‘लोकवाङ्मय गृह’ ही प्रकाशन संस्था गेल्या ५० वर्षांहूनही अधिक काळ मराठी साहित्य
क्षेत्रात कार्यरत आहे. या काळात विविध विषयांवरील जवळपास बाराशेहून अधिक पुस्तके
आम्ही प्रकाशित केली आहेत. आम्ही प्रकाशित केलेल्या पुस्तकांमध्ये विषयांचे
वैविध्य आहे. त्यात कथा-कादंबऱ्या आहेत, तसेच समीक्षा
ग्रंथही आहेत. इतिहास, तत्त्वज्ञान व राजकीय विचारधारेवरील
अनेक पुस्तके आहेत. दैनंदिन व्यवहारात उपयोगी पडणारी पुस्तकेदेखील आम्ही प्रकाशित
केली आहेत. कवितासंग्रहासारखा दुर्लक्षित व व्यावसायिकदृष्ट्या न परवडणारा
साहित्यप्रकार टिकवून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने अनेक नव्या व
चांगल्या कवींचे कवितासंग्रह आम्ही प्रकाशित केले आहेत.
पदवीचे शिक्षण मराठीतून घेणाऱ्या
विद्यार्थ्यांना दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून देण्याची योजना, तसेच एकोणिसाव्या व विसाव्या शतकातील वैचारिक साहित्य नव्या पिढीला पुनर्मुद्रित
स्वरूपात उपलब्ध करून देण्याची योजना यांद्वारे काही उत्तम पुस्तकांचे प्रकाशन
आम्ही आजवर केले आहे व भविष्यातही आणखी काही पुस्तके या योजनांमध्ये प्रकाशित
होणार आहेत. इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी यांच्या लेखनाचा मराठी अनुवाद हे
आमचे संकल्पित प्रकाशन आहे. ‘निवडक साहित्यमाला’ या मालिकेतील दहा पुस्तकांपैकी पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पुढील पाच
पुस्तके लवकरच प्रकाशित होतील.
‘प्रगतिशील विचारांशी
बांधिलकी’ हे आमचे व्रत आहे आणि ‘वाङ्मय’
हे ‘लोकवाङ्मय’ ठरावे,
अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे हे आमचे उद्दिष्ट आहे. ‘लोकवाङ्मय गृह’ हा एक साहित्यप्रेमी, पुस्तकप्रेमी लोकांचा मोठा परिवार आहे. यात आमचे लेखक, वाचक, पुस्तकविक्रेते यांच्याबरोबरच या ना त्या
प्रकारे, निरपेक्ष भावनेने ‘लोकवाङ्मय
गृहा’ला मदत करणाऱ्या अनेकांचा समावेश होतो. ‘लोकवाङ्मय गृहा’चे मासिक मुखपत्र असलेले ‘आपले वाङ्मय वृत्त’ हा या परिवाराला एकत्र गुंफणारा
धागा आहे. आपण वाचक असाल, विक्रेते असाल किंवा सहृदय
पुस्तकप्रेमी असाल, आपले या परिवारात स्वागत आहे.
No comments:
Post a Comment