2

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 85 30 52 85 50 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

Friday 15 February 2019

आरमार

आरमार म्हणजे स्वतंत्र एक राज्यांगच आहे. जसें ज्यास अश्वबल तसी त्याची पृथ्वीप्रजा आहे, तद्वतच ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र. याकरितां आरमार अवश्यमेव करावें. चालीच्या गुराबा बहुत थोर ना बहुत लहान, ऐशिया मध्यरीतीनें सजाव्या. तशींच गलबतें करावीं. थोर बहुत वारसे जार्गांत जें वार्‍याविणें प्रयोजनाचेच नव्हे असें करावयाचें प्रयोजन नाहीं. कदाचित् एक दोन सलाबतीमुळें केलें तरी जें आरमार करावें त्यावर मर्दानी मारक माणूस, भांडीं, जंबुरें, बंदुका, दारूगोळी, होके आदिकरून आरमारी प्रयोजनी सामान यथेष्ट बरें सदुतें करावें.

आरमाराची व्यवस्था

त्याचे प्रत्येक प्रत्येक सुभे करावे. दर सुभ्यास पांच गुराबा, पंधरा गलबतें करून द्यावीं. इतकियासी एक सरसुभा करावा, त्याचे आज्ञेंत सर्वांनीं वर्तावें. आरमारास तनखा मुलखांत नेमून द्यावा. पैदास्तीवरील नेमणुकीमुळे साहुकारांस उपद्रव होऊन साहुकारी बुडेल. बंदरें राहिलीं पाहिजेत. प्रयोजनिक वस्तु परस्थळींतून आणावी तेव्हां येत्ये. असें जाहलियामध्यें राज्याचा भ्रम काय उरला? तसेंच जकाती आदिकरून हांशीलही बुडालें. लुटीमुळें गोरगरिबांचा सत्यानाश होऊन अपरिमित पापही वाढलें. आरमारकरीही बे-लगाम होऊन मन:पूत वर्तों लागले, तरी नेहमीं तनखा मुलखांतून देणें घडतें, तरी इतका अनर्गल प्रसंग न होता. कदाचित आरमारास सारा नेहमीं तनखा कैसा अनुकूल पडतो म्हणावें तरी जितका अनुकूल पडेल तितकेंच आरमार सजावें. साहुकारी वाढवावी. साहुकारीमुळें जकातीचेंच हांशील होईल. तितकियावरी कितेक आरमार करूं नये. या रीतीनें आरमार सजीत सजीत सजावें. आरमारकरी यांणीं हमेषा दर्यांत फिरून गनीम राखावा. जंजिरियाची सीमा जवादा वरीचेवरी पावीत जावा. येविषयीं जंजिरेकरी याचा बोभाट हुजूर येऊं न द्यावा. सर्वकाळ दर्यावर्दी गनिमाचे खबरेंत राहून गनिमाचा मुलूख मारावा. हवी पाळती घालून गनिमाचे स्थळाचे लाग करावे.

व्यापारी गलबते

दर्यांत कोळी साहुकारी तारांडीं यांची अमदरफ्ती करावी. कोळी साहुकारांचे वाटेस जाऊं नये. त्यांस कोणाचे उपद्रव लागत असेल तरी तो परिहार करावा. गनीमाचे मुलुखाखेरीज विदेशीचें गैरकौली असे साहुकारांची तरांडी येत जातां असलीं, तरी तीं परभारें जाऊं न द्यावीं. नयेंभयें हाताखालीं घालून, त्यांचे दसोडीस हात न लावतां, दिलासा करून बंदरास घेऊन यावी. बहुत प्रकारें त्यांणीं व मुलूखगिरीचें कारभारी यांणीं जाऊन त्यांचें समाधान करावें. लांकडे, पाणी घेतील तें घेऊं द्यावे. नारळांचीं शाळी आदिकरून जो त्यांस पाहिजे जिन्नस असेल तो त्यांस विकत अनुकूल करून द्यावा. याविरहित आणखी खरेदी प्रोक्त आत्मसंतोषें करितील तो अल्पस्वल्प जकात घेऊन सुखरूप करूं द्यावा. थोर मनुष्य साहुकार कोणी असला तरी त्याचे योग्यतेनुरूप दिवाणचे तर्फेनें त्याची थोडीबहुत मेहमानी करावी. तो खर्च दिवाणांतून मजुरा घ्यावा. कोणी एका प्रकारें त्या परकी साहुकारास सौख्य दिसे, माया लागे, तें राज्य अमदरफ्ती करीत, असें करावें. गनीमीचे मुलुखांतील साहुकारी तरांडी दर्यांत असलिया कस्त करून घ्यावीं, धरून बंदरांस आणावीं. मालांत काडीइतकी तसनस न करितां तमाम माल जप्त करून महालचे कारकुनांनी व आरमारकरी यांणीं हुजूर लिहून पाठवावें; आज्ञा होईल तशी वर्तणूक करावी.

