Saturday, 9 May 2020

भूकेची गाथा : भूकेचा दृश्य इतिहास


भुकेने मानवी इतिहासात आतापर्यंत किती बळी घेतले असतील? साहजिकच या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर देणं कदाचित शक्य नसेलही. मात्र सर्वात जास्तहे ही एक उत्तर असू शकेल. मानवी इतिहासात सतत-अविरतपणे माणसे कशाने मरत आली आहेत याचे मात्र एकमेव उत्तर भूक हेच आहे. भुकेने माणूस मरणं हे कुणीच थांबवू शकलेलं नाही. आज कोरोनाने माणसं मरत आहेत. त्यावर उपचार किंवा लस सापडली की कोरोनाने माणसं मरायचे थांबतील. पण कोरोनाच्या टाळेबंदीतही माणसे भुकेने मरत आहेत. कोरोनानंतरही माणसं भुकेने मरत राहतील. भुकेच्या अशा अगणित छटा सर्व कलांमध्ये अविरतपणे अभिव्यक्त झालेल्या आहेत. कदाचित भुकेचे सर्वात जास्त प्रतिबिंब साहित्यात उमटलेलं असेल. कोणत्याही काळात भुकेबद्दलचं साहित्य कुठल्यातरी स्वरुपात लिहिलं गेलं असेल, असा मला ठाम विश्वास आहे. अगदी तुकारामाच्या गाथेलाही तत्कालीन दुष्काळाच्या कळा सोसाव्या लागल्याच असतील.

मानवी संस्कृती आणि सभ्यतेचा इतिहास हा भुकेचाच इतिहास आहे. परंतु हे मान्य नसल्याच्या अविर्भावातच मानव आतापर्यंत जगत आलेला आहे. भुकेमुळे पहिल्यांदा दोन माणसे एकत्र आली, पुढे सोबत राहिली. त्यातूनच समूह तयार झाले. त्याला समाजाचे कोंदण लाभले आणि संस्कृती उदयास आली. असा अंदाज घेतला तर लक्षात येईल की मानवी संस्कृतीची बीजे भूकेतच होती. पुढे शेतीचा शोध लागल्यानंतर हे समीकरण अधिकच दृढ झाले. युवाल नोआ हरारी यांना शेतीचा शोध हा मानवी इतिहासातील सर्वात मोठी चूक किंवा घोटाळा वाटत असला तरी भुकेला उत्तर किंवा पर्याय सापडेपर्यंत हे सर्व असंच चालत राहील. आपल्या जगण्याचा सगळा आटापिटा पोटासाठीच. भुकेने माणसांना काय काय करायला लावले आणि यापुढे काय काय करायला लावेल याची गणतीच नाही. फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांतीसाठीही एक कारण भूक होतीच. ही भुकेची गाथा अशी संपणार नाही.

भुकेने मानवी इतिहासात आतापर्यंत किती बळी घेतले असतील? साहजिकच या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर देणं कदाचित शक्य नसेलही. मात्र ‘सर्वात जास्त’ हे ही एक उत्तर असू शकेल. मानवी इतिहासात सतत-अविरतपणे माणसे कशाने मरत आली आहेत याचे मात्र एकमेव उत्तर भूक हेच आहे. भुकेने माणूस मरणं हे कुणीच थांबवू शकलेलं नाही. आज कोरोनाने मासं मरत आहेत. त्यावर उपचार किंवा लस सापडली की कोरोनाने मासं रायचे थांबतील. पण कोरोनाच्या टाळेबंदीतही माणसे भुकेने मरत आहेत. कोरोनानंतरही मासं भुकेने मरत राहतील.

भुकेच्या अशा अगणित छटा सर्व कलांमध्ये अविरतपणे अभिव्यक्त झालेल्या आहेत. कदाचित भुकेचे सर्वात जास्त प्रतिबिंब साहित्यात उमटलेलं असेल. कोणत्याही काळात भुकेबद्दलचं साहित्य कुठल्यातरी स्वरुपात लिहिलं गेलं असेल, असा मला ठाम विश्वास आहे. अगदी तुकारामाच्या गाथेलाही तत्कालीन दुष्काळाच्या कळा सोसाव्या लागल्याच असतील. जगाच्या पाठीवर असे अनेक तुकाराम होऊन गेलेत. त्यातील काहींचा तर भुकेने बळी गेलेला असू शकेल.

