आम्ही दोघं भावंडं
सायकलला आवळून बसलोय
मागं आणि पुढं
सायकल हाकत वडिल
गर्द रानाकडे निघालेय
जिथे झाडा... झाडाला
मोहळं असतात
वडिलांच्या तोंडातली सिगारेट
एकसारखी मोहळांवर धूर सोडतेय...
मधमाश्यांची गुणगुण त्यांच्या
अवतीभोवती सुरूच आहे
अर्धा भाकरीएवढ्यां मोहाळांच्या पिवळ्या पोळ्यां
जमिनीवर पडल्यांय
ज्यांतून मधमाशीच्या पिल्लांची
डोकी आतबाहेर होत आहे
मधाने भरलेला अडकित्ता
आणि घट्टे असलेला वडिलांचा
जाडशीळ तळवा आम्ही
उपाशी मांजरीसारखा साफ करतोय
सिगारेटचा धूर सोडून देखील
वडिलांच्या हातांला कडकडून
झोंबलेल्या मधमाश्या
आम्ही मातीत चिरडून टाकायचो
वडिलांचे भप्प सुजलेले दोन्ही हात
थरथरत राहायचे
आम्ही चिरडलेल्या मधमाशीसारखेच
तरी वडिल आमची चिगट हाततोंडं
धुवण्यांसाठी एका विहिरीतून
पितळी बादलीने पाणी शेंदत असायचे
त्याच विहिरीत एक दिवस
जीव दिलेली बाई पाठीवर तरंगलेली आहे
जी बहिणीने मला मागे ओढून धरत दाखविली होती
सिगारेटच्यां धूरात विसकळलेलं मोहळ
पाठीवर पडलेल्यां प्रेतासारखं
पाठलाग करीत राहतयं...
- अनील साबळे
No comments:
Post a Comment