2

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 85 30 52 85 50 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

Monday, 17 February 2020

भाषेची हिंसा आणि लोकतांत्रिक प्रत्युत्तर


भाषा ही अर्थ-वहनाची इतकी विचित्र बांधणी आहे की, काही वेळा अगदी सोप्या वाटणार्‍या शब्दाचा नक्की अर्थ सांगण्यात नाकी-नऊ येऊ शकतात; आणि त्याउलट कितीतरी क्लिष्ट वाटणार्‍या शब्दाचा नेमका अर्थ अगदी सहजासहजी सांगता येऊ शकतो. उदाहरणार्थ ‘अँथ्रोपोसिनी’ या नव्यानेच इंग्रजीमध्ये रूढ होत असलेल्या शब्दाचा अर्थ आहे ‘मानवाने पर्यावरणावर आणि प्रकृतीवर उठवलेला ठसा पर्याप्त मर्यादा ओलांडून विनाशकारी बनला ते युग’ हे ठणकावून सांगता येते. पण, जर ‘प्रकृती’ चा अर्थ शोधायचा असेल तर, शारीर-प्रकृती का निसर्ग? ह्या द्विधेमध्ये आपण अडकतो. शिवाय, निसर्ग केवळ  जीव (लाइफ) सृष्टीच्या आधी आणि नंतर असतो, का मग संपूर्ण जीवसृष्टीला धरून असतो? हा न सुटणारा प्रश्‍नही समोर उभा राहतो. शिवाय, ‘संस्कृती’ आणि ‘प्रकृती’, म्हणजे एका बाजूला मानवी इच्छा आणि बुद्धी आणि दुसर्‍या बाजूला सारे न-मानवीय, यांच्यातले सततचे परस्पर-विरोध आपल्याला आठवायला लागतात.

एकंदरीत ‘अर्थ’ कसा ‘उद्भवतो’, त्याचा चलन-व्यवहार कसा नक्की ठरतो, हे अजूनही पूर्णपणे न सुटलेले कोडे आहे.  मुळात ‘अर्थ’ या शब्दाचा अर्थच फारसा स्पष्ट नाही. आपण सामान्यत: कठीण शब्दांचे अर्थ समजून घेण्यासाठी शब्दकोशाची मदत घेतो. मी इंग्रजीमध्ये ‘मिनिंग’ या शब्दासाठी ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी उघडली तेव्हा त्यात जो ‘अर्थ’ सापडला तो असा : what is meant by a word, action or idea. मराठीत त्याचा गोषवारा होईल ‘एखाद्या शब्दाने विशिष्ट कृती, संकल्पना किंवा शब्द यांचा अभिप्रेत होत असलेला अर्थबोध’ यात पुन्हा आपण ‘अर्थबोध’ म्हणजे काय? असे त्या शब्दकोशाला विचारले, तर गोल-गोल फिरत शब्दकोश आपल्याला पुन्हा त्याच घोटाळ्यावर आणून उभा करेल. ते न विचारणेच योग्य. शब्दकोशाची निर्मिती अर्थ समजावून सांगण्यासाठी झाली असली तरीही, अर्थ शब्दाचा संपूर्ण अर्थ ते आपल्याला सांगू शकणार नाहीत. ह्यात कारण हे नाही की शब्दकोशांना भाषेच्या सगळ्या लकबी माहीत नसतात. उलट, त्या त्यांना सगळ्या माहीत असतात म्हणून ते शब्दकोश बर्‍याचशा शब्दांचे अर्थ अनुत्तरित स्वरूपात नोंद-करत असतात. त्यांना हे पक्के माहीत असते की शब्दांचे अर्थ सतत शब्दांच्या पुढे धावत राहतात, सतत बदलत राहतात.  हे झाले शब्दकोशांचे. स्वत: शब्दही बर्‍याचदा अशा रीतीने वापरले जातात की त्यांचे प्रस्थापित अर्थ मोडीत निघावेत आणि त्या नव्या वापरातून काही नवे अर्थ त्या विशिष्ट शब्दांना चिकटावेत.  गेल्या पाच-सहा वर्षांत मी कितीतरी शब्दांचे प्रस्थापित अर्थ बदललत असलेले पाहत आलो आहे. अशा शब्दांची --आणि त्यातून बनवलेल्या वाक्यांची -- एक ‘धोबी-लिस्ट’ देतो. ही यादी ‘समग्र शब्दसूची’ नाही. ती एक सहज बनवलेली, केवळ अगदीच नजरेआड करता येणार नाहीत अशा शब्द-वाक्यांची आहे. सोबत त्यांचे नवे अर्थही आहेत. वाचक स्वत:ही त्यात बरीच भर घालू शकतील.     

‘मनापासून पुस्तके वाचणारे, ज्ञानाच्या-कलेच्या क्षेत्रात आणि सामाजिक जीवनात आपला ठसा उमटवणारे आणि वेळोवेळी आपली मते निर्भीडपणे माध्यमातून व्यक्त करणारे’ या सगळ्यांसाठी आता ‘खानमार्केट बुद्धिजीवी’ हे लेबल वापरले जाते.

ज्यांना देशात काश्मीरपासून आसामपर्यंत कोणत्याही भागांत अन्याय झाला तर दुःख होते, जे ती वेदना जाणीवपूर्वक व्यक्त करतात त्यांना ‘तुकडे-तुकडे गँग’ म्हणण्यात येते.

जे सरकारची प्रजा-विरोधी धोरणांशी सहमत नाहीत ते ‘देशद्रोही’ आणि जे अशा जनहितविरोधी धोरणांची जबाबदारी पंतप्रधानांची आहे असे स्पष्ट बोलतात, तसे लिहितात ते ‘अर्बन नक्सलाइट’ ह्या शब्दात संबोधले जातात.

घोळके आणि झुंडी बनवून एखाद्या निरपराध व्यक्तीस जे क्रूरपणे पिटतात त्यांना ‘गौरक्षक’ म्हटले जाते. ज्या व्यक्तीस पिटण्यात येते त्या व्यक्तीस ‘ऑफेंडर’/गुन्हेगार मानण्यात येते.

‘घरमे घुसके मारुंगा’ तसेच ‘चुन-चुनके  मारुंगा’ म्हणजे ‘लोकहितदक्ष राज्यव्यवस्थेची नवी व्याख्या’; ‘आश्रितांना नागरिकत्व बहाल करणे’ म्हणजे काही विशिष्ट धर्माच्या लोकांनी देशात राहू नये अशी परिस्थिती निर्माण करणे’; ‘कपडेसे पहचान जाते है’ म्हणजे  इतिहासातील गर्दीत घरातून निसटलेले बालक चुकू नये म्हणून पाच लाखांच्या कोटावर त्याचे नाव हजारोवेळ लिहून घेणे.

‘चौकीदार’ म्हणजे ‘आपल्या आवडीच्या कोट्यधीशांना व्यवस्था करून देणारा’; ‘बेटी बचाओ’ म्हणजे बलात्कारी नेत्यांचा सार्वजनिक सत्कार करणे.

‘ऑपरेशन कमल’ म्हणजे ‘नैतिकतेला सार्वजनिक सुट्टी देणे’; ‘किसीको डरनेकी जरुरत नंही है’ म्हणजे युनिव्हर्सिटी विद्यार्थ्यांना बेदम चोपण्यासाठी गँग्स पाठवणे; ‘परदेशात प्रतिष्ठा वाढलीय ’ म्हणजे ‘सगळ्या प्रमुख परदेशी वर्तमानपत्रात भारत सरकारवर प्रखर टीकेचे लेख येतायत’; सायन्स काँग्रेसचे उद्घाटन करणे म्हणजे पुराणातल्या तद्दन अशास्त्रीय गोष्टी शास्त्रज्ञांना सांगत बसणे; ‘छप्पन इंच छाती’ म्हणजे फाशी लावून घेणार्‍या शेतकारी वर्गाची निर्मम अवहेलना सुरू ठेवण्याचे साहस; ‘परीक्षेपे चर्चा’ म्हणजे थर्डरेट व्यक्तींना व्हाईसचान्सलर म्हणून नेमणे; नेहरू सेक्युलर होते असे संसदेत सांगणे म्हणजे नेहरू मेमोरियल लायब्ररी या संस्थेची वाट लावणे; प्रधान सेवक म्हणजे लोक काय म्हणतात याकडे कायम दुर्लक्ष करणे.

निवडणूक म्हणजे आपण स्वत: हे भारत आणि इतर सारे हे पाकिस्तान असा खेळ. जवळपास युद्धच! 

साहित्य विषय शिकणार्‍या कॉलेज विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत एक प्रश्‍न हमखास विचारला जातो, तो म्हणजे ‘कोणत्या युगकर्त्या कवी-लेखनाने आपल्या भाषेत किती नव्या शब्दांची भर घातली?’ आणि विद्यार्थी मोठ्या आवडीने कालिदास असो, शेक्सपियर असो, तुकाराम असो, जो महान कवी-लेखक प्रश्‍नात असेल त्याच्या शब्दसंपत्तीबद्दल लिहितात. त्या शब्दसंपत्तीच्या आधारावर, त्या त्या युगकर्त्या कवीने निर्माण केलेल्या साहित्ययुगाची प्रमुख लक्षणे अधोरेखित केली जातात.

सध्याच्या नव्या शब्दसंभारात एक खास गुण दिसून येतो, तो म्हणजे घृणा, तिरस्कार, धुत्कार यांची रेलचेल. या अभ्यासातील नियत झालेल्या पद्धतीने जायचे झाल्यास आपण या नव्या शब्दांच्या निर्मात्यांना ‘युगकार’ म्हणू शकू, आणि त्यांनी देशाला ज्या युगात फरपटत आणून पोहोचवले आहे त्याला ‘घृणायुग’ अथवा ‘तिरस्कार युग’ म्हणू शकतो. एखाद्या काळात अनेक लेखककवी काही नवीन निर्माण करत असतील तर त्यांचा उल्लेख इंग्रजीमधून ‘स्कूल’ असा केला जातो. त्या प्रमाणे आपण या नव्या वेदनेच्या कर्त्यांना ‘हेट-स्कूल’ म्हणू शकतो इतकी विपुल हेट-शब्द संपत्ती त्यांनी आपल्या सामाजिक जीवनातील परिभाषेत आणून टाकली आहे.

मनोवैज्ञानिक सिगमंड फ्रॉइडच्या पद्धतीने या नव्या हेट भाषेचे विश्‍लेषण करायचे झाल्यास, ह्या ‘हेटकी’ त ‘स्वत:च्या मनात सतत पछाडणारा न्यूनगंड आक्रमकपणाने व्यक्त करण्याची प्रबळ भावना’ दिसून येईल. ‘आजपर्यंत मला नाकारलेत काय? आता दाखवतो तुम्हाला’ --हा आवेश आणि त्यापोटी, देशाने परिश्रमातून आणि विचारपूर्वक उभ्या केलेल्या अनेक संविधानिक संस्था तोडायला लागल्या तरी त्यांची ऐसी-की-तैसी! इतिहासकारांना या नव्या भाषेचे आणि ती निर्माण करणार्‍या भाषिकांचे वर्णन करायला दिले तर ते, देश आर्थिक गर्तेत गेलेला असताना त्याकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून उभा केलेला शब्दिकी प्रचार या दृष्टीने पाहतील.

