Thursday, 16 May 2019

सत्तेचं शहाणपण सांगणारी मानसं


2009 साली प्रदर्शित झालेल्या ‘Invictus’ या क्लिंट ईस्टवूड यांनी दिग्दर्शन व निर्मिती केलेल्या चित्रपटाबद्दल आज आपण जाणून घेऊ या. हा चित्रपट Playing the Enemy: Mandela and the Game that Made a Nation by John Carlin या पुस्तकावर आधारित आहे. विषय आहे दक्षिण आफ्रिकेतील पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी अंतर्गत यादवीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या देशाचे रग्बी खेळाच्या माध्यमातून कसे एकत्रीकरण केले. चित्रपट सुरू होतो तो पहिलाच शॉट या विषयाची स्पष्ट ओळख करून देतो. 

एका प्रशस्त मैदानावर फक्त गौरवर्णीय तरुण शाळकरी मुले रग्बीचा सराव करत आहेत. प्रशिक्षक त्यांना सूचना देत आहेत. त्या मैदानावरून कॅमेरा डावीकडे पॅन होत मैदानाबाजूच्या रस्त्यावरून पलीकडच्या एका मैदानात येतो. इथे सर्व कृष्णवर्णीय मुले फुटबॉल खेळत आहेत. त्यांना हिरवं गवताचं मैदान नाही, कुणी प्रशिक्षक नाही, अंगभर कपडे नाही, पायात धड चपला, बूट काहीच नाहीत. याउलट गौरवर्णीय मुले खेळाच्या गणवेशात खेळत होते. सोबत स्क्रीनवर लिहून येतंय साऊथ आफ्रिका, 11 फेब्रुवारी 1990.  या दोन मैदानांमधून एक रस्ता जातोय. त्या रस्त्यावरून काही गाड्यांचा ताफा जातोय. त्याकडे बघत सर्व कृष्णवर्णीय मुले कुंपणाच्या जाळीला लटकत ओरडत आहेत... मंडेला... मंडेला... हे बघून गौरवर्णीय मुले कुंपणाजवळ एकत्र येऊन गोंधळलेल्या नजरेने बघत आहेत. एक मुलगा प्रशिक्षकाला विचारतो हा काय प्रकार आहे. प्रशिक्षक सांगतात, तो आतंकवादी मंडेलाला आज सोडलाय, त्याला घेऊन जात आहेत. आजचा दिवस लक्षात ठेवा मुलांनो, आपला देश अशा कुत्र्यांच्या हातात जाणार आता. फक्त 72 सेकंदांच्या या संपूर्ण सीनमधून दिग्दर्शक तेव्हाच्या काळातील परिस्थितीची पूर्ण जाणीव प्रेक्षकांना करून देतो. प्रत्यक्षात यासाठी पुस्तकात कित्तेक पाने खर्ची घालावे लागले असतील. तरीही चित्रांसारखा अपेक्षित परिणाम होणार नाही. हे चित्रपट या माध्यमाचे वैशिष्ट्य आहे. हजार शब्दांचा आशय चित्रपटातील एका शॉटमध्ये अधिक प्रभावीपणे सांगता येऊ शकतो, तेही एकाही शब्दाचा वापर न करता. यापुढील दोन मिनिटे दहा सेकंदांच्या मोन्ताजमधून 11 फेब्रुवारी 1990 ते 10 मे 1994 एवढा काळ वृत्त सादरीकरणाच्या रचनेतून दाखवलेला आहे. आता तुम्ही कल्पना करू शकता, की हा चार वर्षांपेक्षा जास्त इतिहास सांगायला पुस्तकात किती पाने लागली असतील. चार हजार देशीविदेशी राजकीय नेत्यांच्या साक्षीने मंडेला राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतात या समारंभाने हा मोन्ताज संपतो.

