2

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 85 30 52 85 50 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

Friday, 27 March 2020

द्वेषाच्या पलीकडे...


मुस्लीम आतंकवाद हे समीकरण आता सामान्य झाले आहे. परंतु हे समीकरण मुळात असे आहे ? हे माध्यामातून रचलेले राजकीय समीकरण आहे? सर्वसमावेशक शत्रू उभा करण्याचं हे सोपं साधन आहे? याची चर्चा मात्र सामान्य पातळीवर होत नाही. अगदी तुरळक बुद्धिवादी आणि कलासक्त परिघामध्ये याबद्दल चर्चा होते, मात्र केंद्रीभूत पद्धतीने सर्वसमावेशक चर्चा होत नाही. सार्वजनिक पद्धतीने कुणी हा प्रयत्न केला तर त्याला ट्रोलकरून पाकिस्तानचे तिकीट काढून दिले जाते. मुस्लीम धार्मिक मूलतत्त्ववाद किंवा मुस्लीम कट्टरपंथी हे तर अतूट समीकरण तयार झाले आहे. जसे काही इतर धर्मात कट्टरपंथी नाहीतच. कट्टरतावाद हा आता आधुनिक जगाचा व आपल्या जगण्याचा एक भाग आहे.

या अरिष्टात गुरफटलेल्या मुस्लीम मनाच्या घुसमटीला व अवहेलनेला आपल्या साहित्यातून प्रभावीपणे मांडणारे लेखक आहेत मोहसीन हमीद. हमीद हे मूळचे पाकिस्तानी. त्यांचा जन्म लाहोरचा. पंजाबी आणि काश्मिरी आईवडिलांसोबत हमीद यांचे बालपण अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये गेले. त्यांचे वडील अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्राध्यापक होते. ते पाकिस्तानात परतल्यानंतर हमीदही त्यांच्यासोबत परत आले. लाहोर अमेरिकन स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतले.

पुढे उच्चशिक्षणासाठी ते पुन्हा अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठात दाखल झाले. इथे शिक्षण घेत असतानाच त्यांनी टोनी मॉरिसन यांच्यासोबत काम करताना एक कादंबरी लिहायला सुरुवात केली होती. तेथील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हमीद आपली पहिली कादंबरी पूर्ण करण्यासाठी पुन्हा पाकिस्तानात आले. मात्र अमेरिकेत शिक्षणासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी त्यांना पुन्हा अमेरिकेत काम करण्यासाठी जावे लागले. वर्षभरात काम करून तीन महिने सुट्टी घेऊन ते कादंबरी पूर्ण करण्यासाठी पुन्हा पाकिस्तानात येत होते. असं करत त्यांची पहिली कादंबरी मॉथ स्मोक 2000 मध्ये प्रकाशित झाली. त्यानंतर पुढची काही वर्ष त्यांनी न्यूयॉर्क व लंडन येथे जाहिरात क्षेत्रात नोकरी केली. मात्र कादंबरी लिहिण्यासाठी ते पुन्हा पुन्हा पाकिस्तानात येत राहिले. 2007 साली त्यांची द रिलॅक्टंट फंडामेंटलिस्टही कादंबरी प्रकाशित झाली. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या या कादंबरीच्या एका वर्षात दहा लाखांपेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या व मॅन बुकरसाठीही नामांकन मिळाले. हमीद यांच्या जवळपास सर्व कादंबर्‍यांची मुख्य पात्र मुस्लीम आहेत व त्यातील बरीचशी पाकिस्तानी आहेत. पश्‍चिमी सभ्यता आणि पूर्वेची संस्कृती या पोकळीत जगणारी ही माणसं.

त्यांच्याकडे मात्र कुणी माणूस म्हणून बघायला तयार नाही. पश्‍चिमी जगतासाठी ती मुस्लीम आहेत आणि म्हणून संशयित आतंकवादी आहेत.  तर ही कादंबरी मीरा नायर या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रपट दिग्दर्शिकेच्या वाचनात आली. त्यांनी या कादंबरीवर चित्रपट बनवण्याचे ठरवले व हमीद यांना संपर्क केला. हमीद मीरा नायर यांच्या चित्रपटाचे चाहते असल्याने त्यांनी लगेच होकार दिला. मात्र हा चित्रपट तयार होणे ही खूप मोठी अडथळ्याची शर्यत होती. पहिलं मोठं काम होतं कादंबरीचे चित्रपटाच्या पटकथेत रूपांतर करणं. कादंबरीचे कथानक खूप नाजूक होतं. एक पाकिस्तानी तरुण आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत अमेरिकेत जातो. तिथे उच्च शिक्षण घेतो. न्यूयॉर्कमध्ये एक मोठ्या कंपनीत मोठ्या पगाराच्या पदावर पोहोचतो. जग जिंकल्याच्या आविर्भावात असताना नऊ अकराला वर्ल्ड ट्रेड सेंटरवरचा हमला होतो.