भाषाशास्त्र मात्र जरा वेगळ्या दृष्टीने हा प्रकार पाहील. ते याला ‘डिस्कोर्स अनालिसिस’ चे नियम लावून तपासतील.  ते, म्हणजे भाषाशास्त्री, म्हणतील ‘काहीही असो, भाषा ही शेवटी एक सामाजिक व्यवस्था असते’. एकदा कोणत्याही शब्दाचा वापर काही नव्याच अर्थाने केला गेला तर त्यानंतर तो वापर तसाच करण्याची कायम-मक्तेदारी त्या पहिल्या वापर-दाराकडे राहत नाही. सुरुवातीस, असे ‘नवे’ अर्थ शब्दात ओतताना त्या प्रथम वापरदारास आपण काही तरी महान नैतिक काम करतो आहे असे वाटणे स्वाभाविक आहे; पण नंतर जेव्हा हे सारे शब्द इतरही वापरू लागतात तेव्हा समाजात आणि भाषेत केवळ चिखलफेक आणि कचराफेक माजतात.

‘हेटकी’ ने भारतीय समाज जीवनात ही कचराफेक आणि चिखलफेक रुजवलेत. या पूर्वी, आपल्या समाज जीवनात कितीतरी महात्म्यांनी आपल्यासाठी नवीन शब्द तयार केले: गांधींनी आपल्याला दिले ‘स्वराज’, ‘सत्याग्रह’, ‘अहिंसा’, ‘असहकार’, ‘सविनय कायदेभंग’ सहयोग, बाबासाहेबांनी दिले ‘समानता’, ‘अधिकार’, ‘संविधान’ विनोबांनी ‘भूदान,’ आणि ‘जेपींनी’, ‘संपूर्ण क्रांती’. या सार्‍या शब्दात समाजमनाची उंची वाढवण्याची ताकद होती. हेटकीमध्ये ती नाही, उलट समाजाचा नीतीस्तर कितीतरी खाली ढकलण्याची खटपट त्यात आहे. रोज सकाळ-संध्याकाळ टीव्ही सेट्समधून आपल्या घरात हेटकी ओतली जाते आणि आता आपल्या घराघरात ती रुळून गेली आहे. घृणा आणि त्यातून निर्माण होणारी हिंसा या वेदनादायक आणि अनिछिनीय असतात; पण त्याहूनही जास्त दु:खद असते ते म्हणजे त्यांचे ‘नॉर्मलायझेशन’ रुळून जाणे. ते झाले आहे.

शब्दकोशांना ‘अर्थ’ शब्दाचा अर्थ पूर्णपणे माहीत नसेल, काही हरकत नाही. पण हिंसेच्या भाषेचा समाजावर सखोल परिणाम होत चालला तर त्याला कसे सामोरे जावे हे मानवी समुदायांना मात्र फार चांगले माहीत असते. भाषा ही खरोखरच एक विलक्षण सामाजिक व्यवस्था आहे. तिचा आपला एक प्रतिकाराचा प्रकार असतो. जेव्हा हिंसेचे शब्द भाषेचीही हिंसा करू लागतात तेव्हा भाषा ‘संपावर जाते’, ती तिच्या अर्थ-व्यवस्थेचे खालावलेले स्तर सांभाळून ठेवायला पुढे येते. ती काही संवाद अशक्य बनवते. हा तिचा संप. आणि काही नवे संवाद ती निर्माण करते. ही तिची कृती. भाषेच्या कोणत्याही अभ्यासकाला विचारा, तो/ती आपल्याला सांगेल की देशात उफाळून आलेला प्रोटेस्टचा महापूर हा मात्र नागरिकत्व मुद्यासाठीचा, मात्र सिटिझनशिप रजिस्टरच्या मुद्द्यालाच नाही. तो हेटकीच्या विरोधात पण आहे. मुळात तो त्यातूनच निर्माण झालेला आहे. आपल्या देशातील तरुणांनी आणि आजपर्यंत कधीही रस्त्यावर न उतरलेल्या स्त्रियांनी हेटकीला भर चौकात आणलंय. ते संविधानाच्या नावाने आणि तिरंग्याच्या छायेत संवाद मागताहेत. ते हेटकी नाकारताहेत, कारण ते हिंसेची भाषा आणि भाषेची हिंसा यापासून समाजमुक्त करायला उद्युक्त झालेत.

- गणेश देवी

Wednesday, 22 January 2020

लोक, राष्ट्र आणि नागरिक : निषेधाचे शास्त्रीय निदान


(छायाचित्र : संदेश भंडारे)
मानवी इतिहासामध्ये मानवी समुदाय ‘लोक’ स्वरूपात एकत्र येऊ लागले आणि नंतर कालक्रमाने ते ‘नागरिक’ बनले. ही प्रक्रिया सुरू होऊन ती पुरी व्हायला, होमो-सेपियन्स --माणूस-- प्राण्याच्या इतिहासातील फार प्रदीर्घकाळ लागला आहे. मानवाच्या अगदी सुरुवातीपासून जरी नसले तरी, माणूस विचार व्यक्त करण्यासाठी भाषा वापरू लागला, भाषेचा विकास करू लागला, त्यातून मानवी समुदायांची जडण-घडण होत गेली, त्या कालखंडापासून तरी ‘लोक’ या घटिताची सुरुवात झाली असावी. भाषेमधून विचार व्यक्त करण्याची क्षमता जेव्हा माणसांमध्ये आली त्या प्रक्रियेतून होमो-सेपियन्समधून ‘लोक’ बनणे सुरू झाले.


भाषेच्या माध्यमातून जाणीव विकसित होत जाणे आणि त्यातून भाषा वापरणार्‍या समाजात, ज्याला तत्त्ववेत्त्यांनी ‘phenomenological communities’ (जाणीव, अनुभव या माध्यमातून विचार करणारा समाज) असे म्हटले आहे, त्यातून ‘लोक’ निर्माण झाले. हे असे मानवी समूह एका ठिकाणी किंवा भटकंतीच्या स्वरूपात फार मोठ्या आणि व्यापक इतिहास प्रवाहात विकसित होत गेले. हे कोणते लोकसमूह होते? हा प्रश्‍न येथे फारसा महत्त्वाचा नाही. पण तत्कालीन भाषा वापरणार्‍या आणि त्यामुळे विकसित होत जाणार्‍या समाजात एकमेकांना जोडल्या जाणार्‍या संकल्पना व शारीर अनुभव यांच्या अनुषंगाने काही नेटवर्किंग तयार होत गेले आणि यातून आकलन, ज्ञान किंवा काही बोधनात्मक व्यवहार आणि त्याला मिळणारा भावनात्मक प्रतिसाद नियंत्रित होत गेले. अर्थात हे लोकसमूह. तोपर्यंत समाज बनले नव्हते. प्रत्येक कालखंडात ते बदलत राहिले. सामाजिक अभिसरणाची ही प्रक्रिया सातत्याने घडत राहिली. यातून एकमेकांचे आदान-प्रदान होत राहिले. या गोष्टी फार उघडपणे घडल्या असाव्यात असे म्हणता येणार नाही. म्हणजेच, या भाषिक इतिहासामध्ये लोकसमूहांचे विचार, संकल्पना, ग्रहीतके, एकमेकांच्या अपेक्षा याचे आदान-प्रदान फार उघडपणे झाले असेल असे नाही. एकमेकांना देण्याघेण्यातून आणि बर्‍याचशा अव्यक्त अशा रूपातून हा पाया मजबूत होत गेला, ज्यातून ‘लोक’ नावाची सामाजिक घडण आकाराला आली.

‘राष्ट्र’ ही संज्ञा खूप काळ ‘लोक’ यासाठी संपूर्णत: नसली तरी अल्पांशाने समानअर्थी म्हणून वापरली जात होती. राष्ट्र ही संकल्पना प्रामुख्याने प्रदेश/ जमिनीच्या अनुषंगाने आली. लोक ज्या प्रदेशात किंवा भूभागावर त्यांना आणि त्या प्रदेशाला ‘राष्ट्र’ म्हणून ओळखले जाऊ लागले. सुरुवातीला, राष्ट्र याचा एक अर्थ ‘नियंत्रित झालेले लोक’ असा होता. तरीही, आर्थिक देवाण-घेवाण, श्रमाची विभागणी, समाजातील व्यक्तीची सुरक्षितता, यांच्यातील वाढत्या गुंतागुंतीमुळे ‘लोक’-समाजाने ‘राष्ट्र’ ही संकल्पना स्वीकारली. ही प्रक्रिया पूर्ण व्हायला काही हजार वर्षे जावी लागली. व्यक्ती आणि राष्ट्र यांच्यातील नात्याचे स्वरूप पाहता त्या दोहोंत एक ‘सामाजिक करार’ (रुसोंच्या भाषेत) निर्माण झाला. कालांतराने लोकांना राष्ट्र नावाच्या गोष्टीला आणि त्या राष्ट्राचे ‘नागरिक’ म्हणून कवटाळायला भाग पाडले गेले.

वेगवेगळ्या रूपात होणारी उघड आक्रमणे आणि हल्ले आणि छुप्या हिंसा या बाबतीत राष्ट्राने नागरिकांची सुरक्षितता करावी अशी लोकांची अपेक्षा असते. आपल्यावर होणार्‍या किंवा नियंत्रित केल्या जाणार्‍या हिंसेच्या बदल्यांत देशाकडे असणार्‍या हिंसेच्या नियंत्रणाला ते शरण जातात. सौंदर्य, उद्दात-भावना, संस्कृती, आशय दडवण्याचा कला-सदृश्य प्रयत्न किंवा सर्वसाधारण परिस्थितीतसुद्धा देश आणि नागरिक या नात्यांचे बर्‍याचदा विविध रूपात उदात्तीकरण केले जाते; वेगवेगळे आकार धारण करून हे अनेक संस्कृतीत घडलेले आहे. गेल्या दोन शतकांत या उदात्तीकरणाने, राष्ट्र संकल्पनेला जगभर हातभार लावला आहे; तो बराचसा आभासी विचार रुजवला आहे.

