2

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 85 30 52 85 50 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

Wednesday, 17 July 2019

अण्णा भाऊंना समजून घेताना...

हे वर्ष अण्णा भाऊंच्या जन्मशताब्दीचे वर्ष. म्हणजे अण्णा भाऊ जन्मून ह्या वर्षी शंभर वर्षे होतील. अण्णा भाऊंचा जन्म 1 ऑगस्ट 1920 सालचा. ही जन्मतारीख डॉ. बाबुराव गुरव यांच्याअण्णा भाऊ समाजविचार आणि साहित्य विवेचन या पीएच.डी. प्रबंधातून समोर आली. ही जन्मतारीख कशी सापडली हे सांगताना गुरव सर सांगतात पुण्या मुंबईकडे अमुक साली खूप मोठा माणूस गेला. त्या दिवशीच अण्णा भाऊ जन्मले. आता 1920 साली बाळ गंगाधर टिळकांचे निधन झाले होते. मग या दुव्यावरून अण्णा भाऊंची जन्मतारीख 1 ऑगस्ट 1920 अशी ठरली. साधारण 1941 ते 1969 हा त्यांचा कार्यकाल. या कालखंडात अण्णा भाऊंसारख्या कधीही रीतसर शाळेत न गेलेल्या (म्हणजे साधारण 1 ते 2 दिवसांच्या वर) माणसाने साहित्यविश्वात मेख मारून ठेवली. चेहरा नसलेल्या माणसांची कथा लिहिली. समाजव्यवस्थेने आवाज दडपलेल्या माणसांचे गाणे लिहिले व गायलेही. 8 पोवाडे, 10-12 गाणी, 1 प्रवासवर्णन, 1 नाटक, 9 लोकनाट्ये, 15 वगनाट्य, 30 कादंबर्या, 300 कथा, अशा 52 ग्रंथाशिवाय 20 पेक्षा जास्त पुस्तिका असे एकूण 79 हून अधिक ग्रंथ पुस्तिका या स्वरूपातले वाङ्मय उपलब्ध आहे. अप्रकशित किंवा नाव न देता लिहिलेल्या वाङ्मयाचा तर हिशेबच नाही. अण्णा भाऊंनी केवळ ललित लेखन केले असे नाही. तरलोकयुद्ध’, ‘लोकयुग’, ‘युगांतर’, ‘युद्धनेतृत्व. नियतकालिकांमधून स्फुट स्वरूपाचे खूप लेखन केले. यापैकी बहुतांश लेखन त्यांनीयुगांतरमध्ये चालवलेल्यावाट्टेल ते लिहितोया सदरातून केले.


‘‘खरी कला काळजाशी भिडून बोलते’’
- अण्णा भाऊ साठे

साहित्यविश्वात कलेच्या विश्वात कलेसाठी कला की जीवनासाठी कला असा वाद आहे. प्रस्थापित प्रवाहाने ज्यांना साहित्यकार म्हणलं त्यांची मुख्य प्रवाहाने नोंद घेतली. ब्राह्मणी साहित्य समीक्षकांनी अण्णा भाऊंची गणतीच केलेली नाही. 27 भाषांमध्ये भाषांतरित  झालेला लेखक साहित्यविश्वात उपेक्षित ठेवला आहे. खरे तर ज्या ब्राह्मणी  व भांडवली व्यवस्थेविरोधात अण्णा भाऊंची लेखणी झिजते. त्या लेखणीचा सन्मान ते कसे करतील. त्यामुळेच अण्णा भाऊंचा विश्वास हा सामान्य कष्टकरी जनतेवर होता. ते स्वत: म्हणतात, ‘‘जो लेखक जनतेकडे पाठ फिरवतो जनता त्याच्याकडे पाठ फिरवते. आणि जो लेखक जनतेला कडेवर घेतो. जनता त्याला गळ्यातला ताईत बनवते. म्हणून ज्या कष्टकर्यांसाठी, कामगारांसाठी, शोषितांसाठी अण्णा भाऊ लिहितात त्या जनतेने... कष्टकर्यांच्या चळवळींनी अण्णा भाऊंना जिवंत ठेवले. अण्णा भाऊंचं गाणं हृदयात ठेवले. कारण अण्णा भाऊंनी निर्माण केलेले साहित्य हे त्यांचेच तर आहे. त्यांच्या साहित्यात कथा-कादंबर्यांमधली पात्र काल्पनिक नाहीतच मुळात. कल्पनेच्या भरार्या मारणे त्यांना जमलेच नाही कधी. आजूबाजूचे वास्तवच इतके भयंकर असताना आभाळाच्या वरच आणि जमिनीच्या खालचे लिहायला अण्णा भाऊंकडे वेळ कुठे होता? डोळ्याला दिसणारं भयाण विषमतेचे वास्तव डोळ्याआड सारणं कोणत्याही संवेदनशील लेखकासाठी असंभव आहे. अण्णा भाऊ स्वत: एक संवेदनशील माणूस होते. प्रस्थापित छावणीने अण्णा भाऊंवर अन्याय केलाय हे खरेच आहे. परंतु कष्टकर्यांच्या चळवळींनी अण्णा भाऊंना जपून ठेवलंय. ही सकारात्मता विसरून चालणार नाही.


चळवळींनी अण्णा भाऊंना स्वीकारताना वेगवेगळ्या पद्धतीने स्वीकारलंय. कोणी अण्णा भाऊंना कम्युनिस्ट म्हणून तर कोणी आंबेडकरवादी म्हणून तर कोणी सत्यशोधक अण्णा भाऊ स्वीकारलेत. आता खरेतर आंबेडकर, फुले, नाना पाटील, मार्क्स, लेनिन या सर्वांचाच प्रभाव त्यांच्या लिखाणात दिसतो. ज्याने ज्या इझमचा चश्मा लावलाय त्याला अण्णा भाऊ तसेच दिसणार. खरेतर इतिहास असेे सांगतो की वाटेगावहून मुंबईला आल्यावर तरुण वयातच कामगार चळवळीशी संपर्क होऊन अण्णा भाऊ लिहू लागले. अण्णा भाऊ कम्युनिस्ट पक्षाचे कार्ड होल्डर होते हे सत्यच आहे. त्यांच्या संपूर्ण साहित्यात मुळाशी मार्क्सवाद आहे. हे नाकारता येत नाही. परंतु आंबेडकरवादी मंडळींना कॉम्रेड अण्णा भाऊ तितकेसे भावत नाहीत, त्यांना साहित्यरत्न अण्णा भाऊ हवे असतात. पण महामानव असे आपल्याला वाटेल तसे थोडीच स्वीकारता येतात. ते जसे होते तसेच स्वीकारावे लागतील. त्यामुळे अण्णा भाऊंना मार्क्सवादाच्या किंवा आंबेडकरवादाच्या गोटात ढकलण्याआधी नीट समजून घेतले पाहिजे. अण्णा भाऊंच्या साहित्यातला जात वास्तवाचा स्वर टाळता आला पाहिजे. त्यांच्या अप्रकाशित कथासंग्रहामध्येबुद्धाची शपथनावाची कथा आहे. किंवा अण्णा भाऊ स्वत: आंबेडकरांच्या कोणत्याच आंदोलनात सहभागी झाले नसले तरी अण्णा भाऊंची प्रतिभा बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी पोहोचलेली दिसते. ‘‘जग बदल घालूनी घाव सांगून गेले भीमराव’’ हे गाणं त्याचं उदाहरण आहे. अण्णा भाऊ एकीकडे स्तालिनग्राडचानानकीन नगरापुढेपोवाडा लिहितात. तेव्हाच ते शिवाजी महाराजांना वंदन करतात. त्यांच्या कथा-कादंबर्यांचे नायक गावगाड्याताली  शूद्र माणसे आहेत. विशेषत: स्त्रिया जातीने शूुद्र अतिशूद्र व गरीब असणार्या माणसांचं चित्रण आपल्याला त्यांच्या लिखाणात दिसते. वास्तव हे आहे की अण्णा भाऊ ज्या जातीत जन्मले ती मांग जात वर्ण उतरंडीत शूद्र समजली गेली. भयाण जातवास्तवाचे चटके सहन करतच तर अण्णा भाऊ वाढले. त्यामुळे टोकदार जातनेणिव त्यांना पोथीनिस्ट कम्युनिस्ट होऊ देत नाही. जातीअंताचा रस्ता हा बाबासाहेबांनी दाखविलेला आहे. हे स्वीकारताना त्यांचा वर्गवाद आडवा येत नाही. म्हणून त्यांना इझमचे लेबल चिटकवण्याची घाई करू नये असे मला वाटते. उलट अण्णा भाऊ जातीअंताचा व वर्गअंताचा लढा जोडण्याचे काम करतात. मार्क्सवाद व आंबेडकरवाद यातला दुवा होऊन जातात. कोणतीही टोकाची भूमिका टाळून हा दुवा जास्त भक्कम बनवणं काळाची गरज आहे. कलाकारांची विचारांशी बांधिलकी असली पाहिजे इथपर्यंत ठीक आहे. पण त्याने अमुक एका पक्षाशी, संघटनेशी... अमुक एका इझमशी बांधील असलं पाहिजे हे गरजेचं आहे का? याचाही विचार केला पाहिजे. मॅक्झीम गॉर्की कधीही रशियन कम्युनिस्ट पार्टीचा कार्डहोल्डर नव्हता पण तरीही क्रांतीच्या भक्कम प्रेरणांमध्ये त्याचं नाव तार्यासारखं चमकताना दिसतं. अण्णा भाऊ कुठल्या इझमचे होते. यापेक्षा शोषितांच्या मनातलं प्रेरणास्थान होते ही ओळख जास्त महत्त्वाची आहे. माणसाने त्याच्या विकासाच्या प्रक्रियेत जगाचा अर्थ समजून घेताना इझम जन्माला घातले. इझम माणसासाठी आहेत. माणसं इझमसाठी नाहीत. हे समजून घेता आले तरी पुरेसे आहे.