या घटनेने त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होतं व तो पाकिस्तानात परत येतो. इथे एका रेस्टॉरंटमध्ये बसून एका गुमनाम अमेरिकन व्यक्तीला तो आपली कथा सांगतोय अशा आशयाची कादंबरी. इथे चहा पीत पीत घडणारं संभाषण हीच संपूर्ण कादंबरी आहे. मात्र चित्रपटासाठी ही पटकथा होऊ शकत नव्हती. हमीद यांना सुरुवातीला सोबत घेऊन अनेक बदल कथेत केले गेले. दोन स्वतंत्र पटकथा लेखक नेमले गेले.  त्यांनी मिळून पटकथा लिहून पूर्ण केली. मात्र त्यांना यासाठी तीन वर्षे लागली. मूळ कादंबरी लिखाणापेक्षा हा वेळ जास्त होता. इतर अनेक कारणांसाठी हा चित्रपट बनवणे कठीण होते.

अमेरिकेचे वर्चस्व असलेल्या पश्‍चिम आणि उर्वरित जग अशा दोन संशयास्पद जगातील वैचारिक संघर्ष मांडणारा हा चित्रपट प्रेक्षकांना कितपत रुचेल हा एक भाग. दुसरे म्हणजे पाकिस्तानी नायक आणि  द्वेष, परकेपणा, अर्थहीनपणा आणि अर्थातच, सभ्यतेचा संघर्ष अशा काही गंभीर सामाजिक समस्यांकडे लक्ष देणार्‍या चित्रपटासाठी कोण पैसे गुंतवणार. दुसरा प्रश्‍न चित्रपट पूर्ण करण्यासाठी अधिक महत्त्वाचा होतं. चित्रपटातील कथेचा नायक पाकिस्तानी मुस्लीम तरुण ही कल्पनाच कुणाला ऐकायची नव्हती. पाकिस्तानात जाऊन शूटिंग करायला कुणीही तयार होत नव्हते. मात्र नायर यांना अशा लोकांनाच आरसा दाखवायचा होता. मात्र कुणीही पैसा गुंतवायला तयार नसल्यामुळे हा चित्रपट तयार होतो की नाही असे नायर यांना वाटायला लागले होते. शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आले व कतारमधील दोहा फिल्म इन्स्टिट्यूटने या चित्रपटासाठीची संपूर्ण गुंतवणूक केली. पाकिस्तानऐवजी भारतात दिल्लीमध्ये लाहोरचे शूटिंग पूर्ण केले गेले.

चित्रपटात मात्र हे ओळखायलाही येत नाही एवढे साम्य या दोन शहरांत आहे. असे करत साधारण साडेपाच वर्षांनंतर चित्रपट पूर्ण झाला. कादंबरीला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. जगभरातील जवळपास सत्तरेक भाषांमध्ये भाषांतरित झालेल्या या कादंबरीवरच्या चित्रपटाला मात्र प्रेक्षकांचा काहीच प्रतिसाद मिळाला नाही. समीक्षकांनी तेवढी या चित्रपटाची प्रशंसा केली.

चित्रपटाच्या पटकथेसाठी मूळ कादंबरीच्या कथेत खूप बदल करण्यात आले. कथेचा नायक चंगेज खान कुणाला आपली कथा सांगतोय हे मूळ कथेत गोपनीय आहे. चित्रपटात हे दाखवणे शक्य नव्हते. त्यासाठी अमेरिकी गुप्तचर संस्था सीआयएचा एक एजंट पत्रकार बनून चंगेजला भेटायला येतो व त्या दोघांमधील संवादामध्ये संपूर्ण चित्रपटाचे कथानक घडते. खरे तर अमेरिकेचा मुस्लीम द्वेष किती निरर्थक आहे हेच मूळ कथाबीज आणि तेच एक अमेरिकन एजंटला सागितले जातंय. चंगेज खानची कादंबरीतील कथा तो अमेरिकेतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून पाकिस्तानात परत येतो इथेच संपते. चित्रपटाची कथा मात्र तो पुढे पाकिस्तानी तरुणांचा आवाज बनतो इथपर्यंत पुढे जाते. चंगेज खानची प्रेमकहाणी चित्रपटाचा बराच भाग व्यापते. मात्र तरीही मुस्लीम आणि गैरमुस्लीम या संघर्षाची जी जाणीव चित्रपट करून देतो ती खूप अस्वस्थ करणारी आहे. या पलीकडच्या म्हणजे दुसर्‍या बाजूचा विचार आपण कधी केलेला नसतो. ही दुसरी बाजू जाणून वा समजून घेण्यासाठी हा चित्रपट खूप महत्त्वाचा आहे. या जाणिवेचे भान हेच कादंबरीच्या कथेच्या मुळाशी आहे.