आपल्याकडेही 26 मे 2014 ला असंच काही तरी झालं होतं. मात्र पुढच्या इतिहासात फार फरक आहे. सकाळी 4 वाजता मंडेला उठतात आणि फिरायला बाहेर पडतात या शॉट पासून खर्या अर्थाने चित्रपटाच्या कथेला सुरुवात होते. आधीचा भाग हा कथेची पार्श्वभूमी मांडणारी रचना होती. काल शपथ घेतल्यानंतर आज राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यालयात जाण्याचा त्यांचा पहिला दिवस आहे. आपल्या बॉडीगार्डसोबत सकाळी 4 वाजता फिरायला बाहेर पडून ते या दिवसाची सुरुवात करतात. फिरताना एक कार संशयास्पद पद्धतीने त्यांच्या मागेपुढे रस्त्यावर फिरत असते. त्या कारमधून वर्तमानपत्रांचे गठ्ठे बाहेर फेकले गेल्यानंतर संशय दूर होतो. उत्सुकता म्हणून सर्व बघतात तर आजची आठ कॉलम बातमी असते, ‘ते निवडणुका जिंकू शकतात, पण देश चालवू शकतील का?’ मंडेलांचा बॉडीगार्ड म्हणतो, तुम्ही अजून एकही दिवस राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केले नसताना ते असा प्रश्न कसा काय विचारू शकतात? त्यावर मंडेला उत्तर देतात, ‘पण त्यांचा प्रश्न रास्त (कायदेशीर) आहे.’ आता ही रचना मूळ पुस्तकात नाही. ही क्लिंट ईस्टवूड यांची दिग्दर्शक म्हणून खासियत आहे. ते आपल्या चित्रपटातील मुख्य पात्र नेमकं काय विचार करतं याचा अंदाज प्रेक्षकांना येऊ देत नाहीत. अशा रचनेतूनच ते आपल्या चित्रपटाच्या मुख्य पात्रांची उकल करतात. त्याचा अपेक्षित परिणाम प्रेक्षकांवर होतो. या सीनमुळे मंडेलांचं एक व्यापक आणि प्रामाणिक चित्र प्रेक्षकांच्या मनामध्ये तयार होतं. असे अनेक प्रसंग पुढे चित्रपटात आहेत जिथे प्रेक्षकांना अनपेक्षित उत्तरे मिळतात. ही तशी साधी भाषिक रचनाच आहे, परंतु तिचा दृश्यात्मक परिणाम खूप मोठा आहे. हे साहित्यात शक्य नाही. आज असा प्रश्न विचारण्याची सोयच जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीत नाही. मंडेलांसारखे प्रामाणिक उत्तर मिळणे तर खूप लांबची गोष्ट राहिली.

मंडेलानंतर दक्षिण आफ्रिकेच्या रग्बी टीमचा कॅप्टन फ्रॅकॉइस पियेनारची त्याच सकाळी ओळख करून दिली जाते. त्याचे वडील भीती व्यक्त करतात, की इतर आफ्रिकन देशांप्रमाणे इथेही आता अनागोंदी निर्माण होईल, कारण बहुसंख्य कृष्णवर्णीयांकडे सत्ता गेल्यामुळे अल्पसंख्याक गौरवर्णीयांवर अन्याय होईल. इतर सर्व देशातही अशीच भावना आहे. मंडेला पहिल्या दिवशी राष्ट्राध्यक्ष कार्यालयात जातात तर तिथे सर्व गोरे कामगार आपल्याला नोकरीवरून काढून टाकण्याच्या आधीच आपले सामान बांधून ठेवत जाण्याच्या तयारीत आहेत. मंडेला सर्वांना एकत्र बोलावून आश्वासन देतात की, त्यांनी त्यांचे काम सुरू ठेवावे. त्यांना कोणताही त्रास होणार नाही. ते मुद्दाम आपल्या सुरक्षारक्षकांमध्ये काळ्या आणि गोर्या बॉडीगार्डचा समावेश करतात. पुढे चित्रपट सरळ मूळ कथानकावर येतो. मंडेला दक्षिण आफ्रिकेची रग्बी टीम जी स्प्रिंगबोक्स या नावाने ओळखली जाते तिचा इंग्लंडसोबतचा सामना पाहण्यासाठी येतात. तिथे त्यांची फ्रॅकॉइस पियेनारशी रग्बी टीमचा कॅप्टन म्हणून हस्तांदोलन करताना पहिल्यांदा भेट होते. सामना पाहत असताना मंडेलांच्या लक्षात येतं. गोरे लोक स्प्रिंगबोक्सला समर्थन देत आहेत आणि काळे लोक इंग्लंडच्या बाजूने चीअर करत आहेत.

दक्षिण आफ्रिकेतील कृष्णवर्णीय लोकांच्या मनामध्ये गौरवर्णीयांबद्दल प्रचंड राग आहे. त्यांनी इतके दिवस केलेल्या कृष्णवर्णीयांवरील अन्यायाबद्दलची ही चीड आहे; परंतु आता ती परिस्थिती राहिली नाही. वर्णद्वेषाची लढाई आता संपली आहे. आता देशाला प्रगती करायची असेल, पुढे जायचे असेल तर सर्वांना एकत्र मिळून प्रयत्न करावे लागतील. कृष्णवर्णीयांनी आपल्यावरील अन्यायाचा बदला घ्यायचा ठरवले तर हे शक्य होणार नाही. मंडेला याच रग्बीच्या खेळाचा उपयोग करून देशाला आणि पर्यायाने काळ्या- गोर्या लोकांना एकत्र कसे आणतात हीच चित्रपटाची मूळ कथा आहे. मंडेला आणि पियेनार ही या कथेतील दोन मुख्य पात्रे. म्हणून मुख्य कथा या दोन पात्रांच्या भोवतीच गुंफलेली आहे.