कष्टकर्यांच्या बाजूने साहित्याचा महामेरू कसा उभा करावा हेच अण्णा भाऊंच्या उभ्या आयुष्याचे सार आहे.  माणूस वाचता आल्याशिवाय हे शक्य नाही. प्रचंड इच्छाशक्ती व प्रतिभा असल्याशिवाय हे शक्य नाही. दारिद्य्रात गुलामीत तापलेल्या जमिनीवर समतेच्या, विचारांचा पाऊस पडावा आणि त्यातून कष्टकर्यांच्या दु:खाला वाचा फोडणारी शब्दसुमने उगवावीत, हेच अण्णा भाऊंचं जीवन आहे.

अण्णा भाऊ हे परिस्थितीनं जन्माला घातलेलं अपत्य आहे. अण्णा भाऊ म्हणजे जीवनानुभवाचे दाटलेले ढग आहेत जे सगळ्या क्षमतेसह बरसतात. महापूर आणतात. अण्णा भाऊ राबणार्यांना आपलेसे वाटतात. राबणार्यांच्या चळवळीला आपलेसे वाटतात. शाहिरांना, कवींना, कलाकारांना आपलेसे वाटतात.

मी स्वत: शाहीर असल्यामुळे मला अण्णा भाऊ कलाकाराच्या रूपात जास्त जवळचे वाटतात. अण्णा भाऊंचा प्रवास पाहताना एक लक्षात येतं की, ते पहिल्यापासूनच लिहीत होते, नकला करत होते. म्हणजे कलाकार होते पणलाल बावटा कलापथकने त्यांच्या आयुष्याला शिस्त लाभली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील या कलापथकाचं योगदान मोलाचं आहे. संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालत या कलाकारांनी जनतेच्या हृदयात स्थान मिळवलं. ‘लाल बावटा कलापथकाची स्थापना व वाटचाल त्यांच्या आयुष्यातला कस्तुरीचा ठेवा आहे. हे कलापथक पक्षाचं होतं. कम्युनिस्ट पक्ष या कलाकारांना मानधन देत असे.  अण्णा भाऊंचे जीवाभावाचे मित्र शाहीर अमरशेख व गव्हाणकर स्वत:  अण्णा भाऊ या कलापथकाचे महत्त्वाचे खांब होते. खरं तर अण्णा भाऊंचा आवाज झिलकरी पद्धतीचा होता. अण्णा भाऊंपेक्षा पहाडी व बुलंद आवाज होता अमरशेखांचा... अमरशेख हातात कुर्हाड व खांद्यावर घोंगडं टाकूनच गायला उभे राहायचे. अण्णा भाऊ त्याउलट प्रचंड विनोदी... व मिश्कील स्वभाव. पण उत्कृष्ट अभिनेते. गव्हाणकरही प्रतिभावान. भारदार सादरीकरण. अशा या लाल बावटा कला पथकावर सरकारने बंदी घातली.  अण्णा भाऊंच्या बुद्धिचातुर्याने तमाशाचं रूपांतर लोकनाट्यात केलं व बंदी निष्प्रभ झाली. ज्या कलापथकानं उभा महाराष्ट्र चेतवला त्या कलापथकाची फाटाफूट कशी झाली? पक्षातून बाहेर पडून अमरशेखांनी स्वतंत्र व अण्णा भाऊंनी स्वतंत्र कलापथक का स्थापन केलं असावं? याच्या वास्तववादी कारणांचा शोध घेतला पाहिजे. अण्णा भाऊंनी बर्याचदा कलापथक उभं करण्याचा प्रयत्न केला. कलाकार आले निघून गेले. बर्याचदा वाद्यांची वाटणी करण्याची वेळ आली. भवतालच्या व्यावहारिक जगानं एका प्रतिभावान मनाला वारंवार दु:खाच्या डागण्या दिल्या. जर अण्णा भाऊंना आपल्याला खरंच समजून घ्यायचं असेल तर त्यांच्या भवतालाचा उघड्या डोळ्यांनी व अतिशय तटस्थपणे अभ्यास करणे गरजेचं आहे. एवढं विपुल साहित्य निर्माण करणारे अण्णा भाऊ अंतरंगातून एकाकी आणि निराश का होत गेले असतील याचा शोध घेतलाच पाहिजे.


अण्णा भाऊंविषयी लिहिताना वा.वि. भट म्हणतात, ‘‘अण्णाला मी खूप पूर्वीपासून ओळखतो. त्यांच्या जीवनातील सर्व प्रकारचे चढउतार मी एक सहृदय या नात्याने जवळून पाहिले आहेत. अखेरच्या काळात अण्णा भाऊ कमालीचे बहकले हेही खरे आहे. पण त्यामागची सत्य कारणे माहिती असणारा सुज्ञ त्यांच्या दु:खाने घायाळ झाल्यावाचून राहणार नाही. सर्व प्रकारच्या दुर्दैवाचे पहाड अण्णा भाऊंच्या अंगावर कोसळले. पण अण्णा भाऊंमधला कलाकार मूळचा माणूस कमालीचा मोठा होता. दुर्दैवाने त्याला सावरण्याची शक्ती आम्हा कुणातच नव्हती. त्यामुळे अण्णा भाऊंचा दु:खद अंत झाला.’’ आणि अण्णा भाऊंवर पहिली पीएच.डी. केलेल्या डॉ. बाबुराव गुरव यांनी नोंदवलेलं मत असं की, ‘अण्णा भाऊंच्या बरोबर त्यांचा नश्वर देहच नष्ट झाला असे नाही. तर मराठी सारस्वतामधील एका ऊर्जस्वल प्रतिभेचाही अंत झाला. म्हणून महत्त्व अण्णा भाऊंच्या देहाचे नाही तर ते अण्णा भाऊंबरोबर विलीन झालेल्या प्रतिभेचे आहे.’

चळवळीचे कलाकार हे केवळ कलाकार नसतात तर ते कार्यकर्ते असतात. कला हे त्यांच्या चळवळीतल्या सहभागाचं माध्यम असतं. शोषितांच्या... दलितांच्या, बहुजनांच्या कलाकारांना जर ब्राह्मणी पितृसत्ताक धावणी बेदखल करते. उपेक्षित ठेवते, तसे परिवर्तनवादी चळवळदेखील या कलाकारांना खूप नीटपणे समजून घेत त्यांचा सन्मान करते असे दिसत नाही. चळवळीच्या पक्ष संघटनांकडे मुळातच सांस्कृतिक राजकारणाची कमी समज त्यापेक्षा अनास्था कलाकारांच्या वाट्याला येते. क्रांतिकारी मनोरंजन या पलीकडे विचारांचे भाष्यकार म्हणून असणारी कलाकारांची क्षमता डावलण्याचाच प्रयत्न होत असतो. आणि कलाकारसुद्धा विचारवंत असल्याशिवाय अण्णा भाऊ, अमरशेख घडत नाहीत, हेही तितकेच खरे आहे. म्हणण्याचा उद्देश असा आहे की, कलाकारांच्या पूर्ण क्षमतांना त्यांच्या प्रतिभेची कदर करणार्या चळवळी जन्माला याव्यात ही त्यामागची भावना आहे.