लाहोर विद्यापीठातून एका प्राध्यापकाचे (अमेरिकी) अपहरण केले गेले आहे. याच विद्यापीठातील तरुण प्राध्यापक चंगेज खान या तरुणाकडे सीआयए संशयित म्हणून बघत आहे. सीआयएचा एक एजंट पत्रकार बनून चंगेज खानला भेटायला एका हॉटेलसारख्या टी हाऊसमध्ये आलाय. इथे त्या दोघांचा संवाद सुरू होतो. या संवादातूनच चंगेज खान त्याची आपबिती सांगतोय. चंगेजने अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठातून पदवी घेऊन एका वित्तीय कंपनीत कामाला सुरुवात केली आहे इथपासून तो आपली गोष्ट सांगतोय. त्याचे काम चांगले सुरू आहे. मोठी कंपनी, मोठे काम, मोठा पगार, मस्त मौज मजा असं सगळं व्यवस्थित चालू आहे. ही संधी त्याला अमेरिकेतच मिळू शकते. तिथे माणसांच्या ज्ञानाची, कौशल्याची व कामाची किंमत केली जाते. यासाठी तो अमेरिकेच्या प्रेमात आहे. असंच एक दिवस न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये फिरताना त्याची ओळख एका फोटोग्राफर तरुणीशी होते. तिचे नाव इरिका. ती अमेरिकेचे प्रतीक आहे.

अमेरिकेच्या स्पेलिंगमधले  स् काढले की तिचे नाव राहते ते र्िंग्म्. ती कलाकार आहे. तिच्या पुढच्या भेटींमध्ये चंगेज तिच्या प्रेमात पडतो. अगदी कमी दिवसांत चांगले काम करून चंगेज आपल्या बॉसला खूश करतो, बदल्यात त्याला बॉस मोठ्या पदावर बढती देतो. चंगेज याबद्दल स्वत:वर खूप खूश आहे. याच आनंदात तो टीव्ही सुरू करतो. त्याला वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्याची बातमी दिसते. ती दृश्य बघून तो अचंबित होतो. दुसर्‍या दिवशी विमानतळावर पाकिस्तानी मुस्लीम आहे म्हणून त्याची तपासणी केली जाते. संपूर्ण नग्न करून त्याची तपासणी घेतली जाते. इथे पहिल्यांदा त्याला अमेरिकेचे वेगळे रूप दिसते. फक्त मुस्लीम आहे म्हणून त्याची ही अवहेलना झालेली आहे हे वास्तव त्याला अस्वस्थ करतं.

त्याच्या ऑफिसमध्ये सर्व सहकारी मुस्लिमांबद्दल द्वेषाने बोलत आहेत ते चंगेजला ऐकून नकोसं होतं. अमेरिकेत अचानक देशभक्तीला आलेलं उधाण पाहून तो अचंबित होतो. असंच एक दिवस पार्किंगमधील त्याच्या कारची चारही चाकाची हवा सोडून देऊन एक अमेरिकी नागरिक त्याच्यावर थुंकतो. इरिका तो वेगळाच माणूस आहे असं म्हणून त्याला झिडकारते. काही दिवसांनंतर एक दिवस अचानक ऑफिससमोरील रस्त्यावर चालत असताना पोलीस चंगेजला अटक करून कोठडीत टाकतात. त्याला अफगाणिस्तानात ट्रेनिंग घेतले का विचारतात. खूप प्रश्‍न विचारून त्याला वैतागून सोडतात. नंतर सोडून देतात. त्यानंतर तो इरिकाने केलेल्या एका कला प्रदर्शनाला भेट देतो. ते बघून इरिकाने त्याच्या पाकिस्तानी मुस्लीम असण्याचा कलात्मकबाजार मांडला असे त्याला वाटते. तिच्यासोबत भांडण करून तो तिथून बाहेर पडतो. पुढे एका कामानिमित्ताने इस्तंबूल शहरातील एका प्रकाशन संस्थेच्या कामासाठी जातो. तेथील प्रकाशक त्याला त्याच्याच वडिलाच्या कवितांचे तुर्की भाषेत अनुवादित केलेले पुस्तक देतो. दुपारच्या जेवणासोबतच्या गप्पांमध्ये त्याला एक गोष्ट सांगतो, ती गोष्ट चंगेजच्या सर्व अस्वस्थ प्रश्‍नांचे उत्तर देते. त्याच क्षणाला चंगेज आपली नोकरी सोडतो.