मानवी इतिहासातील सर्वच दुष्काळ नैसर्गिक नव्हते. काही दुष्काळ हे मानवी चुकांचे एकत्रित परिणाम म्हणूनही बघितले जातात. शेतीच पिकली नाही आणि अन्नाचा तुटवडा निर्माण झाला हा नैसर्गिक दुष्काळ. तर युद्ध, महामारी, राजकारण व सत्ताकारणातून निर्माण होतात ते मानवनिर्मित दुष्काळ. अलीकडच्या काळातील असाच एक मोठा मानवनिर्मित दुष्काळ चीनने ‘द ग्रेट लीप फॉरवर्ड’च्या काळात १९५९ ते १९६१ दरम्यान अनुभवला. त्यात तब्बल एक कोटी पेक्षा जास्त लोक भुकेने मेले, असा अंदाज व्यक्त केला गेलेला आहे. उदाहरणादाखल सांगायचे तर १८६० पासून मागील १५० वर्षात फक्त आशिया खंडात दहा कोटी लोकांपेक्षा जास्त लोक भुकेने मारले गेले आहेत. त्यातील वर सांगितलेले चीनचे एक सर्वात मोठे उदाहरण. https://ourworldindata.org/famines या वेबसाईवरील तक्ते व त्याखालील माहिती नजरेखालून घाला; डोळ्याला अंधाऱ्या येतील. अर्थात त्यासाठी तेवढी संवेदनशीलता आपल्यात अजून शिल्लक असावी लागेल. कलाकारामध्ये ती कायम असते. म्हणून आपल्या कलेतून तो याविषयी अभिव्यक्त होत राहतो.

१९१८ मधील दुष्काळात पर्शियन इलाख्यातील उत्तर इराणमधील एकूण लोकसंख्येच्या एक चतुर्थांश लोक भुकेने मारले गेले होते. १९३३ मधील रशियातील दुष्काळही असाच भयंकर. परंतु या दुष्काळाची महाभयंकर बाब म्हणजे इतिहासकारांच्या मते हा पूर्ण मानवनिर्मित दुष्काळ. गव्हाचे उत्पादन मुबलक प्रमाणात होऊनही तत्कालीन स्टॅलिन सरकारने युक्रेन प्रांतातील सामुहिक शेतीतील सर्व गहू बंदुकीच्या जोरावर जमा करून घेतला. लोकांना खायला काही उरले नाही, तर मासं ही लहान मुले आणि स्त्रियांना खायला लागली.. इथपर्यंत परिस्थिती गेलेली. या दुष्काळात जवळपास चाळीस लाख युक्रेनियन लोक भुकेने मारले गेले. या दुष्काळावर आधारित वासिल बार्का यांनी ‘द यलो प्रिन्स’ ही कादंबरी १९६३ मध्ये लिहिली. "बुर्जुआ राष्ट्रवाद" याबद्दल कविता प्रकाशित केल्यावर ते प्रथम चर्चेत आले. बार्का तसे बहुआयामी व्यक्तिमत्व. ते Great Patriotic War मध्ये सहभागी झाले, जखमी झाले, त्यातून बरेही झाले. पुढे कामानिनित्त जर्मनीत गेले, मग फ्रान्समध्ये, शेवटी अमेरिकेत स्थाईक झाले. मिळेल ती कामे केली, कोणतीही नोकरी केली; जसे फायरमॅन, विंडो क्लिनर, नोकरी नसेल तेव्हा कधीकधी तर उपासमारही सहन केली. मात्र मायदेशात परत गेले नाहीत. तेथील परिस्थितीबद्दल मात्र लिहित राहिले.