अण्णा भाऊंच्या जन्मशताब्दी वर्षात खूप मोठे समारंभ होतील. त्यांच्या पुतळ्यांची पूजा होईल. स्वागत-सत्कार होतील. पुरस्कार वाटले जातील. प्रामाणिकपणे अण्णा भाऊंच्या विचारांचा जागर घालणारे उपक्रमही राबवले जातील. पण या सर्वांमध्ये अण्णा भाऊंचं साहित्य समजून घेताना, त्यांचं कार्य समजून घेतानाअण्णा भाऊनावाच्या माणसाला समजून घेण्याचं राहून जाऊ नये. असं मनोमन वाटतं. अण्णा भाऊंना आत्मचरित्र लिहायचं होतंमृत्यूकडून जीवनाकडेअसं नावही ठरवलं होतं त्यांनी. पण ते लिहू शकले नाहीत. अण्णा भाऊंच्या वाटेवर चालणारे कलाकार या प्रवासातल्या भल्याबुर्याचा शोध घेतील, हा आशावाद आहे.


या लेखात समग्र अण्णा भाऊ येणे शक्य नाही किंवा कोण्या एका व्यक्तीकडून समग्र अण्णा भाऊ मांडले जाणेही शक्य नाही. मांडणार्या व्यक्तीचं विचारविश्व, भावविश्व यातूनच अण्णा भाऊ साकारले जातील. याला मीसुद्धा अपवाद नाही. त्यामुळे या लेखात अण्णा भाऊंचं चित्रण किंवा जो विचार आलेला आहे तो माझ्या आकलनाशी सापेक्ष आहे. हे नम्रतेने सांगून थांबते.

- शीतल साठे

Sunday, 16 June 2019

इंडियन अ‍ॅनिमल फार्म : माणसाच्या विचारविश्वाचा प्राण्यांनी केलेला स्वीकार


 प्रवीण बांदेकर यांचीइंडियन अॅनिमल फार्मही नवी कादंबरी. ‘चाळेगतउजव्या सोंडेच्या बाहुल्याया त्यांच्या आधीच्या दोन कादंबर्या गाजलेल्या आहेत. समकालीन वास्तवाला भाषिक पातळीवर जिवंत करण्यासाठी बांदेकर हे स्थानिक संस्कृतीचे  काही आदिम तर काही आधुनिक बंध बेमालूमपणे आपल्या कथनात मिसळतात. पण तो निव्वळ भाषिक प्रयोग नसतो, तर ती त्यांचीभाषिक कृतीअसते. ही कृती सभोवतालच्या वर्तमान वास्तवावर नोंदविलेली केवळ एक प्रतिक्रिया नसते. ती त्यांची सामाजिक उत्तरदायित्वाची मूल्यात्मक कृती असते. ही गोष्ट त्यांच्याइंडियन अॅनिमल फार्मया  नव्या कादंबरीने पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

जॉर्ज ऑर्वेल यांचीॅनिमल फार्मही कादंबरी तिच्यातील ऐतिहासिक वास्तवाच्या अभिनव चित्रणासाठी प्रसिद्धच आहे. बांदेकर यांनीइंडियन अॅनिमल फार्महे नाव आपल्या नव्या कादंबरीला देताना अनेक गोष्टी साध्य केल्या आहेत. राजकीय पक्षाची पोथीनिष्ट विचारचौकट आणि मानवी संस्कृतीतील समानता-विषमता या आदिम मूल्यसंघर्ष यांची तत्कालीन वर्तमानाच्या पार्श्वभूमीवर जॉर्ज ऑर्वेल यांनी केलेली मांडणी जागतिक साहित्यात एक जिवंत मिथक बनून राहिली आहे. ऑर्वेलचीच ‘1984’ ही त्यानंतरची आधुनिक साहित्यातील राजकीय भाष्य करणारी सर्वोत्तम कादंबरी मानली जाते.

बांदेकर यांनीइंडियन अॅनिमल फार्ममध्ये वर्तमान भारतीय परिप्रेक्ष्यात ऑर्वेलच्या दोन्ही कादंबर्यांचे शैलीसूत्र स्वीकारले आहे किंवा ऑर्वेलच्या कादंबर्यांवर समकालीन राजकीय घटनांचे केलेले कलम म्हणजेइंडियन अॅनिमल फार्महोय, असेही म्हणता येईल.  

कादंबरीचा प्रारंभ होतो तोइंडियन अॅनिमल फार्मम्हातार्या कृष्णा घोड्याच्या हत्येने. हिवाळ्यातल्या एका पहाटे कृष्णावर कोणीतरी गोळी झाडतो आणि पळून जातो. त्याच वेळी इंडियन अॅनिमल फार्मच्या नव्या मालकाचे आगमन होते. कृष्णा हा अॅनिमल फार्ममधील प्राण्यांना चार शहाणपणाच्या गोष्टी सांगणारा म्हातारा घोडा असतो. पशुपक्ष्यांनी आपसातील जाती विसरून एक व्हावं, शोषण करणार्या माणसाविरुद्ध संघटित व्हावं, आपल्या हक्कांसाठी लढावे असे सांगणारा कृष्णा घोडा आधार वाटायचा. ॅनिमल फार्ममधील सर्व कष्टकरी प्राण्यांची म्हातार्या कृष्णा घोड्याने एक संघटना बांधली होती, ‘श्रमिक प्राणी मोर्चा.’ पण वांशिक अस्मितेच्या आड सत्तेच्या राजकारणासाठी त्या शिवारात आणखी संघटना आहेत. जय समर्थ गँग हीइंडियन अॅनिमल फार्ममधील कुत्र्यांची संघटना. नानोपंत समर्थ हे जय समर्थ गँगचे सर्वेसर्वा. दुसरी एक संघटना आहे, जी हुजूर पार्टी. या पार्टीचे मुख्य आहेत, साहेबरावजी डुक्कर. इंडियन अॅनिमल फार्मच्या राजकारणातील या संघटना प्रमुख असल्या तरी सर्वोच्च नेता वेगळाच आहे. ‘नवा मालकया नावाने सगळे प्राणी त्याला ओळखतात. तो समोर कधी येत नाही. ‘बिग बॉसप्रमाणे तो फक्त स्क्रीनवर दर्शन देतो आणि जय समर्थ गँगचे कुत्रे आणि जी हुजूर पार्टीचे डुक्कर यांना हाताशी धरून इंडियन अॅनिमल फार्मच्या समस्त जनतेवर सत्ता गाजवतो. त्यासाठी प्राण्यांमध्ये शिवाराच्या विकासाचे स्वप्न तो पेरतो.


ॅनिमल फार्ममध्ये आलेल्या नव्या मालकाला विकास हवा असतो. त्यालाश्रमिक प्राणी मोर्चासारख्या संघटना आणि प्राण्यांचे प्रबोधन करणारे म्हातार्या कृष्णासारखे जुनेजाणते विचारवंत शत्रू वाटत असतात. नवा मालक फॉरेनमध्ये शिकला असला तरी त्याला आपल्या संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान असतो. तो अॅनिमल फार्मच्या पहिल्याच भेटीत जी हुजूर पार्टीचे वराहपंडित आणि जय समर्थ गँगचे नानोपंत श्वान हे नव्या मालकाला गायींच्या गोठ्यात घेऊन जातात. तेथे नवा मालक गोमातेचं शेण-पवित्र गोबर उचलून भक्तिभावानं आपल्या मस्तकाला लावतो. प्रसाद म्हणून जिभेवरही ठेवतो. पहिल्याच भाषणात तो म्हणतो, मित्रांनो, गोवर्या थापत, नांगरट करत, भांग्लण करत, दूधदही विकत मी कसंबसं माझं शिक्षण केलं. गरिबी म्हणजे काय ते मी अनुभवलं आहे. तुमच्याशी बोलताना माझा कंठ दाटून आला आहे. पण मित्रांनो आता इंडियन अॅनिमल फार्ममधील जीवन असं कष्टाचं असणार नाही. इथून पुढे जे काही होईल ते चांगलंच असेल. याची मी गॅरंटी देतो. मी तुमचा स्वामी नाही. आयम युवर बिग ब्रदर. सीनिअर सर्वंट. मला दुसरं कोणतंही कुटुंब नाही. ना आई ना बाप. ना भाऊ ना बहीण. ना पत्नी ना मुलं. तुम्ही मला फक्त साथ द्या. इथे कोणी मालक नाही. नोकर नाही. आपण सगळे या शिवाराचे सेवेकरी. मीही तुमच्या सारखाच या शिवाराचा प्रधान सेवेकरी आहे.       