मंडेला आणि पियेनार या दोन पात्रांची रचना एकमेकांना पूरक आहे. चित्रपटाच्या अपेक्षित परिणामांसाठी ही ठरून केलेली रचना आहे. मूळ पुस्तकामध्ये आणि वास्तवात ती नसेलही. मात्र चित्रपटाच्या कथानकापुरता यात काही बदल केला जातो. याला दिग्दर्शकीय स्वातंत्र्य असं म्हटलं जातं. चित्रपटाच्या कथानकात पात्रांची समांतर रचना करता येऊ शकते. मात्र साहित्यात समांतर रचना करता येईलच असे नाही. चित्रपटात मात्र ही सहज आणि प्रभावी रचना ठरते. म्हणून या समांतर पात्र रचनेचा वापर चित्रपटात खूप मोठ्या प्रमाणात केलेला दिसून येईल. मंडेला आणि पियेनार या दोन पात्रांच्या सहसंबंधातून कथासूत्र उलगडत राहतं. मंडेला आणि पियेनार यांच्या पहिल्या भेटीच्या सीनपासून मंडेला रग्बी विश्वचषक पियेनारला देताना शेवटच्या शॉटपर्यंत ही रचना कायम ठेवली आहे. मात्र चित्रपटाचे नायक म्हणून मुख्य भर मात्र मंडेला यांच्यावरच राहील अशा पद्धतीने चित्रण केले आहे. क्लिंट ईस्टवूड हे या कलेत माहीर आहेत. अनेक चरित्रात्मक चित्रपटांचा अनुभव त्यांच्याकडे आहे. त्यांची चरित्र रंगवण्याची स्वत:ची एक पद्धत आहे. मंडेलांचे पात्र ज्या पद्धतीने चित्रित केले आहे ते खूप प्रभावी व प्रेरणात्मक आहे. स्प्रिंगबोक्स इंग्लंडसोबतचा सामना खूप वाईट पद्धतीने हरली. यानिमित्ताने नॅशनल स्पोर्ट्स कौन्सिलमध्ये ही टीम बरखास्त करून या टीमचे नाव, कपड्यांचे रंग, बोधचिन्ह असे सर्वच बदलण्याचा निर्णय होतो. त्याची कुणकुण मंडेलांना लागते. हे थांबवण्यासाठी ते कार्यालयातून थेट बैठकीच्या ठिकाणी जाण्यासाठी निघतात. त्यांची सहकारी त्यांना सांगते हे चुकीचे आहे. कृष्णवर्णीयांच्या मनात या टीमबद्दल खूप द्वेष आहे. असं व्हावं ही लोकांचीच इच्छा आहे. तुम्ही यात पडू नका. तेव्हा मंडेला उत्तर देतात...

