इंग्रजी भाषेच्या क्षितिजावर ‘जमाव’ (मॉब्ज)
या शब्दाचा उदय सतराव्या शतकाच्या शेवटी झालेला आढळतो. सुरवातीच्या काळात याच ‘मॉब’ शब्दाचा
वापर विविध शब्दांना पर्यायी शब्द म्हणून केला गेला. आजच्या सत्योत्तरी
काळात याच ‘मॉब’ शब्दाचा वापर अनेक अर्थाने
बदलत गेला. त्या अर्थच्छटांची आजच्या काळातील अर्थांशी तुलना
करायची झाली तर ‘शब्दार्थ उगम शास्त्र’ सांगणारे एखादे छोटे पुस्तकच लिहावे लागेल! फ्रेंन्च
राज्यक्रांती आणि त्यानंतरच्या संपूर्ण एकोणिसाव्या शतकाच्या काळात ‘मॉब’ शब्द सामाजिक अपराधाच्या वर्णनांतील एक अचूक अर्थवाही
शब्द म्हणून वापरला गेला. त्यानंतरच्या सुमारे अर्ध्या शतकानंतर
मॉब या शब्दातून व्यक्त होणार्या माणसांच्या संमिश्र समूहाची
‘मानवी’ बाजू लक्षात घेतली जाऊ लागली. हे कधी घडले? तर कोणत्याही सामाजिक क्रांतीची सुरुवात
माणसांत जागृती करून त्यांना सामाजिक हालचालींसाठी प्रेरित करणे, ‘मोबिलायजेशन’ करणे, ही पहिली पायरी
आहे, असा सकारात्मक अर्थ मॉब शब्दाला राजकीय परिभाषेत प्राप्त
झाला तेंव्हा. त्याही पुढे जाऊन ‘मॉब’
या शब्दाला आणखी सहानुभूती मिळाली ती ‘मोबाइल’
म्हणजे हलता/फिरता अशी ‘यांत्रिक
स्थिती’ दर्शविण्यासाठी पोषक शब्द म्हणून याचा वापर सुरू झाला
तेव्हा. म्हणजे ‘मॉब’ समूह म्हणजे माणसांचा जमाव असेल, तर ‘मोबाइल’ या शब्दाचा अर्थ हलता/फिरता
किंवा वाहता असा घेतला जात असला तरी त्याला ‘पूर्णपणे यांत्रिक
व्यवस्था’ असे अर्थांचे परिमाण आहे.
‘मोबाइल’ शब्द प्रत्येक वेळी यंत्रप्रणीत वाहन/गाडी अशा अर्थाने
वापरला जात नसला तरी त्यातून ‘गतिमानता गुंफलेली कृती’
असा अर्थ मुख्यत: व्यक्त होत असे. एका अर्थाने संपूर्ण विसाव्या शतकात मॉब्ज (जमाव)
आणि ‘मोबाइल्स’ हे शब्द परस्पर
विरुद्ध आशय व्यक्त करण्यासाठी वापरले गेले. सध्या हे दोन्ही
शब्द आधुनिक इतिहासाच्या केंद्रस्थानी विराजमान झालेले दिसतात.
सामाजिक/राजकीय क्रांती घडताना
या ‘मॉब्ज’नी (माणसांचे
समूह) निर्णायक भूमिका बजावली तर औद्योगिक क्रांती घडताना गतीमान
लोखंडी यंत्रांनी महत्त्वाचे स्थान प्राप्त केले. मोबिलिटी किंवा
गतिमानता, मग ती मानवप्रणित असो वा यंत्र-प्रणीत असो ही गतिमानताच, आजच्या आधुनिकतेच्या केंद्रस्थानी
आहे. विसाव्या शतकात ‘मॉब्ज’ म्हणजे माणसांचा समूह सामाजिक किंवा सांस्कृतिक स्मृतीत हिणकस समुह असा नोंदला
गेला. मॉब किंवा समूह म्हणजे श्रीमंत नसलेली, उच्चजातीची नसलेली, राजघराण्यातील नसलेली सामान्य माणसं!
