हे वर्ष अण्णा भाऊंच्या जन्मशताब्दीचे
वर्ष. म्हणजे अण्णा भाऊ जन्मून
ह्या वर्षी शंभर वर्षे होतील. अण्णा भाऊंचा जन्म 1 ऑगस्ट 1920 सालचा. ही जन्मतारीख
डॉ. बाबुराव गुरव यांच्या ‘अण्णा भाऊ समाजविचार
आणि साहित्य विवेचन या पीएच.डी. प्रबंधातून
समोर आली. ही जन्मतारीख कशी सापडली हे सांगताना गुरव सर सांगतात
पुण्या मुंबईकडे अमुक साली खूप मोठा माणूस गेला. त्या दिवशीच
अण्णा भाऊ जन्मले. आता 1920 साली बाळ गंगाधर
टिळकांचे निधन झाले होते. मग या दुव्यावरून अण्णा भाऊंची जन्मतारीख
1 ऑगस्ट 1920 अशी ठरली. साधारण
1941 ते 1969 हा त्यांचा कार्यकाल. या कालखंडात अण्णा भाऊंसारख्या कधीही रीतसर शाळेत न गेलेल्या (म्हणजे साधारण 1 ते 2 दिवसांच्या
वर) माणसाने साहित्यविश्वात मेख मारून ठेवली. चेहरा नसलेल्या माणसांची कथा लिहिली. समाजव्यवस्थेने
आवाज दडपलेल्या माणसांचे गाणे लिहिले व गायलेही. 8 पोवाडे,
10-12 गाणी, 1 प्रवासवर्णन, 1 नाटक, 9 लोकनाट्ये, 15 वगनाट्य,
30 कादंबर्या, 300 कथा,
अशा 52 ग्रंथाशिवाय 20 पेक्षा
जास्त पुस्तिका असे एकूण 79 हून अधिक ग्रंथ पुस्तिका या स्वरूपातले
वाङ्मय उपलब्ध आहे. अप्रकशित किंवा नाव न देता लिहिलेल्या वाङ्मयाचा
तर हिशेबच नाही. अण्णा भाऊंनी केवळ ललित लेखन केले असे नाही.
तर ‘लोकयुद्ध’, ‘लोकयुग’,
‘युगांतर’, ‘युद्धनेतृत्व’ इ. नियतकालिकांमधून स्फुट स्वरूपाचे खूप लेखन केले.
यापैकी बहुतांश लेखन त्यांनी ‘युगांतर’मध्ये चालवलेल्या ‘वाट्टेल ते लिहितो’ या सदरातून केले.
‘‘खरी कला काळजाशी भिडून
बोलते’’
- अण्णा भाऊ साठे
साहित्यविश्वात कलेच्या विश्वात कलेसाठी
कला की जीवनासाठी कला असा वाद आहे.
प्रस्थापित प्रवाहाने ज्यांना साहित्यकार म्हणलं त्यांची मुख्य प्रवाहाने
नोंद घेतली. ब्राह्मणी साहित्य समीक्षकांनी अण्णा भाऊंची गणतीच
केलेली नाही. 27 भाषांमध्ये भाषांतरित झालेला लेखक साहित्यविश्वात उपेक्षित
ठेवला आहे. खरे तर ज्या ब्राह्मणी व भांडवली व्यवस्थेविरोधात अण्णा
भाऊंची लेखणी झिजते. त्या लेखणीचा सन्मान ते कसे करतील.
त्यामुळेच अण्णा भाऊंचा विश्वास हा सामान्य कष्टकरी जनतेवर होता.
ते स्वत: म्हणतात, ‘‘जो लेखक
जनतेकडे पाठ फिरवतो जनता त्याच्याकडे पाठ फिरवते. आणि जो लेखक
जनतेला कडेवर घेतो. जनता त्याला गळ्यातला ताईत बनवते.
म्हणून ज्या कष्टकर्यांसाठी, कामगारांसाठी, शोषितांसाठी अण्णा भाऊ लिहितात त्या जनतेने...
