Thursday, 16 May 2019

एवढ्या लवकर (कविता)


नीरव शांततेत
नकळत यावी वार्याची झुळूक
तसा घडतो आहे एखादाच संवाद
खूप दूर चालून वाटा तुडवल्यानंतरही
अपघातानेच सापडावी
आपल्याला हवी ती वाट
तसा एखादाच भेटतोय जिवाभावाचा माणूसही
दिवसा उजेडा शोधूनही दिसून येऊ नये
आपल्या पायाखालचा चमचमता काचेचा तुकडा
तसा आयुष्यभर आपण
ज्याला जीव लावला
त्याच्याच डोळ्यातून निसटून जातो आहे
आपल्याबद्दलचा ओल्याव्याचा प्रकाश
आता
एवढी खंत तर राहीलच
चालताना पुढील दीर्घ प्रवास
प्रयत्न करूनही
अंधाराच्या राशी उघडता आल्या नाहीत
म्हणून सगळीकडेच अंधार आहे
असे अजिबात समजू नये
पण कधीच कसं लक्षात आलं नाही
माणूस अंधाराकडे जाण्याच्या वाटा
शोधू लागेल एवढ्या लवकर आपल्या आत!

- अजय कांडर

(कवी अजय कांडर हे मराठीतील नवदोत्तर पिढीतील महत्त्वाचे कवी आहेत. कोणत्याही कवीची राजकीय समज हीच त्याची समाजातील बहुसांस्कृतिकता टिकविण्याची समज ठरत असते. त्यांच्या कवितेत याचीच प्रचीती येते. इथे प्रसिद्ध होत असलेल्या या कविताही त्याला अपवाद नाहीत. कांडर यांची 2012 मध्ये प्रसिद्ध झालेलीहत्ती इलोही बहुचर्चित दीर्घ राजकीय कविता हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. त्यांचाआवानओलहा पहिला काव्यसंग्रह 2005 साली प्रसिद्ध झाला. त्याला महाराष्ट्र फाऊंडेशनसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले. अनेक विद्यापीठ, शालेय अभ्यासक्रमामध्ये त्यातील कवितांचा समावेश होतानाच त्या इंग्रजी, हिंदी, मल्याळम, उर्दू आदी भाषांमध्ये भाषांतरित झाल्या.)

No comments:

Post a Comment