याबाबतीत लोकांचे हे विचार चुकीचे आहेत. त्यांनी निवडलेला लोकप्रतिनिधी म्हणून हे थांबवणे ही माझी जबाबदारी आहे.’ यावर सहकारी म्हणते, तुम्ही असे करून आपले राजकीय भविष्य पणाला लावत आहात. तुम्हाला याची भीती वाटत नाही का? मंडेला स्पष्टपणे उत्तर देतात, ज्या दिवशी मला अशी भीती वाटेल त्या दिवशी मी लोकांचे नेतृत्व करण्याच्या योग्यतेचा राहणार नाही. पुढे नॅशनल स्पोर्ट्स कौन्सिलमधील भाषणात ते सांगतात, गौरवर्णीयांनी आपल्यावर जो अन्याय केलाय त्याचा बदला घेण्याची ही वेळ नाही. ते या लोकशाही प्रक्रियेतील आपले सहकारी आहेत. ही आपण सर्वांनी मिळून राष्ट्रउभारणी करण्याची वेळ आहे, आपापसात लढण्याची नाही. ही  द्वेष भावना आता बाजूला ठेवा. तुम्ही मला आपला नेता निवडलं आहे, आता मला निर्णय करू द्या, असे स्पष्टपणे सुनावतात.
यासोबतच त्यांची देहबोली, सोबतच्या इतर माणसांशी त्यांची वागणूक, त्यांची कामाप्रति असलेली निष्ठा, कामातील प्रामाणिकपणा असे अनेक पदर खूप बारकाईने चित्रित केले आहेत. मंडेला आपल्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयात चहापानाचे निमंत्रण पियेनारला देतात. तो आपल्या कार्यालयात येतो तेव्हा त्याचे स्वागत करताना आपल्या खुर्चीतून उठून दरवाजाकडे जात म्हणतात... Frangois, what an honor. Thank you for coming all this way to see me. राष्ट्राध्यक्षांचे हे रूप पाहून पियेनार चकित होतो. त्याच्या चेहर्यावरचे हावभाव दिसतील अशा पद्धतीने हा शॉट घेतला आहे. मंडेला पियेनारसोबत नेतृत्वगुणांबद्दल चर्चा करतात. आपल्या तुरुंगातील अनुभवांबद्दल सांगतात. पुढील भेटीत त्याला स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली ‘INVICTUS’ ही कविता देतात. या भेटीचा खूप प्रभाव झालेल्या पियेनारला मंडेला ज्या तुरुंगात 18 वर्षे होते तिथे भेट देण्याची संधी मिळते. आपले दोन्ही हात लांबवून पियेनार त्या छोट्याशा खोलीचा अंदाज घेतो. त्या खोलीच्या खिडकीतून बाहेर बघतो तर त्याला बाहेर मैदानात दगड फोडणारे मंडेला दिसतात. त्या मैदानावर तो जातो तेव्हा मंडेला व त्याची नजरानजर होते. हे सर्व काल्पनिक आणि प्रतीकात्मक आहे. मात्र हे चित्र माध्यमात शक्य आहे. साहित्यात ही भेट घडवली तर एवढी प्रभावी ठरणार नाही. रग्बी विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या आधीच्या रात्री पियेनार हॉटेलच्या खिडकीतून स्टेडियमकडे पाहतोय तेव्हा तिथे त्याची पत्नी येते. त्याला विचारते, उद्याच्या अंतिम सामान्याबद्दल विचार करतोय का? तर तो म्हणतो, नाही. उद्या काय व्हायचे ते होईल. मी विचार करतोय की, एक माणूस तीस वर्षे तुरुंगातील एखाद्या छोट्याशा खोलीत कसा राहू शकतो आणि बाहेर येऊन त्या सर्वांना माफ करतो ज्यांनी त्याला उमेदीची तीस वर्षे तिथे डांबून ठेवलंय. अशी पात्ररचना आणि घटनांच्या कार्यकारणभावाची रचना करण्याचे रचनात्मक स्वातंत्र्य चित्रपट दिग्दर्शकाला असतं. त्याचा ते पुरेपूर उपयोग करतात. आपल्याला मंडेला माहीत आहेतच, परंतु जे मंडेला क्लिंट ईस्टवूड या चित्रपटातून आपल्याला दाखवतात ते पाहून आपण चकित होतो, प्रभावित होतो. ही या माध्यमाच्या रचनेची ताकद आहे. तिचा पुरेपूर वापर क्लिंट ईस्टवूड करतात.

अंतर्गत यादवी, वर्णद्वेष, वांशिक हिंसा अशा वातावरणात देशाचे नेतृत्व करणार्या मंडेलांनी सहज एका खेळाच्या माध्यमातून त्या देशाला वर्णद्वेषाच्या, हिंसाचाराच्या गर्तेतून बाहेर काढले. स्थिरता आणि शांततेतून विकासाकडे नेत नवी मूल्यव्यवस्था निर्माण केलेला देश घडवला. त्यासाठी प्रोपगंडाचा सकारात्मक वापर केला. यातून मंडेलांचे महानपण हा चित्रपट सिद्ध करतो. हा प्रवास पाहताना आपण विलक्षण प्रभावित होतो. त्यासोबतच आपल्या देशातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहून वाईटही वाटत राहतं. सध्या जे विद्वेषाचे वारे सर्वत्र वाहत आहेत त्यातून मंडेलांसारख्या नेतृत्वाची गरज कायम भासत राहते. मंडेलांचे सर्वसमावेशक राजकीय विचार, नेतृत्वगुण आणि ठाम, पण संयमी व्यक्तिमत्त्व यापुढे आताचे आपल्या देशातील नेतृत्व फारच खुजे वाटते.
- प्रा. संदीप गिऱ्हे
(संदीप गिऱ्हे हे, अहमदनगर येथील संज्ञापन अभ्यास विभाग, न्यू आर्ट्स, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेजमध्ये डिजिटल फिल्म मेकिंग या विषयाचे अध्ययन आणि अध्यापन करत असून जागतिक सिनेमा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.)

No comments:

Post a Comment