दीडेक महिन्यांपूर्वी एक दिवस
अचानक प्रज्ञा दया पवार
यांचा फोन आला.
त्यांनी ‘पद्मश्री दया पवार
प्रतिष्ठान’च्या दरवर्षीच्या कार्यक्रमाबद्दल सांगितले,
जे मला अनेक
वर्षांपासून माहीत होते. मी
‘पद्मश्री दया पवार
प्रतिष्ठान’च्या अनेक
कार्यक्रमांना हजेरी पण लावली
आहे. प्रज्ञाताई बोलताना म्हणाल्या की, ‘या
वर्षीचा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा ग्रंथाली पुरस्कृत ‘बलुतं’पुरस्कार तुम्हाला देण्याचे ठरले आहे.
‘जूठन’ या ओमप्रकाश
वाल्मिकी यांच्या आत्मकथनाच्या ‘उष्टं’ या अनुवादासाठी हा
पुरस्कार आपणास देण्यात येत आहे.
आपण हा पुरस्कार
स्वीकारणार का?’ प्रज्ञाताईंचे बोलणे
ऐकून मला क्षणभर
धक्काच बसला. अर्थात
हा धक्का सुखद होता.
पण क्षणात असा विचार
आला की, आपण
तर कधी कुणाशी
या पुस्तकाविषयी बोललो नाही, कुणाला
शिफारस केली नाही
की, कुणाची कधी कुठे
शिफारस मागितली नाही, तरी
अचानक येणारा असा फोन
‘आजच्या काळात’ मला धक्का
देणारा होता.
माझ्यासाठी स्वत:च्या मनाला
निखळ आनंद देणारी
ही घटना होती.
तेव्हा मला झालेला
आनंद हा निश्चितच मोठा
होता आणि मी
प्रज्ञाताईंना ‘हा पुरस्कार
नाकारण्याचा प्रश्नच नाही,
हा पुरस्कार मी स्वीकारणार’ असल्याचे
सांगितले. माझ्यासोबतच या वर्षीच्या
‘पद्मश्री दया पवार
पुरस्कारा’साठी सुप्रसिद्ध मराठी
कथा-कादंबरी लेखिका मेघना पेठे, ज्येष्ठ
कवयित्री व लेखिका
मल्लिका अमरशेख, परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ती, लोकशाहीर शीतल साठे
यांनाही हा पुरस्कार
देण्यात येणार होता. हाही
आनंद होताच.
‘पद्मश्री दया पवार
प्रतिष्ठान’ ही संस्था
गेल्या तेवीस वर्षांपासून ‘पद्मश्री दया पवार’
यांच्या नावाने दरवर्षी कला-साहित्य
व सामाजिक क्षेत्रात काम करणार्या कलावंतांना हा
पुरस्कार देऊन सन्मानित
करते. मागच्या वर्षीपासून दया पवार
लिखित ‘बलुतं’ या आत्मकथनाला चाळीस
वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘ग्रंथाली’ या प्रकाशन
संस्थेच्या वतीने ‘बलुतं’ पुरस्कार सुरू करण्यात
आला. मागच्या वर्षी (2018) हा पहिला
‘बलुतं’ पुरस्कार ‘आदोर’कार
नजुबाई गावित यांना देण्यात आला आणि
या वर्षीच्या दुसर्या ‘बलुतं’
पुरस्कारासाठी माझी निवड
करण्यात आली.
नजुबाई
गावित यांचे ‘आदोर’ हे
आत्मकथन एकूण त्यांच्या
आदिवासी जीवनातील जगणं आणि
सामाजिक संघर्षाचा दस्तावेज आहे. पण
‘उष्टं’ हे माझं
स्वत:चं आत्मकथन
नाही तर हिंदीतील
ख्यातनाम कवी-लेखक
ओमप्रकाश वाल्मिकी यांच्या ‘जूठन’ या
आत्मकथनाचा मी मराठीत
केलेला हा अनुवाद
आहे. तरीसुद्धा या वर्षी
निवड समितीने आत्मकथनाच्या अनुवादाला हा पुरस्कार
दिला हा माझ्यासाठी आनंद
होताच, पण त्या
पुरस्काराशी जोडल्या गेलेल्या ‘पद्मश्री दया पवार’,
‘बलुतं’ आणि ग्रंथाली’
या नावांमुळे त्या पुरस्काराची ‘प्रतिष्ठा’
माझ्यासाठी अधिक महत्त्वाची आहे.