आरमारी युद्ध

आरमारास व गनीमास गांठ पडोन झुंज मांडलें तरी सर्वांनीं कस्त करून एक जमावें गनीम दमानी घालवून झुंजावें. वारियाचे बळें गनीम दमानी न येत, आपण दमानी पडलों, आपले गलबत वारियावरी न चालेल असें जाहलें, तरी कसेंही आपलें बळ असो तरी गनीमास गांठ न घालतां, गांठ तोडीत तोडीत आपले जंजिरियाचे आश्रयास यावें. तरांडियांस व लोकांस सर्वथा दगा होऊं देऊं नये, आपणांस राखून गनीम घ्यावा. गनीम दमानी पडोन हारीस आला, जेर जाहला, तरी एकाएकीं उडी घालूं नये. दुरूनच चौगीर्द घेरून भांडियांचा मार देत असावें. दगेखोर गनीम आपण जेर झालों असें जाणून दगाबाजीनें कौल घेतो, म्हणून जवळ बोलावूं नये. आपल्या अथवा जवळ बोलाविल्याच्या पायाळास आगी टाकून तरांडें जायां करितो. याकरितां त्याचा विश्वास न मानितां कौलास आला तरी दुरूनच कौल देऊन त्याचेंच बतेल्यावरून सरदार लोक आपणाजवळ आणावे. मग त्याच्या तरांडियावरी आपले लोक चढवावे. नाही तरी मालबिसातीची तमा न धरितां भांडियांचे माराखाली तरांडें फोडून टाकून सलाबत पाडावी.

आरमाराची छावणी

आरमाराची छावणी करणें, दर्यास तुफान होणार तों आठपंधरा दिवस अगोदर करावी. तेही प्रतिवर्षी एकाच बंदरीं अथवा हरएक जंजिर्‍याखालीं किंवा उघड्यामानीं सर्वथा न करावी. प्रतिवर्षी एक्याच बंदरीं छावणी केलियानें, आरमाराचे लोक वारंवार ताकीद केली तरी कांहींएक मुलखास उपसर्ग थोरच आहे तो एकाचे मुलखास होणार, तो होऊं न द्यावा. उघड्यामानीं आरमाराची छावणी केली तरी छावणी कारणें आरमार धड्यावरी वाढावा लागतो. वरती छावणी, तशामध्यें दगेखोर गनीम, चोरी छपीनें तात्काळ आगीचा दगा करणार, असेंही होऊं न द्यावे. केवळ किल्ल्याचें बंदरांत छावणी करावी, तरी आरमाराचे मनुष्य बहुत, प्रायश: अविंध आणि उन्मत्त, एखादे बोलीचालीमुळें कचकलागत होऊन लोक जायां होणार. कदाचित् परस्परें संकेतस्थळांत फितवाही होऊं सके, हें बरें नव्हे. याकरिता आरमाराची छावणी करणें तें प्रतिवर्षी नूतन बंदरीं, ज्या बंदरास मोहरी किल्ला, किल्ल्याचे दहशतीनें गनीम खाडींत शिरों न शके, अथवा खाडीस खाडींत आरमाराची छावणी करावी. तेंही सारें आरमार एकाच जागीं न ठेवावें. जागां जागां छावणी ठेवावी. रात्रौ खाडींतील घस्त, खुष्कीची घस्त, आरमाराभोंवतीं करवीत जावी. सुभेदारानें आपला कबिला देखील दोन महिने त्या जागां राहून आरमाराची ताबिनाती करावी. जें लागेल सामान ते विषयीं हुजूर लिहून विले करून घ्यावी. मुलखांत अवाढावी सर्वथा होऊं न द्यावी.