राष्ट्र हळूहळू लोकांना नागरिक बनवत राहते. इतिहासाच्या ओघात एकदा माणसाचे ‘लोक’, लोकांचे ‘राष्ट्र’ आणि राष्ट्रातील समाज ‘नागरिक’ झाले की नंतर बहुतेक ते नागरिक सतत स्वत:ला नागरिक या स्वरूपातच ओळखायला लागतात, आणि आपण लोकही आहोत हे हळूहळू विसरायला लागतात. तथापि, कधीतरी एखाद्या देशाचे नागरिक जेव्हा प्रचंड मानसिक ताणाखाली येतात तेव्हा ते नागरिक म्हणून राहण्यापेक्षा पुन्हा एकदा ‘लोक’ म्हणून राहणे पसंत करतात, कारण हे त्यांचे मूळ स्वरूप आहे. लोकांना त्यांच्या स्वत्वाचा असा पुनःशोध लागणे असे क्षण हे इतिहासात खूप महत्त्वाचे असतात; इतिहास बदलण्याच्या क्षणांना ते अधोरेखित करतात. असा ऐतिहासिक एक क्षण आपण आपल्या देशाने जेव्हा आपल्या देशाची घटना (Constitution) लागू करण्यात आली तेव्हा अनुभवलेला आहे. ‘वुई द पीपल ऑफ इंडिया’ ‘आम्ही भारतातील लोक’ भारताच्या लोकशाहीचे चिन्ह म्हणून ओळखले जाणारे हेच ते आपल्या घटनेच्या सुरुवातीचे सश्रद्ध शब्द. ही घटनेची अभिव्यक्ती प्रत्येक भारतीयाच्या वुई द पीपल ऑफ इंडिया मनाच्या खोल तळात वुई द पीपल ऑफ इंडिया रुतून गेली आहे. त्यांच्या जाणिवेतून ती आता दूर करणे हे कधीच शक्य होणार नाही. आज आपल्या वर्तमानात घडत असलेली घटना हा एक असाच एक क्षण आहे. आहोत आणि त्यामुळे कदाचित आपल्याला ही सारी प्रक्रिया नीट आकलन करून घेणे कठीणच आहे. ण् म्हणजेच नागरिकत्व कायदा दुरुस्तीने (Citizenship Amendment Act, 2019) आपणांस सगळीकडून घेरले आहे.

हे असे घडले…

राष्ट्रीय लोकशाही युती (The National Democratic Alliance, NDA) हे उजव्या राजकीय पक्षांचे सरकार मे 2019 मध्ये पुन्हा भरपूर बहुमताने सत्तेत आले. प्रथमत: या सरकारने काय केले? तर जम्मू, काश्मीर आणि लडाख या संयुक्त राज्याचे लहान लहान व स्वतंत्र राज्यात तुकडे केले. नंतर ते अयोध्यावर घसरले; अयोध्या प्रश्‍नावरचा निर्णय. शंभरेक वर्षापूर्वीची मस्जिद उद्ध्वस्त केली जाणे हा एक गुन्हा आहे;, ही वस्तुस्थिती बाजूला सारून राममंदिर बांधण्याचा निर्णय देण्यात आला. काही आठवड्यांनंतर, 2002च्या गुजरात दंगलीमधील सहअपराधिता आणि गुन्ह्यात सामील असण्याविषयीच्या संदर्भात नरेंद्र मोदी यांना क्लीनचिट देण्यात आली आणि शेवटी, जग जेव्हा आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन साजरा करत होते, या दिवशी हे बिल लोकसभेत पारित करण्यात आले, नंतर ते राज्यसभेमध्ये सुद्धा पारित करण्यात आले. हे बिल देशाच्या राष्ट्रपतींनी ताबडतोब मंजूर केले आणि हा कायदा अमलात आला. ज्या वेगाने या घटना घडल्या आणि हे वादळ उठवून दिले व ज्या निष्ठुरपणे आणि क्रूरपणे नागरिकत्व दुरुस्तीचा कायदा स्वीकारला गेला, ते पाहता या कायद्यातून धर्मभेद आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा हेतू होता हे स्पष्ट आहे.. हा आपल्या देशाचा आता स्थायीभाव झालेला आहे. पण यातून देशातल्या नागरिकांच्या ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्या मोदी-शहा शासनाने आजपर्यंत अनुभवलेल्या नव्हत्या.

सर्वप्रथम, सर्वोच्च न्यायालयात लोकांनी शंभरेक जनहितार्थ याचिका दाखल केल्या, न्याय व्यवस्थेची विश्‍वासार्हता ही निकृष्ट दर्जाची आहे, तरीदेखील ही घटना फार महत्त्वाची ठरली. सरकारच्या या विभाजक कृतीविरोधी देशातील विद्यापीठांच्या परिसरात विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी आंदोलन छेडायला सुरुवात केली. धर्मभेद, जात, पंथ विसरून देशातील सर्वसामान्य जनता यांनी निषेध नोंदवायला सुरुवात केली. यासंदर्भात शेकडो बैठका, निषेध मोर्चे आणि रेलीज यांचे आयोजन होऊ लागले. भाजपच्या प्रचार यंत्र ज्यांची सतत निंदा करत असतात ती ‘तुकडे-तुकडे-गँग’ (म्हणजे उदारमतवादी आणि फॅसिझम विरोधी मंडळी) नव्हते. हे ‘खान मार्केट इंटलेक्च्युअल्स’ ही नव्हते. हे ‘लोक’ होते; माणसे होती लहान-मोठ्या गावातून आणि शहरातून आलेली. हा संताप, आणि हा क्रोध, हा निषेध लोकांचा होता; तो देशातील सर्व परिसरांतून येत होता. ‘राष्ट्रीय’ मीडियाने या देशभर पसरलेल्या निषेधाच्या गोष्टींना आपल्या कॅमेर्‍यात कैद करावे, ही अपेक्षा कोणाचीच नव्हती. पण देशातल्या स्थानिक, छोट्या-मोठ्या वर्तमानपत्रांनी आणि सोशल मीडियावर या देशभर पसरलेल्या निषेधाची नोंद भरपूर घेतली गेली. एकामागून एक देशातील राज्याने NRC (National Register of Citizens भारतीय राष्ट्रीय नागरिक रजिस्टर) अमलात आणणार नाही याचा निर्धार केला. उसळलेल्या लोकक्षोभाला अनुसरून राजकीय पक्षांनी सभा घेतल्या, निषेधमोर्चे काढले. अपेक्षेप्रमाणे निषेध मोर्चे, सभा यावर निर्दयपणे क्रूर पोलीस हल्ले करण्यात आले. हिंसा भडकली आणि अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.

भाजप आरएसएसचा हिंदुत्व अजेंडा राबवत आहे, त्याच्या विरोधात, त्याला नाकारण्यासाठीचा, हा जनक्षोभ होता का? बहुतेक नाही; कारण सात महिन्यांपूर्वी याच लोकांनी भाजपला निवडून दिले आहे. अगदी उघडपणे आणि अविवेकी ‘वर्गीकरणावर’ ण् आधारलेले आहे ज्यामध्ये केवळ काही देशांतील स्थलांतरितांना आश्रय देण्याची तरतूद केली आहे म्हणून हा क्षोभ उसळला का? बहुतेक नाही. अशाच घटना याही पूर्वी झालेल्या आहेत. पूर्वीच्या शासनांनी, राजकीय पक्षांनी अशा कायदेशीर करारांना अधिकृतपणे पाठिंबा दिला आहे. हा एक नेहमीच्या रूटीन प्रशासकीय आखणीचा भाग होता. एका किंवा अनेक राजकीय पक्षांचे किंवा सामाजिक संघटनांचे त्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया किंवा पडसाद होते का?.

पश्‍चिम बंगाल आणि र्‍ण् - बाधीत उत्तर पूर्व प्रदेश सोडले तर भारताच्या इतर कोणत्याही प्रदेशात याबद्दल काही ताबडतोब घाईची प्रतिक्रिया देण्याचे काही कारण नव्हते. या संपूर्ण निषेधपर्वात कुठेही एकच नेता या सर्वांचे नेतृत्व करत नव्हता. हा क्षोभ मग देशातल्या एकुणात आर्थिक परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या बेकारी आणि मंदीचा परिणाम असावा का? बहुतेक हेही कारण नसावे. या गोंधळाच्या आणि धांदलीच्या परिस्थितीतसुद्धा भांडवली बाजाराचे निर्देशांक हे वाढत चाललेले होते. यावेळी रोटी-कपडा-मकानसारखे प्रत्यक्ष प्रश्‍नही मूर्त असे नव्हते. हा प्रतिसाद नेणिवेतून कार्यान्वित झाला होता. हा निषेध राजकीय किंवा आर्थिक नव्हता; तो ‘आपण लोक आहोत’ या नेणिवेतून उद्भवलेला होता.

जबरदस्तीने निर्णय घ्यायला मदतरूप होईल असे बहुमत, सरकारची बहुसंख्याक अभिमुखता, जम्मू आणि काश्मीर याची विभागणी, नागरिकत्व दुरुस्तीचा कायदा आणि भारतीय राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (NRC)  बद्दलची अस्वस्थता आणि विद्यापीठांच्या कॅम्पसमधून विद्यार्थी प्राध्यापक स्थानबद्ध करणे, अटक करून तुरुंगात डांबून ठेवणे या सर्वांचा तो एकत्रित परिणाम होता. यात नागरिकांना जबरदस्तीने ‘राष्ट्र’ बनवले जात होते. राष्ट्र, देशभक्ती, देशद्रोह हे शब्द (संज्ञा) सार्वजनिकरीत्या लोकांच्या बोलण्यातून वारंवार येत आहेत; हे असे यापूर्वी कधी घडले नव्हते. लोकांना या शब्दांचा ओव्हरडोस झाला आहे. त्यामुळे त्यांच्या भावना या उद्दीपित झाल्या आहेत. या देशातल्या नागरिकांची मने या शब्दामुळे हेंदकळायला लागली आहे. त्यांच्या स्मृतीत आता केवळ एक राष्ट्र नव्हे तर आपण अनेक उप-राष्ट्रे आहोत अशा भावना निर्माण होऊ लागल्या आहेत. या वर्षीच्या हिवाळ्यातील आंदोलनाने केंद्र सरकारचा बराच मोठा कायदेशीर विश्‍वासार्हतेचा भाग हिरावून घेतला आहे आणि याउलट भारतीय राज्यांना तो मोठ्या प्रमाणात प्राप्त झाला आहे. कोणत्याही राजकीय विश्‍लेषण तज्ज्ञाच्या नजरेतून न सुटणारी बाब आहे. अजूनही काही अधिक घडले. NRC मुळे भारतीय नागरिक एका विचित्र कचाट्यात सापडले आहेत, यानिमित्ताने ‘आपण लोक आहोत’ या भावनेचा त्यांना पुन:स्पर्श झाला. हा निषेध अरब स्प्रिंग आंदोलनासारखा किंवा हाँगकाँगचा निषेध निश्‍चितच नव्हता; तो खास भारतीय होता. या निषेधामुळे भारतीयांना ‘आपण लोक आहोत’ त्याचे स्मरण झाले. हीच आपली ओळख आहे हेही त्यांना पुनश्‍च लक्षात आले. धर्म, भाषा, वांशिकता यापलीकडे जाऊन ज्या नियतीशी करार केला (ट्रस्ट विथ डेस्टिनी), ते लोक बोलले. भारतीय लोकांच्या पुन्हा धैर्यच्या प्राप्तीसाठी हे एकच कारण पुरेसे आहे.
- गणेश देवी
(अनुवाद : दीपक बोरगावे)

