मी चार-पाच वर्षांचा होतो तेव्हा माझ्या वडिलांनी रेडिओ घरी आणला. त्या घटनेला आता सहा दशके होऊन गेली आहेत. त्या काळात घरी रेडिओ असणे ही गोष्ट फार प्रतिष्ठेची असे.त्या रेडिओ-सेटचा ‘मेक’ मार्कोनी, फिलिप्स का अजून कोणत्या कंपनीचा होता, हे मला आज स्पष्टसं आठवत नाही. पण घरात आणल्या-आणल्या वडिलांनी तो लगेचच ‘ऑन’ केला, हे मात्र चांगलं आठवतं. त्यात के. एल. सैगल, हेमंत कुमार, खुर्शिद आणि तलद मेहमूद यांची गाणी वाजायची. ही सारी गाणी आजही मला शब्दश: आठवतात. तेव्हापासून रेडिओवर संगीताचे कार्यक्रम मी ऐकत आलो आहे. अर्थात, गाणी मी रेडिओ व्यतिरिक्त इतरही माध्यमातून ऐकत आलो आहे. घरातील ज्येष्ठ मंडळी काम करत असताना गुणगुणत असायची ती गाणी, सणासुदीला, लग्न समारंभात, घरात बारश्यामध्ये ऐकायला मिळालेली गाणी, गावोगाव भटकणारे, शेतात खपणारे कष्टकरी म्हणतात ती, लोणचे-पापड घालताना स्त्रिया म्हणतात ती गाणी, किर्तन, भजन, भारूड, तमाशा या व अशा प्रसंगातून ऐकलेली गाणी. सर्वात मधुर म्हणजे बाळाला झोपवत असताना आया गुणगुणतात ती अंगाई.
बऱ्याच काळानंतर, मी जेव्हा माझ्या तिशीत होतो, तेव्हा पश्चिम भारतातील आदिवासी लोकांमध्ये मी काम करू लागलो होतो. बर्याचदा आमचे बोलणे त्यांच्या अस्मितेसंबंधी असायचे. बहुतेक आदिवासी अस्मितेच्या संदर्भात त्यांच्या गीत-परंपरेविषयी बोलायचे. तोपर्यंत मी मार्क्स, गांधी, आंबेडकर, लोहिया वाचले होते. मला वाटायचे की, त्यांच्यावर (आदिवासींवर) होणार्या अन्यायामुळे आदिवासी अत्यंत संतप्त असतील, ज्या व्यवस्थेने त्यांना ही वेदना दिली, त्याबद्दल ते काहीतरी बोलतील. पण आदिवासींच्या बोलण्यात त्या बाबी क्वचितच यायच्या. मला त्याचे आश्चर्य वाटायचे. त्यांच्या बोलण्यात थेट राजकीय बाबी जवळपास नसायच्याच. ते जे काही बोलत असत त्याला ‘सांस्कृतिक’ म्हणता येईल. त्यांच्याबरोबर काम करताना माझा असंख्य आदिवासी समुदायांशी संबंध बनला होता. त्यातल्या काहींचे स्वत:चे महाभारत होते, व ते त्यांचे संपूर्ण महाभारत गाऊ शकतात, हा अनुभव मी घेऊ शकलो. गुजरात आणि राजस्थानच्या सीमेवर राहणार्या भिल्ल-आदिवासींची स्वत:ची अशी चार महाकाव्ये आहेत. ही गाणारी मंडळी संपूर्ण महाकाव्ये गातात. त्यातील एकही शब्द न गाळता त्याचे सादरीकरण करतात. मध्य भारतातील जंगलातील राज्यात भर्तरी जमातीचे काही आदिवासी माझ्या संपर्कात आले. त्यांना मी विचारल्यावर (केवळ मी विचारले म्हणून), एका राजाच्या आयुष्यावर आधारित संपूर्ण गीतरूप गोष्ट मला गाऊन