या भाषणाने समस्त प्राणी वर्ग भारावून जातो. इंडियन अॅनिमल फार्मला हिंदुस्थानातीलच नव्हे तर दुनियेतील नंबर एकचं शिवार बनवू या ही घोषणा त्यांना आवडते. नवा मालक त्यांना शिवाराच्या संस्कृतीची आठवण करून देतो. अभिमानास्पद इतिहास सांगतो. काही प्राणी खोटा इतिहास सांगून मालक म्हणतो, तुमच्यातीलच काही प्राणी  शोषण-पिळवणूक-विषमता-अन्याय-असहिष्णुता असे मोठमोठे पुस्तकी शब्द वापरून मालकाविरुद्ध भडकावणे, या शिवाराच्या पर्यायाने हिंदुस्थानच्या पवित्र भूमीविरुद्ध द्रोह करणं असे प्रकार करतात, त्यांच्यापासून सावध राहा असा सल्ला देतो.

इंडियन अॅनिमल फार्ममध्ये दुसर्या दिवशी जाहिराती झळकतात. फलक लागतात. त्यात नव्या मालकानं घालून दिलेली आचारसंहितेची कलमं असतात. भय्यालाल पोपट ही सगळी कलमं सर्वांना सांगतो. जय समर्थ गँगच्या कुत्र्यांची प्रत्येकाच्या हालचालीवर तीक्ष्ण नजर असते. झाडाझाडावर बसलेल्या कावळ्याच्या निगराणीखाली आपण आहोत. तशाही परिस्थितीत काही प्राण्यांच्या मनात म्हातार्या कृष्णा घोड्याच्या हत्येच्या तपासाबद्दल प्रश्न निर्माण होत असत. पण ते ओठावर येत नसत. 

पुढे पुढे नव्या मालकाच्या नावाने साहेबराव डुक्कर आपले वर्चस्व प्रस्थापित करतो. त्याला साथ देणार्या नानोपंत समर्थांना पुढे ते सहन होत नाही. वस्तुत: जय समर्थ गँगच्या कुत्र्यांच्या दहशतीनेच शिवारातील गायी, बैल, म्हशी, शेळ्या-मेंढ्या आणि अन्य प्राण्यांचे शोषण सुरू असते. नव्या मालकाच्या नावाने खाद्यसामग्री गोळा केली जाते.  गायी-म्हशींचे शिंग आणि आचळाच्या आकारावरून कर वसुली केली जाते. हा अन्याय गरीब प्राणी सहन करतात. शिवाराबाहेरच्या  हिंस्र प्राण्यांकरवी अत्याचार बलात्कार करून त्याची जबाबदारी जय समर्थ गँगच्या कुत्र्यांवर टाकण्यात सर्व प्रसारमाध्यमांच्या आधारे  साहेबराव डुकराला यश येते. तिकडे नानोपंत समर्थ याच प्रकारे अत्याचार करून साहेबराव विरुद्ध कुजबुज मोहीम चालवून सत्तेला बदनाम करीत असतो.

थोडक्यात इंडियन अॅनिमल फार्ममध्ये समकालीन भारतीय राजकारणातील सर्वच कृती-विकृती आहेत. गोवंश, वराह आणि श्वान यांना आपणच या संस्कृतीमध्ये कसे पूजनीय आहोत असे वाटते. त्यांच्यात अस्मितेचे राजकारण सुरू होते. ‘इंडियन अॅनिमल फार्मचा मालक सोयी-सवलतीच्या मुद्द्यांवरून या जातीमध्ये युद्ध पेटवून देतो. महामोर्चे काढले जातात. एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी मग अन्य प्राण्यांच्या हत्या-मारामार्या व बलात्कार हे प्रकार सुरू होतात. वेगवेगळे गट त्यातून मार्ग काढताना एकमेकांच्या हितसंबंधात कसे गुंतून जातात. हा कादंबरीचा मूळ कथाभाग आहे.

या कादंबरीचे मोठे यश म्हणजे अत्यंत रेखीव अशा व्यक्तिरेखा. मोजक्या प्रसंगातून नेमकेपणाने गेल्या अर्धशतकातील राजकारणाच्या पटावरील मोहर्यांचे सूक्ष्म स्वभावचित्रण करण्यात बांदेकर यशस्वी झाले आहेत. साहेबराव डुक्कर, नानोपंत यांच्याबरोबर चम्फी कुत्री, मोहिनी मांजर आणि बाजीराव गाढव अशी पात्रे यात येतात.  त्यामुळे अखेरपर्यंत कादंबरी चित्तथरारक प्रसंगांनी वाचकाला बांधून ठेवते.

कादंबरीचा शेवट लेखकाच्या वैचारिक दृष्टीच्या आणि कल्पनात्मक निर्मितीक्षमतेच्या उंचीचा प्रत्यय देणारा आहे. ज्या म्हातार्या कृष्णा घोड्याच्या मृत्यूने प्रारंभ होतो, त्याच कॉम्रेडच्या नव्या युगातील तरुण कार्यकर्त्यांचा पुन्हा जन्म होतो, असे मांडले आहे. ही मांडणीसुद्धा स्वप्न, अतिवास्तव आणि फ्यांटसीच्या वेगवेगळ्या परिमाणांनी अद्भुत झाली आहे.                  

माणसाच्या विचारविश्वाचा प्राण्यांनी केलेला स्वीकार, हे या कादंबरीचे गृहीत प्रतिपाद्य आहे. ते अत्यंत ताकदीने लेखकाने पेलले आहे. सत्य-अहिंसेपासून हिंसक दहशतवादापर्यंत. म्हणजे मानवी विचारविश्व आणि आचार-विचार यांचे शिवारातील प्राण्यांवर कलम केले आहे. यात प्राणी आणि मानव यांच्या  स्वभाववैशिष्ट्याचीही सरमिसळ झाली आहे. हे सगळे व्यक्त होते अर्थात भाषेत. पण ही भाषिक निर्मिती हीच या कादंबरीच्या कथनशैलीचे खरे सामर्थ्य आहे. मराठीतील प्राण्यांची नावे, पाळीव प्राणी आणि जंगली प्राणी, त्यांचे मनुष्यसदृश स्वभाव-हावभाव, ते आपले विचार, जगणे, दु:-आनंद, राग-संताप, हसणे-खिदळणे, प्रेम-प्रणय, मत्सर-द्वेष, हाजीहाजी-स्वाभिमान, लोभ-लंपटपणा, हत्या-बलात्कार हे सगळे उपलब्ध भाषेत कसे व्यक्त झाले आहे हे मुळातून पाहण्यासारखे आहे.  अशा अनेक वैचारिक, भावनिक, लैंगिक, राजकीय गमती भाषिक पातळीवर अनुभवण्यासाठी ही कादंबरी मुळातूनच वाचायला पाहिजे.
प्रमोद मुनघाटे

¦
(‘इंडियन अॅनिमल फार्मलेखक : प्रवीण दशरथ बांदेकर, शब्द पब्लिकेशन, मुंबई, मार्च 2019)

Thursday, 16 May 2019

सत्तेचं शहाणपण सांगणारी मानसं


2009 साली प्रदर्शित झालेल्या ‘Invictus’ या क्लिंट ईस्टवूड यांनी दिग्दर्शन व निर्मिती केलेल्या चित्रपटाबद्दल आज आपण जाणून घेऊ या. हा चित्रपट Playing the Enemy: Mandela and the Game that Made a Nation by John Carlin या पुस्तकावर आधारित आहे. विषय आहे दक्षिण आफ्रिकेतील पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी अंतर्गत यादवीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या देशाचे रग्बी खेळाच्या माध्यमातून कसे एकत्रीकरण केले. चित्रपट सुरू होतो तो पहिलाच शॉट या विषयाची स्पष्ट ओळख करून देतो. 

