन पर्यावरणाशी एवढाच काय तो त्यांचा संबंध असावा.

प्रारंभीच परिघाबाहेरच्याही पल्याडचे वास्तव सांगणारा हा कवितासंग्रह आहेअसे म्हणण्याचे कारण असे की, आजवर मराठी कवितेला अपरिचित असणाऱ्या जंगलझाडीतल्या आंतरविश्वाचा वेध घेणारा हा कवितासंग्रह आहे. जंगलझाडीतील माणसे, त्यांचा जीवनसंघर्ष, त्यांचे परस्परांशी असलेले संबंध, त्यांचे सण-उत्सव, त्यांच्या श्रद्धा-अंधश्रद्धा, त्यांची दु:खे, त्यांच्या दैनंदिन जगण्यात उद्भवणारे संघर्षांचे प्रसंग- घटना- घटिते, त्यांचे सभोवतालच्या परिसराशी, तिथल्या स्थित्यंतरांशी, डोंगर-दऱ्या, ओढे-नद्या-नाले, वृक्षवल्ली, पशुपक्षी, जीवजीवाणू यांच्याशी असलेले सौहार्दाचे किंवा संघर्षांचेही नाते, जंगलझाडीतले भक्ष्य आणि भक्षक संबंध, तिथल्या आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांचा जगणे आणि शिक्षणासाठी चाललेला संघर्ष या सगळ्याचे प्रत्ययकारक दर्शन या कवितासंग्रहातून होते. किंबहुना, हे सगळे घटक या संग्रहाच्या केंद्रस्थानी आहेत. या घटकांमधून रान-जंगल संस्कृतीचा अनोखा प्रत्यय या कवितांमधून उत्कटपणे येतो. हे अनुभवविश्व मराठी कवितेला जवळपास अनोळखी असेच आहे. हे या कवितासंग्रहाचे प्रथमदर्शनीच प्रत्ययाला येणारे वैशिष्टय़.

लोकवाड़्मय गृहाचे "टाहोरा" हे पुस्तक ऑनलाईन खरेदी करण्यासाठी भेट द्या आमच्या वेबसाईटला... (सवलत मूल्य फक्त 117 रु.) http://lokvangmaybooks.com/index.php?route=product/product&product_id=277&search=टाहोरा