औद्योगिक क्रांतीच्या भट्टीतून
तावून सुलाखून निघालेल्या मोबाइल्सना म्हणजेच यंत्रप्रणालींना स्वत:ची अशी सांगण्याजोगी स्मृती नसते; परंतु स्मृती म्हणजे
काही शरीराचा एखादा दाखवण्यासारखा असा मेंदूचा भाग नसतो. स्मृती
ही मानवी मेंदूचा एक अविभाज्य हिस्सा असते. मानवी उत्क्रांतीत
माणसाने आत्मसात केलेली ती एक प्रक्रिया असते. विसाव्या शतकाच्या
अखेरीला आजच्या होमो-सेपियन्सनी एक सामूहिक पण मूक असा निर्णय
घेतलेला दिसतोय. तो म्हणजे, स्मृतींचे संश्लेषण करून ती साठवणे आणि आवश्यकतेनुसार पुनर्निमिती करणे यासाठी माणसांनी
‘श्रम’ करणे तितकंसं श्रेयस्कर नाही! ही सर्व किचकट कामे माणसाने बुद्धिमान यंत्रे आणि कृत्रिम माहिती संग्रहक
‘चिप्स’वर सोपविण्यास सुरुवात केली. आता या चिप्सनी स्मृती साठवण्यास सुरुवात केली आणि मोबाइल्स (भ्रमणध्वनी यंत्र) ही माहिती संग्रहालय म्हणून काम करू
लागली. आधीच्या शतकात त्या माणसांनीच स्वत:च्या स्वातंत्र्य, समता, मानवी
प्रतिष्ठा आणि हक्कांसाठी महत्त्वाचे लढे केले होते; पण त्या
लढ्यांच्या स्मृती नष्ट झालेले हे मानवी समूह ‘मॉब्ज’
आता यंत्रासारखे वागू लागलेत आणि मोबाइल्स जणू मॉब्जसारखे महत्त्वाकांक्षी
होऊ लागलेत! हे दोन्ही घटक आता मानवी स्मृति नव्याने घडवू लागलेत.
आजच्या एकविसाव्या शतकातील जाणत्या माणसांसाठी (होमो-सेपियन्सना) स्मृतीचा फारसा उपयोग उरलेला नाही.
आता हे होमो सेपियन्स सतत आपल्या भविष्याच्या विचाराने उत्तेजित होतात.
त्यांचे क्रेडिट कार्ड किती सुस्थितीत आहे आणि आपल्या संभाव्य आमदनीचा
वापर आपण कसा करू शकतो यावर त्यांचे आनंद आणि समाधान अवलंबून असते. पृथ्वीच्या सुरक्षित भविष्यासाठी राखून ठेवलेल्या सर्व नैसर्गिक साधनसंपत्तीचा
वापर करण्यापुरते होमोसेपियन्सचे पृथ्वीशी नाते उरले आहे. आपण
आजवर कसे जगलो याचा विचार करणे त्यांना पसंत नाही. तर यापुढे
किती दीर्घकाळ आपण जगणार आहोत याचाच फक्त विचार करणे त्यांना आवडते. अशा या नव्या मानवी प्रजातीचा उल्लेख ‘सायबोर्ग्ज’
किंवा ‘होमो ड्युअस्’ अशा
शब्दात केला जातो. या प्रजातीला ‘स्मृती’चा फारसा उपयोग नसतो. छोनछोकीन लाडावलेल्या
69व्या शतकातल्या कलाकारांना वाटायचं, जगणं..
ते तर नोकरही जगतात! अशाप्रकारे विचार करणारी मंडळी
काहीशा बेजबाबदारपणे असं गृहीत धरतात की, ‘स्मृती’ म्हणजे ती पूर्वी असायची. त्या वेळी स्मृती गरजेची होती;
आता मानवाला स्मृतीचा काहीच उपयोग नाही.
मोबाइल्स आणि मल्टी-टास्कड (बहुद्देशीय) टॅबलेट्स अशी साधनं आपल्यासमोर खोटी आशा
निर्माण करणारे जग उभे करतात. ही साधनं आपल्यातर्फे खरेदी-विक्रीचे व्यवहार करतात, आपल्या भावना इतरांपर्यंत पोहोचवतात.