Wednesday, 18 December 2019

लोकशाहीच्या वृद्धीसाठी नव्या आशेचा किरण

मी चार-पाच वर्षांचा होतो तेव्हा माझ्या वडिलांनी रेडिओ घरी आणला. त्या घटनेला आता सहा दशके होऊन गेली आहेत. त्या काळात घरी रेडिओ असणे ही गोष्ट फार प्रतिष्ठेची असे.त्या रेडिओ-सेटचा ‘मेक’  मार्कोनी, फिलिप्स का अजून कोणत्या कंपनीचा होता, हे मला आज स्पष्टसं आठवत नाही. पण घरात आणल्या-आणल्या वडिलांनी तो लगेचच ‘ऑन’ केला, हे मात्र चांगलं आठवतं.  त्यात के. एल. सैगल, हेमंत कुमार, खुर्शिद आणि तलद मेहमूद यांची गाणी वाजायची. ही सारी गाणी आजही मला शब्दश: आठवतात. तेव्हापासून रेडिओवर  संगीताचे कार्यक्रम मी ऐकत आलो आहे. अर्थात, गाणी मी रेडिओ व्यतिरिक्त इतरही माध्यमातून ऐकत आलो आहे. घरातील ज्येष्ठ मंडळी काम करत असताना गुणगुणत असायची ती गाणी, सणासुदीला, लग्न समारंभात, घरात बारश्यामध्ये  ऐकायला मिळालेली गाणी, गावोगाव भटकणारे, शेतात खपणारे कष्टकरी  म्हणतात ती, लोणचे-पापड घालताना स्त्रिया म्हणतात ती  गाणी, किर्तन, भजन, भारूड, तमाशा या व अशा प्रसंगातून ऐकलेली गाणी. सर्वात मधुर म्हणजे बाळाला झोपवत असताना आया गुणगुणतात ती अंगाई.

बऱ्याच काळानंतर, मी जेव्हा माझ्या तिशीत होतो, तेव्हा पश्‍चिम भारतातील आदिवासी लोकांमध्ये मी काम करू लागलो होतो. बर्‍याचदा आमचे बोलणे त्यांच्या अस्मितेसंबंधी असायचे. बहुतेक आदिवासी अस्मितेच्या संदर्भात त्यांच्या गीत-परंपरेविषयी बोलायचे. तोपर्यंत मी मार्क्स, गांधी, आंबेडकर, लोहिया वाचले होते.  मला वाटायचे की, त्यांच्यावर (आदिवासींवर) होणार्‍या अन्यायामुळे आदिवासी अत्यंत संतप्त असतील, ज्या व्यवस्थेने त्यांना ही वेदना दिली, त्याबद्दल ते काहीतरी बोलतील. पण आदिवासींच्या बोलण्यात त्या बाबी क्वचितच यायच्या. मला त्याचे आश्‍चर्य वाटायचे. त्यांच्या बोलण्यात थेट राजकीय बाबी जवळपास नसायच्याच. ते जे काही बोलत असत त्याला ‘सांस्कृतिक’ म्हणता येईल. त्यांच्याबरोबर काम करताना माझा असंख्य आदिवासी समुदायांशी संबंध बनला होता. त्यातल्या काहींचे स्वत:चे महाभारत होते, व ते त्यांचे संपूर्ण महाभारत गाऊ शकतात, हा अनुभव मी घेऊ शकलो. गुजरात आणि राजस्थानच्या सीमेवर राहणार्‍या भिल्ल-आदिवासींची स्वत:ची अशी चार महाकाव्ये आहेत. ही गाणारी मंडळी संपूर्ण महाकाव्ये गातात. त्यातील एकही शब्द न गाळता त्याचे सादरीकरण करतात. मध्य भारतातील जंगलातील राज्यात भर्तरी जमातीचे काही आदिवासी माझ्या संपर्कात आले. त्यांना मी विचारल्यावर (केवळ मी विचारले म्हणून), एका राजाच्या आयुष्यावर आधारित संपूर्ण गीतरूप गोष्ट मला गाऊन दाखवली. ‘बंजारा’ समुदायातील माझ्या एका मित्राने मला सांगितले की त्यांच्यात लेहंगी नावाचा काव्य प्रकार असतो. मी सुचवले की त्याला जितक्या आठवतील,जशा माहीत असतील तशा त्या त्याने लिहून काढाव्यात. तो म्हणाला, जवळपास 6,000 ‘लेहंगी’ त्याच्या लक्षात आहेत. हे ऐकून मला फारसे आश्‍चर्य वाटले नाही, कारण यापूर्वी ‘नायक’ जमातीतल्या माझ्या एका मित्राने मला सांगितले होते की, त्याला त्यांच्या साहित्य-संस्कृतीतील 9,000 गाणी त्याच्या लक्षात होती आणि हा गाणारा पक्का. त्याचा आवाज जबरदस्त.  एका गाण्यानंतर दुसरे गाणे असे तो सलग ही ‘गाणी’ म्हणत असे. आजही ही गाणी आठवली तर, मी रोमांचित होऊन जातो. भारतीय समाजात ‘ट्राईब’ आणि ‘जात’ हे दोन वेगळ्या प्रकारचे समुदाय आहेत. जे ‘जाती’ आहेत ते ‘ट्राईब’ नाहीत आणि जे ‘ट्राईब’ आहेत ते ‘जाती’ च्या पिरॅमिडमध्ये नाहीत. मात्र हा फरक दोहोंच्यात असणार्‍या गीत-सोसामुळे नाहीसा होतो. संगीत प्रेमात हे एकत्र येतात.

माझ्याच वयोगटातल्या व्यक्तींबरोबर किशोरवयात आणि तारुण्यात असताना मी खूप प्रवास केला आहे. या प्रत्येक प्रवासात आम्ही एक खेळ खेळायचो, ज्याला आपण ‘अंताक्षरी’ किंवा ‘गाण्याच्या भेंड्या’ असे म्हणतो. तो कदाचित फक्त भारतीय आणि कदाचित आफ्रिकन्स, खेळतात. या खेळाला बोर्ड, बॅट, बॉल... कोणतीच साधनसामुग्री लागत नाही. यात केवळ एकाच गोष्टीची आवश्यकता असते आणि ती म्हणजे, तुम्हाला गाता आले पाहिजे. यात दोन टीम्स असतात. हा खेळ सतत खेळता येतो. याला अंत नसतो. या खेळात हार आणि जीत असे काही नसते. यासाठी कोणत्याही प्रशिक्षणाची गरज नसते, किंवा तुमचा आवाज खूप गोड वगैरे असावा अशीही अपेक्षा नसते. मला माहीत असलेला हा ‘अंताक्षरीचा खेळ’ कदाचित सर्वात लोकशाहीवादी असावा.

गाणी आणि गाणारे यांची भारताची ऐतिहासिक संस्मरणे समृद्ध आहेत; ती दुसर्‍या संस्कृतीतील मानकांच्या तुलनेत  कितीतरी जास्त समृद्ध आहेत. मध्ययुगीन कालखंडाचा आपण  जेव्हा विचार करतो तेव्हा जी नावे आपल्या समोर पटकन उभी राहतात ती म्हणजे कबीर आणि मीरा, जयदेव आणि चंडीदास, सूरदास आणि नानक, अक्का महादेवी आणि तुकाराम, त्यागराज आणि नरसी मेहता. यातील प्रत्येकजणानं श्रेष्ठ दर्जाची गाणी निर्माण केली आणि हे प्रत्येकजण आपापल्या कालखंडात वैशिष्ट्यपूर्ण गायक म्हणून ओळखले गेले.  त्यांच्यातल्या प्रत्येकाचे स्वतःचे असे विशिष्ट तत्त्वज्ञान होते. तरीही यातील प्रत्येकजण ‘प्रेमाचे गाणे’ म्हणणारे म्हणून भारताच्या स्मरणात राहिले आहेत.

‘रघुपती राघव राजाराम’ किंवा ‘वैष्णव जन तो तेणे रे कहिये’ ही गांधीजींना प्रिय असणारी भजनं प्रत्येक भारतीय केव्हा-ना-केव्हा  गायलेला असतो. यातून संगीताबद्दलची गांधीजींची आस्थाही जाणवते. रवींद्रनाथ टागोर यांची प्रतिभा एखाद्या विस्तृत-पटलाची होती;  तत्त्वज्ञान, शिक्षण, नाटक, राजकारण, कथा-कादंबरी, चित्र आणि काव्य यात स्वैर भरारी घेणारी होती. विसाव्या शतकातील भारतीय संस्कृतीवर त्यांची  अमिट छाप आहे. तथापि, रविंद्रनाथ टागोर लोकमानसात थेटवर रुजले त्याचे सगळ्यात जास्त श्रेय जाते रवींद्र संगीताला.

मोठ्या प्रमाणात स्मरणात राहिलेली गाणी आठवून गुणगुणण्याची सवय  ही सर्वसामान्य भारतीयांचा ‘म.सा.वि.’-- किमान गुण--असावा. भले तो कुठल्याही आवाजात, कसंही गाणं म्हणो; या बाबतीत भारताचा जगात पहिला नंबर लागेल यात शंका नाही. राजस्थानमधील सुफी, बंगालमधील बाउल, महाराष्ट्रातील वारकरी, आसाममधील बिहू गाणी आणि गुजरातमधील प्रत्येक तरुण आणि तरुणी ज्या उत्साहाने गरबा नृत्यात गाणी म्हणत सहभागी होतात हे ऐकल्यावर/पाहिल्यावर, आपण सारेजण गाणी आणि संगीतावर अत्यंतिक प्रेम करणारे आहोत हे स्पष्ट  होते.  यातून एक राष्ट्र म्हणून आपली अस्मिता निश्‍चित झाली आहे. मज्जासंस्थेच्या किंवा मेंदुच्या विकारांवर उपचार करणार्‍या तज्ज्ञांच्या मते, मेंदूमध्ये भाषा आणि संगीत याच्या आकलनाची दोन वेगवेगळी केंद्रे असतात: एका भागात भाषेची जाण आणि तर्कबुद्धी तर, दुसर्‍या स्मरणभागातील एका कप्प्यात संगीत लयींचे आलेख कोरलेले असतात. ‘गाण्याचा तुडवडा’ असणार्‍या दुसर्‍या संस्कृतीतील लोकांच्या मनांपेक्षा भारतीय मन हे ‘अतिरिक्त गाण्यांना’ आणि भाषेच्या गारुडाला प्रतिसाद देणारे आहे, हे विधान जरी थोडे धाडसाचे असले तरी, ते सर्वसाधारण तर्काला धरून आहे असे वाटते. वसाहतवादामुळे प्रत्येक तर्काधिष्ठित आणि सर्जन क्षेत्रात आपली अभिरुची बदलत गेली, पण भारतात संगीताची अभिरुची बहुतांशी तीच राहिली आणि आपण त्याच्याशी वसाहतवादी कालखंडात आणि नंतर सुद्धा निगडीत राहिलो.   विशेषत: उत्तर-वसाहतीक कालखंडात सिनेमा नावाची आधुनिक गोष्ट आपल्याकडे आली; ही कला संपूर्णत: तंत्राधिष्टीत गोष्टींवर आधारलेली होती. या आधुनिक कलेला आपण मनापासून स्वीकारले आणि यात आपण ताबडतोब गाण्याचा बेसुमार वापर करायला सुरुवात केली. सिनेमातली ही गाणी आपल्यासाठी अधिकच  महत्त्वाची ठरली. शिवाय ती बर्‍याचदा आपल्या सामुदायिक कृतीच्या केंद्रस्थानी राहिली. एक मध्य पूर्व देशातील चित्रपट अपवाद म्हणून सोडला तर, ही गोष्ट जगामध्ये इतरत्र कोणत्याही सिनेमा इतिहासात  घडलेली आपणांस दिसत नाही. त्यामुळे ‘गीत’  भारतीय महासंस्कृतीचे खास वैशिष्ट्य, गुणविशेष किंवा अंग आहे, असे म्हटले तर यात फारसे चुकीचे नाही.

