Saturday, 9 May 2020

अलगीकरण : एक भ्रम


नोबेल पारितोषिक स्वीकारताना पाब्लो नेरुदा यांनी केलेले भाष्य..

साहित्याचा नोबेल पुरस्कार विजेता महान चिली कवी पाब्लो नेरुदा (१२ जुलै १९०४ ते २३ सप्टेंबर १९७३) यांना अगदी लहान वयातच, म्हणजे समज येण्याच्या उंबरठ्यावरच कला म्हणजे काय आणि माणसाला कलात्मक निर्मितीची आवश्यकता काय याची स्पष्ट जाणीव झाली होती. कला आणि साहित्य हे मानवी आकलन कक्षा रुंदावण्याचे आणि सर्व सजीवांना एकत्र आणण्याचे सर्वोत्तम साधन असते; ही त्यांची आयुष्यभराची ठाम धारणा होती.
लहान वयातील पाब्लोंच्या सहित्यिक उर्मी त्याच्या शाळेच्या संचालक, शिक्षणतज्ज्ञ आणि नंतरच्या काळात चिलीच्या परराष्ट्र खात्यातील स्पेनच्या राजदूत झालेल्या गॅब्रियेला मिस्ट्राल यांनी वेळीच ओळखल्या. या गॅब्रियेला मिस्ट्राल या साहित्याचा नोबेल पुरस्कार विजेत्या प्रथम लॅटिन अमेरिकन स्त्री साहित्यिक ठरल्या. योगायोग म्हणजे पाब्लो नेरुदाही पुढे त्यांच्यासारखेच परराष्ट्र खात्यातील अधिकारी बनले.

पाब्लो नेरुदांचा सर्वात महत्त्वाचा ठरलेला “ट्वेंटी लव्ह पोएम्स अ‍ॅंड साँग ऑफ डिस्पेअर” हा काव्यसंग्रह त्यांच्या वयाच्या विसाव्या वर्षापूर्वीच प्रसिद्ध झाला. हा त्यांचा काव्यसंग्रह म्हणजे लॅटिन भाषेत आजपर्यंत सर्वाधिक वाचले जाणारे काव्य ठरले आहे. त्यानंतरच्या काळात पाब्लो नेरुदा हे नाव जगभरातील मानवतावादी आणि क्रांतिकारक तरूणांना कायम भुरळ घालत राहिले. त्यांचं संपूर्ण जीवन अत्यंत धकाधकीचं, धाडसी आणि चित्तथरारक घटनांनी भरलेलं होतं.

पाब्लो नेरुदा यांना त्यांच्या मृत्यूपूर्वी दोन वर्ष आधी म्हणजे १९७१ साली साहित्याचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला. पाब्लो जागतिक साहित्य क्षेत्रात एक आदर्श आणि मापदंड बनले होते. त्यांची जीवनदृष्टी जगभरातील मानवतावादी साहित्य प्रवाहासाठी मार्गदर्शक ठरली होती. पाब्लोनंतर ११ वर्षांनी नोबेल पुरस्कार प्राप्त झालेल्या गॅब्रियेल मार्क्वेझ यांनी पाब्लो नेरुदा यांच्या उच्चप्रतीच्या आदर्श मानवी मूल्यांसाठी विसाव्या शतकातील ते सर्वभाषिक साहित्यातील सर्वोत्तम कवी, अशा शब्दांत गौरव केला होता.

१३ डिसेंबर १९७१ रोजी पाब्लोनी स्टॉकहोम येथे नोबेल पुरस्कार स्विकारताना दिलेले व्याख्यान म्हणजे एक अत्यंत गाजलेले भाष्य होते. या व्याख्यानाचा समावेश नोबेल लेक्चर्स इन लिटरेचर १९६८-१९८० (पब्लिक लायब्ररी) या मालिकेत करण्यात आला आहे.

१९४८ साली पाब्लो नेरुदाच्या कडव्या डाव्या विचारांमुळे चिलीच्या तत्कालीन हुकुमशाही राजवटीने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले. ही अटक चुकवण्यासाठी पाब्लोंना भूमिगत अवस्थेत पुढचे तब्बल २३ महिने एका घरातून दुसर्‍या घरात आणि एका गावातून दुसर्‍या गावात लपत छपत जगावं लागलं. त्यानंतर कम्युनिस्ट पक्षांच्या चार कार्यकर्त्यांच्या सोबतीनं चिली आणि अर्जेंटिनाच्या सीमेवरील घनदाट जंगलांनी वेढलेला पर्वत ओलांडून ते अर्जेंटिनातील अ‍ॅन्डेस या सीमेवरच्या गावात पोहचले. पुढील आणखी तीन वर्षे हे परागंदा आयुष्य पाब्लो जगले. आपले कुटुंब, गाव, समाज आणि देशापासून लादले गेलेले हे अलगीकरण!

पाब्लो नेरुदांचा हा प्रवास अत्यंत खडतर होता. दाट जंगल, कोणत्याही प्रकारचा रस्ता किंवा पायवाट नाही; उंच कडेकपारी ओलांडत, नद्या आणि धबधब्यांच्या प्रवाहातून वाट काढत हा प्रवास होता. घोड्यावरुन अडखळत, ठेचकाळत केलेला प्रवास! आयुष्य पणाला लावणारा अनुभव. ना भविष्याची खात्री ना जगण्याची शाश्वती. मात्र जीवननिष्ठा आणि मानवी मूल्यांवरील प्रगाढ अचल विश्वास यामुळेच पाब्लो नेरुदा या अनुभवातून तावून सुलाखून बाहेर पडले. एक कवी आणि चिंतनशील साहित्यिक म्हणून नेरुदांच्या जडणघडणीत हा प्रवास आणि हे अलगीकरण म्हणजे महत्त्वाचा टप्पा होता. या प्रवासावर आणि लादल्या गेलेले अलगीकरण अनुभवावर त्यांनी परागंदा असतानाच विस्तृत लिखाण केले होते. या लिखाणाकडे पाब्लोंच्या “परागंदा जीवनाची रोजनिशी” म्हणून बघितले जाते. पुढे १९७१ साली नोबेल पारितोषिक स्विकारताना पाब्लोंनी दिलेले व्याख्यान या अलगीकरणातील खडतर प्रवासाच्या अनुभवाभोवती गुंफले गेलेले होते.

