आता तर फारच झाले
मानेच्या देठापासून
तुटणारे
चेहरे मला दिसताहेत
आणि झाडांच्या
फांद्यांवर
पक्ष्यांऐवजी
रस्त्यांच्या
दुतर्फा
लक्षावधी डोळे
अंथरलेले
आणि माझ्यापुढे
पावलांचे ठसे
उमटलेले
कुणीतरी चेहरा नसलेली
व्यक्ती
बेंबीत बोट घालून
माझ्याकडे धावत
येतेय
आणि म्हणतेय
"पावलांवर पाऊल ठेऊ नकोस ते पुढे निघून गेलेत,
आता पुढे तुझा
रस्ता नाही"
मी म्हणालो,
'ते
बोट काढ आधी!'
तो म्हणाला
"नको, पोटातली भूकही निघून गेली तर
मग पोटच काय
कामाचे!"
चेहरा गमावला
आता भूक नाही
गमावणार..."
मी पुन्हा म्हणालो, 'हो बाजूला...'
तो म्हणाला,
"मेहेरबान आता पुढे काहीच नाही
हेच तुमचं
ठिकाण."
मग मी ही गपकन
थांबून
बेंबीत बोट घातलं
आणि चेहरा पकडून
ठेवला
तुटू नये म्हणून...
- अशोक
कोतवाल
(छायाचित्राचे कॉपीराईट : विकास खोत)
(छायाचित्राचे कॉपीराईट : विकास खोत)
No comments:
Post a Comment