Saturday, 9 May 2020

महात्मा फुलेंची एकमय भारत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रबुद्ध भारत संकल्पना



कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सगळीकडे भीतीचे, असुरक्षिततेचे आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झालेले आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे या भीषण परिस्थितीचा सामना करताना आपण सगळे कमालीची एकजूटता दाखवत आहोत. कारण आपल्याला कल्पना आहे की एकजूटता दाखवल्याशिवाय आपण या संकटातून बाहेर पडूच शकत नाही. पण ही जी कोरोना विषाणूच्या भीतीपोटी आपण सध्या एकजूटता दाखवत आहोत तिला आपण महात्मा फुलेंना अभिप्रेत असलेली एकमयता मानू शकतो का?

सर्व परिवर्तनवादी मित्र आणि मैत्रिणींना जय ज्योती आणि जय भीम!

आज आपण कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सगळेच एका गंभीर संकटातून जात आहोत. सगळीकडे भीतीचे, अनिश्चिततेचे आणि बहुसंख्य गोरगरीब जनतेसाठी चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. अशा परिस्थितीत आपण महात्मा जोतिबा फुले जयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आपआपल्या परीने त्यांच्या विचारांचे आदानप्रदान करून साजरा करण्याचा प्रयत्न करीत आहोत. मी सुद्धा आजच्या गंभीर परिस्थितीला नजरेसमोर ठेवून आपल्यापुढे काही विचार मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.

आज मी विषय निवडला आहे महात्मा फुलेंची 'एकमय' भारत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रबुद्ध भारताची संकल्पना. महात्मा फुले त्यांनी त्यांच्या एकमय भारताची संकल्पना सार्वजनिक सत्य धर्म या पुस्तकात मांडली आहे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रबुद्ध भारताची संकल्पना तर आपल्या सगळ्यांना परिचयाची आहे. आपण दोन बहुआयामी व्यक्तीमत्वाचा आणि एकूणच त्यांच्या लिखाणाचा प्रामाणिकपणे अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल, की 'एकमय' भारत आणि प्रबुद्ध भारतीय समाजाची निर्मिती हा विषय त्यांचा विचार, आचार आणि उच्चार विश्वाचा गाभा राहिला आहे. आजच्या मूळ विषयाकडे वळण्याअगोदर मी सध्या जी परिस्थिती उद्भवली त्याविषयी सुद्धा दोन शब्द बोलू इच्छितो. कारण मला आजच्या निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीत महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जास्त संयुक्तिक आणि महत्त्वाचे वाटतात.

आपल्याला सर्वांनाच जाणीव आहे, की आज आपण सगळेच एका अतिशय गंभीर संकटातून जात आहोत. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सगळीकडे भीतीचे, असुरक्षिततेचे आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झालेले आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे या भीषण परिस्थितीचा सामना करताना आपण सगळे कमालीची एकजूटता दाखवत आहोत. कारण आपल्याला कल्पना आहे की एकजूटता दाखवल्याशिवाय आपण या संकटातून बाहेर पडूच शकत नाही. पण ही जी कोरोना विषाणूच्या भीतीपोटी आपण सध्या एकजूटता दाखवत आहोत तिला आपण महात्मा फुलेंना अभिप्रेत असलेली एकमयता मानू शकतो का?

या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर शोधण्यासाठी आपल्याला महात्मा फुले यांची एकमय भारताची संकल्पना समजून घ्यावी लागेल. महात्मा फुलेंच्या एकमय भारत या संकल्पनेचा जर का आपण प्रामाणिकपणे आणि खोलवर अभ्यास केला, तर आपल्याला निश्चित कळेल की सध्या कोरोनाच्या भीतीपोटी जी एकजूटता दिसत आहे ती महात्मा फुलेंना अपेक्षित असलेली एकमयता नाही. त्याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे सध्या ज्या संकटाचा आपण सामना करीत आहोत, त्याचा सामना करताना आपल्या समाजात असलेली असहनीय विषमता आपल्या नजरेला पडल्यावाचून राहणार नाही. म्हणजेच या कोरोना विषाणूच्या भीतीचा सामाना करण्याकरिता बहुसंख्य लोकांकडे मुलभूत सुविधासुद्धा नाहीत.

लाखो भारतीय रातोरात बेरोजगार झालेले आहेत. हजारो आपल्याला पायी जाताना दिसले. असंख्य नागरिकांना व्यवस्थित जेवण मिळत नाही. म्हणूनच आपल्याला दुर्दैवाने म्हणावे लागेल, की राष्ट्रीय भीतीत एकजूटता आहे पण दुर्दैवाने राष्ट्रीय संपत्तीत प्रचंड विषमता आहे. कारण या कोरोना विषाणूची झळ आपल्याला एक सारखी जाणवत नाही. आपल्या समाजातील असणारी ही जी प्रचंड विषमता आहे तिच्यामुळे फक्त एक आभासी, तात्पुरती आणि तकलादू एकजूटता निर्माण होऊ शकते. एक सक्षम आणि टिकाऊ एकजूटतेसाठी आपल्याला अगोदर आपल्या समाजात असणाऱ्या अमानुष विषमतेच्या विषाणूला समाप्त करावे लागेल. जेणेकरून एक सक्षम, समृद्ध, प्रबुद्ध आणि एकमय भारतीय समाजाची निर्मिती होऊ शकेल. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या समाजात असणाऱ्या विषमतेचे स्वरूप समजून घ्यावे लागेल. कारण या विषमतेला एक इतिहास, विचारधारा आणि धार्मिक मान्यता आहे; ज्यांच्या विरोधात महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शस्त्र उपसली होती.

एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे, की महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे कृतीशील परिवर्तनवादी फक्त प्रस्थापित, अन्यायी सामाजिक व्यवस्थेचा विरोध करून थांबले नाहीत,  तर त्यांनी पर्यायी न्यायधिष्ठित, सामाजिक व्यवस्थेचा पुरस्कारसुद्धा केला; ज्याला त्यांनी एकमय भारत’, प्रबुद्ध भारत म्हणून व्याख्यांकीत केले. परंतु दुर्दैवाची बाब अशी की विषमतावादी आणि अन्यायी सामाजिक व्यवस्थेचा पुरस्कार करणाऱ्या धूर्त लोकांनी जाणीवपूर्वक परिवर्तनवादी विचारसरणीच्या लोकांचे विधायक विचार पुढे येऊ दिले नाहीत. परिवर्तनवादी विचारवंतांचे नेहमीच नकारात्मक, राष्ट्रद्रोही, देशद्रोही, धर्मद्रोही अशा शब्दांचा भडीमार करून दानवीकरण आणि बदनामी करण्यात आली आहे; जेणेकरून सर्व सामान्य लोक त्यांच्या परिवर्तनवादी विचारांपासून दूर जातील.

ज्या-ज्या व्यक्तींनी समाजाची चिकित्सा करून समाजातील असणारे गंभीर विषाणू शोधून काढले आणि त्यावर उपचार सुचविले, त्या सगळ्यांच्या वाट्याला बदनामी, अवहेलना, एकाकीपणा आणि एका विशिष्ट प्रचार यंत्रणेतून केलेले दानवीकरण आलेले आहे. या व्यक्तींच्या यादीत महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रभागी येत असते. कारण त्यांनी केलेल्या निर्भीड चिकित्सेमुळे प्रस्थापित मंडळींचे हितसंबंध धोक्यात आलेले आहेत. आजच्या घडीला सुद्धा या क्रांतिकारक विचारवंतांची बदनामी आणि अवहेलना थांबलेली नाही. आज फरक एवढाच दिसतो की महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत या मंडळींना दांभिकपणा स्वीकारावा लागत आहे. त्यांचा दांभिकपणा आणि ढोंगीपणा असा की त्यांच्या दृष्टीने, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा करणे म्हणजे सकारात्मक गोष्ट; पण त्यांच्या विचारांवर चर्चा करणे म्हणजे नकारात्मक गोष्ट! यामुळे सामान्य माणसांना साहजिकच काही प्रश्न पडू शकतात. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली सामाजिक चिकित्सा आणि त्या चिकित्सेतून येणारे विचार खरंच नकारात्मक आहेत का? त्यांचे विचार खरंच कालबाह्य झालेले आहेत का?

वास्तविक पाहता ज्यांनी ज्यांनी त्यांच्या विचारांचा प्रामाणिकपणे अभ्यास केला, त्यांना महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रस्तुतता आणि महत्त्व आजच्या घडीला जास्त वाटते. जर का त्यांच्या परिवर्तनवादी विचारांची आज जास्त गरज वाटत असेल, तर आपण सुद्धा नकारात्मक या शब्दाचा वापर ही मंडळी कुठल्या अर्थाने करतात याची सुद्धा चिकित्सा करायला हवी! महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निश्चितच विषमतावादी आणि अन्यायी समाजव्यवस्था नाकारली आहे आणि त्यासोबतच ज्या-ज्या धार्मिक गोष्टींनी आणि रूढी-परंपरांनी अशा विषमतावादी समाजरचनेचा पुरस्कार केला आणि मान्यता दिली, त्यांनासुद्धा त्यांनी नाकारले आहे.

ते अशा अनिष्ट, अविवेकी, अन्यायी गोष्टींना विरोध करून आणि नाकारून थांबले नाहीत, तर त्यांनी एक न्यायधिष्ठित, गतीशील, विवेकी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असणाऱ्या सशक्त, समृद्ध, प्रबुद्ध आणि एकमय भारतीय समाजाची मांडणी सुद्धा केली. म्हणून महात्मा फुले यांची एकमय भारत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रबुद्ध भारत या संकल्पनेची आजच्या घडीला असणारी प्रस्तुतता आणि महत्त्व तुमच्यासमोर मांडण्यासाठी मी थोडक्यात त्यांनी केलेली सामाजिक चिकित्सा, चिकित्सा करण्याची पद्धत, चिकित्सेतून आलेला निष्कर्ष अगदी सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वात अगोदर आपण काही प्रश्नांचा प्रामाणिकपणे विचार केला पाहिजे.

