अरबी समुद्रात जगातील सर्वात उंच व भव्य असे छत्रपती शिवाजी
महाराजांचे स्मारक होणार आहे. त्यासाठी ती जागा पसंद केली आहे ती अगदी मोक्याची
असून तिथे मच्छी भरपूर मिळते. बारीक मच्छी ही किनार्यालगतच मिळते, जैविकदृष्ट्या महत्त्वाचा किनार्याचा हा भाग आहे. ह्या
स्मारकामुळे मासे गमविण्यापासून प्रदुषणासह अनेक समस्या उद्भवणार आहेत. ह्या प्रजावत्सल
राजाला मोठी दूरदृष्टी होती. निसर्ग संपवल्यास काय हानी होऊ शकते याची त्यांना
पूर्ण कल्पना होती आणि म्हणून त्यांच्या राजवटीत झाडे, जंगले
तोडायला सक्त मनाई होती. पाऊस भरपूर पडे, पाण्याची विपुलता
होती, परिणामी शेती चांगली होती. दैवदुर्विलास बघा अशा ह्या
निसर्गप्रेमी राजाच्या स्मारकासाठी त्याच्या प्रिय निसर्गाचाच बळी घेतला जाणार
आहे. ज्या कोळी बांधवांच्या सहकार्याने राजांनी पहिले आरमार उभे केले, त्याच कोळी समाजाच्या उपजीविकेचा प्रश्न ह्या स्मारकामुळे उभा राहणार आहे.
समुद्रात भराव टाकण्यासाठी डोंगर तुटणार आहेत. या स्मारकामुळे म्हणे महाराष्ट्राची
शान वाढणार आहे. पण महाराष्ट्राला शान उरली आहे का? सतत
होणार्या शेतकर्याच्या आत्महत्या, महिलांवरील अत्याचार आणि
बलात्काराचे वाढते प्रमाण, गुन्हेगारी आणि नाकाम शासन. अशा
महाराष्ट्राची शान असे उंच पुतळे उभारून भरून निघणार आहे?
सरदार पटेल म्हणाले होते माझ्या मृत्यूनंतर देशाची एक इंच
भूमीसुद्धा माझ्यासाठी वापरू नका. असे असताना त्यांचा भव्य व उंच पुतळा
गुजराथमध्ये उभारला गेला. सरदारांची विचारसरणी अमलात आणली जात नाही. फक्त भव्य
पुतळे उभारले गेले की सगळ भरून पावले असा समज राजकारण्यांचा झालेला दिसतो आहे.
देशात दुष्काळ, महागाई,
बेरोजगारी, भ्रष्टाचार, महिला
सुरक्षा या समस्या आ वासून उभ्या आहेत. सरकार त्या सोडवण्यात फार कमी पडतंय,
मग लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी हे असे प्रयत्न करायचे आणि
जनतेचा पैसा असा उधळायचा असे हे धोरण आहे. आता निवडणुका तोंडावर आल्या आहेत. मते
तर हवीत पण लोकांशी केलेले वायदे पुरे केलेच नाही. पण भारतीय जनतेची मानसिकता
सरकार बरोबर ओळखून आहे, लोक भावनिक आहेत, जरा कंठ दाटून आलेला आवाज काढूनह बोललं, डोळ्यात
पाणी आणलं की लोक पाघळतात हे राजकारणी बरोबर जाणून आहेत. त्यामुळे असे भव्य पुतळे
उभारून लोकांना भूलवायचे आणि जनतेला दिलेल्या वचनांची पूर्ती न करताही मतं पदरात
पडून घ्यायची ही सरकारची नीती आहे.
शिवाजी महाराजांचे शौर्य व त्यांचे कार्य विश्वविख्यात आहे.
त्यासाठी पर्यावरणाचा विनाश करून त्यांचा जगातील उंच पुतळा उभारण्याची काही गरज
नव्हती. हे पुतळे पक्षांना शिटण्यासाठी कामी येतात. वर्षातून फक्त त्यांच्या
जयंतीला व पुण्यतिथीला ते धुतले जातात. एरव्ही ते तसेच शिटांनी, धुळीने माखलेले असतात. जनतेचे पैसे असे पुतळे उभारून खर्च
करण्यापेक्षा त्या पैशातून जनतेला मोफत आरोग्य सेवा, मोफत
शिक्षण द्यावे. क्युबासारखा छोटा देश जर लोकांना ही सेवा देऊ शकतो तर आपला देश का
देऊ शकत नाही? मल्ल्या, निरव मोदीसारखे
देशातला पैसा देशाच्या बाहेर नेऊन स्वत:चे भले करून घेतात. तेव्हा सरकारने जनतेचा
पैसा जनतेच्या कामी आणावा. रोजगार देऊन देशातली बेरोजगारी कमी करावी.
शिवाजी राजांनी राज्यासाठी जे नियम केले होते त्याप्रमाणे
वागल्यास वेगळ्या स्मारकांची गरजच नाही. त्यांच्याविषयी एवढी आपुलकी वाटते तर
त्यांनी बांधलेले गड दुरुस्त करावेत. पर्यटनासाठी त्यांचा वापर करावा. आपोआपच
राजांची महती लोकांपर्यंत पोहोचेल. पण हे असे काही करायचेच नाहीये. फक्त मतांपुरता
राजांचा वापर करून घ्यायचा आहे. त्यासाठी जनतेच्या हजारो कोटी रुपयांवर धाड
टाकायची आहे. राजांविषयी प्रेम वगैरे काही नाही. शिवाजी राजांनी स्वदेशावर प्रेम
करा असे सांगितले आहे. स्वत:चे लुटून परदेशाची भर करा असे नाही सांगितले.
राजांच्या आज्ञांचा अभ्यास करून त्या अमलात आणल्यास ते त्यांचे योग्य स्मारक
होईल.
- मीनल कुष्टे
(1 ते 15 डिसेंबर 2018 च्या ‘परिवर्तनाचा वाटसरू’ अंकातून
साभार)
No comments:
Post a Comment