डोक्यावर फुटकळ सामानांची गाठोडी घेऊन
हातावर पोट
असलेल्या माणसांचे हे लोंढे
वाट मिळेल तिकडे
सैरावैरा धावत
सुटले आहेत
आपापल्या गावांच्या
दिशेने
जीव वाचवण्याच्या
आशेने
आणि त्यांच्या
पायातले त्राण
चिनभीन झाली आहेत
त्यांची मनं
शोधताहेत मालवाहू
ट्रक, टेम्पो,
दुधाचे रिकामे टँकर, रुग्णवाहिका
जी जी मिळतील
गावाच्या दिशेनं
जाणारी
अपरिचित वाहने
आणि कुठलीही किंमत
मोजून
गावाकडे
जाण्यासाठीचे कितीतरी बहाणे..
ज्यांना उपलब्ध
नाही
यापैकी एकही पर्याय
जीवावर उदार होऊन
स्वतःला
वाचविण्यासाठी
ते निघाले आहेत
पायी
मजल - दरमजल करीत
तोंड वळवून
आपापल्या गावांच्या दिशेने
आणि
रस्त्यारस्त्यांवरची नाकेबंदी चुकवून
निघाले आहेत
कधीतरी जिवंत
पोहोचू गावात या आशेने..
पोट भरत नाही
म्हणून
कधीकाळी सोडला होता
त्यांनी आपला गाव
भाकरीच्या शोधात
शहरात घेतली होती
धाव
शहरात जिथे जिथे
मिळेल मोकळी जागा
तिथे तिथे त्यांनी
शोधला होता निवारा
आणि तिथेच मांडला
होता संसाराचा पसारा..
ते बाहेर पडले होते
ज्या गावातून
त्याच गावाच्या
शोधात
ते पुन्हा निघाले
आहेत आता माघारी वळून
त्यातले काही
मरताहेत रस्त्यात अन्नपाण्यावाचून
कायमचेच लॉकडाऊन झाले
आहे त्यांचे आयुष्य
बाकीच्यांचे
अधांतरीच भविष्य
उपासपोटी
उन्हातानातच
सुरु आहे त्यांची
पायपीट..
मजल - दरमजल करीत
आपापल्या गावांच्या
दिशेनं निघालेल्या
या लोकांपैकी
कितीजण पोहोचतील
त्यांच्या
त्यांच्या गावांच्या वेशीत?
यापैकी कितीजणांना
घ्यावा लागेल
शेवटचा श्वास
उघड्या आभाळाच्या कुशीत?
आणि गावाने तर आतून
कधीच सील करुन
टाकली आहेत
त्यांच्यासाठी
आपल्या मनाची दारे
गावाला आता नको आहे
शहरातून गावात
येणारे वारे..
आता त्यांना धड पुढे
जाता येत नाही
माघारीही वळता येत
नाही
आणि कळत नाही
अशा परिस्थितीत
त्यांनी नेमके काय करावे?
कुठे शोधावीत
स्वतःसह आपल्या भुकेची मूळं ?
- एकनाथ
पाटील, इस्लामपूर
(छायाचित्राचे कॉपीराईट : विकास खोत)
(छायाचित्राचे कॉपीराईट : विकास खोत)
No comments:
Post a Comment