समाजवास्तवाचे भान व्यक्त करणारी समाजलक्ष्यी कविता आज मराठीत विपुल लिहिली जाते आहे. त्यादृष्टीने पाहता मराठीतले समाजलक्ष्यी अनुभवांच्या कवितांचे दालन समृद्ध आहे असे म्हणता येईल. टाहोरासंग्रहातील कविताही समाजलक्ष्यी/ समूहलक्ष्यी अनुभवांच्याच कविता आहेत. किंबहुना, ‘टाहोराया शीर्षकाचा अर्थच मुळी ढोल बडवण्याचा लाकडी दांडाहा आहे! कवी आपल्या कवितांतून जंगलझाडीतल्या दु:खांकडे इतर समाजघटकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यासाठी त्याची कविता एक प्रकारे टाहोराबनते आहे. शीर्षकापासूनच या कवितांचे समाजलक्ष्यीत्व/ समूहलक्ष्यीत्व सुरू होते. मात्र, या कवितांमधून सामोरा येणारा समाज हा विशिष्टआहे. तो शहरी वा महानगरातील नाही. तो विशिष्ट परिसरात, जंगलझाडीत, तिथे उपलब्ध असलेल्या नैसर्गिक संसाधनांत अभावग्रस्त अवस्थेत जगणारा आदिवासी समाज आहे. रानसंस्कृती हीच त्याची शाळा आहे. ज्या पशुपक्ष्यांवर त्याची अपार माया आहे, त्यांचीच प्रसंगी शिकार करून तो आपले आणि आपल्या कुटुंबाचे उदरभरण करीत आहे. जीवनदायिनी नद्या-नाले, त्याला आपल्यात सामावून घेत आहेत. तो सुरक्षित आणि स्थिर आयुष्य जगतच नाही. त्याचे वास्तव्याचे ठिकाण ऋ तुचक्रानुसार बदलत राहते. (पावसाळ्यात डोंगराच्या गडदेत/ हिवाळ्यात वीटभट्टीवर/ उन्हाळ्यात रोजगार हमीच्या सडकेवर’) शिक्षणाच्या, आरोग्याच्या, विकासाच्या सोयी-सुविधा त्याच्यापर्यंत यंत्रणा पोहोचू देत नाहीत. किंबहुना, वेठबिगारीचा करार करणाऱ्या, वीटभट्टीची उचल देणाऱ्या, वन खात्याचे पंचनामे करणाऱ्या अशा ग्रामपातळीवर कार्यरत असणाऱ्या भ्रष्ट आणि बेमुर्वतखोर यंत्रणांनी त्याचा जणू अंगठाच कापून घेतला आहे. शोषण करणाऱ्या या व्यवस्थांकडून नागवला जाणारा आदिवासी समाज हा इतर समाजघटकांना एक प्रकारे पारंपरिक एकलव्याच्या मिथकाचीच सतत आठवण करून देतो. त्याला स्वप्नभंगाच्या वास्तवाला सतत सामोरे जावे लागते. विकास, शहरीकरण आणि आधुनिकीकरण यांच्या नावाखाली चाललेला सभोवतालच्या पर्यावरणाचा विध्वंस त्याला असहायपणे पाहावा लागतो. तिथली नैसर्गिक मूल-संस्कृती तिच्यातील सर्व आदिम आणि सुसंस्कृत घटकांसह नष्ट होत आहे. या कवितांमधून प्रकट होणाऱ्या समाजलक्ष्यी/ समूहलक्ष्यी जाणिवेचे स्वरूप हे असे विदारक आणि व्यापक आहे. मराठी कवितेत नव्याने प्रकटणारी ही समाजलक्ष्यी जाणीव वास्तवाचे नवे भान देणारी आहे. म्हणूनच तर ती वैशिष्टय़पूर्ण आहे.


नवे वास्तवभान देणाऱ्या या अनुभवांच्या बरोबरीनेच कवीचे आत्मपर/ आत्मलक्ष्यी स्वरूपाचे अनुभवदेखील या कवितांमधून व्यक्त होतात. आत्मपर/ आत्मलक्ष्यी जाणीव आणि सामाजिक वास्तवानुभव यांची विलक्षण सरमिसळ या कवितासंग्रहात झालेली आहे. हा कवी जेव्हा आत्मपर/ स्वलक्ष्यी अनुभव साकार करीत असतो तेव्हा त्याच्या सभोवतालचे जीवन, त्याला लगडून असलेल्या घटना-घटिते अपरिहार्यपणे कवितेच्या रूपात साकार होत राहतात. उजव्या हाताची बोटे सांभाळण्याच्या भावाच्या सूचनेतून आदिवासी समाजात नुकतीच कुठे शिक्षणाची सुरुवात होते आहे, ही जाणीव होते. तिथेच आपल्या मुलाला बैतवार शिकीवअशी ताकीद देणारी मायमाऊली भेटते. आश्रमशाळेतल्या मुलांच्या वास्तव परिस्थितीने कवीला स्वत:च्या घराची आठवण होते.