गेल्या महिन्यात जेव्हा बेंगलोरमध्ये अनेक ठिकाणी ग्राफिटी (graffiti, सार्वजनिक ठिकाणी भिंतींवर वगैरे काढलेली चित्रे किंवा लिहिलेला मजकूर, भित्तिचित्र, भित्तिलेख, भिंती चितारणे वगैरे) लिहिल्या जात आहे हे समजल्यावर, हे वर नोंदवलेले विचार माझ्या मनात आले. या ग्राफिटीचा संदर्भ असा होता :  रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्समध्ये  जे गाण्याचे लाईव्ह कार्यक्रम होत असतात ते बंद करून त्याबद्दल कठोर आणि कडक कारवाई केली जाईल अशा आशयाच्या सूचना कर्नाटक सरकारने दिल्या. त्याच्या प्रतिकारासाठी ग्राफिटी आली. लोकांनी या अशा कारवाईबद्दल या ग्राफिटींमधून सरकारला काही संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. ‘संगीत मुक्त करा, सरकारचे नियंत्रण नको, संगीत हा लोकांचा आत्मा आहे, त्याला तुम्ही लोकांपासून हिरावून घेऊ नका’ अशा प्रकारच्या ग्राफिटीज लोकांनी लिहिल्या होत्या. अचानकपणे बेंगलोरमधील महात्मा गांधी मार्ग, म्युझियम मार्ग, लॉवेलं आणि सेन्ट-मार्कस मार्ग या महत्त्वाच्या रस्त्यांवर या ग्राफिटीज झळकायला लागल्या. आजची तरूणाई ही या रस्त्यांवरून बहुतांशी नजरेस पडते. ज्या पोलिस यंत्रणेने या तरुणाईचे संगीत बंद केले होते, ते लिहू लागले होते, 'Remember to forget, Four Ders, Sammzie, Rastad, King Turac, Guess who, King and Zero’ यांचा उद्घोष सुरू झाला. आणि या ग्राफिटीबद्दलचा राज्यसंस्थेचा प्रतिसाद काय होता, तर हा उद्योग कोणी केला? याचा शोध राज्यसंस्था घेऊ लागली आणि त्यांना कस्टडीत ठेवण्याची तयारी करू लागली. ‘गाण्या’ बद्दलची आस्था असणार्‍या कोणत्याही भारतीयाला हे समजणे कठीण नाही की, हा निषेध ‘गाणी’, ‘संगीत’ किंवा इंद्रिय सुखाबद्दलचा नव्हताच. या निषेधाचा  मतितार्थ हा खोलवर जाणार आहे आणि उघड उघड प्रगतिशील राजकारणाचा आहे.  इ. स. 2000 च्या आसपास जन्माला आलेल्या या नव्या तरुण पिढीकडून आलेला हा प्रश्‍न आहे. सांस्कृतिक प्रश्‍नांची चिकित्सा करणार्‍या समीक्षकासमोर हा बेंगलोरमधल्या ग्राफिटीचा प्रश्‍न ठेवला तर, याबद्दलचे काय विवेचन असू शकते? अलिकडेच महाराष्ट्र आणि हरियाणा येथील जनतेने सत्ताधारी पक्षाला त्यांची जागा दाखवून दिली आणि याचदरम्यान तरुणाईची ही ग्राफिटी बेंगलोरमधील रस्त्यांवर उमटलेली दिसते. हा काही योगायोगाचा भाग नाही. हा केवळ भाषण, लेखन, इ. कोणत्या तरी हेतूने केलेला पक्षपाती स्वरुपाचा राजकीय मतप्रदर्शनाचा किंवा प्रवृत्तीचा हेतुपुरस्सर भाग आहे म्हणून याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. बेंगलोरमध्ये येऊ लागलेले हे ग्राफिटी लेखन सत्ताधार्‍यांना  अधिक बारकाईने वाचावे लागेल. हे असे अजुनी एक ’गाणे’ लोकशाहीच्या वृद्धीसाठी. या नव्या  गीत-आंदोलनांत एक नव्या आशेचा किरण दिसतोय.

- गणेश देवी
भाषांतर : दिपक बोरगावे

(What unites indians is a love for songs' - The Telegraph - 1.11.19 या मूळ इंग्रजी लेखाचे मराठी भाषांतर)

Tuesday, 17 December 2019

शौकत कैफी आझमी आनंदोत्सव


अनेक संस्कृतीत जन्माप्रमाणे मृत्यूचाही उत्सव केला जातो. मरण हे मानवी वास्तव जीवनाचा भागच आहे. परंतु मृत माणसांच्या आठवणी त्याच्या चांगल्या स्मृती व कार्य यांची आठवण म्हणजे सेलेब्रेशन होय!

26 नोव्हेंबर, 2019 रोजी मुंबईत जलाराम सभागृह, विलेपार्ले येथे शौकत कैफी आझम यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. या श्रद्धांजली सभेला आझमी कुटुंबीयांच्या कल्पक आयोजनामुळे आनंदोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते. शबाना आझमी, बाबा आझमी या शौकतच्या मुलांनी आणि कुटुंबीयांनी अभिनव पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित करून सर्वांना मोहित केले.
सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल, राकेश रोशन, अभिनेत्री काजोल व तब्बूसह अनेक सहकलाकारांनी शौकतजींना आदरांजली वाहिली.

शौकत आझमी यांचे व्यक्तिमत्त्व भारदस्त होते. त्या स्वत: कलावंत होत्या व त्यांना अभिनय संगीत, कविता यांची चांगली जाण होती व चांगले जीवन जगण्याची कलाही त्यांना अवगत होती. हैद्राबाद संस्थानाच्या मोठ्या अधिकार्‍याची मुलगी लखनऊच्या जमीनदार घराण्याचे बंडखोर शायर असलेल्या कैफी आझमी यांच्या प्रेमात पडली. खरं पाहता आधी त्यांच्या शायरीच्या व नंतर शायरच्या प्रेमात पडली असे म्हणणे जास्त योग्य होईल. स्वभावच बंडखोर असलेल्या शौकतजींनी घरातला विरोध मोडून काढला व आपल्या वडिलांना मुंबईत येऊन 40रु. महिना घेऊन खोलीत कम्युनमध्ये राहणार्‍या कैफी आझमीशी लग्न करून देण्यास भाग पाडले! हे तत्कालीन समाज स्थितीत मोठे क्रांतिकारीच होते! अत्यंत सुस्थितीत राहणारी ही मुलगी मुंबईत एका खोलीत कम्युनमध्ये राहण्यास आली! लखनऊ व हैद्राबाद या दोन शहरांना तत्कालीन काळात गंगा-जमुना तहजीब म्हणत असत, म्हणजे, ती हिंदू-मुस्लीम एकत्र राहण्याची शहरे होती व त्याचा प्रभाव आयुष्यभर त्यांच्यावर होता. कम्युनिस्ट नसलेली ही महिला आपल्या प्रेमासाठी कम्युनिस्ट झाली व अंतापर्यंत चांगली कम्युनिस्ट म्हणून जगली तिची जीवनमूल्ये इतरांना प्रेरणादायी ठरली.

कार्यक्रमाची सुरुवात सतारवादनांनी व नंतर आझमी कुटुंबीयांचाच घनिष्ठ स्नेह असलेल्या सिंग या प्रतिभावान गायकाच्या गाण्याने झाली, कैफी आझमीची एक लम्हा, ही गझल व नंतर मिर्झा गालिब, शौकत आझमी यांची आवडती गझल गाऊन या गायकाने रंगत आणली व मैफल जमवली. शबाना आझमीने आपल्या निवेदनात आपल्या आईवडिलांच्या अनेक आठवणी जागवल्या.

शौकत आझमी दररोज सकाळी तब्येतीत चहा घेत असत! त्यावरून कैफीनी ‘तुम कुछ ना कहो, मैं कुछ ना कहुँ’, ही गझल लिहिली होती. शबाना यांनी आपल्या वडिलांची व शौकतजींना गप्प करण्याची इच्छाच या निमित्ताने व्यक्त केली असे सांगितले.

शौकत आझमी यांनी ‘‘कैफी आणि मी’’ हे पुस्तक लिहिले. ते इंग्रजीत आले. तेव्हा नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांनी त्या बद्दल फारच चांगले लिहिले. ते आपल्या आईला वाचून दाखवल्यावर त्यांनी हे अमर्त्य सेन कोण? असे विचारले शबानाने ते मोठे अर्थतज्ज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते आहेत, हे सांगितल्यावर सायंकाळी शौकत जी 16 साड्या विकत घेऊन आल्या! शबानाने हे काय? मी पण एवढ्या साड्या एकदम आणल्या नाहीत हे सांगितले! त्यावर तुझी स्तुती अमर्त्य सेन यांनी केली का? असा प्रश्‍न विचारून आपला आनंद शौकतजींनी व्यक्त केल्याची आठवणही शबानाने सांगितली.

