एक म्हातारी
अर्धवट जळलं लाकूड
किंवा
घाणेरड्या
वस्तीच्या कुंद नालीतून
वाहत जावी एक काटकी
जांभळ्या
द्राक्षासारखा
सुजून टच्च फुगलेला
जखमी हात लोंबकळवत
दोन नाणी पडलेलं
एक कटोरं घेवून
बसस्थानकावर उभी
राहते प्रत्येकापाशी
तिच्यासाठी
पदरचे पैसे मोडून
सुटे करुन
वाटण्याइतपत
जाणीवा नसतील
माझ्यात
एक केलं..
दुपारच्या भूकेसाठी
सोबत आणलेला डबा
उलथला मी तिच्या
कटोऱ्यात
दानशूर म्हणून
मिरवणार होते जरा
स्वतःला
जाताना तिने
विचारलं , 'तूमने कुछ खाया के नही?'
आणि माझ्यापुढे
मिरवत ऐटीत निघून गेली.
- वर्षा
ढोके सय्यद
(छायाचित्रांचे कॉपीराईट : विकास खोत)
(छायाचित्रांचे कॉपीराईट : विकास खोत)
No comments:
Post a Comment