कष्टकर्यांच्या चळवळींनी अण्णा भाऊंना जिवंत ठेवले.
अण्णा भाऊंचं गाणं हृदयात ठेवले. कारण अण्णा भाऊंनी
निर्माण केलेले साहित्य हे त्यांचेच तर आहे. त्यांच्या साहित्यात
कथा-कादंबर्यांमधली पात्र काल्पनिक नाहीतच
मुळात. कल्पनेच्या भरार्या मारणे त्यांना
जमलेच नाही कधी. आजूबाजूचे वास्तवच इतके भयंकर असताना आभाळाच्या
वरच आणि जमिनीच्या खालचे लिहायला अण्णा भाऊंकडे वेळ कुठे होता? डोळ्याला दिसणारं भयाण विषमतेचे वास्तव डोळ्याआड सारणं कोणत्याही संवेदनशील
लेखकासाठी असंभव आहे. अण्णा भाऊ स्वत: एक
संवेदनशील माणूस होते. प्रस्थापित छावणीने अण्णा भाऊंवर अन्याय
केलाय हे खरेच आहे. परंतु कष्टकर्यांच्या
चळवळींनी अण्णा भाऊंना जपून ठेवलंय. ही सकारात्मता विसरून चालणार
नाही.
चळवळींनी अण्णा भाऊंना स्वीकारताना
वेगवेगळ्या पद्धतीने स्वीकारलंय. कोणी अण्णा भाऊंना कम्युनिस्ट म्हणून तर कोणी आंबेडकरवादी म्हणून तर कोणी सत्यशोधक
अण्णा भाऊ स्वीकारलेत. आता खरेतर आंबेडकर, फुले, नाना पाटील, मार्क्स,
लेनिन या सर्वांचाच प्रभाव त्यांच्या लिखाणात दिसतो. ज्याने ज्या इझमचा चश्मा लावलाय त्याला अण्णा भाऊ तसेच दिसणार. खरेतर इतिहास असेे सांगतो की वाटेगावहून मुंबईला आल्यावर तरुण वयातच कामगार
चळवळीशी संपर्क होऊन अण्णा भाऊ लिहू लागले. अण्णा भाऊ कम्युनिस्ट
पक्षाचे कार्ड होल्डर होते हे सत्यच आहे. त्यांच्या संपूर्ण साहित्यात
मुळाशी मार्क्सवाद आहे. हे नाकारता येत नाही. परंतु आंबेडकरवादी मंडळींना कॉम्रेड अण्णा भाऊ तितकेसे भावत नाहीत,
त्यांना साहित्यरत्न अण्णा भाऊ हवे असतात. पण महामानव
असे आपल्याला वाटेल तसे थोडीच स्वीकारता येतात. ते जसे होते तसेच
स्वीकारावे लागतील. त्यामुळे अण्णा भाऊंना मार्क्सवादाच्या किंवा
आंबेडकरवादाच्या गोटात ढकलण्याआधी नीट समजून घेतले पाहिजे. अण्णा
भाऊंच्या साहित्यातला जात वास्तवाचा स्वर टाळता आला पाहिजे. त्यांच्या
अप्रकाशित कथासंग्रहामध्ये ‘बुद्धाची शपथ’ नावाची कथा आहे. किंवा अण्णा भाऊ स्वत: आंबेडकरांच्या कोणत्याच आंदोलनात सहभागी झाले नसले तरी अण्णा भाऊंची प्रतिभा
बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी पोहोचलेली दिसते. ‘‘जग बदल घालूनी
घाव सांगून गेले भीमराव’’ हे गाणं त्याचं उदाहरण आहे.