संपूर्ण जग करोना नावाच्या अदृश्य विषाणूमुळे सक्तीच्या विलगीकरणात ढकलले गेले असताना, एका अतर्क्य अस्थिरतेत प्रवेश करत असताना आणि सामूहिक निराशेने घेरले जात असताना पाब्लो नेरुदांच्या त्या भाषणातील हे काही अंश नक्कीच दिलासादायक आहेत.

“माझ्या मायभूमीचा तो भव्य आणि विस्तृत प्रदेश आणि अस्वस्थकारक घटना आता हळूहळू माझ्या विस्मृतीत जातायत. मला माझ्या देशाची (चिलीची) सीमा ओलांडून अर्जेंटिनात परागंदा होणे भाग पाडले गेले आहे. प्रवासात आम्ही ओलांडत असलेली ही निबीड अरण्ये म्हणजे जणू नैसर्गिक बोगदे आहेत. या दुर्गम प्रदेशात कोणताही संपर्क निव्वळ असंभव. हा प्रवास अत्यंत गोपनीय आणि जगापासून लपून केलेला. ना कोणते निश्चित रस्ते, ना पायवाटा. बरोबर घोड्यावरून मला सुरक्षित पोहचविण्याची जबाबदारी घेतलेल्या माझ्या चार कॉम्रेडस्च्या भक्कम आधारामुळेच आम्ही वाट काढतोय. मोठमोठ्या वृक्षांचे अडथळे ओलांडत, नद्यांचे वेगवान प्रवाह पार करत आणि एकाकी बर्फाळ पठारं ओलांडतोय; एका विश्वासावर की होय, मी नक्कीच एक दिवस  मुक्त होणार!

आमच्यातील प्रत्येकजण अंतहीन वाटणार्‍या एकाकीपणातून जात आहे. अरण्यातील झाडांची हरित आणि शूभ्र शांतता, प्रचंड मोठ्या वृक्षांच्या वाट रोखणार्‍या फांद्या आणि पायाखाली शतकांच्या अस्तित्वाची साक्ष देणारे मातीचे स्तर आम्ही पादाक्रांत करतोय. समोर उभे राहतायत अचानक नवे अडथळे आणि आव्हानं. एका बाजूला स्तिमित करणारे सृष्टीसौंदर्य आम्ही अनुभवतोय तर त्याचवेळी तीव्र थंडीचे संकट, बर्फवृष्टीची असहाय्य छळवणूक, एकाकीपणा, जीवाला असलेला धोका आणि इच्छित उद्दिष्टापर्यंत पोहचण्याची निकड... “कोणतेच अलगीकरण ओलांडणे अशक्य नसते. सर्व रस्ते एकाच उद्दिष्टांकडे नेणारे असतात. हा एकाकीपणा आणि अडचणी, अलगीकरण आणि शांतता यावर आपल्याला मात करायलाच हवी. आपलं जीवन पुन:स्थापित करण्यासाठी, जीवनानंदाचे नृत्य करण्यासाठी, आपल्या विवेकाशी प्रामाणिक रहात वेदनेची आणि दु:खाची गाणी गाण्यासाठी आपल्याला त्या उन्नत जगात जायलाच हवं. कारण आपण जाणतो की हा सारा मानव समाज एक आहे. अखिल मानवाची नियती, प्रारब्ध एक आहे..

“या स्थित्यंतरात आपणाला मार्गदर्शक ठरणारेत संघर्ष आणि आशा हेच दोन तारे! पण लक्षात ठेवा कोणाचाच संघर्ष हा एकट्याचा नसतो, एकाकी नसतो. कोणी एकटा माणूस आशावादी असू शकत नाही. प्रत्येक माणसात असते सामावलेली अनेक युगं आणि असते सामावलेली एक प्रकारची उदासीनता, प्रमादशीलता, वेदना आणि दु:खांचे सूप्त कढ. त्यातूनच निर्माण होते त्या त्या काळातील अत्यंतिक निकड; अशा कठीण काळावर मात करण्याची. आमच्या भावी इतिहासाला गती देण्याची…’’

पाब्लोंचे हे भाषण अत्यंत स्फूर्तीदायक होते. पाब्लो नेरुदांनी नोबेल पारितोषिक स्विकारल्यावर ते चिलीत परतले तेव्हा चिलीचे अध्यक्ष सॅल्वादोर आयंदेंनी त्यांना चिलीच्या राजधानीतील सॅन्दियागो एस्टाडियो नॅसिओनेल (राष्ट्रीय स्टेडियम) वरील जाहीर सभेत सत्तर हजार देशवासीयांसमोर हेच भाषण करण्यासाठी आमंत्रित केले होते.

- पाब्लो नेरुदा
(संदर्भ : ब्रेन पिकिंग्ज न्यूज लेटर; मिडवीक पिक-अप)
मराठी रुपांतर : प्रमोद मुजुमदार

No comments:

Post a Comment