एका प्रशस्त मैदानावर फक्त गौरवर्णीय तरुण शाळकरी मुले रग्बीचा सराव करत आहेत. प्रशिक्षक त्यांना सूचना देत आहेत. त्या मैदानावरून कॅमेरा डावीकडे पॅन होत मैदानाबाजूच्या रस्त्यावरून पलीकडच्या एका मैदानात येतो. इथे सर्व कृष्णवर्णीय मुले फुटबॉल खेळत आहेत. त्यांना हिरवं गवताचं मैदान नाही, कुणी प्रशिक्षक नाही, अंगभर कपडे नाही, पायात धड चपला, बूट काहीच नाहीत. याउलट गौरवर्णीय मुले खेळाच्या गणवेशात खेळत होते. सोबत स्क्रीनवर लिहून येतंय साऊथ आफ्रिका, 11 फेब्रुवारी 1990.  या दोन मैदानांमधून एक रस्ता जातोय. त्या रस्त्यावरून काही गाड्यांचा ताफा जातोय. त्याकडे बघत सर्व कृष्णवर्णीय मुले कुंपणाच्या जाळीला लटकत ओरडत आहेत... मंडेला... मंडेला... हे बघून गौरवर्णीय मुले कुंपणाजवळ एकत्र येऊन गोंधळलेल्या नजरेने बघत आहेत. एक मुलगा प्रशिक्षकाला विचारतो हा काय प्रकार आहे. प्रशिक्षक सांगतात, तो आतंकवादी मंडेलाला आज सोडलाय, त्याला घेऊन जात आहेत. आजचा दिवस लक्षात ठेवा मुलांनो, आपला देश अशा कुत्र्यांच्या हातात जाणार आता. फक्त 72 सेकंदांच्या या संपूर्ण सीनमधून दिग्दर्शक तेव्हाच्या काळातील परिस्थितीची पूर्ण जाणीव प्रेक्षकांना करून देतो. प्रत्यक्षात यासाठी पुस्तकात कित्तेक पाने खर्ची घालावे लागले असतील. तरीही चित्रांसारखा अपेक्षित परिणाम होणार नाही. हे चित्रपट या माध्यमाचे वैशिष्ट्य आहे. हजार शब्दांचा आशय चित्रपटातील एका शॉटमध्ये अधिक प्रभावीपणे सांगता येऊ शकतो, तेही एकाही शब्दाचा वापर न करता. यापुढील दोन मिनिटे दहा सेकंदांच्या मोन्ताजमधून 11 फेब्रुवारी 1990 ते 10 मे 1994 एवढा काळ वृत्त सादरीकरणाच्या रचनेतून दाखवलेला आहे. आता तुम्ही कल्पना करू शकता, की हा चार वर्षांपेक्षा जास्त इतिहास सांगायला पुस्तकात किती पाने लागली असतील. चार हजार देशीविदेशी राजकीय नेत्यांच्या साक्षीने मंडेला राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतात या समारंभाने हा मोन्ताज संपतो.

आपल्याकडेही 26 मे 2014 ला असंच काही तरी झालं होतं. मात्र पुढच्या इतिहासात फार फरक आहे. सकाळी 4 वाजता मंडेला उठतात आणि फिरायला बाहेर पडतात या शॉट पासून खर्या अर्थाने चित्रपटाच्या कथेला सुरुवात होते. आधीचा भाग हा कथेची पार्श्वभूमी मांडणारी रचना होती. काल शपथ घेतल्यानंतर आज राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यालयात जाण्याचा त्यांचा पहिला दिवस आहे. आपल्या बॉडीगार्डसोबत सकाळी 4 वाजता फिरायला बाहेर पडून ते या दिवसाची सुरुवात करतात. फिरताना एक कार संशयास्पद पद्धतीने त्यांच्या मागेपुढे रस्त्यावर फिरत असते. त्या कारमधून वर्तमानपत्रांचे गठ्ठे बाहेर फेकले गेल्यानंतर संशय दूर होतो. उत्सुकता म्हणून सर्व बघतात तर आजची आठ कॉलम बातमी असते, ‘ते निवडणुका जिंकू शकतात, पण देश चालवू शकतील का?’ मंडेलांचा बॉडीगार्ड म्हणतो, तुम्ही अजून एकही दिवस राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केले नसताना ते असा प्रश्न कसा काय विचारू शकतात? त्यावर मंडेला उत्तर देतात, ‘पण त्यांचा प्रश्न रास्त (कायदेशीर) आहे.’ आता ही रचना मूळ पुस्तकात नाही. ही क्लिंट ईस्टवूड यांची दिग्दर्शक म्हणून खासियत आहे. ते आपल्या चित्रपटातील मुख्य पात्र नेमकं काय विचार करतं याचा अंदाज प्रेक्षकांना येऊ देत नाहीत. अशा रचनेतूनच ते आपल्या चित्रपटाच्या मुख्य पात्रांची उकल करतात. त्याचा अपेक्षित परिणाम प्रेक्षकांवर होतो. या सीनमुळे मंडेलांचं एक व्यापक आणि प्रामाणिक चित्र प्रेक्षकांच्या मनामध्ये तयार होतं. असे अनेक प्रसंग पुढे चित्रपटात आहेत जिथे प्रेक्षकांना अनपेक्षित उत्तरे मिळतात. ही तशी साधी भाषिक रचनाच आहे, परंतु तिचा दृश्यात्मक परिणाम खूप मोठा आहे. हे साहित्यात शक्य नाही. आज असा प्रश्न विचारण्याची सोयच जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीत नाही. मंडेलांसारखे प्रामाणिक उत्तर मिळणे तर खूप लांबची गोष्ट राहिली.

मंडेलानंतर दक्षिण आफ्रिकेच्या रग्बी टीमचा कॅप्टन फ्रॅकॉइस पियेनारची त्याच सकाळी ओळख करून दिली जाते. त्याचे वडील भीती व्यक्त करतात, की इतर आफ्रिकन देशांप्रमाणे इथेही आता अनागोंदी निर्माण होईल, कारण बहुसंख्य कृष्णवर्णीयांकडे सत्ता गेल्यामुळे अल्पसंख्याक गौरवर्णीयांवर अन्याय होईल. इतर सर्व देशातही अशीच भावना आहे. मंडेला पहिल्या दिवशी राष्ट्राध्यक्ष कार्यालयात जातात तर तिथे सर्व गोरे कामगार आपल्याला नोकरीवरून काढून टाकण्याच्या आधीच आपले सामान बांधून ठेवत जाण्याच्या तयारीत आहेत. मंडेला सर्वांना एकत्र बोलावून आश्वासन देतात की, त्यांनी त्यांचे काम सुरू ठेवावे. त्यांना कोणताही त्रास होणार नाही. ते मुद्दाम आपल्या सुरक्षारक्षकांमध्ये काळ्या आणि गोर्या बॉडीगार्डचा समावेश करतात. पुढे चित्रपट सरळ मूळ कथानकावर येतो. मंडेला दक्षिण आफ्रिकेची रग्बी टीम जी स्प्रिंगबोक्स या नावाने ओळखली जाते तिचा इंग्लंडसोबतचा सामना पाहण्यासाठी येतात. तिथे त्यांची फ्रॅकॉइस पियेनारशी रग्बी टीमचा कॅप्टन म्हणून हस्तांदोलन करताना पहिल्यांदा भेट होते. सामना पाहत असताना मंडेलांच्या लक्षात येतं. गोरे लोक स्प्रिंगबोक्सला समर्थन देत आहेत आणि काळे लोक इंग्लंडच्या बाजूने चीअर करत आहेत.

दक्षिण आफ्रिकेतील कृष्णवर्णीय लोकांच्या मनामध्ये गौरवर्णीयांबद्दल प्रचंड राग आहे. त्यांनी इतके दिवस केलेल्या कृष्णवर्णीयांवरील अन्यायाबद्दलची ही चीड आहे; परंतु आता ती परिस्थिती राहिली नाही. वर्णद्वेषाची लढाई आता संपली आहे. आता देशाला प्रगती करायची असेल, पुढे जायचे असेल तर सर्वांना एकत्र मिळून प्रयत्न करावे लागतील. कृष्णवर्णीयांनी आपल्यावरील अन्यायाचा बदला घ्यायचा ठरवले तर हे शक्य होणार नाही. मंडेला याच रग्बीच्या खेळाचा उपयोग करून देशाला आणि पर्यायाने काळ्या- गोर्या लोकांना एकत्र कसे आणतात हीच चित्रपटाची मूळ कथा आहे. मंडेला आणि पियेनार ही या कथेतील दोन मुख्य पात्रे. म्हणून मुख्य कथा या दोन पात्रांच्या भोवतीच गुंफलेली आहे.