अण्णा भाऊ एकीकडे स्तालिनग्राडचा ‘नानकीन नगरापुढे’
पोवाडा लिहितात. तेव्हाच ते शिवाजी महाराजांना
वंदन करतात. त्यांच्या कथा-कादंबर्यांचे नायक गावगाड्याताली शूद्र माणसे आहेत. विशेषत: स्त्रिया
जातीने शूुद्र अतिशूद्र व गरीब असणार्या माणसांचं चित्रण आपल्याला
त्यांच्या लिखाणात दिसते. वास्तव हे आहे की अण्णा भाऊ ज्या जातीत
जन्मले ती मांग जात वर्ण उतरंडीत शूद्र समजली गेली. भयाण जातवास्तवाचे
चटके सहन करतच तर अण्णा भाऊ वाढले. त्यामुळे टोकदार जातनेणिव
त्यांना पोथीनिस्ट कम्युनिस्ट होऊ देत नाही. जातीअंताचा रस्ता
हा बाबासाहेबांनी दाखविलेला आहे. हे स्वीकारताना त्यांचा वर्गवाद
आडवा येत नाही. म्हणून त्यांना इझमचे लेबल चिटकवण्याची घाई करू
नये असे मला वाटते. उलट अण्णा भाऊ जातीअंताचा व वर्गअंताचा लढा
जोडण्याचे काम करतात. मार्क्सवाद व आंबेडकरवाद यातला दुवा होऊन
जातात. कोणतीही टोकाची भूमिका टाळून हा दुवा जास्त भक्कम बनवणं
काळाची गरज आहे. कलाकारांची विचारांशी बांधिलकी असली पाहिजे इथपर्यंत
ठीक आहे. पण त्याने अमुक एका पक्षाशी, संघटनेशी...
अमुक एका इझमशी बांधील असलं पाहिजे हे गरजेचं आहे का? याचाही विचार केला पाहिजे. मॅक्झीम गॉर्की कधीही रशियन
कम्युनिस्ट पार्टीचा कार्डहोल्डर नव्हता पण तरीही क्रांतीच्या भक्कम प्रेरणांमध्ये
त्याचं नाव तार्यासारखं चमकताना दिसतं. अण्णा भाऊ कुठल्या इझमचे होते. यापेक्षा शोषितांच्या
मनातलं प्रेरणास्थान होते ही ओळख जास्त महत्त्वाची आहे. माणसाने
त्याच्या विकासाच्या प्रक्रियेत जगाचा अर्थ समजून घेताना इझम जन्माला घातले.
इझम माणसासाठी आहेत. माणसं इझमसाठी नाहीत.
हे समजून घेता आले तरी पुरेसे आहे.
कष्टकर्यांच्या बाजूने साहित्याचा महामेरू कसा उभा करावा
हेच अण्णा भाऊंच्या उभ्या आयुष्याचे सार आहे. माणूस वाचता आल्याशिवाय हे शक्य नाही.
प्रचंड इच्छाशक्ती व प्रतिभा असल्याशिवाय हे शक्य नाही. दारिद्य्रात गुलामीत तापलेल्या जमिनीवर समतेच्या, विचारांचा
पाऊस पडावा आणि त्यातून कष्टकर्यांच्या दु:खाला वाचा फोडणारी शब्दसुमने उगवावीत, हेच अण्णा भाऊंचं
जीवन आहे.
अण्णा भाऊ हे परिस्थितीनं जन्माला घातलेलं
अपत्य आहे. अण्णा भाऊ म्हणजे जीवनानुभवाचे
दाटलेले ढग आहेत जे सगळ्या क्षमतेसह बरसतात. महापूर आणतात.
अण्णा भाऊ राबणार्यांना आपलेसे वाटतात.
राबणार्यांच्या चळवळीला आपलेसे वाटतात.
शाहिरांना, कवींना, कलाकारांना
आपलेसे वाटतात.
मी स्वत: शाहीर असल्यामुळे मला अण्णा भाऊ कलाकाराच्या
रूपात जास्त जवळचे वाटतात. अण्णा भाऊंचा प्रवास पाहताना एक लक्षात
येतं की, ते पहिल्यापासूनच लिहीत होते, नकला करत होते. म्हणजे कलाकार होते पण ‘लाल बावटा कलापथक’ने त्यांच्या आयुष्याला शिस्त लाभली.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील या कलापथकाचं योगदान मोलाचं आहे.
संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालत या कलाकारांनी जनतेच्या हृदयात स्थान
मिळवलं. ‘लाल बावटा कलापथका’ची स्थापना
व वाटचाल त्यांच्या आयुष्यातला कस्तुरीचा ठेवा आहे. हे कलापथक
पक्षाचं होतं. कम्युनिस्ट पक्ष या कलाकारांना मानधन देत असे. अण्णा भाऊंचे जीवाभावाचे मित्र शाहीर
अमरशेख व गव्हाणकर स्वत: अण्णा भाऊ या कलापथकाचे महत्त्वाचे खांब होते. खरं तर
अण्णा भाऊंचा आवाज झिलकरी पद्धतीचा होता. अण्णा भाऊंपेक्षा पहाडी
व बुलंद आवाज होता अमरशेखांचा... अमरशेख हातात कुर्हाड व खांद्यावर घोंगडं टाकूनच गायला उभे राहायचे. अण्णा
भाऊ त्याउलट प्रचंड विनोदी... व मिश्कील स्वभाव. पण उत्कृष्ट अभिनेते. गव्हाणकरही प्रतिभावान.
भारदार सादरीकरण. अशा या लाल बावटा कला पथकावर
सरकारने बंदी घातली. अण्णा भाऊंच्या बुद्धिचातुर्याने तमाशाचं रूपांतर लोकनाट्यात केलं व बंदी निष्प्रभ
झाली. ज्या कलापथकानं उभा महाराष्ट्र चेतवला त्या कलापथकाची फाटाफूट
कशी झाली? पक्षातून बाहेर पडून अमरशेखांनी स्वतंत्र व अण्णा भाऊंनी
स्वतंत्र कलापथक का स्थापन केलं असावं? याच्या वास्तववादी कारणांचा
शोध घेतला पाहिजे. अण्णा भाऊंनी बर्याचदा
कलापथक उभं करण्याचा प्रयत्न केला. कलाकार आले निघून गेले.
बर्याचदा वाद्यांची वाटणी करण्याची वेळ आली.
भवतालच्या व्यावहारिक जगानं एका प्रतिभावान मनाला वारंवार दु:खाच्या डागण्या दिल्या. जर अण्णा भाऊंना आपल्याला खरंच
समजून घ्यायचं असेल तर त्यांच्या भवतालाचा उघड्या डोळ्यांनी व अतिशय तटस्थपणे अभ्यास
करणे गरजेचं आहे. एवढं विपुल साहित्य निर्माण करणारे अण्णा भाऊ
अंतरंगातून एकाकी आणि निराश का होत गेले असतील याचा शोध घेतलाच पाहिजे.
अण्णा भाऊंविषयी लिहिताना वा.वि. भट म्हणतात,
‘‘अण्णाला मी खूप पूर्वीपासून ओळखतो. त्यांच्या
जीवनातील सर्व प्रकारचे चढउतार मी एक सहृदय या नात्याने जवळून पाहिले आहेत.
अखेरच्या काळात अण्णा भाऊ कमालीचे बहकले हेही खरे आहे. पण त्यामागची सत्य कारणे माहिती असणारा सुज्ञ त्यांच्या दु:खाने घायाळ झाल्यावाचून राहणार नाही. सर्व प्रकारच्या
दुर्दैवाचे पहाड अण्णा भाऊंच्या अंगावर कोसळले. पण अण्णा भाऊंमधला
कलाकार मूळचा माणूस कमालीचा मोठा होता. दुर्दैवाने त्याला सावरण्याची
शक्ती आम्हा कुणातच नव्हती. त्यामुळे अण्णा भाऊंचा दु:खद अंत झाला.’’ आणि अण्णा भाऊंवर पहिली पीएच.डी. केलेल्या डॉ. बाबुराव गुरव
यांनी नोंदवलेलं मत असं की, ‘अण्णा भाऊंच्या बरोबर त्यांचा नश्वर
देहच नष्ट झाला असे नाही. तर मराठी सारस्वतामधील एका ऊर्जस्वल
प्रतिभेचाही अंत झाला. म्हणून महत्त्व अण्णा भाऊंच्या देहाचे
नाही तर ते अण्णा भाऊंबरोबर विलीन झालेल्या प्रतिभेचे आहे.’