आत्मपर/ आत्मलक्ष्यी अनुभव आणि रानसंस्कृतीमधले शोषणयुक्त वास्तव यांचीही अशीच सरमिसळ होत राहते. घरात पाळलेल्या कोंबडय़ा, शेळ्या, गाईगुरे यांच्याविषयी ओतप्रोत जिव्हाळा असणाऱ्या स्त्रीमधल्या मातृत्वभावाचे दर्शनही या अनुभवांतून होते. खेडय़ांतल्या तरुणांना स्वप्नभंगाचे दु:ख सोसून, परिस्थितीपुढे अगतिकपणे माघार घेऊन उदरनिर्वाहासाठी शहराची धरावी लागणारी वाट अशा आत्मलक्ष्यी अनुभवांतून प्रतीत होत राहते. आश्रमशाळेतल्या मुलांना कवीविषयी असणारा अपार स्नेह आणि त्या दोहोंतला भावबंध अशा अनुभवांतून झिरपत राहतो. ग्रामसंस्कृती आणि नागर संस्कृती यांच्यातले ताण अशा आत्मपर अनुभवांतूनच व्यक्त होत राहतात. कवी स्वानुभव/ आत्मपर अनुभवकथन करत करत स्वातंत्र्योत्तर काळात बोकाळलेली स्वार्थी वृत्ती, शोषण, दारिद्रय़, अभावग्रस्तता, स्त्रियांची फरपट, आसुरी धर्मभावनेमुळे माणसामाणसांमध्ये उभ्या राहिलेल्या जाती- धर्म- पंथाच्या भिंती आणि या साऱ्या घटकांमुळे बदलत गेलेले ऱ्हासमय जीवन यांचे भेदक वास्तव आपल्यासमोर साकार करतो. मराठीतील काही कवी-कवयित्री समाजलक्ष्यी/ वास्तवलक्ष्यी अनुभवांच्या काठावर उभे राहून अशा अनुभवांचे केवळ वर्णनकवितेतून करत राहतात. प्रसंगी त्यांच्या कवितांमध्ये टिपेचास्वर लागतो. मात्र, हा कवी स्वत:च सामाजिक वास्तवानुभवांच्या केंद्रस्थानी उभा राहून सभोवतालच्या जीवनसंघर्षांकडे अतीव मानवी करुणेने पाहत असल्याने आणि हे सगळे अनुभव घटक त्याच्या जगण्याचे आणि काव्यात्म व्यक्तिमत्त्वाचेदेखील अविभाज्य भाग झाल्याने अशा आत्मपर/ आत्मलक्ष्यी अनुभवांमधूनदेखील समाजलक्ष्यी/ वास्तवलक्ष्यी अनुभव साकार होत राहतात. परिणामी, या कवितांना अस्सल काव्यमूल्यही प्राप्त होते. ही प्रक्रिया मराठीत अगदी मोजक्याच कवींच्या कवितांमध्ये घडल्याचे प्रत्ययाला येते.


 या कवितांमधून व्यक्त होणारे अनुभव केवळ वर्णनाच्या पातळीवर राहत नाहीत. कारण ते प्रत्यक्ष माणसांच्या अनुभवांतून, जीवनसंघर्षांतून प्रकट होत राहतात. पुष्कळ माणसे या कवितांमधून वाचकांना भेटतात. रंजिता, मंदा गावडे, नवनाथ माळी, कवीचा मित्र, वडील, आई, बहीण, ठाकर दादा, तानाजी, सुईण, कादीर, सखाराम साबळे, आश्रमशाळेतली निराधार मुले ही सारी या जंगलझाडीतल्या कुटुंबव्यवस्थेतील, जीवनव्यवस्थेतील, गावगाडय़ातील माणसे, मुले आहेत. या प्रत्येकाच्या अनुभवांच्या विदीर्ण करणाऱ्या स्वतंत्र कहाण्या आहेत. जंगलझाडीतील निसर्गनिर्मित संकटे, निरनिराळ्या यंत्रणांनी व व्यवस्थांनी निर्माण केलेल्या संकटांशी आकांत न करता झगडणारी आणि तरीही जीवनसंघर्षांत एकमेकांच्या आणि रानसंस्कृतीच्याही आधाराने टिकून राहणारी ही माणसे आहेत. त्यांच्या जगण्याच्या विजीगिषु वृत्तीचा प्रत्यय या जीवनकहाण्यांमधून येतो आणि महानगरीय वाचकांना तो स्तिमित करतो. नारायण सुर्वे, नामदेव ढसाळांनी स्खलनशील महानगरीय संस्कृतीतील माणसे आणि त्यांच्या जीवनकहाण्या आपल्या कवितांमधून चितारल्या. कवी साबळे त्याहीपलीकडे जातात आणि आजवर दुर्लक्षित राहिलेल्या माणसांच्या अस्पर्शित जीवनकहाण्यांद्वारे मानवी सामर्थ्यांचे दर्शन घडवतात. यातून त्यांची निखळ मानवतावादी जीवनदृष्टी प्रतीत होत राहते. प्रत्यक्ष जंगलझाडीतील माणसांच्या जीवनानुभवांचा गहिरा स्पर्श या कवितांना झाल्यामुळे त्यांना अस्सलत्व प्राप्त झालेले आहे.