दाखवली. ‘बंजारा’ समुदायातील माझ्या एका मित्राने मला सांगितले की त्यांच्यात लेहंगी नावाचा काव्य प्रकार असतो. मी सुचवले की त्याला जितक्या आठवतील,जशा माहीत असतील तशा त्या त्याने लिहून काढाव्यात. तो म्हणाला, जवळपास 6,000 ‘लेहंगी’ त्याच्या लक्षात आहेत. हे ऐकून मला फारसे आश्चर्य वाटले नाही, कारण यापूर्वी ‘नायक’ जमातीतल्या माझ्या एका मित्राने मला सांगितले होते की, त्याला त्यांच्या साहित्य-संस्कृतीतील 9,000 गाणी त्याच्या लक्षात होती आणि हा गाणारा पक्का. त्याचा आवाज जबरदस्त. एका गाण्यानंतर दुसरे गाणे असे तो सलग ही ‘गाणी’ म्हणत असे. आजही ही गाणी आठवली तर, मी रोमांचित होऊन जातो. भारतीय समाजात ‘ट्राईब’ आणि ‘जात’ हे दोन वेगळ्या प्रकारचे समुदाय आहेत. जे ‘जाती’ आहेत ते ‘ट्राईब’ नाहीत आणि जे ‘ट्राईब’ आहेत ते ‘जाती’ च्या पिरॅमिडमध्ये नाहीत. मात्र हा फरक दोहोंच्यात असणार्या गीत-सोसामुळे नाहीसा होतो. संगीत प्रेमात हे एकत्र येतात.
माझ्याच वयोगटातल्या व्यक्तींबरोबर किशोरवयात आणि तारुण्यात असताना मी खूप प्रवास केला आहे. या प्रत्येक प्रवासात आम्ही एक खेळ खेळायचो, ज्याला आपण ‘अंताक्षरी’ किंवा ‘गाण्याच्या भेंड्या’ असे म्हणतो. तो कदाचित फक्त भारतीय आणि कदाचित आफ्रिकन्स, खेळतात. या खेळाला बोर्ड, बॅट, बॉल... कोणतीच साधनसामुग्री लागत नाही. यात केवळ एकाच गोष्टीची आवश्यकता असते आणि ती म्हणजे, तुम्हाला गाता आले पाहिजे. यात दोन टीम्स असतात. हा खेळ सतत खेळता येतो. याला अंत नसतो. या खेळात हार आणि जीत असे काही नसते. यासाठी कोणत्याही प्रशिक्षणाची गरज नसते, किंवा तुमचा आवाज खूप गोड वगैरे असावा अशीही अपेक्षा नसते. मला माहीत असलेला हा ‘अंताक्षरीचा खेळ’ कदाचित सर्वात लोकशाहीवादी असावा.
गाणी आणि गाणारे यांची भारताची ऐतिहासिक संस्मरणे समृद्ध आहेत; ती दुसर्या संस्कृतीतील मानकांच्या तुलनेत कितीतरी जास्त समृद्ध आहेत. मध्ययुगीन कालखंडाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा जी नावे आपल्या समोर पटकन उभी राहतात ती म्हणजे कबीर आणि मीरा, जयदेव आणि चंडीदास, सूरदास आणि नानक, अक्का महादेवी आणि तुकाराम, त्यागराज आणि नरसी मेहता. यातील प्रत्येकजणानं श्रेष्ठ दर्जाची गाणी निर्माण केली आणि हे प्रत्येकजण आपापल्या कालखंडात वैशिष्ट्यपूर्ण गायक म्हणून ओळखले गेले. त्यांच्यातल्या प्रत्येकाचे स्वतःचे असे विशिष्ट तत्त्वज्ञान होते. तरीही यातील प्रत्येकजण ‘प्रेमाचे गाणे’ म्हणणारे म्हणून भारताच्या स्मरणात राहिले आहेत.