चळवळीचे कलाकार हे केवळ कलाकार नसतात
तर ते कार्यकर्ते असतात. कला हे त्यांच्या चळवळीतल्या
सहभागाचं माध्यम असतं. शोषितांच्या... दलितांच्या,
बहुजनांच्या कलाकारांना जर ब्राह्मणी पितृसत्ताक धावणी बेदखल करते.
उपेक्षित ठेवते, तसे परिवर्तनवादी चळवळदेखील या
कलाकारांना खूप नीटपणे समजून घेत त्यांचा सन्मान करते असे दिसत नाही. चळवळीच्या पक्ष संघटनांकडे मुळातच सांस्कृतिक राजकारणाची कमी समज त्यापेक्षा
अनास्था कलाकारांच्या वाट्याला येते. क्रांतिकारी मनोरंजन या
पलीकडे विचारांचे भाष्यकार म्हणून असणारी कलाकारांची क्षमता डावलण्याचाच प्रयत्न होत
असतो. आणि कलाकारसुद्धा विचारवंत असल्याशिवाय अण्णा भाऊ,
अमरशेख घडत नाहीत, हेही तितकेच खरे आहे.
म्हणण्याचा उद्देश असा आहे की, कलाकारांच्या पूर्ण
क्षमतांना त्यांच्या प्रतिभेची कदर करणार्या चळवळी जन्माला याव्यात
ही त्यामागची भावना आहे.
अण्णा भाऊंच्या जन्मशताब्दी वर्षात
खूप मोठे समारंभ होतील. त्यांच्या पुतळ्यांची
पूजा होईल. स्वागत-सत्कार होतील.
पुरस्कार वाटले जातील. प्रामाणिकपणे अण्णा भाऊंच्या
विचारांचा जागर घालणारे उपक्रमही राबवले जातील. पण या सर्वांमध्ये
अण्णा भाऊंचं साहित्य समजून घेताना, त्यांचं कार्य समजून घेताना
‘अण्णा भाऊ’ नावाच्या माणसाला समजून घेण्याचं राहून
जाऊ नये. असं मनोमन वाटतं. अण्णा भाऊंना
आत्मचरित्र लिहायचं होतं ‘मृत्यूकडून जीवनाकडे’ असं नावही ठरवलं होतं त्यांनी. पण ते लिहू शकले नाहीत.
अण्णा भाऊंच्या वाटेवर चालणारे कलाकार या प्रवासातल्या भल्याबुर्याचा शोध घेतील, हा आशावाद आहे.
या लेखात समग्र अण्णा भाऊ येणे शक्य
नाही किंवा कोण्या एका व्यक्तीकडून समग्र अण्णा भाऊ मांडले जाणेही शक्य नाही. मांडणार्या व्यक्तीचं
विचारविश्व, भावविश्व यातूनच अण्णा भाऊ साकारले जातील.
याला मीसुद्धा अपवाद नाही. त्यामुळे या लेखात अण्णा
भाऊंचं चित्रण किंवा जो विचार आलेला आहे तो माझ्या आकलनाशी सापेक्ष आहे. हे नम्रतेने सांगून थांबते.
- शीतल साठे
अतिशय मोजक्या शब्दात काॕम्रेड अण्णाभाऊ साठे यांचे जीवनकार्य आणि सामाजिक मुल्यांसाठीचे संघर्ष प्रभावीपणे आणि मार्मिकरीत्या विशद केले आहे.आपल्या डफावरील थाप आणि परिवर्तनाची ललकारी अनेक कार्यकर्त्यांच्या मनावर आपण आणि काॕम्रेड माळी यांनी बिंबवलेली आहे.जयभीम-लालसलाम!काॕम्रेड अण्णाभाऊ साठे अमर रहे!
ReplyDeleteGrate
ReplyDelete