‘द यलो प्रिन्स’ ही कादंबरी १९६३ मध्ये लिहिली, मात्र ती १९९१ मध्ये प्रकाशित झाली. याच कादंबरीवर १९९१ मध्ये ओलेस यांचुक या दिग्दर्शकाने Famine – ३३ हा चित्रपट १९९१ मध्ये प्रदर्शित केला. हा चित्रपट पाहणे हा खूप भयावह अनुभव आहे. सहाजणांच्या समृद्ध शेतकरी परिवाराची ही कथा. त्यांची समृद्धता मात्र आता स्वप्नातच उरली आहे अशी परिस्थिती. त्यांच्या शेतातील सर्व उत्पन्न स्टॅलिनचे सैनिक घेऊन गेले आहेत. त्यांचा वाटाच काय तर एक गव्हाचा दाणाही सैनिकांनी ठेवलेला नाही. एका मोठ्या भांड्यातलं पाण्यासारखं पातळ सूप आळीपाळीने खायचे दिवस त्यांच्यावर आले. तेही दिवसातून एकदाच खायचं. पुढे परिस्थिती आणखी बिकट होत गेली, तसं संपूर्ण गावच खाऊन टाकलं भुकेनं.

भुकेचा हा संहार सगळीकडेच होता आणि आहे. ‘अकलेर शंधणे’ इंग्रजीत "इन सर्च ऑफ फॅमिन" हा १९८२ मधील मृणाल सेन दिग्दर्शित भारतीय बंगाली चित्रपट बंगालमधील १९४३ च्या दुष्काळावर आधारित आहे. या दुष्काळात पाच लाखांवर बंगाली लोक भुकेने मारले होते. याच दुष्काळावर सत्यजित रे यांचा बंगाली चित्रपट ‘डिस्टंट थंडर’ बंगालीमध्ये ‘ओशोनी शोंगकेट’ हा १९७३ मध्ये प्रदर्शित झाला होता.  बिभूतिभूषण बंडोपाध्याय यांच्या याच नावाच्या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटाची कथा दुसर्‍या महायुद्धात भारतीय प्रांतातील बंगाल प्रांतातील एका गावात घडते. १९४३ च्या महाकाय दुष्काळाचा परिणाम बंगालच्या एका खेड्यातील  तरुण ब्राह्मण डॉक्टर-शिक्षक गंगाचरण आणि त्यांच्या पत्नीच्या माध्यमातून दाखविले आहेत. एका खुशहाल पारंपारिक खेड्यात दुष्काळामुळे हळूहळू उपासमार आणि उपासमारीच्या दबावाखाली पारंपारिक ग्रामीण संस्कृतीचे कसे पतन होते हा कथेचा गाभा.

भुकेच्या करुणेला थोडीशी का होईना सुखद किनार असलेला एक आफ्रिकन चित्रपट आहे. त्याचे नाव ‘द बॉय हू हार्नेस्ड द विंड’. हा चित्रपट मात्र भुकेच्या संघर्षाचा एक जबरदस्त अनुभव आहे. २०१९ सालचा हा ब्रिटीश चित्रपट चिवेटेल इजिओफोर यांनी दिग्दर्शित केलेला आहे. या चित्रपटात ते स्वतःही मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट ‘द बॉय हू हार्नेस्ड द विंड’ याच नावाच्या विल्यम कमकवांबा आणि ब्रायन मिलर यांच्या बालपणीच्या आठवणींच्या पुस्तकावर आधारित आहे. पुस्तकातील कथा, घटना आणि पात्र हे चित्रपटात जसेच्या तसे घेण्यात आलेले आहेत. चित्रपटाची कथा घडते मलावी मधील एका खेड्यात. मलावी हा पूर्व आफ्रिकेतील एक छोटासा देश. आफ्रिकी देशांना दुष्काळ आणि गरिबी तशी कायमचीच. मलावी हा तसा अजूनही अविकसित देश. ऐंशी टक्के शेतकरी. विकायला तंबाखू आणि खायला मका पिकवणारे शेतकरी. या पार्श्वभूमीवर विम्बे या गावात घडणारी ही कथा. मक्याच्या शेतात कणीस खुडता खुडता एक शेतकरी चक्कर येऊन पडतो आणि मरतो इथंपासून कथा सुरु होते. या मेलेल्या शेतकऱ्याची दोन मुले आहेत. त्याच्यात जमिनीचा वाटा होतो. वाट्यात मोठ्या भावाच्या वाट्याला कोरडवाहू जमीन आलेली आहे. लहान भावाला सुपीक. लहान भाऊ इतर गावकऱ्यांसोबत उतारावरील शेतातील झाडे पैशासाठी विकून टाकतो. मोठा भाऊ ट्रायवेल लहान भावाला आणि गावकऱ्यांना खूप समजावतो, की ही झाडे तोडली तर पुराचा खूप धोका आहे. परंतु पैशाच्या मोहापायी सर्व झाडं विकून तोडली जातात.  ट्रायवेलची भीती खरी होते. त्यावर्षी खुपूर येतो. सर्व पीकं वाहून जातात. गावावर उपासमारीची वेळ येते.