माणसांसाठी अत्यंत अपरिचित वाटावी अशी नवी काल्पनिक विश्व उघडतात. माणसांची आयुष्य ‘स्थिर
फोटोग्राफी’ मार्फत जणू गोठवून टाकतात. ही साधने आता माणसांसाठी विचार करू शकतात आणि निराश-हताश
माणसांना ‘सेल्फी’ काढण्याची संधी देऊन
त्यांची सांत्वनाही करतात. थोडक्यात सांगायचं तर माणसाचं माणूसपण
सिद्ध करणारी बहुतांश कामे आता मोबाइल्स आणि टॅबलेट्स करू लागले आहेत. एवढेच नाही तर या साधनांना माणसांपेक्षा आणखी एक वेगळी शक्ती प्राप्त झाली
आहे. ती म्हणजे ही साधने क्षणार्धांत अतिदूर संपर्क-संवाद साधू शकतात.
मोबाइल्स आता मानवी स्मृतींची साठवण करू
लागले आहेत आणि माणसानं ते काम सोडून दिले आहे. परिणामी याच मानवी समूहांनी गेल्या शतकात निर्माण
केलेली शासने आता माणसांची स्मृति पूर्णांशाने पुसून टाकण्याच्या कामाला लागली आहेत.
आजची सत्ताधारी शासने मोबाइलधारक ट्रोल्सची फौज बाळगतात. आपल्याच नागरिकांच्या स्मृतींत आपल्याला अनुकूल बदल घडवण्यात ती आज दंग आहेत.
लोकांनी वास्तविक इतिहास विसरून जावा आणि सत्ताधार्यांना अनुकूल विकृत इतिहास मान्य करावा यासाठी प्रयत्नशील आहेत. ही मोबाइलसज्ज फौज आपल्याला सांगते की, गांधींनी भारताची
फाळणी केली. मोबाइल फौज आम्हाला सांगते की, गोडसे ही एक ‘महान विभूती’ होती,
पंडित नेहरू भारतीयांचे शत्रू होते. इतकंच नाही
तर ही मंडळी आपल्याला असंही सांगतात की, आमच्या प्राचीन भारतात
प्लॅस्टिक सर्जरीचे तंत्रज्ञान विकसित झाले होते आणि उंच उडणारी विमाने उत्पादित केली
जात होती. आपल्या प्राचीन भारतातील अशा आजवर आपल्याला माहीत नसलेल्या
अनेक मनोरंजक गोष्टी ते आपल्याला सांगतात. पण एवढचं नाही तर आपल्या
अवतीभोवती छान, सुंदर कामं त्यांनी घडवलीत आणि त्यांच्या वैचारिक
तत्त्वज्ञानाच्या प्रभावाने पावन झाल्यामुळे कशी वेगवान प्रगती देशात घडत आहे,
अशा माहितीचा अखंड वर्षाव ते करत रहातात. त्यासाठी
ते आंतरराष्ट्रीय मानांकन संस्थांचे अनेक उत्तमोत्तम ताजे अहवाल अक्षरश: शून्यातून निर्माण करतात. त्यातून त्यांनी साध्य केलेल्या
दैदिप्यमान यशाची माहिती मिळते. त्यातून तथ्य, काल्पनिक तथ्य आणि भीती अशा घटकांचे एक अद्वितीय ‘कॉकटेल’
तयार होते. म्हणजे आता माणसांच्या समूहांना काही
आठवणारच नाही आणि त्यांना काही आठवले तरी मोबाइल्स अशा स्मरणाचे सुख मिळू देणार नाहीत.
असे मॉब्ज आता सरकारची धोरणे ठरवत आहेत. न्यायपालीकेंचे
निर्णय ठरवत आहेत. ते आता नागरीक आहेत. इतर सारे देशद्रोही.