सामान्यत: आजची मराठी कविता ही दोन घटकांच्या संयोगातून निर्माण केलेल्या प्रतिमा प्रतीके व रूपके यांच्याद्वारे व्यक्त होते. तिच्यातून शब्दांचा, ओळींचा अतिव्ययदेखील केला जातो. परिणामी अशा कविता क्लिष्ट होतात. त्यांना दुबरेधता प्राप्त होते. कवी साबळे प्रामुख्याने आजच्या मराठी कवितेची ही प्रचलित शैली बाजूला ठेवतात आणि कथाशैली अवलंबून आपला अनुभव थेट सुबोधपणे प्रक्षेपित करतात. त्यामुळे त्यांना अनुभव आणि भावात्मकता यांचे एकात्मीकरणही करता आले आहे. इथल्या प्रतिमा, प्रतीके, रूपके जंगलझाडीतल्या, रानसंस्कृतीतल्या पर्यावरणातील आहेत. ती कवीच्या निकडीच्या भावानुभवाला व्यक्त करण्यासाठी अनिवार्यपणे येतात आणि अपेक्षित भावानुभवाला समृद्ध करतात. त्यास स्पष्ट असे दृश्यात्मक रूप देतात. या कवितांमधून भावानुभव तीव्रपणे साकार होतोच; शिवाय वाचकांना प्रत्यक्ष दृश्यरूपात दिसतोदेखील! अशा रचनात्मक शैलीच्या शक्यता फार मोठय़ा असतात. हा कवी या शैलीमुळे भावी काळात विशाल मानवी जीवनपट, जीवनानुभव साक्षात करू शकतो. याचा प्रत्यय त्याच्या या पहिल्याच कवितासंग्रहामधून येतो. या कविता प्रमाण मराठीत लिहिल्या गेल्या असल्या तरीदेखील कवीने काही वेळा बोलीभाषेचा, त्यामधील उच्चारांचा, त्यातल्या आर्त आवाहनांचा, संबोधनांचा अर्थपूर्णरीत्या वापर केला आहे. तो औचित्यपूर्ण आहे. त्यामुळेही काव्यानुभव भावात्मक होतो. त्यातून उन्नत अशी कातरता झिरपत राहते.

आज जीवनाच्या सर्वच क्षेत्रांवर जागतिकीकरणाचा दाब वाढलेला आहे. याला वाङ्मयीन क्षेत्रही अपवाद नाही. अशा परिस्थितीत साबळे यांच्या कवितांमधून मात्र सच्चा देशी अनुभव निखळ स्वरूपात साकार होतो. ही प्रक्रिया भावानुभव आणि त्याचे आविष्करण या दोन्ही पातळ्यांवर घडते. कवी साबळे यांना आपल्या समृद्ध काव्यपरंपरेचे पुरते भान आहे. (कविता- तुम्ही पहाटेच्या अंधारात शब्द गोळा करायला निघून जायचे’) साठोत्तरी काळातही सुर्वे, ढसाळ, नारायण कुळकर्णी-कवठेकर, अनुराधा पाटील आणि अरुण काळे या मानवतावादी कवी-कवयित्रींच्या परंपरेतील ही कविता या काव्यपरंपरेला जीवनानुभव आणि त्यांच्या आविष्करणाचे नवे आयाम प्राप्त करून देते. म्हणूनच वाचकांनी टाहोराकवितासंग्रहातील जंगलझाडीतल्या दु:खानुभवांच्या या अस्सल कवितांचे भरभरून स्वागत करावयास हवे.

- नीलकंठ कदम
(साभार : लोकसत्ता 21 जुलै 2019)

No comments:

Post a Comment

माणगाव परिषद : बहिष्कृतांचे रणशिंग - उत्तम कांबळे

'अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद ’ हा उत्तम कांबळे यांचा ग्रंथ ‘ लोकवाङ् ‌ मय गृह ’ तर्फे लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. एका ऐति...