‘रघुपती राघव राजाराम’ किंवा ‘वैष्णव जन तो तेणे रे कहिये’ ही गांधीजींना प्रिय असणारी भजनं प्रत्येक भारतीय केव्हा-ना-केव्हा गायलेला असतो. यातून संगीताबद्दलची गांधीजींची आस्थाही जाणवते. रवींद्रनाथ टागोर यांची प्रतिभा एखाद्या विस्तृत-पटलाची होती; तत्त्वज्ञान, शिक्षण, नाटक, राजकारण, कथा-कादंबरी, चित्र आणि काव्य यात स्वैर भरारी घेणारी होती. विसाव्या शतकातील भारतीय संस्कृतीवर त्यांची अमिट छाप आहे. तथापि, रविंद्रनाथ टागोर लोकमानसात थेटवर रुजले त्याचे सगळ्यात जास्त श्रेय जाते रवींद्र संगीताला.
मोठ्या प्रमाणात स्मरणात राहिलेली गाणी आठवून गुणगुणण्याची सवय ही सर्वसामान्य भारतीयांचा ‘म.सा.वि.’-- किमान गुण--असावा. भले तो कुठल्याही आवाजात, कसंही गाणं म्हणो; या बाबतीत भारताचा जगात पहिला नंबर लागेल यात शंका नाही. राजस्थानमधील सुफी, बंगालमधील बाउल, महाराष्ट्रातील वारकरी, आसाममधील बिहू गाणी आणि गुजरातमधील प्रत्येक तरुण आणि तरुणी ज्या उत्साहाने गरबा नृत्यात गाणी म्हणत सहभागी होतात हे ऐकल्यावर/पाहिल्यावर, आपण सारेजण गाणी आणि संगीतावर अत्यंतिक प्रेम करणारे आहोत हे स्पष्ट होते. यातून एक राष्ट्र म्हणून आपली अस्मिता निश्चित झाली आहे. मज्जासंस्थेच्या किंवा मेंदुच्या विकारांवर उपचार करणार्या तज्ज्ञांच्या मते, मेंदूमध्ये भाषा आणि संगीत याच्या आकलनाची दोन वेगवेगळी केंद्रे असतात: एका भागात भाषेची जाण आणि तर्कबुद्धी तर, दुसर्या स्मरणभागातील एका कप्प्यात संगीत लयींचे आलेख कोरलेले असतात. ‘गाण्याचा तुडवडा’ असणार्या दुसर्या संस्कृतीतील लोकांच्या मनांपेक्षा भारतीय मन हे ‘अतिरिक्त गाण्यांना’ आणि भाषेच्या गारुडाला प्रतिसाद देणारे आहे, हे विधान जरी थोडे धाडसाचे असले तरी, ते सर्वसाधारण तर्काला धरून आहे असे वाटते. वसाहतवादामुळे प्रत्येक तर्काधिष्ठित आणि सर्जन क्षेत्रात आपली अभिरुची बदलत गेली, पण भारतात संगीताची अभिरुची बहुतांशी तीच राहिली आणि आपण त्याच्याशी वसाहतवादी कालखंडात आणि नंतर सुद्धा निगडीत राहिलो. विशेषत: उत्तर-वसाहतीक कालखंडात सिनेमा नावाची आधुनिक गोष्ट आपल्याकडे आली; ही कला संपूर्णत: तंत्राधिष्टीत गोष्टींवर आधारलेली होती. या आधुनिक कलेला आपण मनापासून स्वीकारले आणि यात आपण ताबडतोब गाण्याचा बेसुमार वापर करायला सुरुवात केली. सिनेमातली ही गाणी आपल्यासाठी अधिकच महत्त्वाची ठरली. शिवाय ती बर्याचदा आपल्या सामुदायिक कृतीच्या केंद्रस्थानी राहिली. एक मध्य पूर्व देशातील चित्रपट अपवाद म्हणून सोडला तर, ही गोष्ट जगामध्ये इतरत्र कोणत्याही सिनेमा इतिहासात घडलेली आपणांस दिसत नाही. त्यामुळे ‘गीत’ भारतीय महासंस्कृतीचे खास वैशिष्ट्य, गुणविशेष किंवा अंग आहे, असे म्हटले तर यात फारसे चुकीचे नाही.