आज या प्रतिष्ठित पुरस्कारामुळे माझीही
वाङ्मयीन प्रतिष्ठा वाढली आहे, असे
मी मानतो.
1978 साली प्रसिद्ध
झालेल्या दया पवार
यांच्या ‘बलुतं’ या आत्मकथनाने जसं
मराठी तसेच भारतीय
साहित्यामध्ये आपलं एक
अढळ स्थान निर्माण करून ठेवलं
आहे, नेमकं हिंदीमध्ये (संपून भारतात) तेच स्थान
ओमप्रकाश वाल्मिकी यांच्या ‘जूठन’ या
आत्मकथनाचे आहे. ‘जूठन’
अनेक भारतीय तसेच परदेशी
भाषांमध्ये अनुवादित झाले होते,
मात्र ते मराठीत
उपलब्ध नव्हते. ‘जूठन’ मराठीमध्ये यावे
अशी अत्यंत तीव्र इच्छा माझे परममित्र,
सुप्रसिद्ध भारतीय कवी लोकनाथ
यशवंत आणि ओमप्रकाश
वाल्मिकी यांची होती. त्यासाठी
लोकनाथ यशवंत यांचा सततचा पाठपुरावा व प्रामाणिक
धडपड म्हणजे आज मराठीत
आलेलं ‘उष्टं’ होय.
‘उष्टं’ अनुवादित करत असताना
मी स्वत: एका
विचित्र मन:स्थितीतून
जात होतो. ( 2013 ते
2015 ) माझ्याबाबतीत मी जिथे
काम करतो त्याठिकाणी झालेले
राजकारण. माझ्या आयुष्यात वेळोवेळी डावलण्यात आलेल्या संधी... अशी
सगळी ती अवस्था
तेव्हा होती. आणि
आजही हा पुरस्कार
मिळाला असतानासुद्धा मी अशाच
विचित्र अवस्थेतून जात आहे.
पुन्हा पुन्हा तेच राजकारण,
विशेषत: जातीयवादाचे आपण आपसूक
बळी ठरत जातो...
आणि या अमानवी,
क्रूर व्यवस्थेसोबत लढत राहणे
हेच आपल्या हाती उरते.
‘उष्टं’ची वेदना,
‘उष्टं’मधील ओमप्रकाश
वाल्मिकी यांच्या वाट्याला आलेलं दु:खही
असंच आहे. या
क्रूर आणि अमानवी
‘हिंदुस्थानी’ मानसिकतेची ती ‘ब्ल्यू
प्रिंट’ आहे.
आजही माणसाने
माणसाची विष्ठा डोक्यावरून वाहून नेण्याची, माणुसकीला काळिमा फासणारी आणि लाजिरवाणी
गोष्ट या देशाशिवाय
जगात अन्यत्र कुठेच घडत नसावी.
ती एकविसाव्या शतकात इथे घडते
आणि हा देश
जगाच्या पटलावर स्वत:ला
सुसंस्कृत म्हणवून घेतो व
महासत्ता होण्याचे स्वप्न पाहतो, यापेक्षा मोठा उपहास
कोणता असू शकतो?
हाच प्रश्न मी
पुस्तकाच्या प्रस्तावनेत विचारला आहे आणि
हाच प्रश्न मला
अजूनही सतावतो आहे. आपण
माणूस म्हणून दिवसेंदिवस किती क्रूर
आणि अमानवी होत चाललोय?
आपल्या संवेदना खरंच नाहीशा
होत चालल्यात की काय?