मंडेला आणि पियेनार या दोन पात्रांची रचना एकमेकांना पूरक आहे. चित्रपटाच्या अपेक्षित परिणामांसाठी ही ठरून केलेली रचना आहे. मूळ पुस्तकामध्ये आणि वास्तवात ती नसेलही. मात्र चित्रपटाच्या कथानकापुरता यात काही बदल केला जातो. याला दिग्दर्शकीय स्वातंत्र्य असं म्हटलं जातं. चित्रपटाच्या कथानकात पात्रांची समांतर रचना करता येऊ शकते. मात्र साहित्यात समांतर रचना करता येईलच असे नाही. चित्रपटात मात्र ही सहज आणि प्रभावी रचना ठरते. म्हणून या समांतर पात्र रचनेचा वापर चित्रपटात खूप मोठ्या प्रमाणात केलेला दिसून येईल. मंडेला आणि पियेनार या दोन पात्रांच्या सहसंबंधातून कथासूत्र उलगडत राहतं. मंडेला आणि पियेनार यांच्या पहिल्या भेटीच्या सीनपासून मंडेला रग्बी विश्वचषक पियेनारला देताना शेवटच्या शॉटपर्यंत ही रचना कायम ठेवली आहे. मात्र चित्रपटाचे नायक म्हणून मुख्य भर मात्र मंडेला यांच्यावरच राहील अशा पद्धतीने चित्रण केले आहे. क्लिंट ईस्टवूड हे या कलेत माहीर आहेत. अनेक चरित्रात्मक चित्रपटांचा अनुभव त्यांच्याकडे आहे. त्यांची चरित्र रंगवण्याची स्वत:ची एक पद्धत आहे. मंडेलांचे पात्र ज्या पद्धतीने चित्रित केले आहे ते खूप प्रभावी व प्रेरणात्मक आहे. स्प्रिंगबोक्स इंग्लंडसोबतचा सामना खूप वाईट पद्धतीने हरली. यानिमित्ताने नॅशनल स्पोर्ट्स कौन्सिलमध्ये ही टीम बरखास्त करून या टीमचे नाव, कपड्यांचे रंग, बोधचिन्ह असे सर्वच बदलण्याचा निर्णय होतो. त्याची कुणकुण मंडेलांना लागते. हे थांबवण्यासाठी ते कार्यालयातून थेट बैठकीच्या ठिकाणी जाण्यासाठी निघतात. त्यांची सहकारी त्यांना सांगते हे चुकीचे आहे. कृष्णवर्णीयांच्या मनात या टीमबद्दल खूप द्वेष आहे. असं व्हावं ही लोकांचीच इच्छा आहे. तुम्ही यात पडू नका. तेव्हा मंडेला उत्तर देतात...

याबाबतीत लोकांचे हे विचार चुकीचे आहेत. त्यांनी निवडलेला लोकप्रतिनिधी म्हणून हे थांबवणे ही माझी जबाबदारी आहे.’ यावर सहकारी म्हणते, तुम्ही असे करून आपले राजकीय भविष्य पणाला लावत आहात. तुम्हाला याची भीती वाटत नाही का? मंडेला स्पष्टपणे उत्तर देतात, ज्या दिवशी मला अशी भीती वाटेल त्या दिवशी मी लोकांचे नेतृत्व करण्याच्या योग्यतेचा राहणार नाही. पुढे नॅशनल स्पोर्ट्स कौन्सिलमधील भाषणात ते सांगतात, गौरवर्णीयांनी आपल्यावर जो अन्याय केलाय त्याचा बदला घेण्याची ही वेळ नाही. ते या लोकशाही प्रक्रियेतील आपले सहकारी आहेत. ही आपण सर्वांनी मिळून राष्ट्रउभारणी करण्याची वेळ आहे, आपापसात लढण्याची नाही. ही  द्वेष भावना आता बाजूला ठेवा. तुम्ही मला आपला नेता निवडलं आहे, आता मला निर्णय करू द्या, असे स्पष्टपणे सुनावतात.
यासोबतच त्यांची देहबोली, सोबतच्या इतर माणसांशी त्यांची वागणूक, त्यांची कामाप्रति असलेली निष्ठा, कामातील प्रामाणिकपणा असे अनेक पदर खूप बारकाईने चित्रित केले आहेत. मंडेला आपल्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयात चहापानाचे निमंत्रण पियेनारला देतात. तो आपल्या कार्यालयात येतो तेव्हा त्याचे स्वागत करताना आपल्या खुर्चीतून उठून दरवाजाकडे जात म्हणतात... Frangois, what an honor. Thank you for coming all this way to see me. राष्ट्राध्यक्षांचे हे रूप पाहून पियेनार चकित होतो. त्याच्या चेहर्यावरचे हावभाव दिसतील अशा पद्धतीने हा शॉट घेतला आहे. मंडेला पियेनारसोबत नेतृत्वगुणांबद्दल चर्चा करतात. आपल्या तुरुंगातील अनुभवांबद्दल सांगतात. पुढील भेटीत त्याला स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली ‘INVICTUS’ ही कविता देतात. या भेटीचा खूप प्रभाव झालेल्या पियेनारला मंडेला ज्या तुरुंगात 18 वर्षे होते तिथे भेट देण्याची संधी मिळते. आपले दोन्ही हात लांबवून पियेनार त्या छोट्याशा खोलीचा अंदाज घेतो. त्या खोलीच्या खिडकीतून बाहेर बघतो तर त्याला बाहेर मैदानात दगड फोडणारे मंडेला दिसतात. त्या मैदानावर तो जातो तेव्हा मंडेला व त्याची नजरानजर होते. हे सर्व काल्पनिक आणि प्रतीकात्मक आहे. मात्र हे चित्र माध्यमात शक्य आहे. साहित्यात ही भेट घडवली तर एवढी प्रभावी ठरणार नाही. रग्बी विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या आधीच्या रात्री पियेनार हॉटेलच्या खिडकीतून स्टेडियमकडे पाहतोय तेव्हा तिथे त्याची पत्नी येते. त्याला विचारते, उद्याच्या अंतिम सामान्याबद्दल विचार करतोय का? तर तो म्हणतो, नाही. उद्या काय व्हायचे ते होईल. मी विचार करतोय की, एक माणूस तीस वर्षे तुरुंगातील एखाद्या छोट्याशा खोलीत कसा राहू शकतो आणि बाहेर येऊन त्या सर्वांना माफ करतो ज्यांनी त्याला उमेदीची तीस वर्षे तिथे डांबून ठेवलंय. अशी पात्ररचना आणि घटनांच्या कार्यकारणभावाची रचना करण्याचे रचनात्मक स्वातंत्र्य चित्रपट दिग्दर्शकाला असतं. त्याचा ते पुरेपूर उपयोग करतात. आपल्याला मंडेला माहीत आहेतच, परंतु जे मंडेला क्लिंट ईस्टवूड या चित्रपटातून आपल्याला दाखवतात ते पाहून आपण चकित होतो, प्रभावित होतो. ही या माध्यमाच्या रचनेची ताकद आहे. तिचा पुरेपूर वापर क्लिंट ईस्टवूड करतात.

अंतर्गत यादवी, वर्णद्वेष, वांशिक हिंसा अशा वातावरणात देशाचे नेतृत्व करणार्या मंडेलांनी सहज एका खेळाच्या माध्यमातून त्या देशाला वर्णद्वेषाच्या, हिंसाचाराच्या गर्तेतून बाहेर काढले. स्थिरता आणि शांततेतून विकासाकडे नेत नवी मूल्यव्यवस्था निर्माण केलेला देश घडवला. त्यासाठी प्रोपगंडाचा सकारात्मक वापर केला. यातून मंडेलांचे महानपण हा चित्रपट सिद्ध करतो. हा प्रवास पाहताना आपण विलक्षण प्रभावित होतो. त्यासोबतच आपल्या देशातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहून वाईटही वाटत राहतं. सध्या जे विद्वेषाचे वारे सर्वत्र वाहत आहेत त्यातून मंडेलांसारख्या नेतृत्वाची गरज कायम भासत राहते. मंडेलांचे सर्वसमावेशक राजकीय विचार, नेतृत्वगुण आणि ठाम, पण संयमी व्यक्तिमत्त्व यापुढे आताचे आपल्या देशातील नेतृत्व फारच खुजे वाटते.
- प्रा. संदीप गिऱ्हे
(संदीप गिऱ्हे हे, अहमदनगर येथील संज्ञापन अभ्यास विभाग, न्यू आर्ट्स, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेजमध्ये डिजिटल फिल्म मेकिंग या विषयाचे अध्ययन आणि अध्यापन करत असून जागतिक सिनेमा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.)