. भारतीय समाजाची तत्कालीन सामाजिक रचना कशी होती?

ज्या समाजाची महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चिकित्सा केली, त्या समाजात वर्ण आणि हजारो जातींनुसार भारतीय समाज पावलोपावली खंडित झालेला होता आणि हा शतखंडित झालेला समाज अमानुष आणि असह्य विषमतावादी होता. वर्णजातपितृसत्ताक व्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विषमतेला वर्णजातपितृसत्ताक धार्मिक अधिमान्यता होती. परिणामी बहुसंख्य जनता आणि मुख्यतः स्रीयांचे प्रचंड खच्चीकरण आणि अवमूल्यन केले जात होते.

. अशा शतखंडित समाजाला आपण एकमय राष्ट्र म्हणू शकतो का?

नाही आणि आजसुद्धा एका प्रखर आणि प्रभावी प्रबोधनाअभावी या विषमतेच्या विषाणूचा प्रादुर्भाव थांबलेला नाही. उलटपक्षी त्याला सध्याच्या काळात वर्गीय स्वरूप प्राप्त होऊन तो अधिकच चिवट झालेला आहे.

. एकमय भारतीय समाजाचे निर्माण करण्यासाठी कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत?

सर्वात महत्त्वाचे म्हणजे महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखाणात एकमय भारत आणि प्रबुद्ध भारत म्हणजे काय, याविषयी कमालीची स्पष्टता आहे. एकमय भारत आणि प्रबुद्ध भारत म्हणजे समाजातील लोकांची गोळाबेरीज नव्हे, तर समाजातील लोक एकमेकांशी कशा पद्धतीने आणि कुठल्या तात्विक आधारावर जुळले गेले आहेत ते जास्त महत्त्वाचे आहे. त्यांच्या दृष्टीने एकमय भारत आणि प्रबुद्ध भारतीय समाजाची निर्मिती तेव्हाच शक्य आहे; जेव्हा आपला समाज सम्यक-स्वातंत्र्य या तत्वाचा मनापासून स्वीकार करेल, जेव्हा समाजातील लोक एकमेकांकडे मानवतावादी दृष्टीकोनातून पाहतील, जेव्हा ते एकमेकांशी न्यायबुद्धीने वागतील, जेव्हा ते विवेकी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून जगाकडे पाहतील.

थोडक्यात, एकमय भारत आणि प्रबुद्ध भारताची निर्मिती करण्यासाठी आपल्याला, Hannah Arendt च्या भाषेत म्हणायचे म्हटले तर humanised society आणि socialised humanity साठी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी आपल्याला मुक्तिदायी शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध करून द्यावे लागेल. जेणेकरून सर्व नागरिक स्वतंत्रपणे आपल्या मतीचा म्हणजेच बुद्धीचा वापर करून करून, स्वतःच्या जीवनाविषयी एक सकारात्मक, आशावादी अणि प्रयत्नवादी दृष्टिकोन बनवू शकतील. जेणेकरून नीतीची म्हणजेच सदसद्विवेकबुद्धीचा विकास होऊ शकेल. परिणामी अशा सकारात्मक, आशावादी आणि प्रयत्नवादी दृष्टिकोनामुळे समाजात प्रचंड उर्जा आणि गतीशीलता निर्माण होऊ शकते. साहजिकच अशा गतीशीलतेमुळे आर्थिक विकास साधता येऊ शकतो. त्याकरिता महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते आपल्या देशातील जी भयंकर सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक विषमता आहे, त्या विषमतेच्या विषाणूचा इतिहास, धार्मिक मान्यता, विचारधारा आणि त्याचा प्रादुर्भाव कसा झाला, या सगळ्या गोष्टींची चिकित्सा करणे अपरिहार्य आहे.

ज्याप्रकारे आपल्याला कोरोना विषाणू विषयीची वैज्ञानिक चिकित्सा महत्त्वाची वाटते, त्याचप्रकारे आपल्याला सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय विषमतेच्या विषाणू विषयीची वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेली चिकित्सा महत्त्वाची वाटायला पाहिजे. कारण कोरोना विषाणू एके दिवशी जाईल, परंतु अत्यंत चिवट असा विषमतावादी आणि समाजघातकी विषाणू; ज्यामुळे आपला समाज पावलोपावली जातवर्णवर्गपितृसत्ताक व्यवस्थेमुळे खंडित, विकलांग आणि दुर्बल झालेला आहे तो आपोआप नाही जाणार! त्यासाठी ठोस पावले उचलावी लागतील. आणि म्हणूनच आज महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकमय भारत आणि प्रबुद्ध भारत या आपल्या समाज निर्मितीच्या विधायक संकल्पना महत्त्वाच्या वाटतात. कारण जोपर्यंत आपला समाज खऱ्या अर्थाने एकमय, प्रबुद्ध आणि सशक्त होत नाही, तोपर्यंत आपल्या समाजाची immunity म्हणजेच बाहेरून येणाऱ्या आक्रमणाला परतावून लावण्याची शक्ती ही तकलादू, आभासी आणि संशयास्पदच राहील.
- शरद बाविस्कर 

No comments:

Post a Comment