2

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 85 30 52 85 50 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

Thursday 16 May 2019

सर्वकालीन प्रार्थनेचा स्वर (कविता)


दु:खाला
आपलंसं करून चालणार्यांच्या हृदयात
कायमच वसलेली असते एक वाहती नदी
वेदनेचा कोणता झरा
सतत त्यांच्यात पाझरत असतो
हे नसते माहीत
तरीही निर्वासिताची
सलती वेदना घेऊन भटकणार्यांच्याही
चेहर्यावर स्थैर्याचे भाव दिसून येतात
तेव्हा त्यांच्यासाठी जोडले जावू नयेत हात कधीही
फक्त भूमिहीन होण्यानंतरही त्यांच्यात वाढत जाणार्या
सहृदयी भावनेत आपल्याही भावनांची वाहू द्यावी नदी
आईच्या पान्ह्याची कदर न राखताही
गुराढोरांना, पशुपक्ष्यांना मातेसमान माना म्हणत
जे देतायत सूचक इशारे
त्यांच्या साध्या करड्या नजरेनेही भयभीत होऊन
जे सोडू पाहताय आपली भूमी
त्यांच्याही शब्दात सापडत जातेय सद्भावनेची आर्तता
खरं तर माणसाच्या दु:खाची वेदनाच
सुखाच्या निर्मितीचा क्षण अनुभवत असते तहहयात
म्हणूनच तर
दलित-पददलितांच्या स्पर्श अस्पर्शतेच्या
विद्रोहातून निर्माण होत असतो
माणसाच्या समतेचा जन्म
शोषित, वंचितांच्या सहवासातून शोधता येतायत दु:खाची मुळे
अखेर
दु:खाच्या खपल्या वाढत जाणार्या
अंत:करणातूनच तर ना
निनादत राहतोय सर्वकालीन प्रार्थनेचा स्वर
माणसाच्या असण्यासाठी!

- अजय कांडर

(कवी अजय कांडर हे मराठीतील नवदोत्तर पिढीतील महत्त्वाचे कवी आहेत. कोणत्याही कवीची राजकीय समज हीच त्याची समाजातील बहुसांस्कृतिकता टिकविण्याची समज ठरत असते. त्यांच्या कवितेत याचीच प्रचीती येते. इथे प्रसिद्ध होत असलेल्या या कविताही त्याला अपवाद नाहीत. कांडर यांची 2012 मध्ये प्रसिद्ध झालेलीहत्ती इलोही बहुचर्चित दीर्घ राजकीय कविता हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. त्यांचाआवानओलहा पहिला काव्यसंग्रह 2005 साली प्रसिद्ध झाला. त्याला महाराष्ट्र फाऊंडेशनसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले. अनेक विद्यापीठ, शालेय अभ्यासक्रमामध्ये त्यातील कवितांचा समावेश होतानाच त्या इंग्रजी, हिंदी, मल्याळम, उर्दू आदी भाषांमध्ये भाषांतरित झाल्या.)

No comments:

Post a Comment

माणगाव परिषद : बहिष्कृतांचे रणशिंग - उत्तम कांबळे

'अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद ’ हा उत्तम कांबळे यांचा ग्रंथ ‘ लोकवाङ् ‌ मय गृह ’ तर्फे लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. एका ऐति...