सुप्रसिद्ध ड्रेस डिझाईनर भावना सोमय्या या शबाना आझमीच्या मैत्रिणी आहेत. तसेच त्या कुटुंबांच्या सदस्यदेखील! त्यांनी शौकतजीच्या साडी प्रेमाबद्दल, मॅचिंगच्या त्यांच्या आग्रहाबद्दल सांगतानाच, मला साडी नेसव, लिपस्टिक पावडर लाव, चादर नीट कर, कारण डॉक्टर येणार आहेत असे सांगणार्‍या एका वेगळ्याच व्यक्तिमत्त्वाची शौकतजीची ओळख करून दिली. इप्टाचे जावेद आनंद यांनी त्यांच्या कलाकार म्हणून असलेल्या कामगिरीची व उच्चदर्जाच्या अभिनयाची माहिती दिली. विशेषत: भूमिकेत समरस होणार्‍या त्यांच्या अभिनयाच्या ताकदीची उदाहरणे त्यांनी उमरावजान व इतर चित्रपटातील अभिनयाची उदाहरणे दिली.

शौकतची सून व त्यांची मुलगी तन्वी आझमी यांनी आपल्या सासूबद्दल अनेक छोट्यामोठ्या घटना सांगून त्यांचे व्यक्तित्व उलगडले. विशेषत: लग्न झाल्यावर कैफीजींनी स्त्री स्वातंत्र्य, सक्षमीकरण, व्यक्तिमत्त्व विकास याबद्दल सतत बोलणार्‍या  सासूपासून सावधान राहण्याचा दिलेला इशारा फारच  महत्त्वाच्या पैलूंची आठवण करून देणारा ठरला.

जावेद अख्तर या त्यांच्या जावयाने फारच चांगल्या व योग्य तर्‍हेने शौकतजीच्या व्यक्तित्वाचा आढावा घेतला. अखंड प्रेमात पडलेली स्त्री, वाहत जाऊन शेवटी दासी वा गुलाम होते. परंतु शौकतजींनी ते होऊ दिले नाही. त्यांनी शैलीवर, त्यांच्या काव्यावर जिवापाड प्रेम केले. 55 वर्षे त्यांना साथ दिली. स्वतंत्र व्यक्तिमत्त्व व ओळख कायम ठेवली. हे त्यांचे जगणे अवघड परंतु तेवढेच महत्त्वाचे होते.

त्यांना खोटे बोलणे जमायचे नाही. त्यामुळे सलीम-जावेद यांचा ‘इमान धरम’ हा चित्रपट चालणार नाही. हे त्यांनी स्पष्टपणे जावेद अख्तर, यांना त्याचा खास शो पाहिल्यावर सांगितले होते. त्यानंतर काही आठवड्यांनी जावेद अख्तर हा प्रसंग विसरले असताना, ‘त्रिशूल’ या चित्रपटाचा शो पाहून त्यांनी जावेद यांना हा चांगला चित्रपट आहे, असे आवर्जून सांगून, जुन्या इमान-धरमच्या वेळी केलेल्या व्यक्तव्याची आठवण करून दिली.

एका जीवनपटात शबाना यांनी नेसलेली साडी व ब्लाऊज यांच्या बद्दल काय बेकार मॅचिंग आहे असे सर्वांसमोर त्यांनी आपले मत मांडण्याचा किस्साही सांगितला. त्या आजारी असताना त्यांच्या नातीने त्यांची केलेली देखभाल ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वासाठी प्रेमाच्या आठवणी ठरल्या. या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

हिंदू-मुस्लीम असा भेद न मानणारे हे कम्युनिस्ट कुटुंब आहे. याची जाणीव जेव्हा शबानाजींना झाली तेव्हा त्यांनी सर्वांना नमस्कार न करता लाल सलाम केला.

या आदरांजली सभेला कॉ. सुरेश धोपेश्वरकर, कॉ. राजन बावडेकर, कॉ. प्रकाश रेड्डी, कॉ. चारुल जोशी व इतर अनेक पक्ष व इप्टा सदस्य उपस्थित होते.

- डॉ. भालचंद्र कानगो

Thursday, 21 November 2019

सुधीर पटवर्धन : मानवी संबंधांचा शोध घेणारा चित्रकार


सुधीर पटवर्धनांच्या एकूण कलाप्रवासाचा आढावा घेतला तर त्यांच्या चित्रांतील विषयांना भोवतालच्या वास्तवाचे व वर्तमानकाळाचे स्पष्ट संदर्भ असल्याचं लक्षात येतं. आजूबाजूच्या सामाजिक घनांना, विशिष्ट क्षणांना साकार करताना केवळ स्वत:चं अंतर्गत कल्पनाविश्‍व, अमूर्त संकल्पना प्रतीकात्मकरीत्या किंवा रूपकाद्वारे सादर करण्याचे फारसे प्रयत्न दिसत नाहीत. पण 1998 साली बरीचशी चित्रं करताना मात्र त्यांनी प्रतीकांचा आधार घेत अभिव्यक्ती केली आहे.

‘मॉरल काऊन्सल’, ‘स्लिप’, ‘फॉल’, ‘डिव्हाइड’, ‘एण्ड ऑफ द सेंच्युरी’ या एकाच कालावधीत केलेल्या चित्रांत प्रतीकांचा समर्थपणे वापर केला आहे. प्रतीकात्मकतेच्या रूढ संकल्पनेप्रमाणे परिचित जगाची, वस्तुविषयांची अनोळखी, अतार्किक वाणारी मांडणी आणि सरळ, प्रत्यक्ष अर्थापेक्षा चित्रातील घकांच्या परस्परसंबंधांद्वारे मांडलेली कल्पना, विचार (कन्सेप्) या पातळीवर, ‘मॉरल काउन्सल’, ‘स्लिप’, किंवा अगदी अलीकडचं ‘विनेस’, ही चित्रं गेली आहेत. ‘फॉल’, ‘एण्ड ऑफ द सेंच्युरी’ या चित्रांतील प्रतीकात्मकता व विषयाची मांडणी मात्र प्रथमदर्शनी तार्किक वाणारी, पण काहीसा अतार्किकतेचा स्पर्श असणारी आहेत. उदाहरणार्थ, ‘एण्ड ऑफ द सेंच्युरी’मधील पुरुषाची पारदर्शक व्यक्तिरेखा. या प्रकारची मांडणी त्यांच्या अनेक चित्रांत प्रथमपासूनच दिसते.

‘अ‍ॅक्सिडें ऑन मे डे’मध्ये सरळ दिसणार्‍या वास्तव दृश्यामागे जसा गर्भित अर्थ होता, तसा गर्भित अर्थ ‘फॉल’ या चित्रातही आहे. विस्कळीत झालेल्या संघना किंवा असंघति कामगारांच्या अस्तित्वाचा विचार त्यांनी आपल्या बर्‍याच कलाकृतींमधून व्यक्त केला आहे. अशीच अस्थिर व डळमळीत आधार असलेली मजुराची प्रतिमा ‘फॉल’मध्ये दिसते. चित्राच्या उजव्या चिंचोळ्या भागात दूरचं आणि जवळचं अशी दोन दृश्यं दिसतात. जवळच्या दृश्यात आकाशाचं प्रतिबिंब पडलेला नाला तर दुसर्‍या दृश्यात ेकडी, पाणी इत्यादींचा व्यापक आसमंत दिसतो. दोन्ही दृश्यांच्या मधे ओरडणारी मैना दिसते. पण चित्राची मोठी डावी बाजू ही परातीवरून घसरून पडलेला मजूर, तपशीलवार रंगवलेली खिडकी, ाइल्स या घकांनी व्यापली आहे. आधार गमावल्यामुळे मजुराचं पतन झालं आहे, असा अर्थ त्यांच्या अनेक वास्तव व तार्किक मांडणी केलेल्या चित्रांतून दिसून येतो.

‘स्लिप’ या चित्रातील मांडणीही अशीच अतार्किक वाणारी असून अनेक प्रकारच्या विरोधी तत्त्वांनी चित्र साकारलं आहे. प्रकाशझोतात कष्ट करणारा कार्यमग्न वृद्ध, तर पार्श्‍वभूमीला सोलापुरी चादर गुंडाळून स्वस्थ झोपलेली व्यक्ती; तसंच छाया-प्रकाश, निद्रिस्त-जागृत, कष्टकरी-सुखासीन यांचा विरोधाभास चित्रभर दिसतो. एखाद्या ओवीच्या दोन्ही बाजूंना असतात तशा नियंत्रण रेषा, पॅर्नचा वापर करून ‘स्लिप’च्या दोन्ही बाजूंना दिल्या आहेत.

कलाकृतींमध्ये आठवणी रंगवताना सहसा धूसर, अस्पष्ट, विस्कळीत स्वप्नांची मांडणी करावी तसं चित्रण केलं जातं. पण ‘मेमरी : डबल पेज’ या आठवणींशी निगडित चित्रात विशिष्ट स्थळांना व प्रत्यक्षातल्या परिचित वास्तूंना, पर्स्पेक्विचे प्रयोग करत सादर केलं होतं. ‘मॉरल काउन्सल’ हे चित्रदेखील त्यांच्या आठवणींशी संबंधित असून विषय सादर करताना अतार्किक मांडणी व प्रतीकांचा वापर केला आहे. सायकलवरून मुक्तपणे, स्वैर भकणारा पौगंडावस्थेतला मुलगा, त्याच्या भवितव्याबद्दल वाणार्‍या काळजीतून नैतिकतेचं मार्गदर्शन करणारी पालकाची प्रतिमा चित्राच्या खालच्या अर्ध्या भागात दिसत आहे. पाल्य व पालकाच्या वेशभूषा, सायकलसारखी वस्तू या आधुनिक काळातील घकांच्या तुलनेत वरील भागातील प्रतिमा इतिहासकालीन आहेत.

पाश्‍चिमात्य धारणेनुसार नरकाची कल्पना, वाममार्गाने गेल्यास भोगावे लागणारे परिणाम व होणारी छळवणूक यांचा इशारा आपल्या पाल्याला देणारा पालक चित्रात दाखवला आहे. पंधराव्या शतकातील फ्लेमिश चित्रकार रॉजर व्हॅन देर वायडन याने चित्रित केलेल्या नरकयातनांतील ाीप्रतिमेचा उपयोग पवर्धनांनी नैतिकतेचा धडा व इशारा देण्यासाठी केला आहे.

आपल्या कलाप्रवासात त्यांना कलावंताचं आपल्या विषयाशी असलेलं नातं सतत तपासण्याची गरज वाली आहे. विषयात अमर्याद गुंतणं किंवा त्यापासून दुरावा साधणं; स्वत:च्या मानसिक, भावनिक आंदोलनांनाच प्राधान्याने अभिव्यक्त करणं की दुसर्‍याचं जीवन समजून घेणं; स्वत:ला एका अविचल अवस्थेकडे, पूर्णत्वाकडे नेणं की सतत बदलणार्‍या बाह्य जगाबरोबर बदलत राहणं, अशा संघर्षातून वा काढण्याचा ते सतत प्रयत्न करताना दिसतात. प्रत्यक्षात कलाकृतीची मांडणी करतानासुद्धा द्वंद्वाचे अनेक आविष्कार रचनाबंधात दिसून येतात. त्यांच्या प्रतिमांमध्ये सबल-दुर्बल, शांत-अशांत, अंतर्गत-बहिर्गत, उजळ-गडद किंवा तीव्र छाया-प्रकाशभेद असा विरोध जाणवतो. अवकाशविभाजन करताना उभे-आडवे भौमितिक विभाजन, शुद्ध रंगांची एकमेकांशेजारी योजना, भक्कम-भरीव रचनेच्या विरोधात रिक्त-पोकळ रचना असा रचनाबंध त्यांच्या बहुेतक कलाकृतींमध्ये दिसतो तेव्हा एकीकडे चित्रातील एकसंधतेला बाधा आणणारे घक म्हणून ते येत असले तरी त्यांच्या संदर्भमूल्यांमुळेच परस्परांचं अस्तित्वही ते अर्थपूर्ण करतात.