ट्रायवेलचा मुलगा विल्यम आठवीत शकतोय गावातीलच शाळेत. पण शिक्षण महाग आहे. तो काही फी भरतो आणि उरलेली नंतर भरू म्हणून मुलाचे शिक्षण सुरु ठेवतो. मुलगी पैसे नसल्यामुळे कॉलेजमध्ये शिक्षणासाठी जाऊ शकत नाही, म्हणून तीही घरीच आहे. ट्रायवेलची ही दोन्ही मुले खूप हुशार आहेत याची त्याला जाणीव आहे. मात्र तो एकाच मुलाला शिकवू शकतो म्हणून विल्यमला शिकवतोय. पुरानंतर पाऊस पडेनासा झाल्याने पुढचे पीकही घेता येऊ शकले नाही. आता अन्नासाठीची लढाई अधिक तीव्र होत चाललेली आहे. देशात राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचे वारे वाहत आहेत. एका कार्यक्रमासाठी राष्ट्राध्यक्ष त्यांच्या गावात येणार आहेत, तेव्हा गावाच्या प्रमुखाला भेटून ट्रायवेल आपल्या गावाची व्यथा मांडण्याची विनंती करतो. प्रत्यक्ष कार्यक्रमात गावप्रमुख गावातील अन्नाच्या समस्येबद्दल बोलत असताना राष्ट्राध्यक्ष पोलिसांना खुणावतात, पोलीस गाव प्रमुखाला स्टेजखाली नेऊन बदडून काढतात. ट्रायवेल समजून जातो, की आपल्याला सरकारकडून काही मदत मिळणार नाही. तो गावातील तरुणांना एकत्र करून विरोधी पक्षातील राजकारण्यांना भेटण्यासाठी शहरात घेऊन जातो. रस्त्याने त्याला अन्नासाठी होत असलेल्या हिंसक दंगली दिसतात. त्याला घाबरून ते आपली गाडी परत गावाकडे फिरवतात. तोपर्यंत इकडे गावात अन्नासाठी लुटमार सुरु झालेली आहे. ट्रायवेलच्या घरी काही लोक उरला सुरला तांदूळ आणि मका लुटून नेतात. आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. ट्रायवेल घरातील सर्वांना एकत्र बसवतो आणि सांगतो, ‘‘आपल्याला आता आलटून पालटून दिवसातून एकदाच जेवण करता येईल. कोण केव्हा जेवणार ते सांगा?’’

या परिस्थितीत ट्रायवेलची मुलगी तिच्या प्रियकरासोबत शहरात पळून जाते. ती चिट्ठीत लिहून ठेवते की खाणारं एक तोंड कमी होईल म्हणून मी पळून जातेय. अर्धा गाव असंच अन्नाच्या शोधात शहराकडे निघून गेलाय. ट्रायवेल मात्र आपल्या शेतीला आणि गावाला सोडून जायला तयार नाही. फी न भरल्यामुळे विल्यमची शाळा सुटली आहे. मात्र तो ग्रंथालयातील पुस्तके वाचून शिकतोय. विल्यम मुळातच खूप हुशार आहे. त्याला विज्ञानाची खूप आवड आहे. एवढ्या लहान वयात तो गावातील लोकांचे रेडिओ दुरुस्त करून घराला हातभार लावत आलाय. पण आता सर्वच थांबलंय. अशातच एक दिवस त्याला एका पुस्तकात पवनचक्कीपासून वीजनिर्मिती करता येऊ शकते ही माहिती मिळते. तो वीजनिर्मितीचा ध्यासच घेतो. वीज आली तर अंगणातील विहिरीचे पाणी पंपाने उपसून काही पिकवता येईल आणि पावसाळ्यापर्यंत घर जगेल ही त्याला अपेक्षा. विहिरीला पाणी खूप; परंतु विहीर खूप अरुंद आणि गावात वीज नाही. विल्यम कामाला लागतो. भंगारातून वस्तू गोळा करून एक छोटे मॉडेल तयार करतो. त्यावर रेडिओ सुरु होतो तेव्हा त्याचा आत्मविश्वास दुप्पट होतो. आता आपण हे करूच शकतो या अविर्भावात तो वडिलांना हा प्रयोग दाखवतो. वडिल विरोध करतात. कारण हा प्रयोग पूर्ण करायला विल्यमला त्यांची सायकल हवी आहे. ती गावातील एकमेव सायकल. ती द्यायची ट्रायवेलची तयारी नाही. कारण सायकल मोडून तिच्या पार्टपासून पवनचक्की बनली आणि वीज नाही तयार झाली तर सायकलही कायमची जायची.