गेल्या महिन्यात जेव्हा बेंगलोरमध्ये अनेक ठिकाणी ग्राफिटी (graffiti, सार्वजनिक ठिकाणी भिंतींवर वगैरे काढलेली चित्रे किंवा लिहिलेला मजकूर, भित्तिचित्र, भित्तिलेख, भिंती चितारणे वगैरे) लिहिल्या जात आहे हे समजल्यावर, हे वर नोंदवलेले विचार माझ्या मनात आले. या ग्राफिटीचा संदर्भ असा होता : रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्समध्ये जे गाण्याचे लाईव्ह कार्यक्रम होत असतात ते बंद करून त्याबद्दल कठोर आणि कडक कारवाई केली जाईल अशा आशयाच्या सूचना कर्नाटक सरकारने दिल्या. त्याच्या प्रतिकारासाठी ग्राफिटी आली. लोकांनी या अशा कारवाईबद्दल या ग्राफिटींमधून सरकारला काही संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. ‘संगीत मुक्त करा, सरकारचे नियंत्रण नको, संगीत हा लोकांचा आत्मा आहे, त्याला तुम्ही लोकांपासून हिरावून घेऊ नका’ अशा प्रकारच्या ग्राफिटीज लोकांनी लिहिल्या होत्या. अचानकपणे बेंगलोरमधील महात्मा गांधी मार्ग, म्युझियम मार्ग, लॉवेलं आणि सेन्ट-मार्कस मार्ग या महत्त्वाच्या रस्त्यांवर या ग्राफिटीज झळकायला लागल्या. आजची तरूणाई ही या रस्त्यांवरून बहुतांशी नजरेस पडते. ज्या पोलिस यंत्रणेने या तरुणाईचे संगीत बंद केले होते, ते लिहू लागले होते, 'Remember to forget, Four Ders, Sammzie, Rastad, King Turac, Guess who, King and Zero’ यांचा उद्घोष सुरू झाला. आणि या ग्राफिटीबद्दलचा राज्यसंस्थेचा प्रतिसाद काय होता, तर हा उद्योग कोणी केला? याचा शोध राज्यसंस्था घेऊ लागली आणि त्यांना कस्टडीत ठेवण्याची तयारी करू लागली. ‘गाण्या’ बद्दलची आस्था असणार्या कोणत्याही भारतीयाला हे समजणे कठीण नाही की, हा निषेध ‘गाणी’, ‘संगीत’ किंवा इंद्रिय सुखाबद्दलचा नव्हताच. या निषेधाचा मतितार्थ हा खोलवर जाणार आहे आणि उघड उघड प्रगतिशील राजकारणाचा आहे. इ. स. 2000 च्या आसपास जन्माला आलेल्या या नव्या तरुण पिढीकडून आलेला हा प्रश्न आहे. सांस्कृतिक प्रश्नांची चिकित्सा करणार्या समीक्षकासमोर हा बेंगलोरमधल्या ग्राफिटीचा प्रश्न ठेवला तर, याबद्दलचे काय विवेचन असू शकते? अलिकडेच महाराष्ट्र आणि हरियाणा येथील जनतेने सत्ताधारी पक्षाला त्यांची जागा दाखवून दिली आणि याचदरम्यान तरुणाईची ही ग्राफिटी बेंगलोरमधील रस्त्यांवर उमटलेली दिसते. हा काही योगायोगाचा भाग नाही. हा केवळ भाषण, लेखन, इ. कोणत्या तरी हेतूने केलेला पक्षपाती स्वरुपाचा राजकीय मतप्रदर्शनाचा किंवा प्रवृत्तीचा हेतुपुरस्सर भाग आहे म्हणून याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. बेंगलोरमध्ये येऊ लागलेले हे ग्राफिटी लेखन सत्ताधार्यांना अधिक बारकाईने वाचावे लागेल. हे असे अजुनी एक ’गाणे’ लोकशाहीच्या वृद्धीसाठी. या नव्या गीत-आंदोलनांत एक नव्या आशेचा किरण दिसतोय.
- गणेश देवी
भाषांतर : दिपक बोरगावे
(What unites indians is a love for songs' - The Telegraph - 1.11.19 या मूळ इंग्रजी लेखाचे मराठी भाषांतर)