आपल्याला जाणीव नसतेच
पण खरं तर आईच्या
नाळेनेच
करून दिलेली असते
भुकेची ओळख
जी दिवसागणिक वाढतच
असते
सुरुवातीच्या काळात
कौतुकाचा
विषय असणारी भूक
आयुष्याच्या
मध्यावर
कधी रौद्र रूप धारण
करते
हेही कळतच नाही
आपल्याला
आणि कधी कधी
विवेकशून्यताही
हरवून टाकते
हेही लक्षात येत
नाही
रस्त्याच्या कडेला
रणरणत्या उन्हात
कातळावर घाव
घालणाऱ्याच्या
घामाला
भले तुम्ही कराल
दुर्लक्षित
पण शेजारीच
खेळणाऱ्या
त्याच्या कुपोषित
मुलाच्या
चेहऱ्यावरील
अन्नाची भूक
हृदयाचा दगड करूनही
दुर्लक्षित होता होत नाही
एवढी भुकेची
व्याकुळता
आपल्याही मनात
ठसठसत असते
अशाच वेळी मग
कुठल्याशा
वातानुकूलित
रेल्वेतून प्रवास
करताना,
अंध जोडप्याच्या
डोळ्यातील
जळजळीत भूक
डोळ्याआड करणं
जमतंच असं नाही.
स्वतःच्या पोरांना
महागड्या हॉटेलात
आवडीचं खाऊ घालतानासुद्धा
टेबल पुसणाऱ्या
पोराच्या पोटातील भूक
कितीही दुर्लक्ष
केलं तरी करतेच
तुमचा पाठलाग.
कधी कधी शरीराच्या
भुकेला भागवताना
कुठल्याशा
अगतिकतेनेच
एखाद्या बाईने
तिच्या भुकेसाठीच तर
केलेलं असतं
तुम्हाला जवळ
ज्याला तुम्ही मोजत
असता
शील-अश्लीलतेच्या
तराजूत
हवं ते देवाला
अर्पण केल्यानंतरही
एखादया माऊली जवळ
थबकतोच ना पाय
जिचा सुरकुतलेला
चेहरा
आणि सुकलेले ओठ
भुकेसाठीच तर याचना
करत असतात
अगदी मरणा नंतरही
मोक्षप्राप्तीसाठीच्या
कल्पनेतून कावळ्याच्या साक्षीने
याच भुकेचा आधार
घेताना
भल्याभल्यांचाही
अहंकार
धुळीला मिळवते
आणि जन्मालाच
चिकटून आलेली ही भूक
कोणत्याही
टाळेबंदीच्या काळात
आधी भुकेलेल्यालाही
संपवते!
- प्रा.
नीलम यादव
(छायाचित्राचे कॉपीराईट : विकास खोत)
(छायाचित्राचे कॉपीराईट : विकास खोत)
No comments:
Post a Comment