विल्यमच्या मित्रांना मात्र विल्यम यशस्वी होईल याची खात्री असते. ते सर्व ट्रायवेलकडे सायकल मागायला येतात. मात्र ट्रायवेल मुलाने आपल्याला मारायला मित्र आणले असे समजून अजून विरोध करतो. शेवटी विल्यमची आई मध्यस्ती करते आणि सर्व कामाला लागतात. जे काय उपलब्ध आहे ते सर्व सामान जमा केले जाते. गावातील उरले सुरले लोकही मदतीला येतात. हळूहळू पवनचक्की उभी राहते. भंगाराच्या सामानातूनच पंप तयार केला आहे. हे सगळं जुगाड कसे काम करेल हेच सर्वांच्या चेहऱ्यावरचे भाव. उजाड माळावर वारा खूप होताच. पवनचक्की हळूहळू वेग धरते, पंप सुरु होतो आणि पाणी पाटाला लागतं. सर्व आनंदाने बेभान होतात. खूप दिवसातून त्यांनी एवढं पाणी वाहतांना पाहिले होते. लगेच भाजीपाल्याचा बिया आणून लावल्या जातात. थोडी मका लावली जाते. गावाला जिवंत राहायला पुरेल एवढं अन्न पिकवलं जातं. गाव जिवंत रहातं.

चित्रपटाची कथा इथेच संपते. विल्यमची कथा पुस्तकात पुढे सुरु राहिलेली आहे. विल्यमने पुढे खूप शिक्षण घेतले. वर्षभर शेती करता येईल एवढ्या पवनचक्की आपल्या गावात बांधून दिल्या. आज विल्यम खूप वेगवेगळ्या देशांमध्ये काम करतोय. भारतातही त्याने गरीब वस्त्यांमध्ये स्वच्छतेबाबत काम केले आहे. आता सध्या तो केनियात काम करतोय. पण त्याची नाळ अजूनही गावाशी जोडलेलीच आहे. अजूनही तो गावातील शेतकऱ्यांना उपयोगी पडेल असे काही काही करत राहतो. भूक माणसांना दूर करते तशी जवळही करते. भुकेचं नातं निभावायला आपण विल्यम असावं लागतं.

लाखो भुकेले लोकं हजारो किलोमीटर लांब आपल्या घराकडे उन्हातान्हात पायी निघालेत. त्यांना कशाचीच मदत कुणी करत नाही. उलट दररोज घरी बसल्या बसल्या बनवलेल्या नवनवीन पदार्थाचे फोटो स्टेटसला टाकण्याची स्पर्धा लागलीय. अशा घरांमध्ये कसे विल्यम तयार होतील? विज्ञानाची आवड जोपासण्याऐवजी अवैज्ञानिक कारणे देऊन लोकांना दिवे लावायला सांगितेले गेले तर या देशात कसे विल्यम तयार होतील? हा देशभक्तीचा उन्माद ओसरला की उद्या भूक लागणारच आहे. तेव्हा काय होईल हे सांगायला जोतिषशास्त्राची गरज नाही.
- संदीप गिर्‍हे

No comments:

Post a Comment