सार्वकालिक महान जर्मन लेखक हेन्रिक हाईन
याने कायमचे लक्षात राहील असे एक धक्कादायक वाक्य लिहिलं आहे. तो लिहितो, ‘ही तर केवळ नांदी होती; ते आत्ता पुस्तकं जाळतायत,
शेवटी ते लोकांनाही जाळणारेत.’ मे,
1933 मध्ये नाझी विद्यार्थी संघ, एसएस आणि हिटलर
युथ या संघटनांनी मारिया रिमार्क, कार्ल मार्क्स, अल्बर्ट आइन्स्टाईन आणि अन्य अनेक लेखकांच्या पुस्तकांची जाहीरपणे होळी केली
होती. त्यांनी बर्लिनमधील बेबलप्लाझ या ठिकाणी सुमारे
20,000 पुस्तकं जाळली होती. या पुस्तकातून त्यांना
मान्य नसणारे विचार आणि भूमिका मांडण्यात आले होते; म्हणून पुस्तकं
जाळण्यात आली होती. हाईन याने या भीषण घटनेवर आपली प्रतिक्रिया
व्यक्त केली होती.
जोसेफ स्टालिनच्या राजवटीत अलेक्झांडर
सोल्झेनित्सिनवर त्याने आक्रमक संघटना स्थापन केल्याचा आरोप करण्यात आला. त्यासाठी त्याला लुबयन्का
तुरुंगात टाकण्यात आले. दुसरे महायुद्ध समाप्त होत असतानाच फेब्रुवारी,
1945 सालात घडलेली ही घटना. तो या महायुद्धात रशियाचा
एक सैनिक म्हणून लढला होता; पण त्याला या महायुद्धातील विजयाचा
उत्सव त्याच्या तुरुंगाच्या कोठडीच्या खिडकीतून स्वत:चा जीव धोक्यात
घालून बघावा लागला होता. नंतर पुढे त्याला त्याच्या गाजलेल्या
‘द गुलाग अर्केपॅलिगो’ या कलाकृतीसाठी एकांत कोठडीत
पाठविण्यात आले. आपल्याला जे दिसतंय तेच लिहिले म्हणून तुरुंगात
टाकल्या गेलेल्या असंख्य लेखकांपैकी सोल्झेनित्सिन हा एक होता.
काही महिन्यापूर्वी कोलकात्यात ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या
पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. माझ्या मते ही घटना आपण
‘वैचारिक विविधता आणि विरोधी मतां’बाबत असहिष्णू
होत असल्याचे लक्षण आहे. आपल्या देशातील बदलत्या आर्थिक धोरणाच्या
नव्या चौकटीमुळे आपली मनोभूमिका आणि लोकशाही संकल्पना किती बदलली आहे याचे द्योतक आहे.
एका अर्थी ही एक अत्यंत लक्षणीय ऐतिहासिक घटना आहे. एकोणिसाव्या शतकातील भारतातील आधुनिक वैचारिक पुनरुत्थानाची सुरुवात बंगालमध्ये
झाली होती.
भारतातील प्रभावी बुद्धिवादी मध्यमवर्गाचा
उदय एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस बंगालमध्ये झाला होता. 1960च्या दशकात याच बंगालमध्ये
अति डाव्या विचारप्रवाहाचाही उगम झाला होता आणि याच बंगालमध्ये या शतकाच्या आरंभी डाव्या
विचारप्रवाहाची पीछेहाटही सुरू झाली. या पार्श्वभूमीवर ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची मोडतोड
बघायला हवी. ही घटना म्हणजे भारतात उजव्या विचारसरणीने राजकीय
पटलावर मध्यवर्ती स्थान मिळवल्याचे आणि हिंसेच्या तत्त्वज्ञानाची द्वाही आहे,
हे लक्षात घ्यायला हवे. मे 2019 मधील या घटनेची इतिहासतज्ज्ञांना यापुढील अनेक वर्षे दखल घ्यावी लागेल.
हाईनचे लिखाण परत वाचणे म्हणूनच मनोवेधक ठरावे.
- गणेश देवी
(सुप्रसिद्ध भाषातज्ज्ञ व विचारवंत गणेश देवी यांच्या ‘आपले वाड्मय वृत्त’ मासिकात प्रसिद्ध झालेल्या लेखमालेचे पुस्तक लवकरच…)
The second coming by W B Yeats also speaks of the same situation
ReplyDelete