गो. मा. पवार : अभिरुचीचे भाष्यकार


दोनेएक आठवड्यांपूर्वी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे चिरंजीव प्रतापराव शिंदे यांच्या पत्नी लक्ष्मीबाई शिंदे यांचे हस्तलिखित वाचत होतो. त्या गो. मा. पवार सरांच्या सासूबाई. हस्तलिखिताच्या तपशिलाबाबत सरांना फोन केला. त्यांना उत्साह वाटला. दोन-तीन दिवसांनी ये म्हणाले. आपण सलग वाचून संपवूयात, म्हटले. त्याच दिवशी रात्री सरांना पक्षाघाताचा सौम्य धक्का आला आणि सर इस्पितळात दाखल झाले. आयसीयूमध्ये होते. नाकाला मास्क. तरीही बोलायची अनावर इच्छा; परंतु बोलता येत नव्हते. डोळ्यांच्या खुणावाटे घरी जाण्याची इच्छा व्यक्त करत होते. त्यांच्या चेहर्यावर पहिल्यांदाच इतकी हतबलता पाहत होतो. ध्वनीच जिथे गोठले, तिथे डोळ्यांचे काम चालेना. खूप काही सांगायचे होते. शरीर बांधलेले, परंतु ते बाहेर फेकत होते. खुणांनी कागद आणि पेन मागितला. हातांना कंप होता. पेनाने दोन-तीन वेळा त्यांनी काही तरी लिहिण्याचा प्रयत्न केला. एरवी अतिशय ठाशीवपणे कागदावर शब्द उमटविणार्या सरांना पेन आणि कागद दगा देत होता. जिवाच्या आकांताने लिहिण्याचा प्रयत्न करत होते; परंतु कागदावरून हात घरंगळत होता. असंबद्ध नागमोडी, वेडीवाकड्या रेषा, अक्षरांचे ठसे तेवढे उमटले. अर्थसंवाद तुटलेला. लौकिकाचा संबंध संथपणे संपवत  आल्यासारखी त्यांची भावस्थिती होती..

सोलापूरजवळील मोहोळ तालुक्यातील सीना नदीकाठचे नरखेड हे सरांचे गाव. वडील शिक्षक. एकत्र कुटुंब. वडिलांना आयुर्वेदाचे ज्ञान. लोकसंग्रह भरपूर. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सरांवर मोठा प्रभाव होता. पाचवीनंतर लहान भावंडासह सर सोलापुरात शिक्षणासाठी आले. हरिभाई देवकरण प्रशालेत त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. विनोदाची त्यांना लहानपणापासून आवड होती. सातवीत असतानासोलापूर समाचारमधून त्यांचे विनोदी चुटके प्रसिद्ध झाले. शाळेतील त्यांच्या कविता ऐकून द. रा. बेंद्रे यांनीपवार कविरायअसा उल्लेख केला होता. पुढे महाविद्यालयीन काळात त्यांच्या कवितावसंत’, ‘चेतनाया नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुण्यात गेले. एस. पी. कॉलेज व पुणे विद्यापीठातून बी.. व एम.. झाले. पु. . सहस्रबुद्धे, रा. श्री. जोग, रा. शं. वाळिंबे हे त्यांचे शिक्षक. एम..नंतर एखाद् वर्ष त्यांनी पुणे महापालिकेच्या जकात नाक्यावर लेखनिक म्हणून नोकरी केली. पन्नालाल सुराणा, सरोजिनी वैद्य, . वा. कुलकर्णी, वसंतराव बिडवे हे त्यांचे महाविद्यालयीन सहअध्यायी.

अमरावतीहून औरंगाबादच्या शासकीय आणि नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सर प्राध्यापक म्हणून रुजू झाले. औरंगाबादचा 19 वर्षांचा कार्यकाळ त्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा ठरला. अनंत भालेराव, भगवंतराव देशमुख, वा. . कुलकर्णी, नरेन्द्र चपळगावकर, भालचंद्र नेमाडे, सुधीर रसाळ.. ते पुढच्या पिढीतील विद्यार्थी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, चंद्रशेखर जहागीरदार, रवींद्र किंबहुने, भास्कर चंदनशिव अशा अनेकांशी आयुष्यभराचा स्नेह मराठवाड्यातच जुळला. मराठवाडा साहित्य परिषदेचे सरचिटणीस म्हणूनही सरांनी काम केले. वा. . कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखालीविनोदाचा औपपत्तिक विचारया विषयावर पीएच.डी. संपादन केली. त्यांच्या पीएच.डी. प्रबंधाचे परीक्षक होते डॉ. वि. भि. कोलते आणि पु. . देशपांडे!

1979 साली गो. मा. पवार सर शिवाजी विद्यापीठात नव्यानेच सुरू झालेल्या मराठी विभागाचे प्रमुख आणि प्राध्यापक म्हणून रुजू झाले. कोल्हापुरातील पंधराएक वर्षांच्या काळात त्यांनी हा विभाग नावारूपाला आणला. भाषा-साहित्याविषयीचे अनेक उपक्रम राबविले. साहित्याच्या सामाजिक दृष्टीने अभ्यासाची रुजुवात त्यांच्यामुळेच झाली. भालचंद्र नेमाडे, व्यंकटेश माडगूळकर, भाऊ पाध्ये, बाबुराव बागूल, यू. आर. अनंतमूर्ती, कमल देसाई, दि. पु. चित्रे यांसारख्या नामवंत मंडळींना सरांनी अभ्यागत फेलो म्हणून आमंत्रित केले. ‘मराठी साहित्य : प्रेरणा व स्वरूपहे त्यांनी घेतलेले चर्चासत्र तर महत्त्वपूर्ण ठरले. प्रा. . सु. पाटील यांच्या शब्दांत सांगायचे तर, ‘असे चर्चासत्र पुन्हा होणे नाही.’ या चर्चासत्रातील विचारांनी आधुनिक मराठी साहित्यचर्चेला नवे वळण मिळाले. साहित्य संशोधनाच्या क्षेत्रात सरांच्या अनेक विद्यार्थ्यांनी लौकिक मिळवला. एका चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी म. . हातकणंगलेकर म्हणाले होते, ‘संगीतात जशी घराणी असतात, तसे पवारांनी मराठी ज्ञानपरंपरेत आपले स्वत:चे एक घराणे विद्यार्थीरूपाने सुरू केले आहे.’ हे एका अर्थाने खरेच आहे. निवृत्तीनंतर पवार सर सोलापूर येथे स्थायिक झाले. अखेरपर्यंत लेखनकार्यात रममाण होते.

समाज प्रबोधन संस्थेसाठी लिहिलेलेविवेकनिष्ठ जीवनदृष्टी’ (1966) हे सरांचे पहिले पुस्तक. मानवी स्वातंत्र्याची इच्छा, समतेची जाणीव आणि भ्रातृभावाची भावना ही विवेकाशी निगडित असते, हे त्यांनी त्यात मांडले. त्यांचे आरंभिक लेखन हे अध्यापनाच्या गरजेतून निर्माण झालेले होते. ‘साहित्यमूल्य आणि अभिरुचीया संग्रहात त्यांचे प्रारंभिक लेखन समाविष्ट आहे. प्रस्थापित लेखकांच्या लोकप्रियतेचे दडपण त्यांच्यावर कधीच नसे. त्यामुळेच श्री. ना. पेंडसे, पु. . देशपांडे आणि वसंत कानेटकर यांचे साहित्य स्वप्नरंजनपर, एकसुरी व वाचकानुनय करणारे आहे, असा परखड विचार ते मांडू शकले.

गो. मा. पवार हे नेहमीच आधुनिक साहित्याचे पुरस्कर्ते राहिले. सकस, गुणवान लेखनाचे सामर्थ्यस्थळ तेवढ्याच हिरिरीने ते मांडत. रूढ वाटा टाळून लेखन करणार्या भालचंद्र नेमाडे, भाऊ पाध्ये, चारुता सागर, बाबूराव बागूल आदी लेखकांच्या साहित्यासंबंधी नवा विचार त्यांनी मांडला. भाऊ पाध्ये यांच्या लेखनातील नवनैतिकतेचे स्वरूप, मध्यमवर्गाचे खरेखुरे अंतर्भेदी चित्रण आणि शैलीतील अनुत्कटचे स्वरूप त्यांनी उलगडून दाखवले. सत्तर-ऐंशीच्या दशकातील वाङ्मयीन चळवळीचे ते समानधर्मी राहिले. वाङ्मयविषयक खुला आणि व्यापक दृष्टिकोन त्यांच्या लेखनात होता. त्यांनी नेहमीच गुणसंपन्न साहित्याची दखल घेतली. ग्रामीण संवेदनशीलतेसंबंधी व साहित्याच्या समाजशास्त्रासंबंधीचा मूलभूत विचार सरांनी मांडला. लेखकाची घडण, त्याचा मनपिंड, परिसर भूगोल आणि रूपतत्त्वे यातली मौलिकता त्यांनी स्पष्ट केली. बदलते जीवनभान आणि साहित्य यांतल्या परस्परनात्याचा शोध घेत साहित्याविषयीचे नवे आकलन त्यांनी मांडले. मराठीतल्या अनेक महत्त्वाच्या लेखकांची स्थाननिश्चिती केली. गंगाधर गाडगीळांच्या विनोदात्मक लेखनाचा आवाका तसेच व्यंकटेश माडगूळकरांच्या कथेतील दलित विद्रोही जाणिवेचे रूपदर्शन व देशीयतेची सखोल मीमांसा सरांनी केली आहे.