1980 साली, म्हणजे आपल्या कलाप्रवासाच्या सुरुवातीच्या काळात, हिमाचल प्रदेशातील कसौली येथे भरलेल्या कलावंतांच्या एका कॅम्पमध्ये पवर्धनांनी त्यांची आधुनिकोत्तर कलेची कल्पना मांडली होती. त्यात त्यांनी व्यक्तीव्यक्तीच्या संबंधांवर भर दिला होता. जुन्या, रूढ सामाजिक संबंधांमध्ये माणसांच्या काही समान जाणिवा, अनुभव असायचे व ते त्यांच्या आयुष्याला अर्थ देत समृद्ध करायचे, त्याचबरोबर स्थैर्य व सुरक्षाही द्यायचे. विसाव्या शतकात सुरुवातीपासून सर्वच क्षेत्रांत सामाजिक बदलाची गती उत्तरोत्तर प्रचंड वाढल्यावर रूढ सामाजिक संबंध कालबाह्य व टाकाऊ झाले. पवर्धनांच्या पिढीने तर आणीबाणीपूर्व व नंतरची राजकीय-सामाजिक स्थिती, ऐंशीनंतरचं मुक्त आर्थिक धोरण व जागतिकीकरणाची प्रक्रिया, सोव्हिएत रशियाचं पतन व नंतरचं एकखांबी तंबू झालेलं जग, देशांतर्गत झालेले सत्ताबदल, सांप्रदाायिक दंगली, पुरोगामी विचारसरणीला बसलेले धक्के, चळवळी व आंदोलनांची झालेली पीछेहा याबरोबरच इलेक्र्ॉनिक व माध्यमक्षेत्रात झालेली क्रांती, त्यातून जवळ आलेलं जगˆअशा अनेक घना अनुभवल्या. यातील बहुतांशी घना ऐंशीनंतर घडलेल्या असल्या तरी औद्योगिक क्रांतीनंतर सामाजिक बदलांनी पकडलेल्या गतीचे परिणाम म्हणून मानवी संबंधात जो विस्कलेपणा आला होता, त्याला केंद्र करून व्यक्ती-व्यक्तींमधील नात्याची (इंर-सब्जेक्ििव्ही) त्यांची कल्पना पवर्धनांनी 1980 साली मांडली होती.

सामाजिक बदलांचा परिणाम म्हणून माणसाला भग्नतेचा, आतून तुलेपणाचा, खंडितपणाचा अनुभव येत होता. समाजव्यवस्थेतील वाढत्या व्यामिश्रतेमुळे एकाच व्यक्तिमत्त्वात अनेक व्यक्तिमत्त्वं धारण करण्याची गरज भासू लागली. एकाच चेहर्‍याचे विविध चेहर्‍यांत रूपांतर होऊन अनेक तुकड्यातुकड्यांच्या ओळखी (मल्पिल आयडेिंजि) निर्माण झाल्या. अशा खंडित (फ्रॅग्मेण्ेड) व्यक्तीचा त्याच्यासारख्याच इतर व्यक्तींबरोबर सुसंवाद निर्माण होणं, सहजसुंदर नातं अस्तित्वात येणं कठीण होऊन बसलं आहे. पूर्वी माणसांना उपलब्ध असणार्‍या समान जाणिवांचं क्षेत्र संकुचित झालं आहे किंवा तिचा इतरांच्या जाणिवांशी, विचारांशी संघर्ष तीव्र झाला आहे. अशा स्थितीत प्रत्येक व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीशी तिचे स्वतंत्र विचार, श्रद्धा, स्वायत्तता अबाधित राखून तिच्याशी नातं जोडण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. या मार्गाने आपल्या नव्या व मानुष जाणिवा विस्तारत इतरांच्या जाणिवांशी संवादी राखण्याचा सतत प्रयत्न केला तरच भक्कम आधारावर नव्या सामूहिक जाणिवा, समूहभावना निर्माण होणं शक्य आहे. समाजातल्या अशा परस्परसंबंधांचं (इंर-सब्जेक्ििव्ही) क्षेत्र थोडं थोडं करत वाढवण्याचा प्रयत्न कलेमध्ये सतत होत राहिला पाहिजे, असं पवर्धनांना वातं.

समाजात श्रद्धाविहीनतेचा, रितेपणाचा अनुभव येत असण्याच्या पार्श्‍वभूमीवर प्रसिद्ध विचारवंत दि. के. बेडेकर यांनी 1972 साली एका नवीन प्रकारच्या धर्मपर्यायी मानवश्रद्धेची गरज प्रतिपादन केली होती. साठ व सत्तरच्या दशकातील प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधातील वातावरणाची सविस्तर चर्चा लेखाच्या सुरुवातीला केली आहे. या तत्कालीन विद्रोही परिस्थितीबरोबरच एकूणच विश्‍व व मानवजातीच्या संबंधात श्रद्धेबद्दल, मूल्यांबद्दल, पारंपरिक धर्मश्रद्धांबद्दल तेव्हा प्रश्‍न निर्माण होऊ लागले होते. औद्योगिक क्रांतीनंतर वेगाने बदलत गेलेल्या समाजव्यवस्थेत व्यक्तिगत पातळीवर माणसांमध्ये एकाकीपणाची व निराधार होत असल्याची भावना दृढ होत होती. अशा वेळी एखाद्या संवेदनशील कलावंताच्या आयुष्यात श्रद्धेचं स्थान काय असू शकतं? किंवा स्वीकारलेल्या श्रद्धेचं स्वरूप कसं असेल? भोवताली समाजात पारंपरिक धर्मश्रद्धेबद्दल भ्रमनिरास झालेला असताना त्याच्या आयुष्यात निर्माण होणारी पोकळी कशी भरून येते? पवर्धनांचा कलाप्रवास अभ्यासताना साहजिकच हे प्रश्‍न प्रकर्षाने जाणवतात. 1973 साली मुंबईत स्थलांतर करताना त्यांनी चित्रकलेच्या क्षेत्राची निवड केली होती व माणसांचीच चित्रं काढण्याचा निर्णय घेतला होता. तिथून सुरू झालेल्या आपल्या तीस-पस्तीस वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत अतू श्रद्धेने त्यांनी कलेची साधना केली व अतिशय जिव्हाळ्याने मानवी संबंधांचा शोध घेत लोकायतदर्शन घडवलं. मानुष जगाचा वास्तव आविष्कार आपल्या कलेतून केला. अपूर्णाशी संघर्ष करत पूर्णत्वाच्या दिशेने वाचाल करताना ‘संदेहवृत्ती’ व ‘द्वंद्वात्मक’ पद्धतींचा आधार घेत स्वत:च्या व इतरांच्या जाणिवा त्यांनी आपल्या कलेद्वारा विस्तारल्या व समृद्ध केल्या आहेत.

विसाव्या शतकात प्रभावी असणारे विचारप्रवाह, विचारप्रणाल्या, मानवी इतिहासाशी संबंधित तत्त्वज्ञानं, संस्कृतीच्या विकासाचे प्रचलित सिद्धान्त याबद्दलही साशंकता आताच्या प्राप्त परिस्थितीत निर्माण होऊ लागली आहे. सत्तरच्या दशकात असणारे सामाजिक तत्त्वज्ञानांचे पर्यायी आधारही आता गमावले गेल्याची भावना निर्माण झाली असून काहीशी संभ्रमावस्था जाणवते आहे. पण तरीही मानवी सामर्थ्य, त्याची संघर्षशील वृत्ती, स्वत:च्या मर्यादा ओलांडत व आत्मविकास करत अवकाश विस्तारत जाण्याची त्याची क्षमता, यावर पवर्धनांचा पूर्ण विश्‍वास असल्यामुळे मानुषतेचा सकारात्मक व आशादायक आविष्कार येणार्‍या काळातील त्यांच्या कलेत दिसून येईल याबद्दल शंका वात नाही.

- पद्माकर कुलकर्णी

Thursday, 7 November 2019

प्रगतिशील लेखक संघाचे संमेलन


अस्मितांचे प्रांतीय आणि जातीय संदर्भ यात सामान्य माणसाची दिशाभूल केली जात आहे असे उद्गार प्रगतिशील लेखक संघाच्या जयपूरमध्ये झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटक पद्मश्री भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी काढले.

प्रगतिशील लेखक संघाचे तीन दिवसीय 17वे संमेलन 13, 14, 15 सप्टेंबर 2019ला जयपूर (राजस्थान)च्या रवींद्र मंच या ठिकाणी झाले. या संमेलनात देशभरातून 26 राज्यांतून प्रलेसंचे 470 सभासद आले होते. यांच्या व्यतिरिक्त संमेलनात इप्टा, जलेस, दलेस, जसमचे प्रतिनिधी आणि जयपूरचे साहित्यप्रेमी, पत्रकार, संस्कृतीकर्मी भारतातील प्रमुख साहित्यकार उपस्थित होते.
तीन दिवस चालणारे हे राष्ट्रीय संमेलन ऐतिहासिकच होते. सलग चालणारे वेगवेगळे वैचारिक सत्र, काव्यसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, डिबेट, पॅनलचर्चा पुस्तक प्रकाशन, सांस्कृतिक नाट्य प्रस्तुती, चित्रपट कार्यक्रमांना मोठी गर्दी होती. या वेळी पहिल्याच दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीस प्रारंभ झाला. नेहरूंना अभिवादन करणे हे खरे औचित्यपूर्ण काम या वेळी झाले. निघालेल्या रॅलीतही देशभरातून आलेल्या, नामांकित तीनशे साहित्यिकांचा सहभाग होता. उद्घाटक गणेश देवी, मेघा पानसरे, आनंद मेणसे आदी महाराष्ट्रातून गेलेले प्रतिनिधीही होते. पुस्तक विक्रीलाही लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. खर्या अर्थाने अखिल भारतीय लेखक संमेलन झालं ज्यामध्ये सर्व भाषीय नवे तरुण आणि वरिष्ठ लेखक उपस्थित होते.

