काही दिवसांपूर्वी या लेख-संग्रहाची
प्रत मला मिळाली. ती वाचताना - त्यातील काही लेख या पूर्वी विविध वार्तापत्रात आले, तेव्हाच वाचले असले, तरी
- डॉ. मुणगेकरांच्या वैविध्यपूर्ण प्रतिभेचा पुन्हा एकदा आनंद मिळाला.
गेल्या पाच वर्षांत निर्माण
होत राहिलेल्या जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या घटनेवर सर्चलाईट टाकणारे आणि त्या घडामोडींचे
पद्धतशीर मुद्देसूद विश्लेषण करणारे हे सगळे लेख, डॉ. मुणगेकरांच्या विचारांची सखोलता आणि त्यांच्या विविध शाखांतील
ज्ञानाचा अनुभव आपल्याला देतात. पुस्तकाच्या अखेरच्या भागात समाविष्ट केलेल्या स्मृतिलेखांमुळे,
एक व्यक्ती म्हणून त्यांची अपार माणुसकीची संवेदनशीलता (Sensibility)
आणि गुरुप्रेम व मित्रभावही स्पष्ट दिसतात.
हे सारे लेख त्यातील विषयांचे
सखोल विश्लेषण म्हणून दीर्घकाळ वाचनात राहतीलच, पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचा भाग म्हणजे, हे सारे
लेख काही काळाने आपण मागे वळून पाहू, तेव्हा भारताच्या इतिहासातील
एक मन:स्पात पसरवणारा काळ म्हणून ज्या वर्षाचा उल्लेख होत असेल, त्या पाच वर्षांचा एक अत्यंत वस्तुनिष्ठ आढावा, एक वैचारिक
पंचनामा, ह्या स्वरूपात पाहिले जातील. इंग्रजीमध्ये जॉर्ड ऑरवेल
किंवा ऑर्थर कोस्लर यांनी ज्याप्रमाणे त्यांच्या काळातील विघातक राजकीय प्रक्रियांना
वैचारिकतेच्या पायावर वाचा फोडली होती, त्या प्रमाणे मुणगेकर
देशातील आणि खास करून महाराष्ट्रातील अनेक विघातक सामाजिक आणि राजकीय प्रक्रियांचे
कितीतरी फोरेन्सिक रिपोर्ट्स या पुस्तकात आपल्यापर्यंत पोहोचवतात.
ह्या खेरीज, आवर्जून उल्लेख करावा, असा अजून एक प्रशंसनीय गुण म्हणजे या पुस्तकातील लेखांची वाचकाच्या सहज आवाक्यात
येईल, अशी भाषाशैली अत्यंत गुंतागुंतीच्या विषयावरची,
आणि मुळात दुर्बोध बनत जातात; पण प्रगाढ ज्ञानातून
आणि चिंतनातून जन्मलेले शब्द सरळ सोपे असतात. ते तसे डॉक्टरसाहेबांचे आहेत. लोकशाहीवरचा
प्रगाढ विश्वास आणि सामाजिक समानतेची सततची आस, हे मुणगेकरांच्या
विचारांचे सतत चमकणारे तारे प्रत्येक लेखाला प्रकाश देत राहतात.
मला खात्री आहे की, आपल्या सध्याच्या झाकाळलेल्या या काळात आणि
ज्या संक्रमणाच्या क्षणापाशी आपण आलो आहोत, त्या क्षणात,
डॉक्टर मुणगेकरांचा हा लेखसंग्रह आपला पाठ दर्शक बनेल, प्रश्नाची नांदी बनेल.
- गणेश देवी
No comments:
Post a Comment