आरमाराला लागणारे साहित्य

आरमारास तक्ते, सोंट, डोलाच्या काठ्या आदिकरून थोर लांकडे असावीं लागतात. आपले राज्यांत अरण्यांत सागवानादि वृक्ष आहेत त्यांचें जें अनुकूल पडेल तें हुजूरचे परवानगीनें तोडून न्यावें. याविरहित जें लागेल तें परमुलखींहून खरेदी करून आणवीत जावें. स्वराज्यांतील आंबे, फणस आदिकरून हेही लांकडें आरमाराच्या प्रयोजनाचीं, परंतु त्यांस हात लावूं देऊं नये. काय म्हणोन, कीं, हीं झाडें वर्षां दोन वर्षांनीं होतात असें नाहीं. रयतांनीं हीं झाडें लावून लेंकरांसारखीं बहुत काळ जतन करून वाढविलीं. तीं झाडें तोडिल्यावर त्यांचें दु:खास पारावार काय? एकास दु:ख देऊन जे कार्य करीन म्हणेल तें कार्य करणारासहित स्वल्पकाळाचें बुडोन नाहींसेच होेतें; किंबहुना धनियाचे पदरीं प्रजापीडण्याचा दोष पडतो. या वृक्षांच्या अभावें हानिही होत्ये. याकरितां हे गोष्टी सर्वथैव होऊं न द्यावी. कदाचित् एखादें जें झाड बहुत जीर्ण होऊन कामांतून गेलें असलें तरी त्याचे धन्यास राजी करून घेऊन द्रव्य देऊन त्याचे संतोषें तोडून न्यावें. बलात्कार सर्वथैव न करावा.

उपसंहार

याप्रमाणें हुजुरात, गड, किल्ले आदिकरून परम सावधतेनें वर्तत मातुश्रीसाहेबांचे सेवेशीं कोणेंही अर्थें अंतर न पडे, तुम्हीं केले सेवेचा मुजरा होय आणि या दिग्भरीत यशास तुम्हीं पात्र होऊन स्वामींनीं जो तुम्हांवर संपूर्ण अखत्यार दिला आहे, आणि स्वामींची अनुपम्य दया तुम्हांवरी आहे, ती दिनप्रतिदिनीं अभिवृद्धीस पावे ती गोष्ट करणें. तो योजिला संपूर्ण उद्योग सिद्धीस पावून सत्वरच स्वामींचें आगमन त्या प्रांतीं होत आहे. तदोत्तरी तुमच्या विचारें आणखीही कितीएक नाजूक धंद्याचें नियम जे परंपरेनें राज्याभिवृद्धीस उपयुक्त आणि इहलोक परलोक साधक, ज्यांस संपूर्ण कीर्ति, ते सर्वही यथान्यायें करून दिले जातील. जाणिजे. लेखनालंकार शके 1722 रौद्रनाम संवत्सरे पौष वद्य चतुर्थी रविवारी लेखन समाप्त:

भग्न पृष्टि कटिग्रीवं बखैर लिखितं मया
शुध्धोवापि अशुध्धोवा मम दोषो न विद्यते ॥1॥
तैलाद्रक्षेज्जलाद्रक्षेत् रक्षेत् सिथिल बंधनात्
मूर्खं हस्ते न दातव्यं एत्तद्वदति पुस्तकं ॥2॥

- विलास खोले

आज्ञापत्र - संपादक : विलास खोले, लोकवाङ्मय गृह प्रकाशन, (आवृत्ती पाचवी 2008 पृ. 85 ते 88)
(प्रेषक : सतीश काळसेकर)
(शुद्धलेखन मूळ पुस्तकाप्रमाणे)

No comments:

Post a Comment

माणगाव परिषद : बहिष्कृतांचे रणशिंग - उत्तम कांबळे

'अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद ’ हा उत्तम कांबळे यांचा ग्रंथ ‘ लोकवाङ् ‌ मय गृह ’ तर्फे लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. एका ऐति...