त्यांच्या सबंध लेखनात अभिरुचिविचाशला केंद्रीय स्थान आहे. लेखक आणि वाचकपक्षी असणार्या दुहेरी स्वरूपाच्या अभिरुचीचा विचार त्यांच्या बव्हंशी लेखनात आहे. वाङ्मयीन संस्कृतीतील अभिरुचिद्वंद्वाचे ध्वनी सतत त्यांच्या लेखनात आहेत. अभिरुचीतले खाचखळगे, संघर्ष आणि टकरावाची सखोल मीमांसा त्यांनी केली. समूह-अभिरुचीला शरण जाणारे लेखक आणि नवी अभिरुची घडवणारे लेखक यांच्यातल्या आंतरसंबंधाचे सुस्पष्ट असे चित्र त्यांच्या समीक्षेत आहे. अभिरुचिसंघर्षाचे मूळ बदलत्या सामाजिक-सांस्कृतिक वातावरणात व बदलत्या वाङ्मयविषयक जाणिवांत असल्याचे ते नमूद करतात. एका अर्थाने या काळातील मराठी वाचनसंस्कृतीचा नकाशा सुसंगतपणे त्यांच्या लेखनात आहे. ज्या काळात वर्णनपर, आस्वादपर समीक्षेची मराठीत लाट होती, त्या काळात साहित्यस्वरूपाचे मर्म ते व्यापक सामाजिक, सांस्कृतिक परिप्रेक्ष्यात उलगडून दाखवत होते. यामागे सरांची जीवनसंबद्ध भूमिका होतीच, पण त्यांचा साहित्याकलनाचा पेसही व्यापक होता.

मराठी तसेच भारतीय साहित्यात अपवादभूत ठरावे अशी त्यांची विनोदी वाङ्मयाची समीक्षा आहे. विनोदी वाङ्मयाची निर्मिती ते तिच्या स्वरूपासंबंधी त्यांनी विचार मांडला. विनोदात्मक वाङ्मयासंबंधी सैद्धान्तिक व उपयोजित लेखन केले. ‘विनोद : तत्त्व आणि स्वरूपआणिमराठी विनोद : विविध आविष्कार रूपेहे त्यांचे या विषयावरील महत्त्वाचे ग्रंथ. पाश्चात्त्य व भारतीय विनोद मीमांसेची वाट पुसत त्यांनी स्वत:चा नवा विचार मांडला. संकल्पनात्मक मांडणी तसेच मराठी विनोदी वाङ्मय परंपरा अधोरेखित केली. चक्रधर, संत तुकाराम, महर्षी शिंदे, चिं. वि. जोशी, पु. . देशपांडे, गंगाधर गाडगीळ ते राम नगरकरांच्या व एकंदरीत मराठी विनोदी वाङ्मय परंपरेचे स्वरूप निश्चित केले. चिं. वि. जोशी यांच्या साहित्यातील व्यापक समाज-संस्कृती चित्रणामुळे त्यांचा त्यांनी कादंबरीकार म्हणून केलेला उल्लेख महत्त्वाचा ठरतो.

महर्षी शिंदे यांच्या जीवनकार्याचा शोध हा सरांच्या संशोधनकार्यातील महत्त्वाचा टप्पा होय. त्यांच्यामुळे महर्षी शिंदे यांचे अप्रकाशित वाङ्मय उजेडात आले. महर्षींच्या कार्याविषयी जवळपास दहाहून अधिक ग्रंथ त्यांनी लिहिले. त्यासाठी अफाट आणि अचंबित करणारी संदर्भसाधने मिळवली. महर्षींच्या अनेक डायर्या, पत्रे, तत्कालीन वृत्तपत्रे, अहवाल, दुर्मीळ कागदपत्रे मिळवली. तौलनिक धर्मशास्त्राच्या अध्ययनासाठी महर्षी मँचेस्टर कॉलेज, ऑक्सफर्डला होते. पवार सर तिथे गेले. ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्यहा जवळपास सातशे पृष्ठांचा चरित्रग्रंथ सरांनी लिहिला. महर्षींच्या जीवनचरित्राबरोबर त्यांच्या कार्याचे असंख्य पैलू, धागेदोरे साधार उलगडून दाखवले. त्यामुळेच समाजसुधारकांबरोबर साक्षेपी विचारवंत, संशोधक, भाषाशास्त्रज्ञ व गुणसंपन्न लेखक म्हणून महर्षींच्या कार्याकडे महाराष्ट्राचे लक्ष वेधले गेले. प्रा. राम बापट यांनी या चरित्राबद्दल म्हटले आहे की, ‘महर्षींचे एवढे सविस्तर, सांगोपांग, समतोल, गौरवपर, त्याच वेळी तटस्थ आणि अस्सल साधनांवर आधारलेले हे मराठीतले पहिलेच चरित्र आहे.’ महर्षींच्या कार्याची थोरवी मांडत असताना महर्षींच्या व्यक्तिमत्त्वाचा, अंतरंग-भावदर्शनाचा खोलवरचा ठसा स्वाभाविकपणेच पवार सरांच्या जीवनदृष्टीवर पडला.

त्यांचे व्यक्तीविषयक लेखनसुहृद आणि संस्मरणेया लेखसंग्रहात समाविष्ट आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाला उंची प्राप्त होत असते व्यक्तींच्या कार्यामुळे, असे त्यांचे मत होते. मानवी संबंधातील हृदय अनुभवांनी स्वत:ला संपन्न केल्याची धन्यता त्यांच्या मनात निरंतर वसत असे. त्यामुळेच वडीलधार्या भगवंतराव देशमुख वा वा.. कुळकर्णी यांच्यावर जेवढ्या प्रेमभावाने ते लिहितात तेवढेच आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या रमेश ढावरे या सहकार्यावरनिरागस अंत:करणाचा जिव्हाळ्याचा सहकारीअसा लेख लिहितात. भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्यातील गुणवत्ता आणि सौंदर्यनिर्माणक परिकल्पना सांगण्याबरोबरच नेमाडे यांचेरात्रीच्या प्रहरी नीरव शांततेत त्यांचे सर्जनकार्य चालू असते आणि त्याचा त्यांच्या आनंदाचा स्रोत त्यांच्या अंत:करणात दडलेला असतोहेही ते आवर्जून नमूद करतात. त्यांच्या पत्नी सौ. सुजाता माई या महर्षींच्या नात. याचा त्यांना फार अभिमान आणि धन्यता वाटे. सुधीर रसाळ यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचेनवनीतमृदू आणि वज्रकठोर मित्रअसे केलेले वर्णन सार्थ असेच आहे.

जीवनातील प्रत्येक अवस्था ही आनंददायक असते. तसेच जीवन हे आनंदाने तुडुंब भरलेले आहे, हा अनुभव आपण पूर्ण क्षमतेने घ्यायला पाहिजे व त्यास अनुरूप अशी आपली मनोवृत्ती असली पाहिजे, या भूमिकेतून ते जीवनाकडे पाहत. व्यवसायावरची अपार निष्ठा, अखंड ज्ञानसाधना, मानवी नात्यांनी आलेली समृद्धता त्यांना महत्त्वाची वाटे. बौद्ध तत्त्वज्ञानातील ब्रह्मविहारातीलमुदिता’ (इतरांच्या सुखाने आनंद होणे.) या तत्त्वाचा अखंड ध्यास त्यांच्या मनात वसे. साक्षेपी समीक्षक, महर्षी शिंदे यांच्या जीवनकार्याचे  अभ्यासक आणि तळमळीच्या विद्यार्थिप्रिय शिक्षकाला महाराष्ट्र मुकला आहे.
- रणधीर शिंदे
(सौजन्य लोकसत्ता)

माणगाव परिषद : बहिष्कृतांचे रणशिंग - उत्तम कांबळे

'अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद ’ हा उत्तम कांबळे यांचा ग्रंथ ‘ लोकवाङ् ‌ मय गृह ’ तर्फे लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. एका ऐति...