या संमेलनात उपरोक्त विषयांसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांना स्पर्श केला गेला. प्रलेसंचा वारसा आणि प्रलेसंचे सुरुवातीचे सर्व साहित्यिकांच्या योगदान आणि कलाकृतींची स्मृती या वेळी जागवण्यात आली. रवींद्र मंचच्या दालनात सर्व प्रगतिशील साहित्यिकांचे छायाचित्रे होती. ज्यात दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या प्रतिमेजवळ देशभरातील लेखक कवी सेल्फी काढून घेत होते. या वेळीचौडा रास्ताही स्मरणिका प्रकाशित करण्यात आली ज्यात विभिन्न राज्यांतील प्रलेसंचा गेल्या तीन वर्षांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला आहे. ही स्मरणिका प्रत्येकास देण्यात आली. इप्टा आजमगडची प्रस्तुती असणारी लोकधारा आणि लोकनृत्याने प्रभात फेरीसह, त्यांच्या स्वतंत्रपणे झालेल्या कार्यक्रमांत राज्यस्थानी लोकजीवनाची झाकी प्रस्तुत केली. आनंद पटवर्धन यांच्याविवेक रिझही फिल्म दाखवण्यात आली. या फिल्मद्वारे महाराष्ट्राचे हळूहळू गेल्या पाच वर्षांत कसेकम्युनलबनत गेल्याचे चित्र देशापुढे ठेवले.

उद्घाटन सत्रात डॉ. गणेश देवी यांनीसद्यकालीन भाषाव्यवहार धोक्यात आल्याचे सार्यांच्या ध्यानात आणून दिले. नवनवे माध्यमं तयार होत असताना, लिप्या मृतप्राय ठरत असताना साहित्यकारांनी आपल्या लिखित अशा प्रिंट माध्यमांवर अवलंबून राहणे सर्वथा अयोग्य ठरेल. सद्यकालीन भांडवली व्यवस्था ही मनुष्यत्वापुढेच एक मोठे आव्हान म्हणून उभी असताना सर्वसामान्य माणसाला मार्ग दाखवण्याचे कार्य साहित्यकारांनी करायचे असते. पण तुमची बोलीच नष्ट केली जाते आहे. तेव्हा या संकटाचा सामना कसा करणार हा खरा प्रश् आहे. देशातील सर्व प्रागतिक लोकांनी आपल्या बोली आणि लोकभाषा जपत या राष्ट्रीय मंचावर एक होत संघटितपणे विरोध करण्यासाठी आणि विविध धोरणांची चिकित्सा करण्याची गरज आहे. एक सर्वमान्य कार्यक्रम देशातल्या बुद्धिमंतापुढे या मंचावरून ठेवता येईल का हाही विचार या अधिवेशनात करायला हवा. जगभरात उजवा विचार बोकाळत असला तरी ते ते समाज आणि तेथील विवेकी लंक त्या विरोधात एकजूट होत आहेत. आम्ही दक्षिणायनच्या माध्यमातून हाच प्रयत्न केला. राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाच्या नावावर देशाला अत्यंत धोकादायक वळणावर सरकार घेऊन जात आहे. सीमित आणि संकुचित होत जाणारे अस्मितांचे प्रांतीय आणि जातीय संदर्भ यात सामान्य माणसाची दिशाभूल केली जाते आहे. यातून साहित्यकार समाजाला बाहेर काढू शकतात.’

नवी दिल्लीचे प्रभात पटनाईक यांनी राष्ट्रवादाचा उगम, विस्तार, वाटचाल आणि व्याप्ती याबाबत आपली मतं मांडली. त्यांनी आपल्या वक्तव्यातून काही गंभीर निरीक्षणे मांडली. युरोपात सुरू झालेले हे राष्ट्रवादाचे भूत अविकसित देशात विकृत आणि हिंस्र रूप धारण केलेले आहे. अतिरेकी राष्ट्रवाद हा आपला शत्रू स्वत: विकसित करीत असतो. त्या राष्ट्र हे लोकांसाठी नसते तर लोकांपेक्षाही उच्च स्थानावर राष्ट्र ठेवले जाते. भारतीय राष्ट्रवाद हा इंपेरिलिझमला जोडला गेला आहे. येथील राष्ट्रवाद हा बहुसंख्याकांच्या शोषणव्यवस्थेच्या हितसंबंधाचे प्रात्यक्षिक करणारा आहे. ’र्िेेंग्ेल्स् ग्े ूप र्ोूास र्िंदस् दर्िं र्ूग्दहत्ग्ेल्स्होय असे प्रतिपादन केले.
या अधिवेशनात जलेस (अनुपजी, दलित लेखक संघ दिल्ली (अध्यक्ष, हिरालाल राजस्थानी) आणि इप्टा (राकेशजी, महासचिव) या संस्थांनीही एका सत्रात सहभागी होत प्रलेसंच्या सोबत किमान समान कार्यक्रमात सहभागी असू हे आश्वासन दिले. भूतकालीन चुका दुरुस्त करण्याची ही वेळ असल्याचे सार्यांचे एकमत होते.

दुसर्या दिवशी वंचिताच्या साहित्य आणि ओळख हा परिसंवाद झाला ज्यात मेघा पानसरे यांनी महिला प्रतिनिधी म्हणून आपले मत मांडले. गोविंद पानसरे यांचे कुटुंबीय या अर्थाने त्यांचे अनुभव देशभरातील लोकांना ऐकण्याची उत्सुकता दिसून आली. तसेच याच परिसंवादात संजय दोबाडे यांनी आदिवासी साहित्य आणि मराठी समाज यावर मार्मिक टिपण्णी केल्या. दुसरा परिसंवाद विषय होता विकासाचा अर्थ ज्याचा समन्वयवसुधाचे संपादक विनीत तिवारी यांनी समन्वयकाचे काम केले. परिसंवादात या वेळी आदिवासी राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष एस. पी. शुक्ला यांनी विकासाची परिभाषा करण्याचा प्रयत्न केला. शुक्ला म्हणाले कास्ट आणे क्लास यांचा विचार करून सामाजिक न्यायाची भूमिका मध्यवर्ती असेल तर तो विकास हिताचा असतो. पण भारतात आज तसे काहीही घडत नाही. अभिव्यक्तीच्या याच परिसंवादात उमा या राज्यस्थानातील पत्रकार होत्या त्या म्हणाल्या पत्रकारितेच्या क्षेत्रात विद्रोही महिलेस हमखासरसोईसारखे सदर चालवायला दिले जातात, हेसुद्धा अभिव्यक्तीच्या गळचेपीचा प्रकार होय. दुसरी महिला रुपा ज्या दिल्लीहून आल्या होत्या त्यांनी अर्बन नक्षलच्या मुद्द्यावर आपले भाष्य केले. त्या म्हणाल्या वर्वरा राव यांना पेपर आणि पेनही तुरुंगात दिला जात नाही. सरकार एवढं का घाबरतं?

काश्मीरच्या मुद्द्यावर स्वतंत्रपणे परिसंवाद झाला ज्यात तेथील लोकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी खलिद हुसैन यांनी सांगितले की 370 हे कलम भारत सरकारने लावलेले नव्हते. तर हिंदूंच्या मागणीवरून राजा हरीसिंग याने एकोणीसशे सत्तावीस साली लागू केलेले होते. हिंदू जमीनदारांना वाटत असे की, इतरांना मुक्त वावर दिल्यास आपल्या जमिनी कुणीही बळकावू शकेल या धास्तीतून त्यांनी राजाद्वारे अशी तजवीस केलेली होती.

विनय आदर यांनी भारतभर बुद्धिजीवींची केली गेलेली धरपकड यावर आपले भाष्य केले. आनंद तेलतुंबडे यांच्या . पी. डब्ल्यूतलारिपब्लिक ऑफ कास्टया लेखातले काही बारकावे सांगितले. तसेच कांच्या इलय्या यांचेपोस्ट हिंदू इंडिया’, हंसराज शोवेंद्र शेखर यांचा आदिवासींवरील पुस्तकांचा उल्लेख केला. असे अनेक उदाहरणे देत त्यांनी सांस्कृतिक राष्ट्रवादाचा विमर्श घेतला. त्यात त्यांनी सांगितले की, गैर हिंदीभाषी बुद्धिजीवी जोखीम घ्यायला तयार आहेत. परंतु मोठ्या प्रमाणात बोलल्या जाणार्या हिंदी बेल्टमध्ये विरोध दिसत नाही. दलितांच्या मुद्द्यावर आजही समाजात आत्मावलोकनाची गरज आहे असे ते म्हणाले.

हिंदीतले कवी आणि प्रसिद्ध कथालेखक उदयप्रकाश यांनी वर्तमान परिस्थितीवर भाष्य केले. नव्या युगात माणसाचा मेंदू हा डस्टबीनसारखा झाला आहे. आपल्या सृजनशील लेखकाला पावलोपावली सेंसर लावल्यासारखे चालावे लागते. अस्वस्थता तर येणारच पण डर हीच तर शक्ती असते. आज सृजनाचा हा सुपीक काळ आहे. जेव्हा गाईपासून ऑक्सिजन मिळतो असे रेटून सांगितले जाते तेव्हा आपला सेंसर नीट चालला पाहिजे. भारतात सर्वाधिक तरुण आहेत असे म्हणतात पण याच तरुणांना गांजा दिल्यासारखे राष्ट्रवादाने हिप्नोटाइझ केले जाते. आपले शिक्षणाचं प्रायमरी युनिट असतो परिवार, पण शिक्षण देण्यात हे युनिट पूर्णत: अपयशी झाले आहे. परिवारातून दिले जाणारे शिक्षण टीव्ही माध्यमामुळे बंद झाले आहे. लेखकासाठी त्याचा ग्रंथासारखे असते त्याचे स्वत:चे जीवन परंतु ती समग्रता आता हरवत चालली आहे. अशा वेळी एकदिवस असाही येईल समाजात लेखक असणार नाही. लेखक वाचवण्याची जबाबदारी ही समाजाची आहे. लेखक हा असतो तरी कोण? लेखक हा प्रत्येक धोक्याची सूचना देणारा, उत्तरदायी असणारा घटक असतो.

दुसर्या दिवशी नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड करण्यात आली. सुखदेव सिंह सिरसा यांची नवे राष्ट्रीय महासचिव या पदावर निवड करण्यात आली. त्यांच्यासह अन्य अठ्ठ्याहत्तर सदस्यांचे अध्यक्षीय मंडल यांच्या सोबतीला असेल. प्रलेसंचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मा. पुन्नीलन तर कार्यकारी अध्यक्ष म्हणून अली जावेद यांची निवड करण्यात आली.
राकेश वानखेडे

माणगाव परिषद : बहिष्कृतांचे रणशिंग - उत्तम कांबळे

'अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद ’ हा उत्तम कांबळे यांचा ग्रंथ ‘ लोकवाङ् ‌ मय गृह ’ तर्फे लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. एका ऐति...