आणि ‘जातश्रेष्ठत्व’? त्यातून तर कोणीच
बाहेर पडू इच्छित
नाही. म्हणून मी पुस्तकाची
अर्पणपत्रिका अशी लिहिली,
‘जात श्रेष्ठत्वाची विष्ठा मेंदूत जोपासणार्या व्यवस्थेला स्वच्छ
ठेवण्यासाठी ज्यांनी आपलं ‘माणूस’पण पणाला
लावलं, त्या सुंदर
मनांच्या मेहतर बांधवांना.’
सर्वत्र अराजकसदृश स्थिती असताना, सरेआम ‘मॉब लिंचिंग’
होत असताना, (आज तर
केवळ रस्त्यावरच ‘मॉब लिंचिंग’
होत नाही तर
संस्थानिक खून होत
आहेत.) माणसाच्या जीवाला जनावराच्या जीवाएवढीही किंमत नसणार्या काळात,
नव्या ‘आर्यावर्तात’ आपण जगतो
आहोत की काय?
किंबहुना आपण आज
जिवंत आहोत, हाच
आपला ‘विकास’ आहे, अशीच
जवळपास धारणा होत चालली
असताना, सर्वत्र निराशाजनक वातावरण असताना, असा एखादा
पुरस्कार तुमच्या जीवनात नव्या आशेचा किरण निर्माण
करत असतो, नवी
पालवी फुटत असण्याची
ती जाणीव असते. आपल्याला
मिळणारे पुरस्कार आपल्याला नवी ऊर्जा
देत असतात, प्रोत्साहित करत असतात,
आनंद देत असतात
आणि नवीन काम
करण्यासाठी प्रेरित करीत असतात.
या पुरस्कारानेही नेमकं तेच केलं
आहे.
मला असं
वाटतं की, या
पुरस्काराच्या निमित्ताने का होईना
या देशातील सफाई कामगार,
मेहतर, भंगी समाजाची
वेदना, त्यांचे दु:ख
लोकांपर्यंत पोहोचावे, यानिमित्ताने ‘उष्टं’ लोकांपर्यंत पोहोचावे.
ज्येष्ठ अभ्यासक-तत्त्वचिंतक आदरणीय रावसाहेब कसबे यांच्या
हस्ते आणि ज्येष्ठ
अभ्यासक प्रा. हरिश्चंद्र थोरात, ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी यांच्या
उपस्थितीत मिळालेला सन्मान, हाही माझा
मोठा गौरव आहे,
असे मी मानतो.
‘उष्टं’
साकार होण्यासाठी अनेकांचे हातभार लागलेत. त्यात आदरणीय सतीश काळसेकर,
डॉ. सुलभा कोरे, डॉ.
विमल थोरात, श्रीधर अंभोरे, मुखपृष्ठकार संजय मोरे
(नागपूर), डॉ. सुनील
अवचार, डॉ. श्यामल
गरुड, लोकवाङ्मय गृहचे राजन बावडेकर,
संजय क्षीरसागर, अशोक दळवी
आणि ऑफकोर्स लोकनाथ यशवंत...! पुन्हा एकदा या
निमित्ताने या सर्वांप्रति ऋण
व्यक्त करण्याची ही संधीच
मला मिळाली आहे. या
पुरस्कारात या सर्वांचाच
तेवढाच वाटा आहे,
असे मी मानतो.
‘पद्मश्री दया पवार
प्रतिष्ठान’ तसेच प्रतिष्ठानच्या अध्यक्षा
आदरणीय हिरा पवार,
विश्वस्त प्रज्ञा
दया पवार, प्रशांत
पवार, पुरस्कार निवड समिती,
‘ग्रंथाली’चे आदरणीय
दिनकर गांगल, सुदेश हिंगलासपूरकर, अभयकांता या सर्वांचाही मी
मन:पूर्वक आभारी आहे.
- डॉ. मंगेश बनसोड
No comments:
Post a Comment