खूप दीर्घ
चालल्या नंतरही
हाती लागतायत सुकी पाने
रान तुडवत जाताना
माती कपाळाला लावून
उजळून घ्यावा म्हणतो माथा
कुणास ठाऊक
भोवतालच्या पिढीजात दु:खाच्या
आजन्म कारावासाची
वेदना सलत राहतानाच्या या दिवसात
भोवतालच अधिक हिंस्र होत जाताना
मातीचीही संवेदनशीलता
हरवून बसण्याची शक्यता नाकारता येत नाही
या अविश्वासाच्या दिवसात
ठेवता आला नाही विश्वास नशिबावर
नाही तर या वर्षानुवर्षांच्या असहिष्णू काळात
बांधता आलेही असते स्वप्नांचे मजले
खोटे जगणे यथार्थ यशस्वी केल्याचे
आणि पापपुण्याच्या भाकड कथा सांगत
गाता आली असतीही गाथा
कदाचित इंद्रायनीत गाथा बुडाल्याचे सांगत
आम्हीही धर्ममार्तंड होण्यासाठी
रचली असती नवी कहाणी
कोणत्याही काळात असहिष्णुतेला इथूनच तर प्रारंभ होतो
आणि जात-धर्माच्या मुक्तीची
भाषा बोलता बोलता
त्याचाच तर दोरखंड अधिक घट्ट बांधला जातो!
- अजय कांडर
(कवी
अजय कांडर हे मराठीतील नवदोत्तर पिढीतील महत्त्वाचे कवी आहेत.
कोणत्याही कवीची राजकीय समज हीच त्याची समाजातील बहुसांस्कृतिकता टिकविण्याची
समज ठरत असते. त्यांच्या कवितेत याचीच प्रचीती येते. इथे प्रसिद्ध होत असलेल्या या कविताही त्याला अपवाद नाहीत. कांडर यांची 2012 मध्ये प्रसिद्ध झालेली ‘हत्ती इलो’ ही बहुचर्चित दीर्घ राजकीय कविता हे त्याचे
उत्तम उदाहरण आहे. त्यांचा ‘आवानओल’
हा पहिला काव्यसंग्रह 2005 साली प्रसिद्ध झाला.
त्याला महाराष्ट्र फाऊंडेशनसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले.
अनेक विद्यापीठ, शालेय अभ्यासक्रमामध्ये त्यातील
कवितांचा समावेश होतानाच त्या इंग्रजी, हिंदी, मल्याळम, उर्दू आदी भाषांमध्ये भाषांतरित झाल्या.)
No comments:
Post a Comment