परत पाकिस्तानात येतो आणि लाहोर विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू होतो. तिथे तो नव्या पाकिस्तानच्या स्वप्नांविषयी बोलतो. विद्यार्थ्यांना व इतरही तरुणांना ते आवडायला लागतं. तो अल्पावधीतच त्यांचा आवाज बनतो. हा चंगेज पाकिस्तानात परत आल्यानंतर घडणारा कथानकाचा भाग चित्रपटात आहे, मात्र मूळ कथेत नाही. चंगेज पाकिस्तानात परत आला इथेच कादंबरी संपते. कादंबरी अशी अचानक व गूढ वळणावर संपते. चित्रपट मात्र चंगेज आपली भूमिका मांडून झाल्यावर संपतो. बोल की सच जिंदा है... बोल की लाब आझाद है तेरे... या फैज अहमद फैज यांच्या शब्दांनी चित्रपट संपतो...

नऊ अकराच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हमाल्यानंतर जग दोन भागांत विभागलं. तुम्ही एकतर अमेरिकेच्या बाजूचे किंवा विरोधातले. धाकल्या बुश यांची ही करामत. वॉर ऑन टेररया आवेशात अमेरिकेने किती निष्पाप अफगाणिस्तानी मारले असतील याची गणतीच नाही. हीच बाब इराण, इराक यांच्याबाबतीतही. थोडे मागे गेल्यास व्हिएतमान वगैरे बरेच काही सापडायला लागेल. आतापर्यंत आतंकवाद्यांपेक्षा जास्त माणसे अमेरिकेने वेगवेगळ्या युद्धात व मोहिमेत नक्कीच मारली असतील. पण कुणी अमेरिकेला आतंकवादी म्हणत नाही. उलट त्याविरोधात लढण्याचा मक्ता जगाने त्यांना दिलाय. आता तर ट्रम्प याचं मुस्लिमांना अमेरिकेत यायला बंदी घालायचं चाललंय. त्याच काळात हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने अमेरिकन वृत्तीसमोर आरसा धरला पण त्यात बघायला कुणी तयारच नाही.

राजकारणाचा हा सोपा मार्ग पुढे इतर सर्वांनी स्वीकारला. आता मुस्लीम द्वेष ही एक सामान्य बाब झाली आहे. आतंकवादाचा बागुलबुवा उभा करून, लोकांमध्ये भय व असुरक्षितता निर्माण करून सत्ता मिळवणे हा आता सोपा खेळ झालय. त्यासाठी मुस्लीम आतंकवादी आहेत असे लोकांच्या मनावर बिंबवत राहणे एवढेच पुरेसे आहे. या कारस्थानाला मुस्लीमही बळी पडत अजून हिंसक मार्ग स्वीकारत आहेत. यामुळे हा अरिष्टाचा फेरा तुटायला तयार नाही. हा फेरा कसा तोडायचा याचे उत्तर चित्रपटाच्या शेवटी चंगेज खान देतो. मात्र ते करण्यासाठी खूप हिंमत, शक्ती आणि शांतता असावी लागणार आहे. ती आपल्याकडे नाही. आपल्याकडे उतावीळ वाचाळवीर फार आहेत.  त्यामुळे आपणही या फेर्‍यात पुरते अडकलोय. दिल्लीतील हिंसाचार हे त्याचे ताजे उदाहरण. शाहीन बाग आंदोलनातील कुणाचे काही ऐकण्याची गरज आपल्याला वाटत नाही. जेएनयू व जामियामध्ये नक्की काय घडलं याच्याशी आपल्याला काही देणंघेणं राहिलेलं नाही. आपल्याच माणसांबद्दलचा हा बेदरकारपणा आणि द्वेष आपल्याला कुठे घेऊन जाईल माहीत नाही. आपल्या मुलांसाठी आपण काय भविष्य ठेवून जाणार आहोत याचे उत्तर आपण द्यायला हवे...!
- संदीप गिर्‍हे

No comments:

Post a Comment

माणगाव परिषद : बहिष्कृतांचे रणशिंग - उत्तम कांबळे

'अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद ’ हा उत्तम कांबळे यांचा ग्रंथ ‘ लोकवाङ् ‌ मय गृह ’ तर्फे लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. एका ऐति...